२०२३ अखेरीस भारतातील कुलूप बाजार सुमारे ५,००० कोटी रुपयांचा झाला असून त्यात स्मार्ट लॉकिंग सिस्टीमचा वाटा लक्षणीयरीत्या वाढताना दिसतो आहे. विशेषत: शहरी भागातील निवासी प्रकल्प, हॉटेल्स, आणि कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये डिजिटल लॉक्सना प्रचंड मागणी मिळते आहे.
– – –
माणसाच्या इतिहासात मालकीची संकल्पना जिथे जन्माला आली, तिथूनच एखादी गोष्ट दुसर्यापासून सुरक्षित ठेवण्याची गरज निर्माण झाली आणि मोठमोठ्या खजिन्यांना सुरक्षित ठेवणारी साधनं अस्तित्वात येऊ लागली. हळूहळू खजिने ओढगस्तीला लागले तशी मोठाले टाळे जाऊन आटोपशीर कुलपं आली, कालांतराने माणसं स्मार्ट झाली तशी त्यांची कुलपं देखील ‘स्मार्ट’ झाली.
सुमारे चार हजार वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये वापरात आलेल्या लाकडी स्लायडिंग लॉकला कुलपाचा आद्य नमुना मानलं जातं. या यंत्रणेचा वापर राजवाड्यांमध्ये आणि कोठारांमध्ये केला जाई. या कुलपात अनेक सळ्या बसवलेला लाकडी स्लायडिंग बोल्ट असायचा. हे लॉकिंग यंत्र विशिष्ट चावीशिवाय उघडणं अशक्य होतं. इथेच ‘की’ (चावी) ही संकल्पनाही जन्माला आली. ही चावी म्हणजे एक लाकडी सळी असायची, जी स्लायडिंग लॉकमध्ये घातल्यावर लोखंडी सळ्यांना एका बाजूला ढकलून दरवाजा उघडायची.
कुलपाचा इतिहास माणसाच्या सामाजिक जडणघडणीशी, युद्धनीतीशी आणि अर्थकारणाशी जोडलेला यांत्रिक विकासाचा भाग आहे. प्रत्येक संस्कृतीने पारंपरिक मूल्ये आणि स्थानिक गरजांनुसार कुलपांची वेगवेगळी रूपं तयार केली. उदा. चीनमध्ये कुलपांचा उपयोग फक्त चोरीपासून बचावासाठी केला जात नव्हता, तर ते धार्मिक, सामाजिक आणि तांत्रिक प्रतीक म्हणूनही स्वीकारलं गेलं होतं. चीनमध्ये ‘ट्रिक लॉक’ची एक अनोखी परंपरा विकसित झाली होती, ज्यात कुलूप उघडण्यासाठी विशिष्ट पद्धतीने विविध भाग हलवावे लागत. चोराला गोंधळात टाकण्याचं उद्दिष्ट त्यातून साधलं जात असे. या कुलपांवर ड्रॅगन, सिंह किंवा पौराणिक जीवांची नक्षी असे. यांना सौंदर्य, शक्ती आणि शुभशकून यांचं प्रतीक मानली जात. हीच परंपरा कोरिया आणि जपानमध्येही वेगळ्या रूपात दिसते. कोरियन ‘कावारा जिमे’ प्रकारातील कुलपं विशेषतः बौद्ध मठांमध्ये, धार्मिक दस्तऐवज किंवा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जात असत. या कुलपांचा वापर केवळ यांत्रिक सुरक्षा देण्यासाठी नव्हे, तर त्या वस्तूंच्या पवित्रतेचं रक्षण करण्यासाठीही केला जात असे.
