सायकलगाण्यांची ही शृंखला आजही थांबलेली असावी असे वाटत नाही. चित्रपट वाईट असोत की चांगले, ते आपल्या आठवणीतील भावविश्व असते. आपला भूतकाळ चित्रपटांद्वारे अनेकदा आपल्याला भेटत राहतो. सायकलीवरील गाणी हा यापैकीच एक अविभाज्य घटक. अशाच काही सायकल गीतांचा आढावा.
– – –
बालपणी चालायला सुरुवात करतानाची प्रमुख साथीदार म्हणजे तीन चाकी सायकल. मग शाळकरी वयात दुचाकी सायकल. सायकलीचा जन्म चित्रपटसृष्टीच्या जन्माच्या खूप आधीचा. दळणवळणाचे अत्यंत सुलभ साधन म्हणून सायकल घराघरात जशी पोहोचली तशी ती रुपेरी पडद्यापर्यंतही पोहोचली. मग सायकल कधी प्रेमी जीवांची सखी झाली, कधी नायक नायिकेच्या पहिल्या भेटीची साक्षीदार तर कधी गरीब नायकाला पैसे मिळवून देणारी मदतगार. सायकलने रेसची रंगतही आणली आणि खलनायकाला पकडून देण्यात मदतही केली. सायकल खेड्यातील शेतात, डोंगराळ भागात, शहरांच्या चकचकीत रस्त्यावर, फुलांच्या बागेत, शाळेच्या पटागंणावर, रात्री, दिवसा, पावसात, उन्हातान्हात, मस्तीत, झोकात… किती किती ठिकाणी भटकत राहिली. सायकलचे हे लोभस रूप अनके दिग्दर्शकांना प्रेरणा देणारं ठरलं आणि सुरू झाला सायकलीचा संगीतमय प्रवास, जो आजही सुरूच आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सायकलने पहिलं प्रेमगीत अनुभवलं ते ‘चले जाव’ चळवळीच्या एक वर्ष आधी, अर्थात १९४१ मधील ‘खजांची’ या चित्रपटात. नायक एस. डी. नारंग (जे पुढे प्रसिद्ध निर्माते बनले) आणि नायिका रमोला याच्यावर चित्रित करण्यात आले होते. शमशाद बेगम आणि गुलाम हैदर यांनी हे द्वंद्वगीत गायले होते आणि बोल होते ‘सावन के नजारे है..’ कॉलेज तरुण-तरुणींच्या सहलीचा प्रसंग यात आहे. आजही हे गाणे व चित्रपट युट्युबवर बघता येतो. गाण्यातील ‘आऽऽहा आऽऽहा’ हा हेल ऐकताना मौज वाटते. त्या काळात हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि गाणेही प्रचंड लोकप्रिय झाले.
सायकलीचा चित्रपटातील वावर जसाजसा वाढत गेला, तसतसे सायकलगाणी चित्रित करण्याकडे कल वाढत गेला. ५०च्या दशकातील कॉलेजात जाणार्या बहुतांश तरुण पिढीकडे सायकली होत्या. नायक नायिकेच्या प्रणयाची साक्षीदार सायकल असे. सायकलीचा एक फायदा असा होता की सायकलीवरील गाण्यात भरपूर हालचाली करण्यास व विविध कोनांतून चित्रिकरण करण्यास वाव होता.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक मातब्बर नाव म्हणजे दिग्दर्शक वसंत पेंटर. हिंदी चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले. १९४७मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सीधा रास्ता’ या चित्रपटात शाहू मोडक आणि कमला कोटणीस यांच्यावर चित्रित केलेले ‘आ दूधवाली ग्वालनिया, तेरी चाल निराली…’ हे गाणे जी. एम. दुर्रानी व पारुल घोष यांनी गायले असून हेदेखील यूट्युबवर बघता येते. मात्र या गाण्याचे बोल द्विअर्थी वाटू शकतात. १९५१मधील ‘सगाई’ चित्रपटात सायकल चक्क रंगमंचावर अवतरली. गोप आणि याकूब या हास्यकलावंतावर ‘बनते बनते बिगड गयी बात’ हे गाणे चित्रित करण्यात आले. रंगमंचावर सायकल का आणली? तर गाण्यातील हे दोन तरुण शहरातील बाजारपेठेत निघाले आहेत आणि चौकात त्यांची गाठ तरुणींशी होते हे स्थापित करायला सायकलीची मदत घेतली.
