– डॉ. अंजली मुळके
काल रात्री क्लिनिकचं काम आवरून घरी आले. घरी येऊन टेकले नाही तो मोबाईल वर नोटीफिकेशनची टोन वाजली. मी मेसेज बघितला. मला ‘मंत्रालयातून’ मेसेज आला होता. त्यांनी मला व्यक्तिगत संदेश पाठवून सतर्क, सावध केलं होतं.ते म्हणाले की पुढच्या ३-४ तासांत मुंबई शहर आणि उपनगराच्या भागात
वादळी वारा..
मेघ गर्जना…
विजांचा कडकडाट..
या सगळ्यांना घेऊन,
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे… या सगळ्यांपासून त्यांनी मला सतर्क राहायला सांगितलं होतं!
मी मेसेज वाचून मनातल्या मनात म्हटलं, ‘बरं झालं बाई.. थोडक्यातच घरी पोचले म्हणायचं की! नाहीतर इतक्या वादळी गर्जना, कडकडाट, विजा बिजा अन् त्यावर मुसळधार पाऊस म्हणे. यातून माझा चिमुकला जीव वाचला नसता हो!’
अन् मंत्रालयातून ज्या जिवंत मानवरुपी देवाने हा मेसेज पाठवला, त्याचे मनोमन आभार मानून हातपाय धुवून आवरून घेतलं. सगळं आवरून झाल्यावर मला त्या मेसेजची पुन्हा आठवण झाली. मी मोबाईल घेऊन पुन्हा मेसेज वाचला. ‘मंत्रालयातून’ मला सतर्क राहण्याचा मेसेज आल्याने मला अगदीच गदगदून आलेलं होतं. ‘मंत्रालयातून’ मेसेज म्हणजे काय सामान्य गोष्ट होती काय..!?
ऊर गदगदून भरून येऊन डोळे काठोकाठ भरलेल्या धरणासारखे टच्चं झाले… त्याच गदगद झालेल्या मनाने, डोळ्यातल्या धरणाचं पाणी खाली सांडून, स्वच्छ डोळ्याने मी खिडकीत सोफ्यावर जाऊन बसले…
अन्…
आकाशात मेघांची गर्जना वगैरे असेल… बाहेरची झाडं सोसाट्याच्या वार्याने कराकर वाकून मोडत बीडत असतील… विजांनी थयथयाट मांडला असेल… अन् मुसळधार पावसाच्या धारांनी आसमंत थरथरत असेल, या भाबड्या आशेने आकाशाकडे एक खोल कटाक्ष टाकला. आशा भाबडीच की हो… मंत्रालयातून सांगितलं होतं मला… मग काय ते खोटं असणार है व्हय? ते पण पर्सनल मेसेज करून सतर्क केलं होतं, समजलात काय!
आणि म्हणोन… मी बाहेर त्या आशेने कटाक्ष टाकला… तर आकाशात मागच्या एक महिना झालं न दिसलेल्या चांदण्या आज लख्ख होऊन चमकताना दिसल्या… झाडं अगदी पालवी सुद्धा न हलवता शांत निपचित झोपली होती… वीज दिसणे दुरापास्त होते… कारण एकही वांझोटा बिनपाण्याचा मेघ सुद्धा नभात तरंगत नव्हता… मग विजेचा तर प्रश्नच नव्हता… आता या निरभ्र आकाशाने मग मुसळधार कुठून पाऊस पाडायचा हो?
तीही भाबडी आशा मावळून पार अंधारात बुडाली… अन् त्याच अंधारात चांदण्या माझ्याकडे बघत फिदीफिदी करून हसत चमकत होत्या…
मंत्रालयातून मेसेज रात्री साडे दहाच्या आसपास आला होता.. मेसेज येऊन रात्र सरली… दिवस उगवला… मला वाटलं, मंत्रालयातून मेसेज आलाय.. उगी उगी खेळायला ते काय रिकामटेकडे आहेत की काय.. समजले काय तुम्ही त्यांना?
पाऊस येईल.. ‘तो पुन्हा येईन’ आणि नक्की येईल..!
आणि म्हणोन… तो मेसेज सकाळच्या साडेदहासाठी असेल, म्हणोन मी सकाळच्या साडेदहाला बाहेर बघितलं… महिन्यापासून उन्हाच्या कवडशाला तरसलेलो आम्ही मुंबईकर… पण आज… आज तेच रात्रीचं आकाश तसंच निरभ्र होतं… अन् त्यावर सूर्य दोन्ही हात वर करून आळस झटकून खणखणीत लखलखत होता… कडक ऊन पडलं होतं… झाडं झोप होऊन देखील पुन्हा स्तब्धच होती… अन् आकाशात एकही पांढुरका मेघ औषधाला सुद्धा सापडत नव्हता!
सध्या चोवीस तास उलटून गेलेत… पुन्हा तिसरे साडे दहा वाजून गेलेत… पण गर्जना, कडकडाट अन् मुसळधारा वगैरे यातलं काहीतरी सोडा, एक साधं टिपूस त्या आकाशातून आज पडलं नाही… महिन्याच्या अवकाशाने द्विगुणित ऊर्जित होऊन तळपणार्या भास्करमामामुळे घामाच्या धारा मात्र दिवसभर वाहत राहिल्या…
शेवटी झोपायची वेळ आली… अन् मला वैयक्तिक, पर्सनल मेसेज केलेल्या मंत्रालयाला, त्यांच्या बुद्धिमत्तेला अन् त्यांच्या इतक्या राड्याफोड्यातून देखील वेळ काढून केलेल्या प्रामाणिक मेहनतीच्या प्रयत्नांना या आकाशाने हाणून चांगलंच तोंडावर पाडून त्यांचे दात घशात घातले, याचं मला अत्यंत मनापासून वाईट वाटून, तीव्र दुःखाने माझं मन पुन्हा एकदा गदगदून आलंय… आमचं धरण पुन्हा भरलंय (डोळ्यांच्या पाण्याने)
काय हो..
शेवटी मंत्रालयातून मेसेज आला होता ना हो… ते पण पर्सनल सतर्क करायला…
अध्यक्ष महोदय… हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय!