• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

माझी ताई… २० लाख मुलींची आई!

- संतोष देशपांडे (विशेष लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 5, 2025
in भाष्य
0

जागतिक लोकसंख्या दिनी (वर्ल्ड पॉप्युलेशन डे) म्हणजेच ११ जुलै रोजी १९८१पासून दरवर्षी जागतिक स्तरावरचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अ‍ॅवॉर्ड) दिला जातो. दरवर्षी जगभरातून नामांकने मागवून एका व्यक्तीची आणि एका संस्थेची पुरस्कारासाठी निवड केली जाते. गेल्या चार दशकांत भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती जेआरडी टाटा या दोघांनाच हा पुरस्कार मिळाला होता. हेल्पेज इंडिया या संस्थेलाही या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. त्यानंतर ३० वर्षानंतर सातार्‍याच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या रूपाने एका मराठी महिलेला २०२५ सालचा पुरस्कार दिला गेला, ही अभिमानास्पद अशीच बाब आहे.
वर्षाताईंनी गेली ३५ वर्षे सामाजिक कार्याला वाहून घेतलं आहे. स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात देशभरात मोठा लढा उभा करणार्‍या, भारतीय स्त्रियांच्या सर्वस्तरीय प्रश्नांवर काम करणार्‍या वर्षाताईंना रोख पारितोषिक, सुवर्ण चिन्ह, विशेष सन्मानपत्र (डिप्लोमा) देऊन ११ जुलै २०२५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. वर्षाताईंचा भाऊ म्हणून मला व माझ्या पत्नीला विशेष अतिथी म्हणून हा पुरस्कार सोहळा पहिल्या रांगेत बसून पाहता आला. अनुराधा व प्रशांत खराडे, पी. एन. श्रेयस, प्रतुल गुलाटी हे कौटुंबिक स्नेही देखील कार्यक्रमास उपस्थित होते.
न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन म्हणजे जगाचा आर्थिक केंद्रबिंदू. तिथेच हडसन नदीच्या किनार्‍यावर संयुक्त राष्ट्रांची इमारत आहे. ११ जुलै २०२५ रोजी दुपारी २.२० वाजता वर्षाताईंसोबत आम्ही सर्व त्या भव्य सभागृहात पोहोचलो तेव्हा तिथे अनेक देशांचे प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रसंघाचे पदाधिकारी पूर्वनियोजित जागेवर स्थानापन्न होते. तीन ते चार असा एक तासाचा कार्यक्रम अगदी मिनिटाबरहुकूम आखला गेला होता. जागतिक स्तरावरच्या या कार्यक्रमात कोणी किती मिनिटे बोलायचे हे आधीच ठरवलेले असते. सहसा सर्व कामकाज व भाषणे इंग्रजीत असल्याने व वर्षाताईंना इंग्रजी उत्तम बोलता येत असल्याने ताईंनी आपण मराठीत भाषण करणार आहोत, हे सांगितल्यावर मला थोडे आश्चर्य वाटले, पण ताईंना मातृभाषेतून भावना नीट व्यक्त करता येतील असे त्यांच्या यूएनएफपीएमधील सहकारी अनुजा गुलाटी यांचे मत होते. ताईंच्या त्या मराठी बाण्याचे नंतर मोठे कौतुक होईल याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. आम्ही देशपांडे कुटुंबीय सीमाभागातील बेळगावचे असल्याने कट्टर मराठी अभिमान बाळगणारे आहोतच. आम्हा सर्व भावंडांचे शिक्षणही सरकारी मराठी शाळेत झाले आहे, आम्हाला इंग्रजी, हिंदी व कन्नडही तितकेच चांगले अवगत आहे. अर्थात आम्ही सर्वच स्वाभिमानी मराठी आहोत हे निर्विवाद. ताईंचा मराठीत बोलण्याचा आग्रह कोणतेच आढेवेढे न घेता संयोजकांनी मान्य केला, अर्थात रशियन, स्पॅनिश, प्रâेंच अशा अनेक भाषांतून हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने ताईंना भाषणाची प्रत आधी द्यावी लागली. अशा कार्यक्रमात सहसा एक पाश्चात्य ड्रेस कोड असतो. पण ताईने पुरस्कार घेताना साडी नेसणार असल्याचे आधीच सांगून टाकले. पुरस्कार घेताना ‘सारे जहां से अच्छा’ची धून वाजवायची विनंतीही मान्य झाली. पण ती कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करत नाही ना, हे त्यांनी तपासून घ्यायचे ठरवले हे विशेष उल्लेखनीय होते.