मध्यपूर्व आणि इस्लामी संस्कृतीत कुलपांचा विकास मुख्यत: व्यापार व लष्करी गरजांमधून झाला. बगदाद, दमास्कस आणि इस्तंबूलसारख्या ठिकाणी ८व्या ते १३व्या शतकात झालेली धातूकामातील प्रगती कुलपांच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनमध्ये दिसते. पितळ व तांब्याच्या मिश्रधातूंनी तयार केलेली जड कुलपं व्यापार मार्गांवरील गोदामं, किल्ले आणि दस्तऐवज कक्षांसाठी वापरली जात. या कुलपांवर अरबी लिपी आणि धार्मिक उतारे कोरलेले दिसतात. युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीपूर्वी कुलपं हाताने बनवली जातं, त्यामुळे एक कुलूप बनवण्यासाठी लोहाराला अनेक दिवस लागायचे. ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये धातूचा वापर होऊ लागल्यावर कुलपांचे स्वरूप अधिक मजबूत आणि यांत्रिक बनत गेलं. रोमन लोकांनी कुलपांत लोखंड, ब्राँझ आणि पितळ या धातूंचा वापर करून नवनवीन प्रयोग केले. उदा. कुलूप उघडण्यासाठी अंगठीत मावतील अशा बारीकशा चाव्या तयार केल्या, भारतीय संस्कृतीत ज्या स्त्रीच्या कमरेला चाव्यांचा जुडगा लावलेला असतो, ती कुटुंबप्रमुख असते अशी मान्यता आहे. याचप्रकारे रोमन काळात चावीची अंगठी घातलेल्या स्त्रीची सामाजिक प्रतिष्ठा वाढत असे. मात्र मध्ययुगात कुलपांचा वापर व्यापारी, गिरण्या, कागदपत्रं ठेवणार्या दप्तरी पेट्या, चेस्ट बॉक्सेस या सर्व गोष्टींसाठी व्हायला लागला. लोखंडी पट्ट्या आणि गुंतागुंतीचे लॉकिंग मेकॅनिझम यामुळे कुलूप मजबूत आणि सुंदर हस्तकलेचा नमुना बनत गेले. अनेकदा शिल्पकार व लोहार मिळून कुलपं तयार करत. जर्मनी, प्रâान्स, इंग्लंडमध्ये अशा हस्तशिल्प कुलपांचा व्याप वाढत गेला.
कुलूप बनवणार्या लोहारांना त्या काळचे तांत्रिक तज्ञ मानले जात आणि त्यांच्या कामाला प्रतिष्ठेचं स्थान होतं. इंग्लंडच्या शिल्ड्स, फ्रान्सच्या ल्योन, आणि जर्मनीच्या न्युरेंबर्ग या भागांमध्ये शतकानुशतके कुलपं बनवणारी कुटुंबं हेच कुलपांचे मुख्य उत्पादक होते. हे हस्तशिल्पात्मक युग संपवलं औद्योगिक क्रांतीच्या झंझावाताने. विशेषत: इंग्लंडमध्ये १८व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक स्वतंत्र संशोधकांनी कुलूप तंत्रज्ञानात मूलभूत बदल घडवून आणले. १७७८ साली इंग्लंडच्या रॉबर्ट बॅरॉनने डबल टंबलर लॉक तयार केलं. त्याने कुलूप उद्योगात खरी क्रांती आली. या लॉकमध्ये सुरक्षा यंत्रणा दोन स्वतंत्र टप्प्यांत विभागली गेली होती, योग्य चावीनं त्या दोन्ही टंबलर योग्य स्थितीत आल्यावरच कुलूप उघडू शकत होतं. ही कल्पना इतकी क्रांतिकारक होती की पुढील शतकभर अनेक लॉक उत्पादकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केलं. यानंतर जोसेफ ब्रॅमाह नावाच्या इंजीनिअरने १७८४ साली ‘ब्रॅमाह लॉक’ तयार केलं, जे त्याच्या म्हणण्यानुसार ‘कोणालाही उघडता येणार नाही’ इतकं सुरक्षित होतं. हे कुलूप उघडून दाखवा असं आव्हान दिलं गेलं. कुलूपतज्ञांनी आणि घरफोडी करणार्या चोरांनी अनेकदा हे कुलूप उघडायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आलं. या क्लृप्तीमुळे या कंपनीची कुलपं मोठ्या प्रमाणात विकली जाऊ लागली. तब्बल ६७ वर्षांनंतर अल्फ्रेड चार्ल्स हॉब्स या एक अमेरिकन कुलूपतज्ञाने १८५१ साली लंडनमध्ये झालेल्या ‘ग्रेट एक्झिबिशन’ या जागतिक प्रदर्शनात हे कुलूप उघडून दाखवलं. यामुळे ब्रिटनमधील कुलूप उद्योगात एकच खळबळ माजली आणि यापेक्षाही सुरक्षित कुलूप बनवण्याच्या दिशेने अधिक संशोधन सुरू झाले.
