• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘रूट’ त्याचा वेगळा!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 5, 2025
in खेळियाड
0

जो रूटने एकेक शिखरे सर केली आहेत. आता फक्त कसोटी क्रिकेटमधील माऊंट एव्हरेस्ट त्याला साद घालते आहे. ३४ वर्षांच्या रूटची कारकीर्द ट्वेंटी-२० क्रिकेटच्या भाऊगर्दीत हरवत नाही. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची फलंदाजीची नजाकत ठळकपणे लक्षात राहते, तसेच त्याचे नेतृत्वगुणही लक्षात राहतात.
– – –

आयपीएल, देशोदेशीच्या लीग आणि द्विराष्ट्रीय मालिका अशी वर्षभराची ट्वेंटी-२० क्रिकेटची रेलचेल जागतिक क्रिकेटमध्ये असतानाही इंग्लंडचा फलंदाज जो रूट याचे वेगळेपण दिमाखात सिद्ध होते. आधुनिक क्रिकेटमधील कसोटी आणि एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. ट्वेंटी-२० क्रिकेटचे आक्रमण त्याच्या फलंदाजीच्या शैलीत नाही. पण दीर्घकालीन क्रिकेटसाठी आवश्यक असे खास काहीतरी त्याच्याकडे आहे. फलंदाजीचे दर्जेदार तंत्र, अलौकिक सातत्य आणि धावांची अविरत भूक. ताजेच उदाहरण द्यायचे तर ओल्ड ट्रॅफर्डवरील भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीमधील त्याच्या दीडशे धावांच्या झुंजार खेळीचे देता येईल. या खेळीदरम्यान रूटने राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग आणि जॅक कॅलिस यांच्यासारख्या तीन दिग्गज फलंदाजांना मागे टाकले. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या पंक्तीत दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा (१५,९२१ धावा) विक्रम त्याला साद घालतो आहे. हे अंतर जवळपास अडीच हजार धावांचे आहे. ते पार करण्यासाठी त्याला आणखी किमान ४० सामने खेळावे लागतील. रूट सचिनला सहज मागे टाकू शकतो, असा विश्वास पॉन्टिंगने व्यक्त केला आहे, तर रूटने अग्रस्थानाकडे वाटचाल सुरू केली आहे, असे त्याचा सहकारी ऑली पोप म्हणतो. रूटचे हे ३८वे शतक. संगकाराची बरोबरी साधणार्‍या रूटला शतकवीरांच्या यादीत अग्रस्थान मिळवण्यासाठी पॉन्टिंग (४१), कॅलिस (४५) आणि सचिन (५१) हे अडथळे ओलांडावे लागतील.
इंग्लंडच्या कसोटी संघाचा रूट हा प्रमुख आधारस्तंभ आहे. हे स्पष्ट होण्यासाठी त्याची सध्याची कामगिरी पुरेशी आहे. तो ‘आयसीसी’च्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे, तर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या मागील टप्प्यात (२०२३-२५) त्याच्या खात्यावर सर्वाधिक विक्रमी १,९६८ धावा जमा होत्या. यात सात शतकांचाही समावेश होता. म्हणूनच इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स रूटला सार्वकालिक सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणतो. जगाला क्रिकेट शिकवणार्‍या इंग्लंडने २०१९मध्ये प्रथमच प्रतिष्ठेच्या एकदिवसीय विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. त्यावेळी इंग्लंडकडून सर्वाधिक धावा रूटच्याच खात्यावर होत्या.
रूट यॉर्कशायर कौंटी संघाशी नाते सांगतो. शेफील्ड शहरातील डोरेचा तो निवासी. त्याचे वडील मॅट यांनीच त्याच्यात क्रिकेटची आवड रुजवली. त्याचा भाऊ बिलीसुद्धा ग्लॅमॉर्गनचे प्रतिनिधीत्व करतो. यॉर्कशायरकडून खेळणारा इंग्लंडचा माजी फलंदाज आणि कर्णधार मायकेल वॉनने रूटच्या जडणघडणीच्या वयात मोलाचे पाठबळ दिले. उजव्या हाती फलंदाजी करणारा रूट हा मूलत: एक सलामीवीर. पण इंग्लंडसाठी तो बहुतांश क्रिकेट मधल्या फळीत खेळला. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज. कसोटीप्रमाणेच इंग्लंडसाठीची सर्वाधिक एकदिवसीय शतकेही (१८) त्याच्याच नावावर आहेत. जून २०२२मध्ये तो १० हजार कसोटी धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंडचा दुसरा आणि एकंदर १४वा फलंदाज ठरला. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये दोन सर्वोच्च भागीदार्‍याही त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. त्याने चौथ्या गड्यासाठी हॅरी ब्रूकसोबत ४५४ धावांची, तर १०व्या गड्यासाठी जेम्स अँडरसनच्या साथीने १९८ धावांची भागीदारी रचली होती. लॉर्डसवर सर्वाधिक आठ शतकांचा विक्रमही फक्त रूटने साकारला आहे.

