ड्यूक्स चेंडू प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चिंतेत होतं. ‘आयसीसी’चे प्रमुख जय शाह यांच्या निर्देशानं हे प्रकरण आता क्रिकेटच्या नियमावलीचं अधिष्ठान असलेल्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) कोर्टात येऊन धडकलं होतं. काय घडलं या न्यायालयात? चला पाहू या काल्पनिक खटल्यातून!
– – –
‘एमसीसी’चे प्रमुख मर्व्हिन किंग यांनी आलिशान कारमधून खाली उतरत मुख्यालयाच्या पायर्यांकडे मोर्चा वळवला, तेव्हा असंख्य प्रसारमाध्यमांची गर्दी वातावरणाचं महत्त्व स्पष्ट करीत होती. किंग यांच्या आगमनाची वर्दी मिळाल्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी सारेच सज्ज झाले होते. एव्हाना मुख्य दालनात प्रवेश करून समोरील बाजूला बरोब्बर मध्यभागी असलेल्या विशेष सिंहासनावर ते आसनस्थ झाले. तशी समोर उभे असलेली सर्व मंडळी आपापल्या जागी बसली. शिपायानं ‘ड्यूक्स हाजीर हो!’ असं नाव पुकारताच आरोपीच्या पिंजर्यात ड्यूक्स चेंडू उभा राहिला. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटीत वादाच्या भोवर्यात सापडल्यानं त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला. स्वत:ला निर्दोष ठरवण्यासाठीच हा अट्टहास होता. सभागृहात ड्यूक्स चेंडूची निर्मिती करणार्या कंपनीचे मालक भारतीय उद्योजक दिलीप जजोडिया, कुकाबुरा, एसजी, आदी असंख्य मंडळी उपस्थित होती.
चौकशी आयोगाने न्यायाधीश किंग यांनी आरोपी ड्यूक्सकडे एक नजर फिरवली आणि आरोपपत्र वाचायला प्रारंभ केला, ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये ८० षटकांनंतर चेंडू बदलण्याची गोलंदाजी करणार्या संघाला मुभा असते; पण भारत-इंग्लंड कसोटीत ड्यूक्स चेंडू लवकर खराब होतो. त्याचा टणकपणा संपून तो मऊ होतो. क्वचितप्रसंगी त्याचा आकारच बदलतो, असा आरोप करण्यात आला आहे. भारतीय संघनायक शुभमन गिल, इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स, जो रूट, ऋषभ पंत, जसप्रीत बुमरा, आदी असंख्य क्रिकेटपटूंनी ड्यूक्स चेंडूबाबत नाराजी प्रकट केली आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, जेम्स अँडरसन यांच्यासारख्यांनी टीका केली आहे. ड्यूक्स, तुला तुझ्यावर होत असलेले हे आरोप मान्य आहेत का?’’ अशी विचारणा न्या. किंग यांनी केली.
‘‘त्रिवार नाही… नाही,’’ ड्यूक्स उत्तरला. किंग यांनी ड्यूक्सला हातानंच इशारा देत शांतपणे बाजू मांडायला सांगितलं. ड्यूक्सनं स्वत:ला सावरलं आणि बोलू लागला, ‘‘युअर हॉनर. क्षमा असावी. मी आपले लक्ष या वस्तुस्थितीकडे वेधून घेऊ इच्छितो की, ब्रिटनमध्ये ड्यूक म्हणजे सर्वोच्च सामाजिक प्रतिष्ठा असलेली व्यक्ती. हीच प्रतिष्ठा गेली अनेक शतकं मी ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ असं बिरूद मिरवणार्या क्रिकेटमध्ये टिकवली आहे. माझी निर्मिती ब्रिटिश क्रिकेट बॉल्स लिमिटेड ही कंपनी करते. ड्यूक कुटुंबीय १७६०पासून ही क्रिकेट साहित्य निर्मिती कंपनी चालवत होती; परंतु दिलीप जजोडिया नामक एका भारतीय उद्योजकानं १९८७मध्ये ही कंपनी खरेदी केली. या कंपनीचे लोकप्रिय ड्यूक्स चेंडू इंग्लंडबरोबरच वेस्ट इंडिज आणि आयर्लंडमध्येही वापरले जातात. ब्रिटिश प्रमाणित पद्धतीनं आमची जडणघडण होते. प्रत्येक चेंडूचं शास्त्रीय परीक्षण केलं जातं. यावरून तुमच्या लक्षात येईल की मी पृथ्वीतलावरील एक सुंदर निर्मिती आहे. मग माझा दोष काय? गावसकर नेमेचि टीका करतात. पंत हा माझ्याशी स्पर्धा करणार्या एसजी या चेंडू कंपनीचा सदिच्छादूत आहे. त्यामुळे माझ्यावर दोषारोप करणार्यांपैकी काही जण तरी निश्चितच हेतूपुरस्सर मला नावं ठेवतायत.’’