हा पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवण्यासाठी १६ देशांच्या प्रतिनिधींची एक विशेष समिती एप्रिलचा महिनाभर कार्यरत होती. जगभरातून संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातून नामांकने पाठवलेली होती, भारतातूनही नामांकने पाठवली गेली. त्यात वर्षाताईंचे नाव होते. वर्षाताईंकडे तेव्हा पासपोर्ट आणि अमेरिकेचा व्हिसा याची तयारी नव्हती. ते मिळवण्यासाठी काय काय दिव्य पार करावे लागले हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पुरस्कार स्वीकारताना वर्षाताईंच्या कामाविषयी एक छोटी चित्रफीत दाखवली गेली. त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोरून गेल्या कित्येक वर्षांपासून अव्याहत सुरू असलेला माझ्या बहिणीच्या संघर्षाचा पट उभा राहिला.
एकविसाव्या शतकात समस्त मानवजातीचा प्रवेश तंत्रज्ञानाचे महाद्वार उघडून झाला. वैद्यकीय तंत्रज्ञानही नवीन झेप घेत होते. सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफीसारखे तंत्रज्ञान लहान शहरातही उपलब्ध होऊ लागले होते. सोनोग्राफी तपासणी तर गरोदरपणाचा अविभाज्य भाग बनली होती. त्याचवेळेस सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा भारतात स्त्रीभ्रूण शोधून बेकायदा गर्भपात करण्यासाठी गैरवापर होऊ लागला आहे, असा धारवाड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनय कुलकर्णी यांचा लेख वर्षाताईच्या वाचनात आला. भारतात मुलगी नकोच अथवा निदान एकतरी मुलगा हवाच, असे समाजमन आहेच. ही स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे ताईंना जाणवले. तोवर सातारमध्ये स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारी म्हणून ताईंचे नाव झाले होते आणि तेथील पीसीपीएनडीटीच्या जिल्ह्यातील पर्यवेक्षक समितीत ताईंचा समावेश झाला. अशा समित्या आणि असे समावेश हे कागदी वाघ असतात, पण इथे मात्र ताईंनी मिळालेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर सुरू केला.
स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात १९८८ साली देशात महाराष्ट्र सरकारने सर्वप्रथम कायदा केला होता, पण असा काही कायदा आहे याची साधी माहितीही सरकारदफ्तरी अथवा आरोग्य खात्याला नसावी अशा प्रकारे गर्भातच मुली मारण्याचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता. समाजातही अगदी उघडपणे नसले तरी कुजबूज स्वरूपात हे माहीत होते. एकमेकांना ‘योग्य’ डॉक्टरकडे पाठवून देण्याचे कर्तव्य अनेकजण पार पाडत होते. आपला समाज दुतोंडी आहे. त्यामुळे, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडियोलॉजिस्ट, औषध