१८५७मध्ये अमेरिकन संशोधक जेम्स सर्गेंटने आकड्यांचे कॉम्बिनेशन लॉक तयार करून कुलूप उद्योगाला नवनिर्मितीची हाक दिली. बँका, लॉकर आणि खाजगी दस्तऐवजांसाठी अत्यंत सुरक्षित प्रणाली उपलब्ध झाली. या शोधामुळे ड्युटी बदलल्यावर चाव्यांचे हस्तांतर करणे, चावी हरवणे, डुप्लिकेट चावी बनण्याची भीती असणे हे अडसर दूर झाले (पुढे अनेक दशकांनंतर हीच प्रणाली इलेक्ट्रॉनिक रूपात वापरली जाऊ लागली.) याच काळात लायनस येल सीनियर व त्याचा मुलगा लायनस येल ज्युनियर यांनी अमेरिकेतून कुलूप उद्योगाला नवा चेहरा दिला. १८६१ साली त्यांनी पिन टम्बलर सिलिंडर लॉक विकसित केलं, ही प्रणाली आजही जगभरात वापरली जाते. त्याने पारंपरिक लॉकमध्ये असलेली गुंतागुंत कमी करत एक अत्यंत सुस्पष्ट आणि विश्वासार्ह यंत्रणा बनवली. या कुलपात लहान पिन्स आणि एक विशिष्ट रचना असते, जी फक्त योग्य चावीनेच उघडता येते. ‘येल अँड टाऊन्स’ या कंपनीच्या नवकल्पनेमुळे घरगुती कुलूप व्यवसाय मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत आणि युरोपात विकसित झाला. येल अँड टाऊन्सने सुरक्षित लॉकर, बँक वॉल्ट, आणि हँडल लॉकिंग सिस्टीम या व्यवसायात देखील भरारी घेतली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या प्रारंभी, अमेरिकेतील सार्जन्ट अँड ग्रीनलीफ, जपानची मिवा लॉक, जर्मनीची अबूस, आणि युनायटेड किंगडममधील चब लॉक्स या कंपन्यांनी केवळ यांत्रिक नव्हे तर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल लॉकिंग सिस्टीमवरही काम सुरू केलं.
भारतात देखील मालकी हक्क, वस्तूंचं रक्षण आणि घरादाराची सुरक्षा ही संकल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. प्राचीन भारतात महाभारत आणि रामायणासारख्या ग्रंथांतून अनेक ठिकाणी ‘कोष’, ‘गुप्तगृह’, ‘कोठार’ यांचा उल्लेख आढळतो. या ठिकाणी मौल्यवान वस्तू, शस्त्रे, किंवा शासकीय दस्तऐवज ठेवले जात. सुरक्षा ही मुख्यत: दरवाज्याच्या रक्षणासाठी असायची जिथे बोल्ट, ‘मंजीरे, साखळ्या, अडसर यांचा वापर व्हायचा. परंतु कुलपाची कोणतीही यांत्रिक प्रणाली आढळत नाही. त्या काळात सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सैनिक, द्वारपाल किंवा सेवकांवर अवलंबून होती. कुलपासारख्या यांत्रिक यंत्रणेचं अस्तित्व भारतात आढळायला लागतं ते मुघल साम्राज्याच्या काळात. दिल्ली, आग्रा, लाहोर, जयपूर येथील लोहार खास दस्तऐवज पेट्या, दारे आणि लोखंड-तांब्याच्या कुलपांची निर्मिती करत. मौल्यवान वस्तूंची ने-आण करताना वापरल्या जाणार्या धातूच्या पेटार्यांना चोरांपासून वाचवण्यासाठी त्यांच्या कुलपांची रचना विशेष क्लृप्त्यांनी केली जाई. उदा. चावीने उघडण्याआधी एक विशिष्ट पद्धतीनं दोन बटनं एकाचवेळी दाबावी लागत अथवा ते उलटे फिरवावं लागे. अशा प्रकारच्या ‘ट्रिक लॉक’ यंत्रणा त्या काळी लोकप्रिय होत्या. त्यांचा उपयोग राजघराण्यांतील संचित पेट्या, पूजेच्या कोठार्या किंवा गुप्त दस्तऐवजांच्या सुरक्षेसाठी केला जात असे. आज ही दुर्मिळ कुलपं संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात.
