– डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
आराम हराम आहे, असा क्रियाशील माणसांचा मंत्र असतो. तो लहानपणापासून सगळ्यांच्या मनावर बिंबवला जातो. कामात बदल हीच विश्रांती, असंही सांगितलं जातं. एखादा माणूस रात्रीही न झोपता किंवा अवघे तीन चार तास झोपून बाकीचा वेळ केवढे काम (कोणासाठी ते विचारायचं नाही) करतो, याचं आपण फार कौतुक करतो. एखादा माणूस सुशेगात असतो किंवा आराम करतो, तेव्हा त्याला आपण आळशी ठरवतो. खासकरून तरुण वयात तर सगळेच सांगत असतात की आराम म्हातारपणी करा, आता भरपूर काम करा, सगळी ताकद लावा. कर्मचार्यांकडून आठवड्याला ७० तास कामांची अपेक्षा ठेवणारे औद्योगिक ढुढ्ढाचार्यही या अमानवी वेठबिगारीला विरोध करणार्यांना आळशी ठरवून मोकळे होतात. आराम खरंच इतका वाईट आहे का?
नाही हो, आराम जीवनावश्यक आहे. प्रत्येकासाठी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात तो केला नाही, तर घातक ठरू शकतो, इतका आवश्यक आहे.
वैद्यकीय दृष्टिकोनातून ‘आराम’ म्हणजे शरीर आणि मन यांना तणाव, थकवा आणि रोग यांपासून मुक्त करणारी अवस्था ज्यामुळं ऊर्जा पुनर्संचयित होते आणि शारीरिक-मानसिक संतुलन राखले जाते.
अनेकांना वाटतं की रात्री मस्त झोप झाली, म्हणजे आराम झाला. आजच्या धावपळीच्या युगात सात आठ तासांची सलग झोप मिळणंही कठीण आहेच माणसाला. पण तशी झोप मिळाली तरी तेवढाच आराम पुरेसा आहे का? लक्षात घ्या, झोप, अगदी पुरेशी म्हणजेही आराम नव्हे ती आरामाचा एक भाग आहे. आराम ही संकल्पना व्यापक आहे. तिच्यात शारीरिक विश्रांती, मानसिक शांतता आणि भावनिक स्थैर्य या सर्वांचा समावेश होतो.
आराम हा शब्द दैनंदिन जीवनात नेहमीच वापरला जातो, परंतु वैद्यकीय दृष्टिकोनातून त्याचा अर्थ आणि महत्त्व यांचा विचार केला तर ही एक व्यापक आणि बहुआयामी संकल्पना आहे. आराम म्हणजे केवळ शारीरिक विश्रांती नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलनाची अवस्था आहे जी व्यक्तीच्या एकूण आरोग्याला चालना देते. वैद्यकीय संदर्भात तर आराम हा रोगप्रतिबंध, उपचार आणि पुनर्वसन यांचा अविभाज्य भाग आहे.
आराम आणि झोप यांच्यातील फरक समजून घेणेही महत्त्वाचे आहे. झोप ही आरामाची एक नैसर्गिक अवस्था आहे, परंतु आरामात झोप, ध्यान, शारीरिक निष्क्रियता आणि मानसिक तणावमुक्ती यांचा समावेश होतो. उदा. एखादी व्यक्ती झोपली असली तरी तिचे मन तणावग्रस्त असेल तर ती पूर्ण आरामाची अवस्था अनुभवत नाही.
आता शारीरिक आराम म्हणजे काय ते पाहू. शारीरिक आराम म्हणजे स्नायू ऊती आणि शरीराच्या इतर प्रणालींना कार्यातून विश्रांती देणे. यामध्ये बसणे, झोपणे किंवा कमी शारीरिक श्रम करणे यांचा समावेश होतो. शारीरिक आरामामुळे स्नायूंमधील थकवा कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि ऊर्जा पुनर्संचयित होते. शारीरिक आरामामुळे शरीरातील लॅक्टिक अॅसिडचे प्रमाण कमी होते जे स्नायूंमध्ये थकवा निर्माण करते. तसेच, पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्था सक्रिय होऊन हृदयगती आणि रक्तदाब नियंत्रित होतो.
आता वळूया मानसिक आरामाकडे. मानसिक आराम म्हणजे मनाला तणाव, चिंता आणि गोंधळापासून मुक्त करणे. यामध्ये ध्यान, माईंडफुलनेस, योगसाधना किंवा साधी शांतता, निव्वळ शांत बसून राहणे यांचा समावेश होतो. मानसिक आरामामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि कॉर्टिसॉलसारखे तणावग्रस्त हार्मोन्स कमी होतात. अलीकडच्या काळातील संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की ध्यान आणि माईंडफुलनेस यांसारख्या पद्धती मेंदूतील अमिग्डाला अर्थातच तणावाशी संबंधित भागाची क्रिया कमी करतात आणि सेरोटोनिनसारख्या सुखदायी हार्मोन्सचे उत्पादन वाढवतात.