१९५६मध्ये फिल्मीस्तानच्या ‘हम सब चोर हैं’ या चित्रपटात मात्र सायकलीवर रोमँटिक नाही तर एक हास्यगीत आय. एस. जोहर आणि मजनू या अभिनेत्यांवर चित्रित केले आहे. मजरुह यांनी लिहिलेले ‘हमको हँसते देख जमाना जलता है’ हे गाणे गायक जी. एम. दुर्रानी व मोहम्मद रफी यांनी मिळून गायले आहे. दुर्रानी हे पूर्वीच्या काळात खूप लोकप्रिय असलेले गायक होते. स्वत: रफी साहेबदेखील त्यांच्या गायकीचे चाहते होते. या गाण्यात रफी आणि दुर्रानी यांचे आवाज इतके एकसारखे वाटतात की स्वतंत्रपणे अजिबात ओळखता येत नाहीत. रफी साहेबांना हास्यगीत कसे गावे याची संथा दुर्रानी साहेबांनी दिली. या गाण्यातील दोन सीट असलेली सायकल हीदेखील त्यावेळी अपूर्वाई होती. शिवाय १९५६मध्ये मुंबईतील विविध परिसर कसे होते हेही बघता येते. या गाण्याची प्रिंट आजही उत्तम अवस्थेत आहे.
या काळात सर्वाधिक लोकप्रिय झालेले सायकलगीत म्हणजे हेमंत कुमार व लतादीदीचे ‘साँवले सलोने आए दिन बहार के’ हे उडत्या चालीचे सुनील दत्त, मीनाकुमारी व छोटी डेझी इराणी यांच्यावर चित्रित झालेले गाणे. संपूर्ण गाण्यात तिघे एकदाही सायकलवरून खाली उतरलेले नाहीत. हे गाणे बहुतेक गोरेगावच्या आरे कॉलनीत चित्रित झाले असावे असे दिसते. (जाणकारांनी प्रकाश टाकावा). याच काळातील मराठमोळ्या स्नेहल भाटकरांनी संगीत दिलेले एक अत्यंत मधाळ, पण विस्मृतीत गेलेले गाणे म्हणजे ‘देखी देखी पंछी देखी ये फुलवारी…’ हे ‘जलदीप’ या चित्रपटातील एक समूहगान आहे. नायिकेला सायकलवर बसवून बाळगोपाळांसह नायक निसर्गाचा उत्कट अनुभव घेत आहे. एखादी सुंदर प्रार्थना ऐकल्यासारखे हे गाणे आजही अत्यंत श्रवणीय वाटते.
देव आनंद-नूतन यांचा ‘पेईंग गेस्ट’ आणि विजय आनंद-शकीला यांचा ‘आग्रा रोड’ हे चित्रपट एकाच वर्षी १९५७ला प्रदर्शित झाले. पैकी देव आनंदचे ‘माना जनाब ने पुकारा नहीं’ हे सायकल गाणे त्या वर्षी तुफान गाजले आणि आजही तितकेच लोकप्रिय आहे. किशोरदांची मस्ती, खट्याळ नायक तितक्याच खट्याळ नायिकेला प्रणयाची विनवणी करताना सायकलसोबत खास देवटाईप उड्या मारत जातानाचे हे गाणे म्हणजे संगीताची खास मेजवानी. ‘आग्रा रोड’ सिनेमातील एकदम उडत्या चालीचे ‘उनसे रिपीटिप्पी हो गयी’ हे काहीसे अपरिचित असलेले, तरी किशोरदांच्या खास यॉडलिंगसाठी ऐकण्यासारखे आहे. याच काळातील ‘जॉनी वॉकर’ या चित्रपटातील जॉनी वॉकर व श्यामा यांच्यावर चित्रित झालेल्या व ओ. पी. नय्यर यांच्या खास चालीच्या ‘बचके बलम चल’ या गाण्यात दिग्दर्शक मुंबई, दिल्ली, आग्रा, कलकत्ता अशा शहरांची सफर घडवून आणतो. गेटवे ऑफ इंडियालगतच्या ताजमहल हॉटेल परिसरापासून या गाण्याची सुरुवात आहे. १९५७मधील हा परिसर बघताना मन भूतकाळात सहज प्रवेश करते.