विक्रेते, सोनोग्राफी मशीन विकणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्या, सरकारी यंत्रणा, अगदी ग्रामीण भागातल्या आरोग्यसेविका अशा जवळपास सरसकट सगळ्यांच्या संगनमताने आणि प्रत्येकाचा ‘कट’ पोहोचवत स्त्रीभ्रूण हत्येचा धंदा तेजीत होता. काही जिल्ह्यांत तर नवीन जन्मलेल्या हजार मुलांमागे फक्त पाचशे ते सहाशे मुली असे प्रमाण घसरले होते. लोकसंख्येतील स्त्री-पुरुषसंख्येचे निसर्गनियमित प्रमाण ढासळले. या देशातील एक संपूर्ण पिढी ‘मुलगा हवाच’ या हव्यासापोटी असमतोल लैंगिक गुणोत्तरात ढकलली गेली, ज्याने भविष्यात संपूर्ण सामाजिक समतोलच ढासळणार होता. इकडे वर्षाताई मात्र सुशिक्षित पांढरपेशा वैद्यकीय व्यवसायाला कलंक असणार्‍या कसाई डॉक्टरांचा थरकाप उडवणारी रणचंडिका बनली होती. कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, बीड, जिथे कोठे डॉक्टर स्त्रीभ्रूण हत्या करतो असे समजायचे, तिथे वर्षाताई आपले कार्यकर्ते घेऊन तळ ठोकायची. सामाजिक भान असलेल्या एखाद्या गरोदर मैत्रिणीला ताई नकली गिर्‍हाईक म्हणून ऑपरेशनसाठी तयार करायची. तिच्या नवर्‍याला, घरच्यांना तयार करणे इतके सोपे नसायचे. ताईंचे सैन्य म्हणजे या गरोदर मैत्रिणी. या ‘डेकॉय’चे घरचे सदस्य म्हणून वेष बदलून जाणारे अ‍ॅड. शैला जाधव आणि कैलास जाधव. जेव्हा स्मार्टफोन नव्हता, सीसीटीव्ही नव्हते, टिकलीएवढे कॅमेरे नव्हते, एखाद्याच्या नकळत त्याचे शूटिंग करणे अशक्य होते अशा काळात वर्षाताईंनी डेकॉय ऑपरेशन आखले. स्त्रीभ्रूण हत्या करणार्‍या अगणित डॉक्टर्सचे गुन्हे कॅमेर्‍यात कैद केले. ताई आणि तिचे कार्यकर्ते भ्रूणहत्या रोखण्यासाठी झपाटलेले होते, पण व्यवस्था भ्रष्ट होती. समोरून पैशांचे आमिष यायचे, खोट्या केसेस टाकणे, धमक्या देणे, बदनामीकारक बातम्या छापणे; राजकीय दबाव तर नेहमीच. पण असे सर्व प्रकार ताईने सोसले. गेल्या पस्तीस वर्षांत शेकडो मानसन्मान आणि त्याहून जास्त दूषणे घेत ताईचे काम सुरूच आहे.
सरकारला हळूहळू का होईना, पण जाग येत होती. या सर्वाच्या मुळाशी सोनोग्राफी मशीनचा दुरुपयोग आहे हे ओळखून केंद्र सरकारने त्यावर देखरेख करणारी एक केंद्रीय पर्यवेक्षक समिती बनवली आणि त्यात ताईंचा समावेश केला. गेली दोन दशके वर्षाताई त्या समितीचे सुकाणू सांभाळते आहे. डेकॉय ऑपरेशन, डॉक्टरांना जेलमध्ये पाठवणे हे तात्पुरते उपाय आहेत, तर प्रशासन आणि समाज संवेदनशील होणे हे ठोस उपाय आहेत हे ताईंचे सुरुवातीपासून मत होते. मुलगा आणि मुलगी एकसमान आहेत अशी सामाजिक भावना निर्माण होणे गरजेचे होते. ताईने मग देशभरातून प्रशासन, पोलीस, न्यायाधीश यांच्या हजारो कार्यशाळा घेतल्या.