आता भावनिक आराम समजून घेऊ या. भावनिक आराम म्हणजे भावनिक स्थैर्य आणि सकारात्मक मानसिक अवस्था. त्यात सामाजिक संवाद, प्रियजनांशी संवाद किंवा स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो. भावनिक आरामामुळं मानसिक आरोग्य सुधारतं आणि नैराश्य, चिंता यांसारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
अर्थात, आरामात झोपेचं महत्त्व सर्वोच्च आहेच. कारण, झोप ही आरामाची सर्वात महत्त्वाची अवस्था आहे. यामध्ये शरीर आणि मेंदू दुरुस्ती, पुनर्जनन आणि स्मरणशक्ती एकत्रीकरण यांसारखी कार्ये करतात. अपुरी झोप मधुमेह, हृदयरोग, मानसिक विकार यासह अनेक आजारांचे मूळ कारण ठरू शकतं. रॅपिड आय मूव्हमेंट (आरईएम) आणि नॉन-आरईएम झोपेच्या अवस्थांमधून मेंदू स्मृती एकत्रीकरण आणि न्यूरॉन दुरुस्ती करतो. झोपेदरम्यान ग्रोथ हार्मोनचं उत्पादन वाढतं, जे ऊतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. नियमित आणि पुरेसा आराम घेतल्यानं रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत होते. अपुरी झोप किंवा तणावामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो.
अलीकडच्या संशोधनात असं स्पष्ट झालं आहे की दररोज किमान ७-८ तास झोप घेणार्या व्यक्तींना सर्दी किंवा फ्लूसारख्या आजारांचा धोका कमी असतो. ज्या व्यक्ती आजारी असतात त्यांच्यासाठीही आराम हा उपचारांचा महत्त्वाचा भाग आहे. उदा. शस्त्रक्रियेनंतर किंवा कर्करोगासारख्या तीव्र आजारात पुरेसा आराम घेतल्यानं पुनर्वसन जलद होतं, आरामामुळे शरीराला सगळी ऊर्जा उपचारप्रक्रियेसाठी वापरता येतं.
(हॉस्पिटलमध्ये पेशंट अॅडमिट असताना भेटीचे तास सोडून कोणत्याही वेळी तब्येत बघायला जाणारे नातेवाईक आणि रात्रीच्या वेळी मोबाइलवर, टीव्हीवर मोठ्या आवाजात सिनेमे, विनोदी कार्यक्रम पाहणारे, मोठमोठ्याने गप्पा छाटणारे हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी हे विशेष लक्षात ठेवलं पाहिजे.)
मानसिक आरामामुळं चिंता, नैराश्य आणि तणाव यांसारख्या समस्यांचं व्यवस्थापन करणं सोपं होतं. दीर्घकालीन तणावामुळं मेंदूतील न्यूरोट्रान्समिटर्स असंतुलित होतात, ज्यामुळ मानसिक आजारांचा धोका वाढतो. नियमित ध्यान किंवा योग यामुळं मानसिक स्थिरता वाढते. क्रीडापटूंना आणि शारीरिक श्रम करणार्या व्यक्तींनी आराम केल्यावर स्नायूंची दुरुस्ती होते आणि कार्यक्षमता वाढते. व्यायामानंतर पुरेसा आराम न घेतल्यास स्नायूंना सूज येणं किंवा दुखापत होणं हे प्रकार वाढतात.
वैद्यकीय संशोधनान आरामाचं महत्त्व अनेकदा अधोरेखित केलंय. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्यानुसार अपुरी झोप ही मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणाशी संबंधित आहे.दररोज ८-९ तास झोप घेणे आवश्यक आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका अभ्यासानुसार दीर्घकालीन तणाव आणि अपुरी विश्रांती यामुळं कॉर्टिसॉल हार्मोनचं प्रमाण वाढतं, जे रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढवतं. स्लीप रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार झोपेच्या कमतरतेमुळं स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते ज्याचा परिणाम कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता यावर होतो.
दैनंदिन जीवनात ‘आराम’ मिळवण्यासाठी :
१) नियमित झोपेचे वेळापत्रक असावे, ज्यानुसार रोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं यामुळं सर्वेâडियन रिदम नियंत्रित राहते.
२) मोबाइलवर, टीव्हीवर कार्यक्रम, सिनेमे, विनोदी रील्स पाहणे, गाणी ऐकणे, पॉडकास्ट ऐकणे या सगळ्यात डोळे आणि कान गुंतलेले असतात, मेंदू गुंतलेला असतोच. त्यामुळे तो काळ आरामात गणू नये. आराम म्हणजे शुद्ध आणि परिपूर्ण आराम!
३) माईंडफुलनेस आणि योगासनं तणाव कमी करतात आणि मानसिक आराम मिळतो.
४) दररोज काही वेळ शांत बसणं किंवा हलकं स्ट्रेचिंग यामुळं स्नायूंना आराम मिळतो.
५) रात्री मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर कमी केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते.
६) मित्र-परिवाराशी संवाद साधल्याने भावनिक स्थैर्य मिळतं.
आधुनिक जीवनशैलीत विशेषतः शहरी भागात कामाचा तणाव आणि व्यस्त वेळापत्रक यामुळं आरामाकडं दुर्लक्ष होतंय. यामुळं तणाव, चिंता आणि थकवा यांसारख्या समस्या वाढत आहेत.
थोडक्यात ‘आराम’ ही केवळ शारीरिक विश्रांती नसून ती एक वैद्यकीय संकल्पना आहे जी शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याशी निगडित आहे. नियमित आणि पुरेसा आराम घेतल्यानं रोगप्रतिबंध, रोगनिवारण आणि एकूण जीवनाची गुणवत्ता सुधारते.
आधुनिक जीवनशैलीत आरामाला प्राधान्य देणं हे केवळ वैयक्तिक आणि शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर प्रत्येकाच्या मानसिक आरोग्यासाठी पर्यायाने समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठीही आवश्यक आहे!
(लेखक पुण्यात जनरल प्रॅक्टिश्नर आहेत)