ठिकाण गांधी पुतळा. एमजी रोड. गांधी चौक. पुतळ्याभोवती सरंक्षक जाळी, आणि त्यात छोटेखानी उद्यान. तिथे आगेमागे काही सिमेंटचे बाकडे टाकलेले. तो पाठीला बॅग अडकवून तिथे आलेला. कुणाची तरी वाट बघत तो पुतळ्याजवळच्या एक बाकड्यावर बसतो. टळटळीत ऊन डोक्यावर आलंय. तो घड्याळ बघतो. हातातल्या मोबाईलमध्ये काही धुंडाळतो. पुन्हा अवतीभवती नजर टाकतो. दुपारची वेळ आणि रहदारीचं मुख्य केंद्र असल्यानं इथं प्रचंड गजबज जाणवतेय. तो पुन्हा मोबाईलवर बोटं फिरवतो. आणि मोबाईल कानाला लावतो.
‘किती वेळ? पाच मिनिटांत आलीस तर बरंये! नाहीतर…’ तो रागाने मोबाईल खिशात टाकतो. काही पुटपुटत बॅग धरून बसतो.
समोरून एक सफेद कपड्यातील वृद्ध व्यक्ती येते. गांधी टोपी सावरत ती व्यक्ती कचर्याच्या पेटीमागील झाडू घेऊन संपूर्ण परिसर झाडू लागते. ‘अरे काय हे? ह्याला आताच झाडायचं आहे का?’ तो काहीसा चिडून पण तरी काही मोकळं न बोलता त्या वृद्ध माणसाला झाडण्यास जागा करून देतो नि पुन्हा मूळ जागेवर येऊन बसतो. अर्थात मोबाईलवर बोटं फिरवत तो पुन्हा काही बघू लागतो.
सरंक्षक जाळीच्या शेजारच्या फुटपाथवरील गर्दीतून एक दहा-बारा वर्षांचं लहान पोरं वाकुल्या दाखवत जाताना दिसतं. त्याला आधीच असलेला राग आणि त्यात त्या चिमुकल्या मुलानं चिडवणं बोचतं. पण लहान मुलाला बोलणार काय ना?
तो पुन्हा मोबाईल बघू लागतो. काही वेळानं कॉलेजच्या तरुणी जवळून जाताना अचानक त्याच्याकडं बघत फिदीफिदी हसू लागतात. काही चावट विनोद करताय का ह्या मुली? तो एकवार स्वत:कडे बघतो. काही हसण्यासारखं दिसतंय का म्हणून. पण त्याला काहीही वावगं दिसत नाही. मूर्ख मुली असतील त्या! असं मनाला समजावत तो गप्प बसतो.
काही वेळानं एक टोळकं हातात हॉकी स्टिक, कोयते घेऊन तेथून जाते. त्यातील काही खुणेने ‘कापून टाकीन, फोडून टाकीन.’ हातवारे करत तेथून पुढे जातात. इतका वेळ येणारा राग आता भीतीत बदलतो. ही मुलं अशी खुन्नस देत का गेली असतील? त्याला काहीही उमगत नाही. तो घाईने मोबाईल काढतो आणि फोन लावतो.
‘कुठवर आलीस तू? इतका वेळ लागतो का यायला?’ भीतीयुक्त रागातून तो प्रश्न करतो. पलीकडून काहीतरी उत्तर मिळतं. पण ते महत्त्वाचं आहेच कुठे? इथे भीतीने गाळण उडालीय. ती भीती घालायला आधार शोधणं ही खरी आवश्यकता आहे ना?
‘बसलास?’ एक वयस्कर माणूस समोर येऊन उभा ठाकतो. तो मोबाईल बंद करून खिशात सरकवत भयमिश्रित आश्चर्याने त्याच्याकडे बघतो.
‘बस बाबा, तुला कोणे विचारायला? घर ना दार! आहे कसली जबाबदारी?’ तो रोखून बघत प्रश्नांची सरबत्ती करत जातो. ‘अरे मी घर सोडलंय कधी?’ तो स्वत:ला विचारू लागतो. हा माणूस असा का बोलतोय? याचा त्याला पेच पडतो.