भारतीय उपखंडात प्रभावी; पण…

रूटच्या कामगिरीचे पृथक्करण केल्यास १३,४०९ धावांपैकी ७,१९५ धावा आणि ३८ शतकांपैकी २३ शतके इंग्लंडमध्ये साकारली आहेत. भारत हा त्याचा आवडता प्रतिस्पर्धी. त्याची १२ शतके आणि १२ अर्धशतकांसह ३४ सामन्यांमध्ये ५९.०७च्या सरासरीने सर्वाधिक ३,२४९ धावांची पुंजी भारताविरुद्धच. पण इतक्याच सामन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची कामगिरी तितकी आकर्षक नाही. म्हणूनच क्वचितप्रसंगी तो टीकेचा धनीही ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ४०.४६च्या सरासरीने २,४२८ धावा केल्या आहेत. यात फक्त चार शतकांचा समावेश आहे. पण रूटची ऑस्ट्रेलियातील कामगिरी आणखी निराशाजनक आहे. या कट्टर प्रतिस्पर्धी देशात त्याला एकदाही शतक झळकावता आलेले नाही आणि तिथे त्याची सरासरी फक्त ३५.६८ आहे. तसेच १८ वेळा त्याला अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात अपयश आले आहे. भारतीय उपखंडातील राष्ट्रांविरुद्ध (भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका) रूटची सरासरी ५६.५८ धावा इतकी आहे. यात २० शतकांचा समावेश आहे. तर ‘सेना’ राष्ट्रांविरुद्ध (ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका) त्याची सरासरी ४६.६५ धावा अशी असून, यात फक्त १२ शतके नोंदवली आहेत. इंग्लिश फलंदाजांचा खरा कस हा भारतीय उपखंडातील फिरकीविरुद्धच लागतो. त्यामुळे रूटचे मोठेपण अधोरेखित होते. ‘आयसीसी’ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा त्यानेच काढल्या आहेत. याश्िावाय या स्पर्धेत एक हजारहून अधिक धावा करणारा तो एकमेव इंग्लिश खेळाडू आहे. कामचलाऊ ऑफ-स्पिन गोलंदाजी हे रूटचे वैशिष्ट्य आहे. कसोटीत ७३ (२१ भारतात) आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८ बळीसुद्धा त्याने मिळवले आहेत. कसोटीत रूट विशेषत: पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतो, नव्हे ही त्याची खासियत आहे. आजमितीला सर्वाधिक कसोटी झेल (२१२) रूटच्याच नावावर आहेत.

यशस्वी इंग्लिश कर्णधार

इंग्लंडच्या क्रिकेटची परंपरा यशस्वीपणे चालू राखणारा खेळाडू ही रूटची आणखी एक ओळख. ती कसोटी क्रिकेटमध्ये प्रकर्षाने दिसून येते. फेब्रुवारी २०१७ ते एप्रिल २०२२ या कालावधीत त्याने कसोटी नेतृत्वाची छाप पाडली. ४२.१८ टक्के विजयाची टक्केवारी राखून सर्वाधिक ६४ सामन्यांत नेतृत्व आणि सर्वाधिक २७ सामन्यांत विजय त्याने प्राप्त केले. त्याच्या यशस्वी नेतृत्वात फलंदाजीच्या कौशल्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. २०२१ हे त्याच्या कारकीर्दीतील संस्मरणीय वर्ष. इंग्लंडचा कर्णधार म्हणून कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा त्याने या वर्षी काढल्या. याच वर्षी ‘आयसीसी’चा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार त्याने पटकावला. हा धावांचा प्रवाह अजूनही आटलेला नाही. शांत स्वभाव, खिलाडूवृत्ती आणि समर्पण भावना या बळावर संघातील अन्य खेळाडू आणि प्रतिस्पर्धी खेळाडूही रूटकडे आदराने पाहतात. २०२१-२२मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियातील अ‍ॅशेस मालिका ०-४ अशा मानहानीकारक फरकासह गमावली आणि रूटच्या नेतृत्वापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. परिस्थितीचा आदर राखून रूटने कर्णधारपद सोडले, तर ख्रिस सिल्वरवूडची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. ‘माझ्या कारकीर्दीतील हा सर्वात आव्हानात्मक निर्णय होता. परंतु माझ्या कुटुंबाशी आणि मार्गदर्शकांशी चर्चा केल्यानंतर ही योग्य वेळ असल्याची खात्री पटली,’ असे रूटने त्यावेळी म्हटले होते.
मे २०२२पासून इंग्लिश कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅझबॉल’ युगाचा प्रारंभ झाला. ‘बॅझ’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅकलमने मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत इंग्लंडच्या क्रिकेटला नवे आक्रमक रूप दिले. या कालखंडात बेन स्टोक्सकडे नेतृत्व सोपवण्यात आले. पण या युगातही रूटचे महत्त्व टिकून आहे. २०१९पासून गेली सहा वर्षे तो आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटच्या हाणामारीपासून दूर आहे.
‘आयपीएल’च्या धावोत्सवातही तो रमला नाही. फार उशिराने म्हणजे २०२३मध्ये राजस्थान रॉयल्सने एक कोटी रुपये मानधन देत रूटला संघात स्थान दिले. पण तीन सामन्यांत फक्त १४ धावा काढणारा रूट पुन्हा ह्या मैदानात दिसला नाही. पण तो उतला नाही, मातला नाही; घेतला वसा टाकला नाही. म्हणूनच त्याचे वेगळेपण सिद्ध होते.

[email protected]

Previous Post

मय मेरा बार नहीं दूँगा!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.