वर्षाताईंनी एकट्याने हे काम उभे केले असे त्या कधीच म्हणत नाहीत. संयुक्त राष्ट्रांत केलेल्या भाषणातही त्यांनी सहकार्‍यांचे योगदान मान्य केले. इतकेच नव्हे तर ज्या गरोदर मातांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये मदत केली, त्यांनाच तो पुरस्कार ताईंनी अर्पण केला. स्वत:च्या गरोदरपणात सामाजिक भान ठेवून डॉक्टरचे कृष्णकृत्य पकडण्यासाठी उतरणार्‍या त्या मातांचा तो अधिकारच आहे. ताईंना सावलीसारखी ३० वर्षे साथ देणारे अ‍ॅड. शैला जाधव आणि वैâलास जाधव, यूएनएफपीएच्या अनुजा गुलाटी, गर्ल्स काऊन्टचे रिझवान, साबू जॉर्ज, उच्च न्यायालयातील वकील डॉ. अ‍ॅड. उदय वारुंजीकर अशी एक फळी सतत एकत्रित काम करत होती. ताईंचे पती प्रा. संजीव बोंडे हे सुरुवातीपासून या चळवळीशी जोडलेले असल्यामुळे ताईंनी पूर्ण वेळ सामाजिक काम करावे, हा त्यांचाच आग्रह. ताईंची मुलगी अ‍ॅड. चैत्रा, जी आता स्वतःदेखील तंबाखूजन्य पदार्थांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते आहे, तिने तर लहानपणापासून आपली आई जगावेगळे काम करते हे समजून घेतले. ताईंच्या पाठीवरची बहीण डॉ. मेघा देशपांडे (एमडी) हिचा ताईला फार मोठा मानसिक आधार आहे. ताईंना सतत सकारात्मक उर्जा देण्याचे काम तिचेच. माझी धाकटी बहीण सातारलाच असल्याने तिचा ताईच्या कामात सक्रिय सहभाग आहे. एखाद्या बॅकस्टेज आर्टिस्टसारखी रूपाताई शांतपणे बराच व्याप सांभाळून घेते. माझे नवी मुंबईतले घर हे ताईंचे मुंबईचे मुख्यालय म्हटले तर वावगे ठरू नये. मंत्रालय, उच्च न्यायालय, विमानतळ येथे ताईंची सतत ये-जा असल्याने तिचे अचानक घरी येणे माझ्या पत्नीला निशाला सवयीचे झाले होते. आम्हा संपूर्ण कुटुंबीयांचा आधारवड म्हणजे माझी नव्वदीतली आई. आई ज्या शाळेत शिक्षिका होती, तिथेच सर्व बहिणींचे प्राथमिक शिक्षण झालेले आहे. आमचे वडील मी १३ वर्षाचा असताना व ताई २० वर्षाची असताना अचानक वारले. त्यानंतर आईने सर्वांचे शिक्षण व करीयर उभे केले. हे सांगण्याचा हेतू इतकाच की एखाद्या व्यक्तीने समाजासाठी पूर्णवेळ काम करावे, असे वाटत असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला सामावून घेणारी पोषक कुटुंबव्यवस्था असावी लागते. पूर्ण वेळ समाजकार्य एखादी नोकरी अथवा व्यवसाय करण्याइतकेच श्रेष्ठ आहे, ही भावना आधी कुटुंबाने व मग समाजाने बाळगली तरच असे काम करणारे कार्यकर्ते निर्माण होतील.
ताईने पीसीपीएनडीटी कायदा प्रभावीपणे देशभर राबवून ५०हून अधिक डेकॉय ऑपरेशन करून भ्रूणहत्या करणार्‍या डॉक्टरांना धडकी भरवली. या कायद्याबाबत पोलीस, न्यायाधीश, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे देशभरात प्रशिक्षण घेतले. ३५ वर्षे देशभर पदरमोड करून ती फिरत होती. तिला पुरेसा प्रवासखर्च देखील मिळायचा नाही, पण ती सगळीकडे जायची. तिच्या या आर्थिक बेशिस्तीवरून माझे व तिचे बरेचदा वाद व्हायचे, मग ती तोंडदेखले सगळे पटले असे म्हणायची, पण ती बदलली नाही.
खेडोपाडी जाऊन महिलांना स्त्रीगर्भ पाडणार नाही अशी शपथ घ्यायला लावणे हा ताईचा आवडता कार्यक्रम. बायका भाबड्या असतात आणि एकदा तरी शपथ दिली की त्या ती पाळतात अशी ताईंची ठाम समजूत आहे. इतक्या सोप्या कृतीतून मुलींचा जन्मदर वाढवणे ताईला जमते, पण सरकारला मात्र शेकडो कोटींचा चुराडा करून ते साध्य होत नाही हे वास्तव आहे. मुलींचा जन्म साजरा करायचे ती जाहीर कार्यक्रम करते. एका मुलीवर थांबलेल्या पालकांचा जाहीर सत्कार करते. पण ताईचे काम इतकेच नाही, ते विविध क्षेत्रांत आहे.
सातारा जिल्ह्यातील दारूबंदी चळवळीची मुहूर्तमेढ ताईंनी केली आहे. जिल्ह्यात बेकायदा गावठी दारू मिळत नाही असे विधान जिल्हाधिकार्‍यांकडून आल्यानंतर ताईने सबंध जिल्ह्यातील गावठी दारूच्या अड्ड्यांवर हल्ला चढवून त्यात जप्त केलेली शेकडो लिटर दारू जिल्हाधिकार्‍याला मिरवणुकीने गाजत वाजत नेऊन भेट दिली होती.
