• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

फिरविले राऊळ जगामाजी ख्याती!

- ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 24, 2025
in धर्म-कर्म
0

– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर

हसत खेलत तेरे देहुरे आइआ।
भगति करत नामा पकरि उठाइआ ।।
हीनडी जात मेरी जादमराइआ।
छीपेके जनमि काहे कऊ आइआ ।।
लै कमली चलिऊ पलटाइ।
देहुरे पाछै बैठा जाई ।।
जिऊ जिऊ नामा हरिगुण उचरै।
भगत जना कऊ देहुरा फिरै ।।
हा संत नामदेवरायांचा अभंग आहे. तो गुरुग्रंथसाहिब या शीखधर्मीयांच्या पवित्र धर्मग्रंथातला अभंग आहे. शीखांच्या ग्रंथसाहेबात नामदेवरायांची ६१ पदं आढळतात. त्यापैकीच हे एक पद. मराठी माणसांना अभिमान वाटावा अशी ही बाब आहे. नामदेवरायांच्या पदांना एका धर्मग्रंथात जागा मिळणं हा फार मोठा सन्मान आहे. या अभंगात नामदेवरायांनी त्यांच्या जीवनातल्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. ती घटना आहे देऊळ फिरवल्याची. हीच घटना इतर एका हिंदी पदात आणि वारकरी साहित्यातही रुढ आहे. त्यामागची पार्श्वभूमी या अभंगात नामदेवरायांनी सांगितली आहे.
ही घटना नेमकी कोणत्या मंदिरात घडली याचा तपशील नामदेवरायांच्या अभंगात आढळत नाही. तरीही लोकमानसात ही घटना औंढ्या नागनाथाच्या मंदिरात घडली असं मानलं जातं. महिपतींच्या भक्तिविजयातही तसा उल्लेख आहे. औंढ्या नागनाथ हे बारा जोतिर्लिंगापैकी एक आहे. हे ठिकाण मूळचं पाशुपतपंथी शैवभक्तांचं होतं. त्याविषयी डॉ. रा. चिं. ढेरे यांनी मूलभूत विवेचन केलेलं आहे. लिळाचरित्रातही चक्रधर स्वामींना नागनाथ क्षेत्री तप केलेला एक पाशुपतपंथी भेटल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर तत्कालीन विविध शिलालेखांतही या क्षेत्रातील पाशुपतांचे निर्देश आहेत. पाशुपत पंथ हा मूळचा समतावादी विचारांचा पंथ. वर्णजातीचा भेदभाव पाशुपतांना मंजूर नाही. पाशुपतपंथाची दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला ‘भरटक’ म्हणतात. भरटक कोणत्याही जातीचे असू शकतात. भरटकाची दीक्षा घेताना ब्राह्मणी धर्माचे नियम पाळले जात नाहीत. षडदर्शनसमुच्चयात पाशुपतांच्या या दीक्षेविषयीचा श्लोक वाचला तर हा मुद्दा लक्षात येईल. ‘भरटादिनां व्रतग्रहणे ब्राह्मणादिवर्णनियमो नास्ति। यस्य तु शिवे भक्ति: स व्रती भरटादिर्भवेत ।।’ म्हणजे भरटादींना व्रतग्रहणाची दीक्षा घेताना ब्राह्मणादी व्रतबंधन नसतं. जो शिवाची भक्ती करतो तो कोणीही भरटक बनू शकतो. ‘भरटानां व्रतादाने वर्णव्यक्तिर्न काचन। यस्य पुनः शिवे भक्तिर्व्रती स भरटो भवेत।।’ म्हणजे भरटांच्या व्रतग्रहणात कोणतंही वर्णबंधन नसतं. जो शिवाची भक्ती करेल त्याला भरटक बनता येईल. पाशुपतांच्या मंदिरात फक्त भरटकांना प्रवेश असतो. इतरांनी फक्त बाहेरून शिवाला नमस्कार करायचा, तोही समोरून नव्हे तर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने. ‘शेषा नमस्कारकरा:, सोऽपि कार्यो न सन्मुख:।’ म्हणजे भरटकांशिवाय इतरांनी देवाला केवळ नमस्कार करायचा तो सन्मुख होऊन नव्हे तर विन्मुख होऊन. पाठीमागच्या बाजूने शिवाला नमस्कार करण्याचा हा पाशुपतांचा आचारधर्म होता. त्याला अनुसरून शिवमंदिराच्या पाठीमागच्या बाजूलाही दरवाजा होता. असा दरवाजा हे पाशुपत शिवमंदिराचे वैशिष्ट्य होते.