पुढे न्या. किंग यांनी ड्यूक्स चेंडूची निर्मिती करणार्या जजोडिया यांना बाजू मांडण्याचे निर्देश दिले. जजोडिया आत्मविश्वासानं उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘आम्हाला चेंडूंच्या सत्तास्पर्धेतून संपवण्याचे हे षडयंत्र आहे, असं माझं ठाम मत आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांचा हा बनाव आहे. क्रिकेटचे चेंडू चांगले नाहीत, हे गेल्या काही वर्षांत वारंवार म्हटलं जातंय, मग ते कुकाबुरा असोत, वा एसजी किंवा ड्यूक्सचे. क्रिकेट सामन्यांसाठी पूर्णत: नवे चेंडू वापरले जातात. हा चेंडू म्हणजे काही अभियांत्रिकी उत्पादन नाही. ते एखाद्या यंत्रातून बनत नाहीत, तर येथे हस्तकौशल्य महत्त्वाचं ठरतं. चेंडूवरील टाके हातानं घातले जातात. एका चेंडूच्या निर्मितीसाठी किमान साडेतीन तास लागतात. परंतु ते १०० टक्के परिपूर्ण पद्धतीनं कार्य करतील, याची खात्री देणं अशक्य आहे. आता क्रिकेट पहिल्यासारखं धिमं राहिलेलं नाही. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजांचं राज्य आहे. ते लिलया चेंडू सीमापार धाडतात. ते मारण्यासाठीचं आयुध म्हणजे बॅट. तीही आता पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यशाली झाली आहे. ही वस्तुस्थिती असताना ड्यूक्स चेंडूबाबत आक्षेप कशासाठी? दुसर्या कसोटीत भारतानं मोठ्या धावसंख्याही उभारल्या आणि प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी बादही केले. मग तरीही गिल आणि त्याचे सहकारी चेंडूबाबत असमाधानी का आहेत?’’
जजोडिया यांनी जय शाह यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि निवेदन पुढे चालू ठेवलं, ‘‘खेळाडूंनी संयम राखण्याची नितांत आवश्यकता आहे. आमचे चेंडू भारतात मीरतमध्ये बनतात आणि इंग्लंडमध्ये त्यांच्यावर अखेरची प्रक्रिया केली जाते. भारतात मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी एसजीचे चेंडू वापरले जातात. आमच्या कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय बेंगळूरुत आहे. भारतातसुद्धा ड्यूक्स चेंडूंचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास ही समस्या येणार नाही. त्यांना ड्यूक्स चेंडू सवयीचा होईल. ‘बीसीसीआय’कडे आम्ही तसा प्रस्ताव याआधीच सादर केला आहे!’’ जजोडिया यांनी आरोप नाकारण्याच्या बहाण्यानं मार्केटिंगसुद्धा करून घेतलं.
ड्यूक्सनं किंग यांच्याकडे नजर रोखून पुन्हा हात वर केला. किंग यांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली. ड्यूक्स म्हणाला, ‘‘यंदाच्या उन्हाळ्यात इंग्लंडमधील खेळपट्ट्या कोरड्या पडल्या आहेत. ओलसरपणाचा अभाव राहिल्यानं खेळपट्ट्या उत्तम दर्जाच्या व इंग्लंडसाठी अनुकूल झाल्यायत. जर कसोटी अडीच दिवसांत संपली असती तर मी गोलंदाजांना धार्जिणा आहे, असा आरोप झाला असता. पण कोरड्या खेळपट्टीवर मोठ्या धावा होतायत आणि तरीही सामना निकाली ठरतोय, याचं श्रेय मला का दिलं जात नाही?’’
किंग यांनी ड्यूक्सला बसायला सांगितलं. ते म्हणाले, ‘‘सध्या १०८ देशांमध्ये क्रिकेट खेळलं जातं. पण, ‘आयसीसी’नं यापैकी फक्त १२ देशांना पूर्ण सदस्यत्व बहाल केलंय. बाकीचे सहयोगी सदस्यत्व आहे. फुटबॉलच्या इतिहासातील एक दिग्गज संघ असलेला इटलीचा संघ मागील दोन फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी पात्र ठरू शकला नव्हता. पण त्यांचा क्रिकेट संघ पुढील वर्षी भारतात होणार्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरलाय. क्रिकेट सर्वदूर पसरतोय, हे महत्त्वाचं. चेंडूच्या वादासंदर्भात आता ‘आयसीसी’चे कायदेशीर सल्लागार पॉल मॅकमोहन आपली बाजू मांडतील.’’