डेकॉय ऑपरेशनमध्ये जे पैसे डॉक्टरला दिले जातात त्याचे नंबर आधी पंचांसमोर नोंदवले जातात व त्याच नंबरच्या नोटा असतील, तरच तो पुरावा म्हणून मान्य ठरतो. एका डॉक्टरने तर पकडले गेल्यानंतर झटकन नोटा खाल्ल्या. ताईने त्याच्या कानशिलात लगावून त्याच्या तोंडात हात घालून नोटा काढून घेतल्या. बीडच्या सुदाम मुंडे या नराधम डॉक्टरने दिवसाला पन्नास मुली मारण्याचा कारखानाच उघडला होता. बीड जिल्ह्यातील राजकीय वरदहस्त असलेल्या सुदाम मुंडेला पकडण्यासाठी ताईने दोनदा अयशस्वी प्रयत्न केले होते आणि एकदा तर ते त्यांच्या जिवावर बेतले होते हे फक्त ताईच्या जवळच्या व्यक्तींना माहिती आहे. ती बीडला निघाली की सारे घरदार चिंतेत असायचे. सुदाम मुंडेला रंगेहात पकडायचे अशी जणू प्रतिज्ञा ताईने केली होती. त्याला अटक झाल्यानंतर एकदा आर. आर. पाटील यांनी ताईंना बोलावून घेतले व बळे बळेच एक सशस्त्र अंगरक्षक दिला. काही महिन्यानी अंगरक्षक पुरवण्याचे पैसे पोलीस खात्याने मागितल्यावर ताईंनी ती सुरक्षा नाकारली. स्त्रीभ्रूणहत्येत आर्थिक हितसंबंध असलेल्यांनी ताईंवर अनेक ठिकाणी खोट्या फौजदारी केसेस टाकल्या होत्या. आर. आर. आबांनी यातील बहुतांश खोट्या केसेस रद्द केल्या. सातारा जिल्हा बँकेने फक्त पुरुषांनी नोकरीसाठी अर्ज करावा अशी जाहिरात दिल्यावर ताईने आंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून ताईच्या गाडीवर हल्ला झाला होता.
खरे तर ताईंच्या आयुष्यात प्रत्येक दिवस नाट्यमय घटनांनी भरलेला आहे. ताईंचे नाव व काम किती मोठे आहे हे पाहायचे तर दर सोमवारी सातारा येथील मुक्तांगण कार्यालयातून ताई मोफत कायदा सल्ला केंद्र चालवते त्याला एकदा आवर्जून भेट द्यावी. पहाटेपासून गरजूंच्या तिथे रांगा लागतात. कित्येक घरगुती वाद, जागेचे वाद, नवरा बायकोंची भांडणे यावर ताई तिथे मोफत कायदेशीर सल्ला देते. मोफत शिक्षण, मोफत आरोग्य यांच्याइतकाच मोफत कायदेशीर सल्ला गरीबाला गरजेचा आहे असे ताईंचे मत आहे. ताई शक्य असेल तितकी प्रकरणे अधिकारवाणीने, सामोपचाराने सोडवते. कित्येकदा आमदार, खासदार, कलेक्टर यांनी त्यांचे घरगुती वाद, तंटा प्रकरणे सामोपचाराने मिटावीत म्हणून ताईंची मदत घेतली आहे. ताईंनी अगदी राजकीय पुढार्‍यांच्या घरात होणारे घटस्फोट, त्या घरची भांडणे थांबवली आहेत. कित्येक गावांत ताईंनी शेकडो बचत गट उभे केले आहेत. बीड येथील शिरूर कासारमधले ताईंचे कार्यालय कायम गजबजलेले असायचे. लोकांना आरोग्य उपचार मिळवून देणे असो, नाहीतर कामधंदा नोकरी मिळवून देणे असो, ताई कायम मदतीसाठी तत्पर.