औंढ्या नागनाथाच्या मंदिर परिसरात पाशुपतांचा प्रभाव होता. पुढच्या काळात पाशुपतांच्या मूळ समतावादी विचारांचा विसर पडला गेला. भरटकांनी मंदिरात जाण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांपुरता मर्यादित केला गेला. पाठीमागच्या बाजूने देवाला नमस्कार करण्याचा आचारधर्मही लोपला. हे औंढ्या नागनाथाचं मंदिर नामदेवरायांच्या मूळ नरसी गावापासून जवळ होतं. एकदा ते या मंदिरात गेले. या अभंगातल्या वर्णनानुसार ते ‘हसत खेलत तेरे देहुरे आइआ’ म्हणजे हसत खेळत मंदिरात आले. हसत खेळत भक्ती हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. त्यानुसार ते हसत खेळत मंदिरात गेले. जाताना टाळ आणि वीणा सोबत नेलेच होते. याच प्रसंगावरच्या आणखी एका अभंगात तसा उल्लेख येतो. ‘टाल बीना लेकर नामा राऊल मे गाया’ असं ते वर्णन आहे. ते मंदिरात जाऊन टाळ वीणा घेऊन कीर्तन करायला लागले. ते पाहून पुजारी संतापले. शिंपी जातीतला एक हरिभक्त मंदिरात कीर्तन करतो याचा त्यांना राग आला होता. त्यांनी नामदेवरायांना मंदिरातून बाहेर काढलं. ‘हिनडी जात’ म्हणून त्यांना जातीवरून अपमानित केलं. नामदेवरायांनी कीर्तनाची घोंगडी म्हणजे कांबळ उचलली आणि ते मंदिराच्या पाठीमागे गेले. ‘कमली चलिऊ’ म्हणजे कांबळ उचलली आणि ‘देहुरा पाछै’ ते कीर्तन करायला लागले.
नामदेवराय देवळामागे कीर्तन करायला लागले तेव्हा भाविक तिथे जमू लागले. देवळाच्या मागच्या दरवाजासमोर कीर्तन हा प्रकार सुरुवातीला लोकांना रुचला नसणार. त्यावेळी नामदेवरायांनी लोकांना शिवाला विन्मुख होऊन पाठीमागच्या दरवाजाने नमस्कार करण्याचा पाशुपतांच्या आचारधर्माची आठवण करून दिली असणार. त्या ठिकाणी पाशुपतांचा बराच प्रभाव होता. त्यामुळे लोकांना पाठीमागचा दरवाजाच नमस्कारासाठी आणि कीर्तनासाठी योग्य आहे याची खात्री पटली. पुढे नामदेवरायांनी त्यांना समतावादी विचारसरणीही सांगितली असणार. देवळातले पुजारी देवळात जाण्याच्या विशेष अधिकाराचं भांडवल करून जातश्रेष्ठत्वाचा दावा करत होते. तो दावाच नामदेवरायांमुळे निकालात निघाला. त्यावेळी नामदेवरायांनी केलेला युक्तिवाद बिनतोड होता. नामदेवरायांनीच तो नोंदवून ठेवलाय. ‘नाना वर्ण गवा एक वर्ण का दूध। तुम कहां के ब्राह्मण हम कहां के सूध ।।’ म्हणजे गायी विविध रंगाच्या असल्या तरी दूध एकाच रंगाचे देतात, त्याप्रमाणे माणसांच्या वर्णांची नावे जरी वेगळी असली तरी कोण ब्राह्मण आणि कोण शूद्र? ब्राह्मण आणि शूद्र हे दोन्ही सारखेच आहेत. नामदेवरायांचा हा विचार तिथल्या लोकांना आवडला. नामदेवरायांच्या रसाळ कीर्तनात लोक रंगून गेले. आता खरी पंचाईत झाली ती मंदिरातल्या पुरोहितांची. दोन्ही बाजूला दरवाजा असल्यामुळे समोरची बाजू आणि मागची बाजू यात फरकच उरला नाही. आत शिवलिंग असल्यामुळे मूर्तीच्या आधारावरूनही देवाची सन्मुख बाजू कोणती आणि विन्मुख बाजू कोणती हे ठरवता येणार नव्हतं. त्यामुळे ज्या दरवाजाच्या बाजूने लोक शिवाला नमस्कार करत आहेत, कीर्तन करत आहेत तीच बाजू समोरची बाजू ठरली आणि पुरोहितांना अपेक्षित असलेली समोरची बाजू ही पाठीमागची बाजू ठरली. देवळाच्या बाजूत १८० अंशात झालेला हा बदल ही नामदेवरायांची किमया होती.
नामदेवरायांनी देवळाच्या दिशेत अदलाबदल तर केलाच, पण त्याचबरोबर माणसांची विचारांची दिशाही १८० अंशात बदलून टाकली. विषमतेकडून समतेकडे, कर्मकांडाकडून प्रेमभक्तीकडे आणि वेदांकडून अभंगाकडे अशा बर्‍याच बाबतीत समाजाच्या विचारांची दिशा बदलवली. तुकोबाराय म्हणतात तसं ‘फिरविले राऊळ जगामाजी ख्याती’ अशी नामदेवांची जगामध्ये ख्याती झाली. नामदेवरायांची ही गोष्ट चहुमुलखी झाली. ती त्यांच्या नावाने असलेल्या हिंदी पदात जशी आलीय तशीच ती गुरुग्रंथसाहिबातही आलीय. संपूर्ण भारतात या घटनेमुळे नामदेवरायांचा बोलबाला झाला. ज्या नामदेवरायांना मंदिरात प्रवेश नाकारला आज त्याच नामदेवरायांची जगभरात शेकडो देवळे आहेत.
