– किरण माने
‘पोट’ फार वाईट मित्रहो! पोटासाठी माणसं स्वाभिमान गहाण ठेवतात. लोचट-लाचार होतात. केविलवाणी होतात. खोटं बोलतात. वेळ पडली तर गुन्हेगारही होतात! एखाद्या धनवानानं, सत्ताधीशानं आपल्यावर कितीही अन्याय केला तरी तोंड उघडायची भीती वाटते ती एकाच गोष्टीमुळे, ‘यानं आपलं पोटपाणी बंद केलं तर?’
म्हणून तुकोबाराया म्हणतात,
‘पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ।।
पोटाभेणें तिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ।।
जप तप अनुष्ठान । पोटासाटीं जाले दीन ।।
पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ।।
पोट काशियानें भरे । तुका म्हणे झुरझुरुं मरे ।।’
…पोट पाठीमागं लागलंय. देशोदेशी हिंडवतंय.
…पोटाच्या भीतीनं जिकडं जावं, तिकडं ते बरोबर येतंच. जप, तप, अनुष्ठानं सुद्धा पोटापुढे केविलवाणी झाली आहेत.
…या पोटाने पार अब्रू घालवलीय, नीच माणसांपुढं सुद्धा नाचायला लावतंय.
…पोट कशाने भरतं? तुका म्हणे, पोटामुळे नव्हे, तर पोट भरायच्या काळजीमुळे माणूस झुरून झुरून मरतो.
तुम्ही म्हणाल, खूप सोपा अभंग घेतलाय यावेळी. सगळं समजण्यासारखं आहे. नाही भावांनो, खरी मेख शेवटच्या ओळीत आहे! तो गुंता सुटला की अभंगाची गाठ सुटली. तुकोबारायानं विचारलंय, ‘पोट काशियानें भरे?’ लै म्हणजे लैच खोचक प्रश्न आहे हा! काय लागतं हो पोट भरायला? चपाती भाजी नाहीतर तेल-चटणी-भाकरी खूप झाली पोट भरायला. ती कमावणं फार अवघड नाही. मग तरीही पोटाच्या काळजीनं माणूस एवढा का झुरून झुरून मरतो?
तर इथे आपण असं लक्षात घेतलं पायजे, की तुकोबारायाच्या अभंगातलं हे ‘पोट’ म्हणजे माणसाचं अतृप्त ‘मन’, जे कधीच भरत नाही! हे हावरं-अधाशी मन माणसाच्या पाठीमागं लागतं, हैराण करतं, वरावरा हिंडवतं, जपतप करूनबी थार्यावर रहात नाही. इज्जतीचा पंचनामा करतं. फडतूस माणसांच्या तालावर नाचायला लावतं.
पण इतिहास साक्षी आहे, ‘मी कष्टात कमी पडणार नाही. जीव लावून काम करीन. पण मालकाची हांजीहांजी जमणार नाही. पोटापुरतं मिळालं तरी बास, पण पायचाटूपणा नाही करणार. फायद्यासाठी वाकड्या वाटेने जाणार नाही.’ असा ताठ कणा असलेले लोकच महान कार्य करून दाखवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मातेकडून हीच स्वाभिमानाची, ताठ कण्याची शिकवण घेतली. म्हणून तर त्या काळातल्या जुलमी सत्ताधीशांविरोधात महाराजांनी बंड पुकारलं. तुकोबाराया, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोक सर्वसामान्य घरातून येऊन, गरिबीत दिवस काढूनही महान का झाले हो? ते ‘पोटासाठी’ व्यवस्थेपुढं लाचार झाले नाहीत. भुकेपुरतं खाऊन समाधानात राहिले. कितीबी खाल्लं तरी अतृप्त राहणार्या मनाची ‘हाव’ जवळपास फिरकू दिली नाही. त्यामुळेच तर त्यांचं सत्त्व आनि स्वत्व अबाधित राहिलं. त्यांनी बलाढ्य वर्चस्ववाद्यांचा अन्याय सहन केला नाही. त्यांच्या दबावापुढे, जुलमापुढे मान झुकवली नाही.