ताईंच्या आयुष्यातले अनेक प्रसंग, कामे कधी लिहिली गेली नाहीत, त्याची नोंद नाही म्हणूनच त्याचे एकत्रित प्रतिबिंब असा एक मोठा पुरस्कार तिला मिळाला असावा. स्त्रियाच्या प्रश्नांपलीकडेही ताईंचे बरेच काम आहे. मुंबईमध्ये एकदा पहाटे ताई बर्‍याचजणांना सोबत घेऊन माझ्या घरी आली. अर्थात तिने असे अचानक १०-२० जणांना घेऊन घरी येणे आम्हा कुटुंबीयाना सवयीचे आहे. पाचगणी पठारावरचे अनेक घोडेवाले घेऊन ताई आली होती. त्यांना त्या पठारावर घोडे चालविण्यासाठी अचानक मनाई हुकूम आला होता. तो प्रश्न घेऊन ती न्यायालयीन लढाईला उतरली. आज देखील त्या पठारावर घोड्याची रपेट पर्यटकांना मिळते ती ताईंमुळे. माथेरानचे नगराध्यक्ष मनोज खेडकर ताईंना भेटायला आले असता माथेरानला एस.टी.ची सोय नाही हे त्यांनी सांगितले. पुढच्या महिन्याभरात ताई व मनोज खेडकर यांनी ती एस.टी. सुरू केली. टॅक्सीचा धंदा बसेल या अपप्रचाराला बळी पडून पहिल्याच दिवशी ती एस.टी. जाळली गेल्यावर ताईने तत्कालीन एस.टी. परिवहनचे आयएएस अधिकारी ओमप्रकाश व कोकणेच आयजी पाठक यांची मदत घेऊन पोलीस बंदोबस्तात एस.टी. परत चालू करण्यासाठी मदत केली याचे साक्षीदार मी व मनोज खेडकर आहोत. आज देखील ती एसटी सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील शंभरहून अधिक बालविवाह ताईने रोखले. त्या मुलींना शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. ताईने राष्ट्रीय पारितोषिक विजेते लघुपट बनवले आणि त्यात अभिनयही केला. ताईंनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सक्रिय भाग घेतला. शेतकरी बांधवाना विजय मिळणारच याची ताईंना खात्री होती. घरच्या स्त्रीचे नाव सातबाराला लावण्यासाठी अभियान राबवले. कोयना पूरग्रस्तांसाठी ताई धावून गेली. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ताईने जेवण, शिधावाटप, आरोग्य मदत अव्याहत सुरू ठेवले. त्यातून ताईंना कोरोना देखील होऊन गेला, पण ताई कोरोनावर मात करून काम करत राहिल्या. ताई दरवर्षी ३ जानेवारीला सातारा येथे सावित्रीबाई पुरस्कार कार्यक्रम घेते. अनेकांना यातून सन्मानित केले जाते.
भाषणातील ताकत, कामाचा आवाका, विचारांशी बांधिलकी, स्फटिकासारखे निर्मळ मन हे ताईमध्ये एकवटले आहे. शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट कार्यक्रम, फिल्मी कार्यक्रम, देवळातील उत्सव, भजन समारंभ, जत्रा, हळदी कुंकू असे कोणतेही आमंत्रण आले की ताई स्वीकारते, त्याचे कारण एकच असते मुली वाचल्या पाहिजेत. स्त्रीला सन्मानाने जगता आले पाहिजे.
संग तसा जुना आहे. ‘दि इकॉनॉमिस्ट’ या इंग्लंडमधील मासिकाचा मुलाखतकार माझ्या घरी ताईंची मुलाखत घेत होता. मुलाखत आटोपली आणि चहा घेत अनौपचारिक गप्पा सुरू असताना त्याने ताईंना एक माहिती दिली. त्याच्या माहितीनुसार ताईंच्या कामाने त्या दशकभरात २० लाख स्त्रीभ्रूणहत्या रोखल्या गेल्या आणि तो सहज म्हणाला की, यू आर ट्रू मदर ऑफ दोज २० लाख डॉटर्स…
आज युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड या अगणित मुलींच्या मातेला मिळणे आणि ती माझी सख्खी मोठी बहीण असणे याहून जास्त अभिमानास्पद काय असू शकते?

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

फुल्या फुल्या आप्पा

Next Post

फुल्या फुल्या आप्पा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.