भारतात औद्योगिक पातळीवर कुलूप निर्मितीचा खरा प्रारंभ झाला तो १८७०च्या सुमारास अलीगढ शहरात. एका ब्रिटिश व्यापार्यानं सुरू केलेल्या लहानशा यंत्रशाळेतून या कुलूप उद्योगाची बीजं रोवली गेली. सुरुवातीला इंग्लंडहून धातूच्या चाव्या, स्प्रिंग्स, लिव्हर सेट्स असे कुलपांचे विविध भाग पाठवले जात, स्थानिक लोहार त्यांची केवळ जोडणी करत. पण अल्पावधीतच अलीगढच्या कुशल कारागीरांनी या तंत्रज्ञानाचं स्वरूप समजून घेतलं आणि कुलूप बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल (धातूच्या पत्रे ते स्प्रिंग) आणि लिव्हर तयार करण्यापर्यंतची प्रक्रिया स्थानिक पातळीवरच तयार होऊ लागली आणि अलीगढमध्ये एक विशिष्ट ‘क्लस्टर इकॉनॉमी’ उभी राहिली. आज अलीगढमध्ये ५,०००हून अधिक लघुउद्योग व कारखाने विविध प्रकारची कुलपं बनवतात. यातील काही कारखाने घरगुती स्वरूपात चालवले जातात, तर काही आधुनिक यांत्रिक मशीन्ससह कार्यरत आहेत. येथे फक्त घरगुती दरवाज्यांसाठीच नव्हे, तर मुख्य गेट, गोडाऊन, ट्रंक, दुचाकी, स्कूल लॅब्स, आणि शासकीय इमारतींसाठीही १०००हून अधिक प्रकारची कुलपं तयार होतात. यामध्ये लिव्हर लॉक, डिस्क लॉक, नंबर लॉक आणि कॉम्प्युटराइज्ड सिलिंडर लॉक यांचा समावेश आहे. अलीगढ आज संपूर्ण भारतात ‘कुलपांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. इथे तयार होणारी कुलपं पश्चिम आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ, आणि भूतानसारख्या देशांमध्येही निर्यात केली जातात. येथे ३० ग्रॅम वजनाच्या छोट्याशा कुलपापासून ते तब्बल ४०० किलो वजनाच्या औद्योगिक कुलपांपर्यंत सर्व काही तयार केलं जातं. इथे अत्यंत कमी ख्ार्चात मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं. येथे २ लिव्हरपासून ते ७ लिव्हरपर्यंतचे कुलूप प्रकार तयार केले जातात, जे स्थानिक किरकोळ विक्रेत्यांपासून हातगाडीवर विकणार्या व्यापार्यांच्या गरजेनुसार ठरवले जातात. मात्र या उत्पादन पद्धतीचा एक ठळक तोटाही आहे, तो म्हणजे ब्रँड मूल्य आणि ग्राहक विश्वासाचा अभाव. अलीगढमधील बर्याच उत्पादकांचा व्यवसाय हा ओईएम (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर) स्वरूपात असतो, म्हणजे ते दुसर्या ब्रँडच्या नावाने कुलपं तयार करतात. परिणामी, स्वत:च्या नावाने ओळख निर्माण करणं त्यांच्यासाठी अधिक कठीण होतं. अलीगढव्यतिरिक्त भारतात राजकोट (गुजरात), कोयंबतूर (तमिळनाडू), आणि लुधियाना (पंजाब) या शहरांमध्येही छोट्या प्रमाणात कुलूप उत्पादक आढळतात.