संगीतकार मदन मोहन यांना आजही आठवलं जातं ते त्यांच्या खास गजल गीतांसाठी. १९५८मधील प्रदीपकुमार व मीनाकुमारी या जोडीचा ‘अदालत’मधील ‘उनको ये शिकायत है…’ आजही सिनेरसिक विसरले नाहीत. मात्र याच चित्रपटातील ‘जब दिन हँसी हो दिल जवाँ’ हे खास पिकनिक गाणे म्हणजे सळसळत्या तारुण्याचे प्रतीकच. रफी साहेब व आशाताईंनी यात मजा आणलीय. चित्रपट ज्या काळात व ज्या स्थळावर चित्रित केले जातात, त्या इतिहास व भूगोलाचेही ते दस्तावेज असतात. त्यावेळची ही ठिकाणं आज शोधताना काळाच्या पावलाचे ठसे स्पष्ट बघता येतात. मानवाने निसर्गाची किती हानी केलीय हे चित्रपटातील गाणी सांगत असतात. कारण बहुतांशी गाण्यांचे चित्रिकरण आऊटडोअरला झालेले आढळते. या यादीतील बरीच गाणी जॉनी वॉकरवर चित्रित झालेली आहे. सन १९५८मधील ‘सितारों के आगे’ चित्रपटातील ‘रुक जा प्यारे’ हे गाणे देखील जॉनीभाईंवरच चित्रित झालेय. मात्र या गाण्यातील नायक नाही, तर इतर माणसे सायकलीवर पळताना दिसतात आणि त्यांना उद्देशून हे गाणे आहे. या गाण्यात सायकल व्यवहारज्ञान बनून अवतरली आहे.
एखाद्या संगीत रसिकाला विचारले की कृष्णधवल काळातील कोणते सायकल गाणे तुम्हाला लगेच आठवेल? तर उत्तर येईल ‘बनके पंछी गाए प्यार का तराना.’ शंकर जयकिशन यांच्या मेलोडियस गाण्यांच्या यादीतील उत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक. नूतनवर चित्रित झालेल्या, खास ‘दत्ताराम ठेका’ असलेल्या आणि उत्कृष्ट चित्रित केलेल्या या गाण्यात कोरसचा खूप सुंदर वापर केला आहे. नूतनच्या सहज सुंदर नैसर्गिक अभिनयाने ‘अनाडी’ सिनेमातील हे गाणे खूप उंचीवर गेले. हृषिदांचे अत्यंत आवडते कॅमेरामन जयवंत पाठारे यांनी या गाण्यातील निसर्ग अप्रतिम टिपला आहे. पार्श्वभागी मनमाडजवळचा थम्सअप हिलसारखा डोंगर दिसतो. गाणे संपताना नायक-नायिकेच्या सायकलची बहारदार टक्कर हा या गाण्यातील उच्च बिंदू.