‘पण डोईवर काही घेत जायचं उन्हातान्हाचं टकल्या!..’ तो माणूस बोलतोच आहे. बाकड्यावरला तो लागलीच डोकं चाचपून बघतो. ‘अरे केस तर आहेत माझ्या डोक्यावर. मग हा कुणाशी बोलतोय?’ तो नजरेनं चौफेर मागोवा घेतो. कुणीही आढळत नाही, पण तोवर तो माणूस हातवारे करू लागतो. त्या व्यक्तीच्या हातवार्यांच्या रोखाकडे बघून तो मान वळवतो. ‘हाय रे! म्हणजे इतक्या सार्यांचा दुश्मन हा टकला आहे तर?’ तो पुतळ्याकडे बघून सुटकेचा नि:श्वास टाकतो. तो वयस्कर माणूस बराच वेळ पुतळ्याशी बोलत राहतो. नंतर तसाच पुटपुटत हातवारे करत निघून जातो.
मघाशी आलेली गांधी टोपीधारी व्यक्ती आता अख्खं उद्यान लख्ख करून परत आलीय. शांतपणे झाडू पुन्हा घेतला त्या जागेवर ठेवत ते ‘काका’ पुतळ्याकडे तोंड करून ठेवलेल्या बाकड्यावर बसतात.
‘तुम्ही इथं कामाला आहात का?’ तो कुतूहलाने विचारतो.
‘नाही.’ काका शांतपणे उत्तरतात.
‘मग ही इथे साफसफाई का करतात तुम्ही?’ त्याचा पुन्हा प्रश्न.
‘हा पुतळा माझ्या वडिलांच्या अर्ज-विनंत्यांवर उभारला गेला आहे. मी अगदी लहान असतानापासून इथे येतो. तेव्हापासून ही झाडू मारायची सवय लागलीय मला.’ काका सांगतात.
‘म्हणजे इथली देखभाल तुम्हीच करतात?’ नवलाने तो.
‘हो, मीच बघतो. रिटायर झाल्यापासून आणखी वेळ मिळायला लागलाय मला. त्यात इथं आल्यावर शांतपणा मिळतो.’ काका उत्तर देतात.
‘इथे शांतपणा? कसं शक्य आहे? इथे भोवती इतकी रहदारी, गोंगाट असताना कुठे शांतपणा…’ त्याचा प्रश्न अर्ध्यात तोडला जातो.
‘तो गोंगाट, आवाज दूरच असतो. तो पुतळ्यापर्यंत येतो कुठे? आवाज फक्त मोर्चे, आंदोलन, जयंती-मयंतीच्यावेळी चौथर्यापर्यंत येतो. पण हल्ली तोही क्षीण झाला आहे. त्यांच्यालेखी गांधी परका झालाय ना?’ काका उलट सवाल करतो.
‘हो, मी बघतोय. त्यात हल्ली ह्या झुंडी थेट हत्यारं घेऊन पुतळ्यापर्यंत येत आहेत. अशावेळी तुम्हाला भीती नाही वाटत?’ त्याची न संपणारी प्रश्नावली चालू होते.
‘सत्य स्वीकारलं की भीती गळून पडते. आणि अशा झुंडींना गांधींचा पुतळा पाडायचा असतो. लेनिन-स्टॅलिन, माओ, गेला बाजार मुजीबुर रेहमान यांच्याप्रमाणे! त्यांना वाटतं पुतळा संपला की गांधी मरेल. म्हणून ते विकृत लोक बीभत्स हासत नाचत, कुठल्या तरी देवांच्या नावाने घोष करत येतात चालून. घालतात घाव. घामटा निघेपर्यंत! पण गांधी तसाही अडगळीत गेलेला निरुपद्रवी म्हातारा. इथे केलेला हैदोस धिंगाणा दुसर्या दिवसाच्या निषेधाच्या दोन ओळीत मिटतो. कुणाच्याही भावना त्याने दुखावत नाहीत. कुणीही झुंडीविरुद्ध ‘अरेला कारे’ करत नाही. दंगली होत नाहीत. बंद-संप होत नाही. इथेच गांधी जिंकतो. झुंडी हरतात. गांधी हसतमुखाने बसून राहतो.’ काका सांगत जातो.