१९व्या शतकाच्या अखेरीस भारतावर ब्रिटिश सत्ता असताना बहुतांश यंत्रसामग्री परदेशातून आयात केली जात होती. त्या काळातली कुलपं अनेकदा दर्जाहीन असत. याच पार्श्वभूमीवर, १८९७ साली अर्स्ट गोदरेज या पारशी उद्योजकाने दर्जेदार ‘अनपिकेबल लॉक’ तयार करण्याचा निर्धार केला. १९०९ साली गोदरेजने भारतात तयार झालेलं पहिलं पेटंटेड स्प्रिंगलेस लॉक कुलूप बाजारात आणलं. टम्बलर लॉक नावाच्या या स्वदेशी कुलपात ६ लिव्हर, ट्रिपल सेफ्टी सिस्टिम आणि प्रिसिजन मशीनिंगचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, प्रत्येक कुलपासाठी एक युनिक की बनवली जात असे, जी कोणत्याही दुसर्या कुलपावर लागू होत नसे. हे वैशिष्ट्य त्या काळात अद्वितीय मानलं जात होतं. याचं कौतुक त्या काळातील ब्रिटिश राजसत्तेनेही केलं होतं. १९४०च्या दशकात गोदरेजने ‘नव-ताल’ (म्हणजेच ‘नवं ताळं’) या नावाचं कुलूप बाजारात आणलं. हे टाळं भारतातील सर्वसामान्य ग्राहकासाठी मजबूत, टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय ठरलं. यामध्ये लोखंडी बॉडी, स्टेनलेस स्टील शॅकल, अँटी-कट यंत्रणा आणि सॉफ्ट स्प्रिंग-अॅक्शन यांचा समावेश होता. हे कुलूप इतकं लोकप्रिय झालं ‘नव-ताल’ हे नाव कुलूप या शब्दाचा पर्याय बनलं. गोदरेजने नेहमीच दर्जा आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिलं. त्यांच्या कुलूप निर्मितीत टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंगपासून सुरुवात होते. अत्यंत अचूकतेने होणारी कटिंग प्रक्रिया, हीट ट्रीटमेंट, क्रोम कोटिंग आणि प्रत्येक टप्प्यावर होणारी क्वालिटी टेस्टिंग प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाते. विक्रोळीतील त्यांच्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये हायड्रॉलिक प्रेस, सीएडी आणि की कोडिंग मशीनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे उत्पादन ग्राहकाच्या विश्वासाला पात्र ठरतं. १९७०नंतर गोदरेजने बँक लॉकर, सेफ्टी ट्रेझर, ऑफिस फर्निचर आणि फायरप्रूफ लॉकर यांसारख्या श्रेणींत विस्तार केला. त्यांनी भारतीय बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्राला ‘सुरक्षितता’ या संकल्पनेचं यांत्रिक रूप दिलं. आजही भारतात बहुतांशी बँक वॉल्ट म्हणून गोदरेज लॉकर वापरले जातात.
पुढील काळात जागतिक बाजारातील स्पर्धा तीव्र होत गेली आणि विविध देशांमधून आलेल्या कमी किमतीच्या उत्पादनांनी भारतीय बाजारात शिरकाव केला. पण गोदरेजने या आव्हानांना सामोरे जाताना दोन गोष्टींवर ठाम भर दिला. एक म्हणजे सतत नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि दुसरं म्हणजे भारतीय ग्राहकांच्या गरजांचा अचूक वेध घेत त्यानुसार उत्पादनात योग्य बदल घडवणं. २०१०नंतर त्यांनी ‘गोदरेज अॅडव्हँटिस’ या नावाने डिजिटल आणि बायोमेट्रिक कुलपांची नवी श्रेणी सादर केली. या कुलपांमध्ये पिन कोड, आरएफआयडी कार्ड, फेस स्कॅन, मोबाइल ओटीपी आणि ब्लूटूथ अनलॉकिंग अशा अत्याधुनिक सुविधा होत्या. ही कुलपं शहरी अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेससाठी डिझाइन करण्यात आली आणि त्यांनी दक्षिण कोरिया, जपान आणि चीनसारख्या आघाडीच्या ब्रँड्सना थेट स्पर्धा दिली. या नव्या वाटचालीसाठी त्यांनी आपला आर अँड डी विभाग अधिक सक्षम केला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि स्मार्ट सुरक्षा प्रणालींच्या दिशेने सक्रिय पावलं टाकली. त्यांच्या स्मार्ट लॉक सिरीजमध्ये आता गुगल होम आणि अॅमेझॉन अॅलेक्सा यांसारख्या स्मार्ट असिस्टंट्ससोबत सुसंगतता आली आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहकांना आधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानात आधारित सुरक्षा अनुभवता येते. आज गोदरेज कंपनी एक संपूर्ण सिक्युरिटी सोल्यूशन्स प्रोव्हायडर बनली आहे. देशभरात त्यांच्या पाच हजारहून अधिक डीलरशिप्स, साडेसातशे सर्व्हिस सेंटर्स, आणि पन्नासहून अधिक कुलूप प्रकार उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातसुद्धा त्यांनी आपली उपस्थिती घट्ट ठेवली आहे, आणि ‘नव-ताल’ हे कुलूप आजही विश्वासाचं प्रतीक मानलं जातं.
