शिंदेसेनेच्या मंत्र्यांना अजितदादा निधी देत नाहीत, असा सूर लावणार्या शिंदेसेनेच्या मंत्र्यांना माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या स्वतंत्र बैठकीत दिलेल्या ‘अजितदादांवर लक्ष ठेवा’ या आदेशानंतर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या पोट धरधरून हसू लागला. यात पोक्याचं काहीच चूक नव्हतं. कारण अजितदादांच्या संशयास्पद वाटणार्या निधीवाटप व्यवहाराला लाडक्या बहिणी जबाबदार आहेत, हे ठाऊक असूनही वेड पांघरून पेडगावला जाण्याचं सोंग शिंदे महाशय कसं काय आणू शकतात, असा प्रश्न पोक्याला पडला होता. शिंदे म्हणाले होते, अजितदादांच्या खात्याकडे गडगंज निधी आहे. तो नेमका कुठे वितरित होतो याची माहिती घ्या आणि त्यावर लक्ष ठेवा. अजितदादांच्या खात्यात १४-१४ हजार कोटींचे दोन मोठे निधी आहेत. याची माहिती आपल्याला मिळालीच पाहिजे असं सांगत, मंत्र्यांना निधी मिळवण्यासाठी ठामपणे पावले उचलण्याचं आवाहन करताना गुप्त पोलिसांप्रमाणे हेरगिरी करून दादांचा भंडाफोड करा हेच त्यातून ते सूचित करत होते. मी पोक्याला म्हटलं, तू खुद्द शिंदेसाहेबांना भेटून त्यांची भूमिका समजावून घे. नाहीतर मी असं म्हणालोच नव्हतो, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असा ठोकळेबाज खुलासा करतील. तू अजितदादांची आणि मुख्यमंत्री फडणवीसांचीही प्रतिक्रिया घे. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल… त्याच या प्रतिक्रिया.
एकनाथ शिंदे : अजितदादांच्या अर्थखात्यावर वॉच ठेवा, असे आदेश मी माझ्या पक्षाच्या मंत्र्यांना दिले आहेत, हे कटू सत्य आहे. अजितदादा आम्हाला निधी देत नाहीत, मग आम्ही विकासकामं करायची कशी? असा तक्रारीचा सूर माझ्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी लावल्यापासून मी अस्वस्थ आहे. आम्ही महायुतीत असलो तरी निधीवाटपावरून त्यांच्यात आणि आमच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये धुसफूस चालूच असते. आमच्या लाडक्या बहिणींसाठी मी निधी वळवला की पळवला असं काहीबाही ते सांगत असतात. मला ते पटत नाही, पटणार नाही. अरे, ज्यांच्या मतांवर आपण निवडून आलो त्या बहिणींशी तुम्ही प्रतारणा करता? आणि त्यासाठी आमच्या आमदार आणि मंत्र्यांना निधीअभावी उपाशी मारता? मी सांगतो, तिजोरीत अजिबात खडखडाट नाही आणि महायुतीकडे तर अजिबात नाही. निवडणूककाळात युतीकडे इतका गडगंज पैसा होता की मतांसाठी वाटूनही तो संपला नाही. संपणार नाही. डोंगराएवढ्या पैशाच्या राशी भाजपाकडे आहेत. त्यातून पुढच्या चार निवडणुका होऊ शकतात. त्यावर केवळ भाजपाचा हक्क नाही, तर महायुतीचाही हक्क आहे. कारण तो निवडणुकीच्या नावावर भाजपाने गोळा केलेला पैसा आहे. त्यापैकी द्या ना माझ्या लाडक्या आमदारांना आणि मंत्र्यांना. आमच्या हक्काचा निधी हे अजितदादा कशासाठी आणि कुणासाठी पळवतात याचा शोध लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आज आमच्या शिरसाटांसारख्या मंत्र्याची निधीअभावी काय दारुण अवस्था झालीय ती एकदा डोळे उघडून बघा. एक साधं कोट्यवधीचं हॉटेल ते विकत घेऊ शकले नाहीत. त्यात महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. आमच्या पक्षाला त्या स्वबळावर जिंकायच्या आहेत. भाजपाला आणि अजितदादांच्या पक्षाला आडवे करून मुंबई जिंकली तर पालिकेची तिजोरी आमची होईल. मग बसा आशाळभूतपणे जिभल्या चाटत. सगळी फौज आम्ही त्यासाठी कामाला लावली आहे. आजपासून आमचा प्रत्येक मंत्री आणि आमदार गुप्त वेष धारण करून हातात दुर्बीण आणि कॅमेरा घेऊन अजितदादांच्या पाळतीवर राहील. ते दिवसा आणि रात्री कुठे जातात, कुणाला भेटतात, कुणासाठी पैसा उधळतात यावर आमची तीक्ष्ण आणि बारीक नजर राहील. त्यासाठी पूर्वीच्या काळी इंपोर्ट एक्स्पोर्ट धंद्यात ड्रायव्हर म्हणून डोळ्यात तेल घालून मालाचे रक्षण करणारे आमचे ज्येष्ठ नेते मा. रामदासभाई कदम यांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापण्यात आली असून ती त्यांच्या आवक-जावक व्यवहारावर लक्ष ठेवील. आमच्या डॉक्टर पुत्राने नुकत्याच केलेल्या विदेश दौर्यावरून छत्तीस ड्रोन कॅमेरे आणले आहेत. ते बारामतीपासून मुंबईपर्यंत आकाशातून अजितदादांची टेहळणी करतील. त्यामुळे दादा पैशाची विल्हेवाट कुठे आणि कशी लावतात हे कळू शकेल. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या मताला दहा हजार रुपये या कथित पैसेवाटपावरही त्यामुळे प्रकाश पडू शकेल. आमच्या पक्षाचे हेरखाते वळवण्यात आणि पळवण्यात आलेल्या निधीचा शोध लावल्याशिवाय अपेयपान करणार नाही.
अजित पवार : हे चिल्लर लोक माझ्यावर वॉच ठेवणार! स्वर्गातून तुमच्या छत्तीस पिढ्या खाली उतरल्या तरी कोणाच्या बापाला हे शक्य नाही. तुमच्या दलाली आणि भ्रष्टाचारावरही मुख्यमंत्र्यांचा वॉच आहे हे लक्षात ठेवा. पैशासाठी हपापलेले तुम्ही आहात, मी नाही. तुमची सोदेगिरी आणि सौदेगिरी माहीत आहे मला. तुमच्या लाडक्या बहिणींनी ही पाळी आणलीय माझ्यावर. अर्थखाते चालवणे म्हणजे ठाण्यात रिक्षा चालवण्याइतकं सोपं नाही. त्यासाठी ब्रेन असावा लागतो डोक्यात. पैशाची उधळपट्टी करण्यात कोण माहीर आहे हे ठाऊक आहे जनतेला. गद्धे, माझ्यावर वॉच ठेवतायत! माझ्या सगळ्या पैशांचा व्यवहार उघडा नागडा आहे. एका पैशाची हेराफेरी झालेल्ाी नाही माझ्या अर्थखात्यात. मी अर्थमंत्री आहे म्हणून तरी राज्याच्या तिजोरीत थोडा फार पैसा खुळखुळतोय. तुमच्या पक्षाचा अर्थमंत्री असता तर एव्हाना खुळखुळा केला असता तिजोरीचा. ठाण्यातले तुमचे धंदे माहीत आहेत जनतेला. बडवे माझ्यावर वॉच ठेवतायत! नाय तुमच्या डोळ्यात मुंबईच्या आणि ठाण्याच्या जनतेने मिरचीची पूड टाकली तर नाव सांगणार नाय हा अजितदादा. लुच्चे कुठले?
देवेंद्र फडणवीस : आमदार निधी स्वत:चा विकास करण्यासाठी नसतो, एवढंच मी सांगू इच्छितो.