किशोर कुमार गाण्यासोबत अभिनयाची पण खास अशी छाप सोडून गेले आहेत. १९६०मधील ‘बेवकूफ’ या चित्रपटात माला सिन्हाबरोबर ते नायक होते. यातील ‘मायकल है तो सायकल है’ हे खास किशोरदाची मस्ती असलेले गाणे. माला सिन्हाला मागे बसवून काय काय उछलकूद केलीय किशोरदांनी. हे गाणे काळजीपूर्वक ऐकताना लक्षात येईल की दुसर्या कडव्यातील पहिल्या दोन ओळी मन्ना डे यांनी गायल्या आहेत. हे कसे काय? पूर्वी चित्रपटासोबत गाण्यांवरही सेन्सॉर बोर्ड कात्री लावत असे. या कडव्यातील मूळ ओळी अशा होत्या ‘उल्फत का तुफान हूं मैं, एक रोज आईए, लहरों में आके मेरी झुल झुल जाईए’. या ओळी सेन्सॉरला अश्लील वाटल्या आणि त्यात बदल करायला सांगितलं गेलं. बदल सुचवला त्यावेळी किशोरदा उपलब्ध नव्हते, म्हणून संगीतकार सचिन देव बर्मन यांनी गीतकार मजरुह यांच्याकडून या ओळी बदलून घेतल्या त्या अशा, ‘उल्फत पर कुरबाँ हूँ देखते जाईए, नैनों में आके मेरे झुलझुल जाईए’ आणि त्या मन्नादाकडून गाऊन घेतल्या. संपूण गाणे किशोरदाचे असतानाही मन्नादांनी आढेवेढे न घेता या दोन ओळी म्हटल्या. एकमेकांच्या कलेबद्दल प्रचंड आदर असण्याचा तो काळ होता. पुढच्या वर्षी १९६१मधील ‘अपना घर’ आणि ‘घुंघट’ या चित्रपटात अनुक्रमे ‘कैसे भिगे भिगे प्यारे है नजारे’ रफी-सुमन कल्याणपूर हे नंदा आणि मोती सागर यांच्यावर चित्रित झाले होते. तर ‘ये जिंदगी का मौसम’ प्रदीप कुमार व आशा पारेख यांच्यावर चित्रित झाले होते. दोन्ही चित्रपटांचे संगीतकार रवी होते आणि चालही जवळपास सारखीच आहे.
मुकेश यांनी गायलेले ‘आस का पंछी’ चित्रपटातील ‘तुम रुठी रहो, मैं मनाता रहूँ’ हे गाणे १९६१मधील लोकप्रिय गाण्यापैकी एक होते. राजेंद्र कुमार व वैजयंती माला यांची प्रेमळ नोकझोंक आणि लयदार ठेका यामुळे हे गाणे आजही मनाला ताजेतवाने करते. तरुणाईचा एक घोळका सायकलवर जाताना एक सायकलस्वार त्यांच्या पाठून येतो आणि अग्रभागी येत म्हणतो, ‘अकेला हूं मैं इस दुनिया में’ रफी साहेबांचा मधाळ स्वर आणि चॉकलेट हीरो देव आनंद याचं मस्त मिश्रण म्हणजे हे गाणं. हा एकटा जीव स्वत:शीच बोलतोय. स्वत:च्या सावलीशिवाय त्याची सोबत करणारा सध्या तरी कुणी नाही आणि पुढे मिळेल की नाही हेही माहीत नाही. १९६२मधील ‘बात एक रात की’ या चित्रपटातील हे गाणे संपूर्णपणे सायकलशी एकजीव झालेय. नायक सरळसोट सायकल न चालविता काहीसे हेलकावे देत च्ाालवतोय. बेफिकीर तारुण्याचे प्रतिक. आयुष्याचेही असेच तर असते. मग अचानक या प्रवासात जीवनसाथी भेटण्याची आशा पल्लवित होते आणि सायकलही वेग घेऊ लागते. प्रेमाचे अंकुर तरारू लागतात आणि जीव नादी लागतो. अशा धुंद वेळी ‘चल मेरे दिल लहरा के चल…’ याच ओळी ओठी येणार नाही का? मुकेशच्या आवाजातील आणि जॉय मुखर्जीवर चित्रित झालेले हे गाणे ‘इशारा’ चित्रपटातील आहे. कल्याणजी आनंदजी यांच्या क्लासिक गाण्यांपैकी एक. या गाण्याच्या पार्श्वभागी दिल्लीतील संसद भवनाची इमारत एखाद्या सपाट माळरानावर असल्यासारखी भासते. दिल्ली किती बदलली आहे ना?
जवळपास याच बाजाचे आणखी एक गाणे म्हणजे ‘मेरे सनम’ या चित्रपटातील ‘पुकारता चला हूँ मैं…’ मात्र यात नायक सायकलवर नाही तर चारचाकीवर आहे. नायिका सख्यांसोबत सायकलवर जातेय व ती अजून नायकाची झाली नाहीए. तो शोध घेतोय आपल्या नायिकेचा. संगीतकार ओ. पी. नय्यर व रफीसाहेब एकत्र आले की यांची धुंदी लवकर उतरत नाही.
