सबकुछ फडणवीस असलेल्या महायुती सरकारच्या गालफडात मायमराठीच्या वज्रमुठीचा सणसणीत तडाखा बसल्यावर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याला जितका आनंद झाला, तितका इतर कुणालाही झाला नसेल हे मी खात्रीने सांगतो. पोक्याने आयुष्यात पहिल्यांदाच स्वखर्चाने जाडजूड फटाक्यांच्या लांबचलांब पाच हजार माळा लावून सारा आसमंत दणाणून सोडला होता. महायुती सरकारने हिंदी लादण्याचा अध्यादेश मागे घेऊन सपशेल शरणागती पत्करल्यावर तर पोक्याच्या प्रतिभेला इतके पंख फुटले की त्याने त्या आनंददायक घटनेवर त्या एका दिवसात पाचशे एक उत्स्फूर्त विनोदी कविता, चाळीस गद्दार-उद्धार गीते, बत्तीस एकपात्री, नाट्यछटा, एकावन्न स्वगते आणि पंचवीस पोवाडे लिहिलेच, शिवाय तो घराबाहेर लाऊडस्पीकर लावून माईकवर या रचना गात होता. त्या ऐकण्यासाठी हजारोंचा जमाव घरासमोरील पटांगणावर गोळा झाला होता. मग त्याला उत्स्फूर्त भाषण करण्याची स्फूर्ती आली आणि त्याने अजितदादा सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांची भाषणात बिनपाण्याने हजामत केली. त्याच्या तोंडून बाहेर पडत असलेल्या मराठीतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार यांनी भाषणाला इतकी रंगत आणली की त्यापुढे सदावर्तेचीही बोलती बंद झाली असती. त्याने दिवसभरात हा कार्यक्रम उरकल्यावर मी त्याचं गळाभेट घेऊन अभिनंदन केलं. तेव्हा तो गदगदून म्हणाला, टोक्या, बाळासाहेबांचे ते जाज्वल्य उद्गार आजही मला प्रेरणा देतात. बाळासाहेब म्हणाले होते, रोहिडेश्वरी स्वराज्य संस्थापनेच्या आणाभाका घेतल्यापासून ते तहत स्वराज्याचे झेंडे अटकेपार फडकले, तिथवरचा इतिहास हेच सांगतो की ही वज्रमूठ एकदा वळली गेली की धडगत नाही… आज बाळासाहेब असते तर त्रिभाषा सूत्राचा अंमल महाराष्ट्रावर बजावण्याचा प्रयत्न करण्याची हिंमतच दिल्लीश्वरांना झाली नसती… पोक्याला शांत करत मी म्हणालो, पोक्या, मराठी माणसांनी दाखवलेल्या नेत्रदीपक एकजुटीमुळे ज्यांच्या पोटात मोठ्ठा गोळा आला त्यापैकी काहीजणांच्या प्रतिक्रिया घेतल्यास तर आणखी मजा येईल. पोक्याने कामगिरी फत्ते केली. त्याच या प्रतिक्रिया..