आज भारतातील कुलूप उद्योग दोन स्पष्ट भागांमध्ये विभागलेला आहे. एकीकडे ए-टू-झेड, सेफएज, हरिसन आणि गोदरेज अशा पारंपरिक यांत्रिक कुलूप तयार करणार्या कंपन्या आहेत, तर दुसरीकडे नव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल आणि स्मार्ट लॉकिंग सोल्युशन्स देणारे नवीन पिढीचे ब्रँड्स आहेत, ज्यामध्ये झेब्रॉनिक्स, येल इंडिया, लावना आणि कुबो यांचा समावेश होतो. अँकर लॉक्स या ब्रँडने स्वस्त दरातील, मजबूत बांधणी असलेली पाच लिव्हरपर्यंतची कुलपं बाजारात आणून स्थानिक ग्राहकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. हॅरिसन लॉक्स हे शटर आणि गोडाऊनसाठी वापरल्या जाणार्या मजबूत कुलपांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तर अलीगढमधूनच सुरू झालेल्या लिंक लॉक्स या ब्रँडने टेलीव्हिजन जाहिराती आणि ब्रँड पोझिशनिंगच्या जोरावर स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. प्लाझा लॉक्स ही कंपनी ट्रंक आणि सामान वाहतूक क्षेत्रातील गरजांनुसार कुलपं तयार करून विशिष्ट बाजारपेठ मिळवते, तर सेफएज या ब्रँडने औद्योगिक सुरक्षा आणि फायरप्रूफ वॉल्ट्ससारख्या क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर काही भारतीय स्टार्टअप्स आता आयओटी आधारित लॉकिंग सिस्टीम्स विकसित करत आहेत, जिथे कुलूप ब्लूटूथ किंवा वाय-फायच्या सहाय्याने थेट मोबाइल अॅपमधून उघडता येतं.
या सर्व ब्रँड्समध्ये तीव्र किंमत स्पर्धा आहे. कारण भारतात बहुतांश ग्राहक डिझाईन किंवा तांत्रिक वैशिष्ट्यं पाहण्याऐवजी दर, टिकाव आणि सहज उपलब्धता यावरून कुलूप निवडतात. म्हणूनच गेल्या दहा वर्षांत कुलूप उद्योगासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं, ते म्हणजे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार होणार्या स्वस्त आणि आकर्षक उत्पादनांचं. चिनी कुलपं कमी दरात, पण रंगीत बॉडी, सॉफ्ट की आणि आकर्षक डिझाईनसह बाजारात येतात. परिणामी भारतातल्या अनेक होलसेल बाजारांत चिनी कुलपांना मागणी वाढत असल्याचं स्पष्ट दिसून येतं. त्याचवेळी, येल (दक्षिण कोरिया), गोडो लॉक (जपान), आणि अबूस (जर्मनी) यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनी भारतात स्मार्ट लॉक श्रेणी सादर केल्यामुळे शहरी उच्चवर्गीय ग्राहकांची ओढ भारतीय ब्रँड्सऐवजी परकीय ब्रँडकडे वळली. मात्र, गोदरेज, कुबो आणि लवाना यांसारख्या भारतीय कंपन्यांनी स्मार्ट लॉकिंग क्षेत्रात आघाडी घेऊन या स्पर्धेला सक्षम प्रतिसाद दिला.