पॉल उभे राहिले. त्यांच्यासमोर बराच दस्तऐवज होता. विषय मांडण्यासाठीचा पुरेसा अभ्यास करून ते आले होते, हे जाणवत होतं. ते म्हणाले, ‘‘सर्वच क्रीडाप्रकारांत मैदान आणि खेळण्याचं साहित्य याची नियमावली आहे. क्रिकेटच्या सर्वच नियमांचं बाकीचे खेळ कौतुक करीत असताना अपवाद ठरतात, ते दोन नियम. एक म्हणजे सीमारेषेचं अंतर आणि दुसरा विविध देशांत वापरले जाणारे तीन प्रकारचे चेंडू. ड्यूक्स चेंडू ओळख तर आपल्याला झालीच. एसजी म्हणजेच सॅन्सपॅरिल ग्रीनलँड्स ही कंपनीसुद्धा १९५०पासून मीरतमध्ये चेंडू तयार करते. केदारनाथ आणि द्वारकानाथ आनंद या दोन बंधूंनी १९३१मध्ये या कंपनीची स्थापना केली. १९४०पासून त्यांची क्रिकेट साहित्य उत्पादनं भारताबाहेरही निर्यात केली जातात. कुकाबुरा चेंडू हे कुकाबुरा स्पोर्ट्स कंपनीचे. ही एक ऑस्ट्रेलियन कंपनी क्रिकेट आणि हॉकीच्या क्रीडा साहित्याची निर्मिती करते. हे चेंडू ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि झिम्बाब्वेमध्ये वापरले जातात. ड्यूक्स आणि एसजी चेंडूंच्या सहाही शिवणरांगा हाताने घातल्या जातात, तर कुकाबुराच्या आतील दोन शिवणरांगा हातानं घातल्या जातात. परंतु बाहेरील दोन्ही बाजूच्या प्रत्येकी दोन रांगा यंत्राच्या साहाय्यानं घातल्या जातात. वातावरणाचा प्रभाव चेंडूंवर जाणवतो, या ड्यूक्सच्या म्हणण्यात तथ्य आहे. देशोदेशीचं वातावरण आणि खेळपट्ट्या यामुळे हे चेंडूंचं वैविध्य जपलं गेलेलं आहे. त्यामुळे एकच चेंडू सर्वच देशांमध्ये वापरणं अशक्य आहे. विविध देशांमध्ये चेंडूंच्या अशा प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यावरूनच ‘एमसीसी’ या निष्कर्षापर्यंत पोहोचलं आहे की…’’
फिर्यादी पक्षाचे वकील बिस्वा पटनायक यांनी त्वरेनं उठून पॉल यांचं वाक्य तोडून प्रश्न विचारला, ‘‘…याचा अर्थ ड्यूक्स चेंडू क्रिकेटसाठी योग्य आहेत? त्यांच्यात कोणताच दोष नाही?’’
न्यायमूर्ती किंग यांनी निकालपत्र वाचण्यासाठी दोन्ही हातांनी सर्वांना सबुरीचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘‘जजोडिया, ड्यूक्स आणि पॉल यांनी मांडलेले मुद्दे विचारात घेऊन मी निकालापर्यंत आलेलो आहे. चेंडूंसंदर्भातील वाद क्रिकेटसाठी मुळीच नवे नाहीत. चेन्नईत २०२१मध्ये झालेल्या भारत-इंग्लंड कसोटीमध्येही एसजी चेंडूबाबत आक्षेप घेण्यात आले होते. त्या प्रकरणात जो रूट आणि बेन स्टोक्सच अग्रेसर होते. कुकाबुराविषयीही अशा प्रकारच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे कोणताही चेंडू परिपूर्ण नाही. पण म्हणून ते अपूर्ण आहेत, असा शिक्का मारणंही अयोग्य आहे. परिणामी ड्यूक्सवर बंदी घातली जाणार नाही. वातावरण आणि खेळपट्ट्या यांच्यानुसार तिन्ही प्रकारचे चेंडू कार्यरत असून, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. परंतु ड्यूक्स चेंडूला सुधारणा करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. तूर्तास ही कार्यवाही पूर्ण झाली आहे, असं मी जाहीर करतो,’’ न्या. किंग यांच्या निकालानंतर ड्यूक्सला दिलासा मिळाला. जजोडिया यांच्या चेहर्यावर आनंद दिसला. पण एसजी आणि कुकाबुरा यांच्या चेहर्यावर शल्य दिसत होतं. एक सत्तास्पर्धक संपवता न आल्याचं… एव्हाना प्रसारमाध्यमांनी ब्रेकिंग न्यूज चालवली की ‘ड्यूक्सला क्लीन चीट’!