बंगाली तरुणीच्या प्रेमात जॉनी वॉकर साहेब पडले आहेत आणि आपल्या खास स्टायलीत म्हणतात, ‘सुनो सुनो मिस चटर्जी’ एक चटकदार हास्यगीत. विशेष म्हणजे या गाण्यात गीतकार शेवान रिझवी यांनी इंग्रजी शब्दांची मजेदार पेरणी केली आहे. १९६६मधील ‘बहारे फिर भी आएगी’ या चित्रपटातील या गाण्यात जॉनी वॉकर यांनी सायकलवर कसरतीही केल्या आहेत. ते या कलेत पारंगत होते. १९६८चा ‘पडोसन’ हा एक सदाबहार चित्रपट. नायिका सायरा बानोवर चित्रित केलेले ‘मैं चली मैं चली…’ हे जसे वेगळ्या कंपोजिशनसाठी प्रसिद्ध आहे, तसेच त्याच्या रंगीत चित्रणासाठी देखील. ६०च्या दशकात चित्रपट रंगीत व तंत्र आधुनिक होऊ लागले. त्यामुळे हे गाणे ऐकणे व बघणे या दोन्हीचा आनंद देते.
७०च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय सायकलगीत म्हणजे देव आनंद यांच्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातील ‘ए मैंने कसम ली…’ एका ध्येयवादी तरुण जोडप्याचे मनोगत सांगणार्या या गाण्यात सायकलचा खुबीने वापर केला आहे. याच काळातील ‘गंगा तेरा पानी अमृत’ या चित्रपटातील ‘इस धरती इस खुले गगन का क्या कहना’ हे रफीसाहेबचे नितांत सुंदर गाणे म्हणजे निसर्गसंपन्न गाव ते शहर असा एक स्वरमयी प्रवासच होय. हे गाणे फक्त आणि फक्त सायकलवरच चित्रित करण्यासाठी असावे इतके सुंदर आहे. या गाण्याचे गीतकार साहिर लुधियानवी यांना तर १०० पैकी १०० गुण द्यायला हवेत, इतके सुंदर लिहिले आहे. या गाण्याशी साध्यर्म सांगणारे असेच दुसरे गाणे म्हणजे ‘गुजर जाए दिन दिन’ हे कवी योगेश यांनी लिहिलेले आणि किशोरदांनी गायलेले ‘अन्नदाता’ चित्रपटातील गाणे. जीवनातील कडूगोड अनुभवांचे मर्म सांगणारे हे गाणे अनिल धवन या अभिनेत्यावर चित्रित केले आहे. धर्मेंद्र व माला सिन्हा अभिनित ‘ललकार’ चित्रपटातील ‘जरा मुडके तो देख’ हे गाणे देखील याच दशकातील तर विनोद खन्ना आणि सायरा बानू यांचे ‘आरोप’ चित्रपटातील ‘नैनों में दर्पण है’चे चित्रण देखील निसर्गरम्य पार्श्वभूमीवर केलेले.
मुळात चाकाचा शोध मानवी जीवनात क्रांती घडविणारा होता. सायकल हे जसे सर्वसामान्यांचे वाहन आहे, तसेच ते एक प्रतीकही आहे आणि रोजगाराचे साधनही. ६०-७०च्या काळात अनेक तरुणांनी दिवसरात्र सायकल चालवण्याचा विक्रम केला होता. १९७२मध्ये मनोजकुमार यांनी हाच धागा पकडून ‘शोर’ चित्रपटासाठी इंद्रजीतसिंग तुलसी यांच्याकडून एक गाणे लिहून घेतले. ‘जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम’. जीवनात अशा अनेक छोट्यामोठ्या घटनांतून प्रेरणा मिळत असते.
भूतकाळातील एक काळ आणि एक व्यक्ती अशी होती ज्याची लहानथोर तरुण सर्वच वाट बघत असत. होय, पोस्टमन ही ती प्रिय व्यक्ती. १९७७मधील ‘पलकों की छाँव में’ चित्रपटात राजेश खन्नाने अत्यंत तरलतेने पोस्टमास्तर साकारलाय. यातील ‘डाकिया डाक लाया’ हे अप्रतिम गाणे तुफान गाजले. पोस्टमनचे एकमेव वाहन म्हणजे सायकल. जगातील सर्व बर्यावाईट, खर्या खोट्या, दु:खी आनंदी प्रसंगाचा साक्षीदार म्हणजे पोस्टमन. गुलजार यांनी अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले हे गाणे किशोरदानी अत्यंत भावपूर्ण आवाजात गायले आहे. पोस्टमनच्या पत्रांच्या पिशवीतील सुखदु:खाचा भार जणू काही सायकलच वाहत आहे.
