महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार अशी चर्चा गेली दोन-तीन महिने मुंबई-महाराष्ट्रात सुरू होती. यासंबंधी सामान्य मराठी माणसाला जशी उत्सुकता होती तशी मराठी कलावंत, साहित्यिक आणि पत्रकारांनाही होती. विविध संघटनांना होती, तशी राजकारण्यांनाही होती. शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना उद्धव आणि राज एकत्र यावेत हे मनोमनी वाटत होते. गेल्या वीस वर्षांत तशा प्रकारे ते कधी-कधी व्यक्त होते आणि इच्छा प्रकट करत होते. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठांनी आणि अराजकीय व्यक्तींनीही करून पाहिला, पण तो विफल ठरला. त्यांना तेव्हा जमले नाही, यश आले नाही. पण भाजपाच्या महायुती सरकारने पहिलीपासून शिकणार्या बालमनावर तिसरी भाषा सक्तीचा जी.आर. काढला आणि चित्र पालटले. त्या जी.आर.ला दोघांनी कडाडून विरोध केला. तसाच मराठी माणसानेही कडाडून विरोध केला. विद्यार्थी-पालक यांच्याबरोबरच मराठी भाषेसाठी लढणार्या साहित्य सभा-परिषदा, संघटना यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंदीसक्तीला सर्वत्र विरोध होऊ लागला. मराठी माणूस एकटवला आणि रस्त्यावर उतरला. एकजुटीची शक्ती दाखवली. त्यामुळे हिंदीसक्ती टळली. अजून ती पूर्णपणे टळली नसली तरी मराठी माणसाच्या एकजुटीमुळे पहिला विजय मिळाला. या मराठी भाषेच्या विजयोत्सवाच्या निमित्ताने उद्धव-राज यांना एकाच व्यासपीठावर येण्याची पहिली संधी मिळाली.
एनएससीआय डोम, वरळी येथे ५ जुलै २०२५ रोजी मायमराठीच्या रक्षणासाठी हे ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले. या ऐतिहासिक क्षणाची मराठी माणूस चातकाप्रमाणे वाट पाहत होता. दोन्ही भावांना एकत्र पाहण्यासाठी डोळे आतुरले होते. त्यांच्या मनोमीलनाने मराठी माणसाच्या डोळ्याचे पारणे फेडले. तो सोनेरी क्षण अनुभवण्यासाठी समोरच्या सागराला हेवा वाटावा एवढा जनसागर डोममध्ये आणि डोमबाहेर उसळला होता. स्व. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील स्वर्गातून तो सोनेरी क्षण पाहून आनंद वाटला असेल.
या विजयी मेळाव्यात जवळजवळ सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, डॉ. अजित नवले, मराठी भाषा अभ्यासक केंद्राचे डॉ. दीपक पवार, रिपब्लिकन पक्ष (खरात) गटाचे सचिन खरात यांच्यासह काही कलावंत मंडळीही उपस्थित होती. ही सर्व मंडळी पक्षीय मतभेद आणि विचार बाजूला ठेऊन फक्त मराठीच्या रक्षणार्थाचा विचार घेऊन एकटवली होती.
उद्धव-राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा महाराष्ट्रातील २९ महापालिका व मुंबई एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरपालिकांवर निश्चित प्रभाव पडेल, असे राजकीय अभ्यासकांना वाटते. कारण मुंबई (२२७ जागा), ठाणे (१३१ जागा), कल्याण-डोंबिवली (१२२ जागा), उल्हासनगर (७८), भिवंडी (९० जागा), मिरा-भाईंदर (९५ जागा), पनवेल (७८ जागा), नवी मुंबई (१११ जागा) वसई-विरार (११५ जागा) अशा नगरसेवकांच्या जागा आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना मानणारा मोठा वर्ग या भागात राहतो. ठाकरे बंधूंना या ठिकाणी चांगले यश मिळू शकते. त्याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, अकोला आदी महानगरपालिकांमध्येही मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांचे नगरसेवक निवडून येऊन काही महानगरपालिकांची सत्ता हस्तगत होऊ शकते. उद्धव-राज यांच्या एकीमुळे शिंदे-फडणवीस यांच्या नगरसेवकांत घबराट झाल्याचे दिसते. नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत निवडणुकांमध्ये यांच्या एकीचा जोर पहावयास मिळेल. एमएमआरडीए क्षेत्रामध्ये एकूण ६० विधानसभा येतात, तर लोकसभेच्या दहा जागा आहेत. विधानसभेसाठी मुंबईत (३६ जागा), ठाणे (१८ जागा), पालघर (५ जागा), रायगड (२ जागा) अशा आहेत. यातील बहुतांश जागांवर शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांचा विजय होऊ शकतो असे राजकीय जाणकारांना तसेच भाजपाच्या चाणक्यांनाही वाटते.