भारतभरातल्या भक्तिपरंपरेत असे अनेक प्रसंग आढळतात. देवाच्या भक्तीप्रेमापोटी मंदिरात जाण्यासाठी तळमळणार्‍या भक्तांना केवळ जातीच्या आधारावर मंदिरात प्रवेश नाकारला गेला. अळवार परंपरेतील तिरुप्पाण, नयनार परंपरेतील नंदनार, दासकूट परंपरेतील कनकदास आणि वारकरी परंपरेतील चोखोबाराय अशा अनेक दलित-बहुजन संतांना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. या संतांनी त्यांच्या भक्तीच्या बळावर समाजमनात वंदनीयता प्राप्त केली. अलीकडच्या काळातील वारकरी संप्रदायातील सत्पुरुष कैकाडीबाबांचं उदाहरण देता येईल. कैकाडीबाबांचं मूळ गाव मांडवगण. या गावात सिद्धेश्वराचं देऊळ आहे. या देवळात कैकाडीबाबांना प्रवेश दिला नव्हता. त्यासाठी त्यांनी एका पायावर उभं राहून सत्याग्रह केला. पुढे कैकाडीबाबा लोकप्रिय झाले. गाडगेबाबांच्या परंपरेचा भाग बनले. गाडगेबाबांच्या परंपरेतील अनुयायांना ‘कुसाबाहेरचे महाराज’ असं म्हटलं जात होतं. त्याच कैकाडीबाबांचे पुतणे रामदास महाराज जाधव पुढे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त झाले. काही काळ मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची घोषणाही झाली होती. रामदास महाराजांना हा जो सन्मान मिळाला तो त्यांच्या लोकप्रियतेकडे पाहूनच. लोकांना समतावादी विचारांच्या बाजूने वळवण्याचा हा नामदेवरायांचा वारसाच कैकाडीबाबा आणि रामदास महाराजांनी पुढे नेला असं म्हणता येतं.
यावर्षी नामदेवरायांचा ६७५वा समाधी सोहळा पार पडला. वारकरी परंपरेनुसार आषाढ वद्य त्रयोदशीला म्हणजेच यावर्षी २३ जुलै २०२५ रोजी हा समाधी सोहळा संपन्न झाला. बरोबर १०० वर्षांपूर्वी म्हणजे १९२५ साली नामदेवरायांचा समाधी सोहळा वेगळ्याच कारणाने गाजला होता. त्यावेळी नामदेव शिंपी समाजाची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे नामदेव पायरीला म्हणजेच नामदेवरायांच्या समाधीकडे निघाली होती. जाताना वाटेत बडव्यांनी मिरवणुकीवर हल्ला केला. समाजबांधवाना मारहाण केली. अगोदरच्या वर्षी म्हणजे १९२४ सालीही असाच प्रकार घडला होता. या काळात वारकरी संतांचा सामाजिक समतेचा वारसा पुढे नेणार्‍या सत्यशोधकांनी नामदेव शिंपी समाजाची बाजू घेतली. त्यात प्रबोधनकार ठाकरे, जयरामनाना वैद्य, केशवराव बागडे वकील, रावसाहेब सोपान आबाजी पतंगे आणि भागवत महाराज देहूकर यांचा पुढाकार होता. त्यांनी शिंपी समाजावर झालेल्या अन्यायाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे बराचसा शिंपी समाज सत्यशोधक समाजाकडे आकृष्ट झाला. ज्या प्रवृत्तींनी नामदेवरायांना मंदिरात प्रवेश नाकारला, त्याच जातीय प्रवृत्तीच्या लोकांनी नामदेवरायांच्या समाधीकडे येणार्‍या नामदेव शिंपी समाजाच्या मिरवणुकीला विरोध केला. त्याच प्रवृत्ती आजही आपल्याला आढळतात. नामदेवरायांचा देऊळ फिरवण्यामागचा समतेचा विचार जर आजच्या काळात स्वीकारला गेला तरच नामदेवरायांना अभिप्रेत समाजरचना तयार होईल. नामदेवरायांच्या ६७५व्या समाधी उत्सवाप्रित्यर्थ तोच समतेचा विचार स्वीकारला जावा, हीच प्रार्थना नामदेवरायांच्या चरणी करायला हवी.

Previous Post

साहेबाची बोलती बंद

Next Post

निश्चयाचा महामेरू

Next Post
निश्चयाचा महामेरू

निश्चयाचा महामेरू

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.