‘पण ह्या झुंडी काही प्रश्न घेऊन येतातच ना?’ तो.
‘छे! त्या झुंडी प्रश्न विसरून द्वेष घेऊन येतात. त्या उठवळ-हुल्लडबाज असतात. त्यांच्याकडे कुठलंही ठोस कारण नसतंच गांधीविरोधाचं! त्यांचं लक्ष एकमेव असतं गांधी संपवणं. त्यांना प्रश्न-उत्तर, चिकित्सा, अभ्यास यांत स्वारस्य नसतंच. ठेवलं तर त्यांना गांधी समजून तो आवडू लागला तर? त्याने त्यांचीच मतं बदलतील की!’ काका समजवतात.
‘मग ते ५५ कोटी, फाळणीचे समर्थन वगैरे मुद्दे?’ तो काकांची कळ काढतो.
‘खरंच ते मुद्दे आहेत? साधारण इतिहासाचा विद्यार्थी त्या बाष्कळ प्रश्नांना सविस्तर उत्तर देऊ शकतो. तेही पुराव्यांसह! पण ती उत्तरं त्यांना ऐकायची-बघायची आहेत? नाही! त्यांना फक्त गांधी नकोय. नि त्याच्या नावाने चालणारी लोकशाही देखील. जोवर गांधीविचार जिवंत आहे, तोवर राष्ट्र एकसंध आहे. गांधी म्हणजे ह्या लोकशाहीचं सोटमूळ आहे. कारण बाकीच्या महापुरुषांना जाती-धर्माच्या कुंपणात केव्हाच बांधून टाकलं आहे. मुक्त आहे गांधी! त्याला बदनाम करूनही नाव मिटवता आलं नाही. असत्य पसरवूनही त्याचं सत्य पुसता येत नाहीय. रोज गोळ्या, कोयते, हातोडे चालवूनही गांधी संपत नाही.’ काका संयतपणे बोलत राहतात.
‘मी इतका हॉर्न वाजवतेय. लक्ष आहे कुठं?’ एक तरुणी उद्यानात येते.
‘गांधीबद्दल बोलत होतो आम्ही! त्यामुळं लक्ष नव्हतं. ये ना बस!’ तो तिला बोलावतो. ‘ काका ही माझी मैत्रीण! आम्ही इथं बोलत बसलो तर चालेल ना?’
‘बाळा, हा गांधी पुतळा आहे. इथं मैत्र, प्रेम याचा विटाळ नाही. हे काही कुठलं प्रार्थनास्थळ नाही की कुठल्या भोंदूची तथाकथित पवित्र भू! हा गांधी आहे. तो मित्र आहे. बाप आहे. मूल आहे नि निराधारांचा आधारही. तुम्ही त्याची आरतीही करू शकता आणि त्याच वेळी लाखोली वाहू शकता. त्याला शेंदूरही फासू शकतात नि शेणही! तो आणि त्याचे विचार कशानेही बाटत नाही.’ काका परवानगी देतात.
‘पण काका एक विचारायचं राहिलं. गांधी नाकारण्याचा दुसरा मार्ग नाहीय का?’ तो काकाला कोडं घालतोच.
‘गांधी नाकारायला आधी गांधीविचारांची चिकित्सा करावी लागेल. त्यासाठी अनेक ग्रंथालयं धुंडाळावी लागतील. गांधी वाचावा लागेल, अभ्यासावा लागेल. त्यासाठी एवढा वेळ आहे तुझ्याकडे?’ काका उलट कोडं त्याला घालतात. आणि स्मितहास्य करत निघून जातात. तो आणि त्याची मैत्रीण पुतळ्याखाली बराच वेळ बसून असतात. कुणीही त्यांना टोकत नाही, कुणाच्या भावना त्याने दुखावल्याही जात नाहीत.