मराठी माणसाच्या ५ जुलैच्या एकजुटीने भाजप-शिंदे सेना आणि त्यांचे नेते सोडल्यास महाराष्ट्रातील मराठी भाषेवर आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा मराठी माणूस मात्र आनंदित झाल्याचे दिसले. सामान्य माणूस, कामगार, शेतकरी, तरुण मंडळी, कलाकार, व्यापारी, लेखक, पत्रकारही आनंदित झाले. पण हा विजयोत्सवाचा जल्लोष ज्यांच्या डोळ्यांना खुपला, ज्यांच्या पायाखालची जमीन हादरली अशांनी दोघा बंधूंवर टीकेची झोड उठवली. उद्धव आणि राज कधीही एकत्र येणार नाहीत असे वाटणार्यांचा आणि ते एकत्र येऊ नयेत म्हणून सतत दोघांमध्ये वितुष्टतेचा बिब्बा घालणार्या महाराष्ट्रद्रोही नतद्रष्टांचा पुरता हिरमोड झाला.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत आलेल्या आणि मुंबईच्या आसपास वर्षोनवर्षे राहणार्या मराठी माणसाची नाळ शिवसेनेशी जुळली आहे. वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन केला. २०२२ साली शिवसेनेत फूट पडली आणि स्वार्थासाठी, सत्तेसाठी गद्दारांची शिंदेसेना स्थापन झाली. त्यामुळे दुरावलेला, भांबावलेला मराठी माणूस उद्धव-राज यांच्या मनोमीलनाने सुखावला आहे.
‘ठाकरे ब्रँड’ संपवण्याचा विडा उचललेल्या भाजपाने अनेक कटकारस्थाने केली. तरी मराठी माणसाच्या एकीपुढे त्यांचे डाव अपयशी ठरले.
या एकीमुळे मराठी भाषिकांना एक भक्कम व्यासपीठ मिळाले आहे. मराठी भाषेवर होणारे हिंदीचे आक्रमण, महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रांवर होणारा केंद्राचा अन्याय, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, शेतकर्यांवरील कर्जाचे डोंगर, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या यावर आवाज उठवण्यासाठी ही भक्कम एकजूट उपयुक्त ठरणार आहे. एमआयडीसीतील बंद पडणारे उद्योगधंदे, गुजरातमध्ये स्थलांतरित केलेले कारखाने, कार्यालये व येऊ घातलेले मोठे प्रकल्प यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला घरघर लागली आहे. हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य वाढते आहे. त्यातील काही आत्महत्या करून जीवन संपवत आहेत. मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने करत आहे. एकेकाळी उद्योगधंद्यात नंबर वन असलेला महाराष्ट्र कर्नाटक, गुजरात या राज्यांच्या मागे पडला आहे. शिक्षण क्षेत्रात केरळ, पाँडेचेरी, ईशान्येकडील राज्यांच्या मागे पडला आहे. काही राज्यांत साक्षरता १०० टक्के झाली आहे, तर महाराष्ट्र अजून ७० टक्क्याच्या आसपास रेंगाळत आहे. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राची अशी अधोगती सर्व क्षेत्रात दिवसेंदिवस होत आहे.
मराठीच्या या विजयोत्सवामुळे महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात एक भक्कम आघाडी उभी राहतेय असे चित्र निर्माण झाले आहे. भक्कम व सक्षम विरोधी आघाडीची गरज पूर्वी कधी नव्हती तेवढी आज आहे. कारण भाजपाचे प्रादेशिक पक्षांना संपवण्याची राजनीती लपून राहिलेली नाही. मराठीवर हिंदीची सक्ती लादणे असो अथवा महाराष्ट्रधर्माचा अपमान असो अथवा अवहेलना असो हे भाजपाकडून सातत्याने घडत आहे किंबहुना हे जाणूनबुजून घडवले जात आहे. याला महाराष्ट्राने एकजुटीने प्रतिकार करायला हवा. मुंबई-महाराष्ट्रावरचा मराठी ठसा पुसणार्यांचे नाव-पक्ष कायमचे पुसून टाकायला हवे.
आपण मराठी माणसं संकट आले की एकवटतो. संकट निघून गेले की विखुरतो. आता तसे होता कामा नये. ‘महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यात तडजोड करणार नाही’ असे राज ठाकरे यांनी सांगितले. तर आता ‘तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा ठसा पुसू नका’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. हिंदी सक्तीविरुद्धचा मराठी भाषिकांचा ५ जुलै २०२५चा रुद्रावतार हा १९५६ सालच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा होता. त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व पक्ष केंद्रातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रद्रोही निर्णयाच्या विरोधात एकटवले होते. तसेच आज घडताना दिसते. वरळीनंतर मिरा-भाईंदरमध्ये सर्वपक्षीय मराठी माणूस आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात मराठीच्या रक्षणासाठी एकत्रित झाला आणि रस्त्यावर उतरला. पोलिसांचा पक्षपाती विरोध त्यांनी जुमानला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या महायुती सरकारने हे पक्के ध्यानात ठेवावे की, मराठी-महाराष्ट्रावर अन्याय झाला की मराठी माणसाचे मन चाळवले जाते आणि एकदा का मन चाळवले की मग तो चवताळल्याशिवाय राहत नाही. ही महाराष्ट्राची माती आहे. या मातीत गवतालाही भाले फुटतात. मिरा-भाईंदरमधील मराठी मोर्चातील सामान्य मराठी माणसाच्या रुद्रावताराने हे दाखवून दिले आहे.
मराठी-महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल, तेव्हा तेव्हा सरकारला मराठी माणसाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मराठी माणूस आता जागा झाला आहे आणि तो एकटवला आहे. तो महाराष्ट्रद्वेष्ट्या महायुती सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण मराठी माणसाचं ठरलंय, आता ही एकी तुटायची नाही!