गौतम बुद्धांनी हेच सांगितलंय, ‘जिघच्छा परमा रोगा, संखारा परमा दुखा’ …सगळ्या दु:खाचं मूळ काय? तर मला हवं ते मिळूनही ‘अजून काहीतरी पाहिजे’ ही ‘तृष्णा’! जिघृक्षा! मी तुम्हाला मागेही सांगितले आहे की तुकोबारायांच्या अनेक अभंगांत बुद्धविचार दिसतो. विठ्ठलात ते बुद्धाला पाहायचे की काय असं वाटतं. बघा की, या अभंगात तर जणू गौतम बुद्धांचं ‘समुदय’ हे दुसरं आर्यसत्य तुकोबांनी ‘पोट काशियानें भरे । तुका म्हणे झुरझुरु मरे ।।’ या शब्दांत सांगितलंय.
अनिर्बंध, स्वच्छंदी अशा मानवी मनाला लगाम घालून योग्य दिशा दाखवण्यासाठी तुकोबारायांनी अनेक अभंग लिहिले. स्वत:च्या इच्छा आकांक्षांवर योग्य तेवढं नियंत्रण ठेवून त्यांना चांगल्या वळणावर नेण्यासाठी माणसानं काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं. आपल्या मनात तुफान माजवणार्या क्रोध, हाव, मत्सर, हर्ष, गर्व अशा विकारांच्या आहारी गेलेल्या माणसाची कायम अधोगतीच होते आणि यांच्यावर मात करून स्वत:वर विजय मिळवणारा माणूस सुखी, समाधानी, यशस्वी आयुष्य जगतो हे त्यांनी अनेक उदाहरणांच्या सहाय्यानं पटवून दिलं आहे.
पाठेळ करिता न साहावे वारा । साहेलिया बोरा गोणी चाले ।।
आपणा आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटी विरो द्यावे ।।
नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निथळ होऊनी राहे मग ।।
तुका म्हणे जरी जग टाकी घाया। त्याच्या पडे पायां जन मग ।।
…आत्ता ‘पाठेळ’ असलेलं जनावर म्हणजेच ‘पाठीवरून ओझं वाहाणारं जनावर’. ते जोपर्यंत नीट माणसाळलेलं नसतं… म्हणजे उदा. बैल जोपर्यंत खोंड असतं, तोपर्यंत ते अंगात वारं भरल्यासारखं बेलगाम असतं. त्याच्या पाठीवर ओझं काय, वार्याचा स्पर्श झाला तरी ते थयथयाट करू लागतं. पण तेच जनावर एकदा का नीट मार्गावर आलं, परिपक्व झालं की मग मात्र त्याच्या पाठीवर कितीही जड पोती टाकली तरी ते कणभरही कुरकूर न करता शांततेत ते ओझं वाहून नेतं.
…प्रत्येक माणसानं या उदाहरणावरून काहीतरी शिकावं. यशाचा अती आनंद आणि अपयशाचं दु:ख दोन्ही सारख्याच संयमानं पचवायला पाहिजे.
…लोणी कढवण्यासाठी त्याला उष्णता दिली की ते सुरुवातीला कडकड कडकड करतं. जसा अपरिपक्व माणूस उथळपणा करतो. पण एकदा का लोण्याचं तुपात रूपांतर झालं की मग ते निवळ होऊन राहतं. जसा परिपक्व माणूस शांत, निर्विकार असतो.
…शेवटी तुकोबाराया म्हणतात, जो दगड टाकीचे घाव सोसूनही टिकून राहतो, त्याला देव मानून लोक त्याच्या पाया पडतात.
बहुजनांच्या रोजच्या व्यवहारातली उदाहरणं वापरून तुकोबाराया खूप मोठं तत्त्वज्ञान अतिशय सोपं करून सांगत. आपल्या मनातले दोष जसे आपण काढून टाकायला हवेत तशाच पद्धतीनं समाजातल्या कुप्रथा, जाचक परंपरासुद्धा मुळापासून उखडून फेकाव्या ही तुकाराम महाराजांची तळमळ होती. हे सोपं करून सांगताना एका अभंगात ते म्हणतात,
निवडावे खडे । तरी दळण बोजे घडे ।।
नाही तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ।।
निवडावे तन । सेतीं करावे राखण ।।
तुका म्हणे नीत । न विचारिता नव्हे हित ।।
…धान्य दळण्यापूर्वी त्यातले खडे निवडावे लागतात तरच ते दळण चांगले होते.
…असे नाही केले, तर त्या खड्यांची माती मिसळल्यामुळे अन्नाची चव बिघडते. स्वयंपाक नासून गेल्यासारखे होते. कारण खडे निवडण्याच्या बाबतीत केलेला आळस.
