□ मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा – बडा गुंतवणूकदार सुशील केडिया याची दर्पोक्ती.
■ नंतर माफीनामा लिहायचाच असतो तर हा माज करायचा कशाला? कोणाच्या जोरावर करता? तुम्हाला वापरून घेणारे तुम्हाला किती काळ संरक्षण देणार? काम झालं की तुम्ही फेकले जाणार कचर्यात. त्यापेक्षा जिथे राहता, खाता, पिता, कमावता त्या राज्याच्या भाषेचा दुस्वास करू नका. शिका की ती!
□ मंदिराच्या परिसरात तंबाखू खाऊन थुंकणार्या आठ पुजार्यांवर कारवाई.
■ अहो, पुजारी आहेत ते. देवापेक्षा त्यांची पॉवर जास्त. पंढरपूरच्या बडव्याचे कृत्य आठवते ना? ते तंबाखू खाऊन थुंकले किंवा कपडे काढून नाचले, तरी त्यांच्यावर कारवाई कशी करता येईल?
□ अमित शहांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी दिला ‘जय गुजरात’चा नारा.
■ मालकांच्या समोर ते सांगतील तसं करावं लागतं. त्यांना खूष करावं लागतं. समोर गुजराती होते म्हणून जय गुजरात म्हणाले. समोर पाकिस्तानी असते तर?… जाऊ द्या, मेलेल्याला किती मारायचं?
□ नोटाबंदीनंतर आता बिहारमध्ये ‘व्होटबंदी’; सुमारे दोन कोटी मतदारांवर ‘व्होटबंदी’ची टांगती तलवार.
■ भारतीय जनता पक्षाची शाखा बनलेला निवडणूक आयोग सर्व सार्वत्रिक निवडणुकांचं खेळणं करून ठेवणार आहे. लोकांचा लोकशाही, संसदीय व्यवस्था यांच्यावरचा विश्वास उडवण्याचा उपक्रम जोरात सुरू आहे. आता लोकच सरकार उलथून पाडतील तेव्हा सगळ्यांचा हिशोब होईल.
□ दादा भुसे यांच्या पोलीस ऑपरेटरचा कारनामा: खंडणीसाठी पान टपरीवाल्याचे अपहरण.
■ ‘साहेब’ आणि ‘साहेबांचा माणूस’ यांचे चोचले पुरवण्याची फळं सगळ्यांना भोगायला लागणार आहेत आपल्या देशात. आपण काहीही करू शकतो, आपलं कोणी काही वाकडं करू शकणार नाही, ही गुर्मी त्यातूनच येते.
□ सरकारचे सात कोटी पाण्यात; दुरुस्ती सुरू असतानाच दापोलीतील शिवकालीन गोवा किल्ला ढासळला.
■ अरेरे, दुरुस्ती केलीच नसती तर कदाचित आणखी तीनशे वर्षं टिकला असता…
□ मराठी येत नसलेल्या आमदारांना थेट ब्रिटीश संसदेत पाठवा – भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला उपरोधिक सल्ला.
■ त्यापेक्षा भाजपमध्येच घेऊन टाका ना? शॉर्टकटमध्ये पावन होतील आणि तुम्ही या कृतीचंही इतक्याच चटपटीत भाषेत समर्थनही कराल. दुसरं करायचं काय आहे रेटून बोलत राहण्याशिवाय?
□ विरोधी विचारांच्या लोकांना शहरी नक्षली ठरवण्याचा डाव – शरद पवार यांचा हल्ला.
■ संविधान समता दिंडी काढणारे तर विरोधी विचारांचे लोक नाहीत, उलट संतांनी सांगितलेला समतेचा खरा संदेश मांडणारे लोक आहेत. तो आपल्या विरोधी आहे असं सांगून सत्ताधारी आपला नीचपणा उघड करत आहेत. पण हे कळण्याची बुद्धी त्यांच्यापाशी नाही आणि निगरगट्टपणा तर नसानसांत भरलेला.
□ मेट्रो स्थानकांच्या नावांमध्ये जाहिरातदारांची घुसखोरी; स्थानिक ओळख पुसण्याचे एमएमआरडीएचे कारस्थान.
■ पैसा फेको, तमाशा देखो, हा त्यांचा कारभार आहे. त्यांना स्थानिक ओळख वगैरे टिकवण्यात शून्य रस आहे. ती पुसून सगळा देश सपाट करून टाकण्याचाच तर त्यांचा अजेंडा आहे. तो बुद्धिमत्तेचा टेंभा मिरवणार्या पुण्याने अगदी नाचत, वाजत गाजत स्वीकारला आहे. आता भोगा.
□ शेतकरी मरताहेत आणि सरकार तमाशा बघतेय – राहुल गांधी यांचा मोदी, फडणवीस सरकारवर घणाघात.
■ शेतकरी मरतायत, तर त्यात काय विशेष आहे राहुलजी? रोज कोणी ना कोणी मरत असतं. जीवन अनित्य आहे. जो आला तो गेला. सरकार तरी काय काय करणार आणि कुठे कुठे करणार? आधीच दोन मालकांचे खिसे भरता भरता जीव मेटाकुटीला आलाय त्यांचा.
□ मुलांना जन्माला घाला, अन् १.२ लाख मिळवा – चीन सरकारची नागरिकांना ऑफर.
■ हे सांगूनही चिनी नागरिक ऐकले नाहीत तर त्यांना सांगा, आता तुम्ही मुलं जन्माला घातली नाहीत, तर भारतातून मजूर मागवायला लागतील. ते कुठून येतात आणि सोबत काय काय घेऊन येतात ते पाहून चिनी लोक लगेच मुलं जन्माला घालण्याच्या राष्ट्रकार्याकडे वळतील.
□ राजकीय विधाने करणार्यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही – तालिका अध्यक्ष चेतन तुपेंच्या शेरेबाजीवर विरोधक संतप्त.
■ असा नियम लावला तर देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांच्यापासून कोणाकोणाचे अधिकार तपासणार? राष्ट्रपती बाई पंतप्रधानांना दहीसाखर भरवणार, पंतप्रधान एका समुदायाचेच नेते असल्यासारखे दुसर्या समुदायाबद्दल जहर पसरवणार, उपराष्ट्रपती अनुचित शेरेबाजी करणार… कोणाकोणाचं तोंड धरणार?
□ अजितदादांनी आश्वासन देऊनही २०० कोटी दिले नाहीत – मंत्री नरहरी झिरवळांकडून घरचा आहेर.
■ अजितदादा, काय खिशात घेऊन फिरतात का? ते आपल्या खिशातून काढून देणार आहेत का? निवडणूक जिंकण्यासाठी बड्या बड्या बाता मारून तिजोरी खाली केली आहे. आता पुरता विचका करूनच बाहेर पडा.