सर्वसामान्यपणे घरगुती वापरासाठी सर्वाधिक पसंती दिला जाणारा प्रकार म्हणजे लिव्हर लॉक, यामध्ये दोन ते सात आडव्या लीव्हर्स असतात आणि योग्य चावीनं विशिष्ट क्रमाने त्या हलवल्या गेल्यास कुलूप उघडतं. मजबूत बांधणी, कमी खर्च आणि सहज उपलब्धता ही याची वैशिष्ट्यं. गोदरेजचं नव-ताळ, अँकर आणि प्लाझा यांसारख्या कंपन्यांची कुलपं याच प्रकारात मोडतात. जिथे अधिक सुरक्षा आवश्यक असते तिथे पिन टंबलर लॉक यंत्रणा अधिक उपयुक्त ठरते. यामध्ये लहान पिन्स विशिष्ट लांबीच्या चावीसोबत अचूक जुळतात आणि त्यामुळे कुलूप उघडणं कठीण होतं. याच धर्तीवर अधिक सुरक्षितता देणारा प्रकार म्हणजे डिस्क टंबलर लॉक. बाइक, गोडाऊन किंवा उघड्या हवेत वापरासाठी हे कुलूप उत्तम ठरतं, कारण त्यात स्टील डोम संरचना असते आणि ते ड्रिलप्रूफ असतं. हॅरिसन आणि सेफएजसारख्या कंपन्यांनी या प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. ब्रीफकेस, बॅग्स किंवा शाळेची लॅब अशा ठिकाणी चाव्यांशिवाय उघडणार्या काँम्बिनेशन लॉकचा उपयोग केला जातो. हे ३-४ अंकी कोडवर चालतं. तिथून पुढं आपण नव्या युगात प्रवेश करतो, जिथं कुलूप म्हणजे एक स्मार्ट सुरक्षा प्रणाली बनते. ब्लूटूथ, वाय-फाय, ओटीपी, बायोमेट्रिक आणि मोबाइल अॅपद्वारे नियंत्रित होणारी स्मार्ट लॉक्स आता शहरी जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. कुबो, लवाना, येल स्मार्ट सिरीज आणि गोदरेज अॅडव्हँटिस ही नावं या क्षेत्रात आघाडीवर आहेत. हीच प्रगती पुढे औद्योगिक आणि शासकीय सुरक्षेच्या गरजांमध्ये पोहोचली आहे. बँक वॉल्ट्स, रासायनिक प्रकल्प, ट्रान्सफॉर्मर स्टेशन किंवा रेल्वे पॅनेल्ससाठी वापरली जाणारी इंडस्ट्रियल व सेफ्टी लॉक्स बहुधा आयएसआय अथवा यूएल प्रमाणित असतात. गोदरेज वॉल्ट लॉक, लिंक लॉक्स हे अशा प्रकारातील विश्वासार्ह पर्याय मानले जातात.