…हे धान्य निर्माण होण्याच्या आधी शेतात पीक असतानाही आळस झटकून अशीच काळजी घ्यावी लागते. तण वेचून काढावे लागते.
…शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, हीच वागण्याची योग्य नीती होय. ही नीती समजून न घेता, तिचा विचार न करता कोणी वागू लागला, तर ते त्याच्या दृष्टीने हितकारक नव्हे.
आपल्या आयुष्यात जे चांगलं आहे, ते टिकावं यासाठी त्याच्या मार्गात येणारं जे वाईट असेल, ते उपटून फेकावं लागतं. आपल्या मनातले, स्वभावातले दोष असोत किंवा समाजातल्या अनिष्ट वृत्ती, प्रवृत्ती असतील… सगळं उखडून फेकावं लागतं. तरच माणसाची आणि समाजाची खर्या अर्थानं भरभराट होते हे शेतात उगवणार्या तणाच्या दाखल्यावरून किती प्रभावीपणे सांगितलं आहे.
…शिवरायांनासुद्धा मार्गदर्शक ठरलेले तुकोबा इतके महान का होते, याचं उत्तर शोधणं फार अवघड नाही. त्यांचे एकेक अभंग सुखी आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी लाख मोलाचे होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य वाट दाखवणारे होते. शिवरायांना तर बलाढ्य, क्रूरकर्मा मोगल सत्ताधीशांशी लढायचं होतं. अवाढव्य सत्तेसमोर तुलनेनं अतिशय सामान्य वाटणार्या शिवरायांनी, मूठभर मावळ्यांना हाताशी धरून ही सत्ता उलथून टाकली. त्यासाठी जे मनोबल लागतं, धाडस लागतं, प्रेरणा लागते ती जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी राजेंनंतर शिवरायांना देणारे होते संत तुकाराम महाराज.
जिद्द, चिकाटी आणि अभ्यास असेल तर माणूस इकडची दुनिया तिकडे करू शकतो हे सांगणारा तुकोबारायांचा खूप सुंदर अभंग आहे.
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । अभ्यासासी संग कार्यसिद्धी ।।
नव्हे ऐसें काही नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरी ।।
दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ।।
तुका म्हणे वैâचा बैसण्यासी ठाव । जठरी बाळा वाव एकाएकीं ।।
…एखाद्या वृक्षाचं ओलं मूळ कठीणातल्या कठीण खडकाचं अंग भेदून पुढे सरकतं. एक नाजुक, मऊ आणि एकदम किरकोळ असणारं ओलं मूळ सूक्ष्म अभ्यासाच्या संगतीनं अथक प्रयत्न करत ही गोष्ट करून दाखवतं. ‘अवघड काहीच नसतं’ याचं छान उदाहरण बनतं!
…अहो साध्या दोर्यानं दगडावर, विशिष्ट पद्धतीनं सातत्यानं घर्षण करत राहिलात तर दगडसुद्धा कापला जाऊ शकतो. विष पचायला अशक्य, पण हेच विष जाणकारीनं रोज थेंब-थेंब पचवायची सवय लावत राहिलं तर एक दिवस माणसाच्या शरीरात जालीम विष पचवायची क्षमता निर्माण होते!
…शेवटी तुका म्हणे, मातेच्या उदरात सुरुवातीला बाळासाठी एकदम छोटी जागा असते असं वाटतं. एवढं मोठं बाळ या छोट्या जागेत कसं मावणार? हळूहळू ते बाळ आपल्या वाढीनुसार आणि गरजेनुसार जागा निर्माण करत जातं. अशक्य वाटणारी गोष्ट सहजशक्य करतं!
आणखी काय सांगू?
तुकोबाचे अभंग हे आपल्या आयुष्यात दीपस्तंभ ठरू शकतात. मनाची मशागत करणारे असे अभंग आपण आचरणात आणले तर आपल्या मेंदूच्या डिक्शनरीतून ‘अशक्य’ हा शब्द कधी निघून जाईल आपल्याला कळणारही नाही. भवतालची परिस्थिती कितीही विपरीत असूद्या, आपलं मन बळकट करायला तुकोबांचे अभंग सोबत असतील तर सगळ्या संकटांवर मात करून आपण दुनिया हलवून टाकू शकतो. आभाळ कवेत घेऊ शकतो.