सायकल कोणत्याही भूपृष्ठावर चालवता येते. दगडधोंडे, खडक, रेताड जमीन, टणक पत्थर कुठेही. अशाच एका अत्यंत रुक्ष आणि रखरखीत पृष्ठभूमीवर चित्रित केलेले गाणे म्हणजे ‘इक रितू आए, इक रुतू जाए…’ हे ‘गौतम गोंविदा’ या चित्रपटातील गाणे. प्रत्येकवेळा आणि प्रत्येकासाठी सर्वच ऋतू काही आनंदमय नसतात. कितीही काळ लोटला तरी दु:ख संपत नाही आणि सुखाचा किरण उगवत नाही. या गाण्यात वाजणारी सायकलची घंटीदेखील कर्णकर्कश वाटते आणि चाकांचा आवाज ऊर कापत जाणारा. इतकंच नाही तर सूर्यप्रकाशही भर माध्यान्हीचा. यातल्या बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळाही कानाला मंजुळ वाटत नाहीत. व्हॅन गॉगचा जिवंत झालेला कॅनव्हास म्हणजे हे गाणे. त्यात किशोरदाच्या आवाजाला आलेली आर्त धार… आजही मानवाचं असं जगणं थांबलेलं नाहीए.
८०च्या दशकात चित्रपटांचं तंत्र, संगीत, कथानक सर्व काही बदललं. चकचकीत कार असो की आकाशात उडणारी विमानं असोत; अनेक आधुनिक वाहनं पडद्यावर आली, सायकल मात्र चंदेरी पडद्यावर येत राहिली. ‘राम करे अल्ला करे’ म्हणत मैत्रीचा धागा जोडत राहिली. राज कपूर या कल्पक अवलियानं तर हॉलंडच्या प्रशस्त ट्युलिप पुष्पवनात सायकलवर गाणे चित्रित केले आहे. ‘भँवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया…’ दृष्टी जाईल तिथपर्यंत ट्युलिपच्या सुंदर रांगा आणि सायकलवर बसलेली तरुण विधवा नायिका आणि तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला नायक… यातील सायकल जणू काही एकाचवेळी सुखदु:खाचे ओझे वाहून नेत आहे. गाणे ऐकताना एकाचवेळी असंख्य भाव मनात दाटून येतात. ‘भाभी’ या गोविंदा नायक असलेल्या चित्रपटातील एका गाण्यात तर ही ‘चांदी की साईकिल, सोने की सीट’ बनून पडद्यावर अवतरली. जीवन म्हणजे खालीवर जाणारा असा मार्ग, ज्यावरून आपले ध्येय गाठावे लागते. हा आशय सांगणारे एक सुंदर गाणे म्हणजे ‘उंचे नीचे रास्ते और मंझिल अपनी दूर’. संजीव कुमारने सहज सुंदर अभिनयाने या गाण्यात जिवंतपणा आणला. ‘१९४७ अर्थ’ या चित्रपटातील ‘धिमी धिमीऽऽ खुशबू है तेरा बदन’ या गाण्यात तर ही सायकल इतकी हळुवार चालतेय, जणू नायकाचे अलवार स्वप्न ढगावरून अलगद घरंगळत येतेय. असेच एक गाणे म्हणजे ‘मेरी जिंदगी में आए हो…’ हे २००३मधील ‘अरमान’ चित्रपटातील गाणे.
सायकलगाण्यांची ही शृंखला आजही थांबलेली असावी असे वाटत नाही. चित्रपट वाईट असोत की चांगले, ते आपल्या आठवणीतील भावविश्व असते. आपला भूतकाळ चित्रपटांद्वारे अनेकदा आपल्याला भेटत राहतो. सायकलीवरील गाणी हा यापैकीच एक अविभाज्य घटक.