देवेंद्र फडणवीस : माझ्या पोटात गोळा वगैरे काही आलेला नाही. पोट सुटल्यामुळेच काहीजणांना तसं वाटत असेल. तुम्ही म्हणता तसं दोन भाऊ एकत्र आले, मराठी माणसांची कधी नव्हे ती एकजूट झाली, पण मला तसं वाटत नाही. तसं खरंच झालं असेल तर मी त्याला कारण ठरलो हे तुम्हाला मान्य करायलाच हवं. मी हिंदीसक्तीचा प्रस्ताव पुढे आणला नसता तर मराठी माणूस पेटून उठला नसता, दोन भाऊ एकत्र आले नसते, विजय मेळावाही झाला नसता. म्हणून या एकजुटीचं श्रेय महाराष्ट्राने मलाच दिलं पाहिजे. मी पक्ष फोडू शकतो तशी दुभंगलेली मनं जोडूही शकतो, हे सिद्ध झालंय. मी रेटून खोटं बोलू शकतो हे महाराष्ट्र वेळोवेळी पाहातच असतो. कारण ही मला मिळालेली ईश्वरी देणगी आहे. ती आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या भल्यासाठीच मी वापरत असतो. या भाषासक्ती प्रकरणात मी कितींदा खोटं बोललो याची स्पर्धाही तुम्ही आयोजित करू शकता. वाटल्यास स्पर्धकांना मी आमच्या महायुतीतल्या कोट्यधीश शिरसाटांतर्फे एक कोटींचं बक्षीसही जाहीर करू शकतो. बदनामीला मी घाबरत नाही. माझी बदनामी झाल्यामुळे कुणाला आनंद वाटत असेल तर त्यात मी समाधानी आहे. आज मी मुख्यमंत्री आहे, म्हणून आमची महायुती टिकून आहे. ज्येष्ठ विचारवंतांकडून इतका विरोध झाल्यानंतर हळूहळू माझी पूर्वीची भूमिकाही थोडी थोडी निवळू लागलीय. शेवटी होतं ते जनतेच्या भल्यासाठीच होतं, असं आमचे विश्वगुरू मोदीजी प्रवचनात नेहमीच सांगत असतात. त्यामुळे मी ही ऐतिहासिक कामगिरी बजावली याचा मला आनंद आहे. अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांची समिती मी नेमली ती हा विषय लवकर संपू नये यासाठीच. ते अर्थतज्ज्ञ आहेत. भाषा या विषयाशी त्यांचा तसा काही संबंध नाही, म्हणूनच त्यांची नेमणूक केलीय. तिथे भाषातज्ज्ञ किंवा बालमानसशास्त्र तज्ज्ञ नेमला असता तर त्याने हिंदीच नव्हे तर त्रिभाषा सक्तीचा मसुदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला असता. पण मला हा विषय मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत रेंगाळत ठेवायचाय. या निवडणुकीच्या आधी सप्टेंबरपर्यंत जाधवांनी विरुद्ध निकाल दिला की मराठी भाषाप्रेमी, ते दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येतील आणि रान पेटवतील. मग विश्वगुरू दिल्लीवरून महाराष्ट्रात त्रिभाषा सक्तीचं धोरण लागू करणार नाही असा फतवा काढतील. मी तो जाहीर करीन आणि या सार्याचं श्रेय मला, भाजपला पर्यायाने महायुतीला मिळेल आणि त्यांच्या आंदोलनाची हवाच काढून घेतली जाईल हा माझा मास्टर प्लान आहे. लोक माझ्या नावाचा उदो उदो करतील. झालं गेलं विसरून जातील.
एकनाथ शिंदे : मी मराठी भाषेच्या बाजूचाच आहे. नाहीतर मी हिंदीत बोललो असतो ना! आमच्या शाळेतले दिवसच मला आठवत नाहीत. त्यामुळे शाळेत कुठली भाषा शिकवायचे तेही मला आठवत नाही. फक्त शंभरपर्यंत आकडे माहीत होते. त्याचा पुढे खूप उपयोग झाला. आताही होतो. बाराखडीपेक्षा बाहेर खडाखडी करण्यातच मी हुशार होतो, असंही तेव्हाचे शेजारी सांगतात. ती चांबट पोरं शिव्यांची बाराखडी म्हणायची, पण माझ्यावर सुसंस्कार असल्यामुळे मी कधी कुणाला शिव्या दिल्या नाहीत. पुढचा माझा इतिहास आणि भूगोल तुम्हाला माहीतच आहे. भाषेविषयी मात्र मला फारसं ज्ञान नाही. कारण तो माझा विषय नाही. ‘गद्दार’ या हिंदी शब्दाचा अर्थही मला ठाऊक नाही. त्रिभाषातज्ज्ञ आशिष शेलार यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याचा अर्थ ‘बेईमान’ म्हणजे ‘डबल इमान असलेला’ असं सांगितलं. तेव्हा मला बे चा पाढा आठवला. भाषेबाबत भाजपा जो काय निर्णय घेईल तो मला मान्य आहे.
अजित पवार : हिंदीसक्तीच्या निर्णयाला ज्यांनी पाठिंबा दिला होता, त्या सर्व मंत्र्यांचा आणि आमदारांचा आमदार निधीच लाडक्या बहिणींकडे वळवतो. मग बसा बोंबलत!