घरगुती वापरासाठी २ ते ४ लिव्हर किंवा पिन टंबलर लॉक पुरेसं ठरतं, तर दुकान वा गोदामासाठी ५ ते ७ लिव्हर किंवा डबल लॉकिंग सिस्टीम आवश्यक मानली जाते. बँक किंवा कार्यालयासाठी डिजिटल वॉल्ट, प्रवासासाठी कोड लॉक आणि उच्च सुरक्षेसाठी आरएफआयडी किंवा बायोमेट्रिक आधारित स्मार्ट लॉक आवश्यक ठरतं. या सर्व प्रणालींचा दर्जा आणि विश्वासार्हता कायम राहावी म्हणून उत्पादन कंपन्यांना आयएसआय (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड), सीई (युरोपियन कन्फर्मितीज), किंवा युएल (अंडररायटर्स लॅबोरेटरीज) यांसारख्या अधिकृत प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागते.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे, २०२३ अखेरीस भारतातील कुलूप बाजार सुमारे ५,००० कोटी रुपयांचा झाला असून त्यात स्मार्ट लॉकिंग सिस्टीमचा वाटा लक्षणीयरीत्या वाढताना दिसतो आहे. विशेषत: शहरी भागातील निवासी प्रकल्प, हॉटेल्स, आणि कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये डिजिटल लॉक्सना प्रचंड मागणी मिळते आहे. २००० ते २०१० या दशकात घरोघरी पारंपरिक यांत्रिक कुलपांसोबत डिजिटल लॉकही दिसू लागलं. सुरुवातीला पासवर्ड किंवा कार्ड-स्वाइपवर आधारित कुलपं फक्त कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा हॉटेल्सपुरती मर्यादित होती. पण लवकरच बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंट व फेस रिकग्निशन लॉक्सचा प्रसार हळूहळू सर्वसामान्य घरांपर्यंत पोहोचू लागला. २०१०नंतर स्मार्टफोनचा प्रसार झाला आणि लॉकसुद्धा स्मार्ट झाले. मोबाईल अॅप्सद्वारे लॉक उघडणं, रिअल टाइम नोटिफिकेशन आणि अॅक्सेस कंट्रोल ही फीचर्स आता सामान्य ग्राहकांना सहज मिळू लागली. झिग्बी, झेड-वेव, वायफायवर आधारित लॉकिंग सिस्टीम्स बिनचावी विश्वात प्रवेश करत होत्या, तेवढ्यात अॅमेझॉन अॅलेक्सा किंवा गुगल असिस्टंटवर चालणार्या व्हॉइस-एक्टिवेटेड लॉक्समुळे वृद्ध आणि दिव्यांगांसाठीही हा बदल उपयुक्त ठरू लागला. ही टेक्नॉलॉजी पुढे इतकी प्रगत झाली की आज कुलूप म्हणजे एआय आणि बायोमेट्रिक सेन्सर्सच्या आधारावर शंका ओळखणारी, चोरांवर लक्ष ठेवणारी आणि मालकाला सतर्क करणारी एक स्मार्ट सिस्टीम बनली आहे. इथेच या डिजिटल प्रवासाला नवं वळण मिळालं. भविष्यातील कुलपं आयरिस स्कॅन, व्हेन स्कॅनिंग किंवा डीएनएवर आधारित ओळख व्यवस्थेपर्यंत जातील, असा अंदाज वर्तवला जातोय. त्याचवेळी क्वांटम सिक्युरिटी, एनर्जी हार्वेस्टिंग लॉक्स आणि ‘लॉक-अॅज-अ-सर्व्हिस’ ही संकल्पना समोर येत आहेत. ग्राहक एकदाच कुलूप विकत घेण्याऐवजी मासिक फी भरून अपग्रेडेबल व देखभालसहित सेवा घेतील. दरवाजा उघडताच घरातील लाइट्स, एसी, किंवा म्युझिक सिस्टिम चालू होईल. ही ‘इंटरकनेक्टेड सिक्युरिटी’ संकल्पना घराच्या रचनेचा भाग बनते आहे. या संपूर्ण प्रवासात निसर्गाचा विचार केला जातोय. रिसायकल होणार्या धातूंमधून तयार झालेली, दीर्घकाळ टिकणारी, पर्यावरणपूरक कुलपं हीच ग्राहकांची नव्या युगातील मागणी ठरत आहे.
या बदलत्या तंत्रज्ञान प्रवाहात उतरायचं असेल, तर नव्या पिढीच्या उद्योजकांनी हार्डवेअर डिझाईनपुरते न थांबता एम्बेडेड सिस्टीम्स, प्रोग्रॅमिंग, आयओटी, सायबर सिक्युरिटी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं ज्ञान यावर लक्ष केंद्रित करणं अपरिहार्य आहे. कारण आजचं कुलूप हे केवळ दरवाजा बंद करणारी गोष्ट नाही. ते विश्वास, डेटा सुरक्षा आणि डिजिटल युगातील गुंतवणूक आहे. जो कोणी या नव्या युगात गुणवत्तेसह नाव उभारेल, तोच खर्या अर्थानं या कुलूप क्रांतीचा शिल्पकार ठरेल.