राजेंद्र भामरे
पुणे शहर हे आता भारतात आयटी हब म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. अनेक नामवंत आयटी कंपन्या इथे कार्यरत असून त्यामध्ये सुमारे चार ते पाच लाख कर्मचारी काम करत आहेत. अन्य कंपन्यांच्या तुलनेत आयटी कंपन्यांमध्ये पगार जास्त मिळतो. बर्याच ठिकाणी नवरा-बायको दोघेही आयटीमध्ये काम करत असतात. घरात चांगली आमदनी येत असल्यामुळे त्यांचे राहणीमान उंचावलेले असते. घरात आर्थिक सुबत्ता असते, त्यामध्ये दागदागिन्यापासून ते गुंतवणुकीपर्यंतचा समावेश असतो. पुणे शहरात मगरपट्टा सिटी, हिंजवडी, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, औंध, बाणेर या ठिकाणी निवासी संकुलांमध्ये ते राहतात. बर्याच सोसायट्या अशा आहेत, जेथे राहणार्यांपैकी ७० ते ८० टक्के हे आयटीमध्ये काम करत असतात. ही मंडळी बर्याचदा विदेशी वेळेनुसार काम करतात, त्यामुळे दुपारच्या वेळेला ते कंपनीत गेलेले असतात. त्या काळात या सोसायट्यामधले फ्लॅट बंद असतात आणि शुकशुकाट असतो.
या गोष्टीचा गैरफायदा घेऊन चोरांनी दिवसा घरफोडी करण्याचा सपाटा सुरू केला होता. ज्या ठिकाणी या चोर्या होत होत्या, तिथे पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केले होते. दिवसा चेकिंग पॉईंट सुरू केले होते. गुन्हे घडणार्या भागात पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. पोलिसांनी रेकॉर्डवरचे गुन्हेगार तपासले होते. पण त्यांना शोधण्यात यश येत नव्हते. त्यामुळे वर्तमानपत्रातून पोलिसांवर टीकेची झोड उठत होती. साहजिकच आमच्या वरिष्ठांनी मला बोलावून ‘क्लास’ घेतला. तुमचे लोक काय करतात, लवकरात लवकर गुन्हेगार शोधा, असा सज्जड दम दिला. माझ्याकडील सर्व युनिट सदस्य याचा तपास करीत होते. परंतु त्यांनाही यश येत नव्हते. मी सर्व युनिटच्या पोलीस निरीक्षकांची एक बैठक घेतली. त्यांना कामे वाटून दिली. घरफोड्या झालेल्या सोसायट्यांमधील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. परंतु, कोणत्याही फुटेजमध्ये चोरटा वाटावा असा संशयित दिसून आला नाही.
एक दिवस पिंपळे गुरव येथील पारिजात सोसायटीमध्ये दुपारच्या वेळी चार ते पाच फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची खबर मिळाली. मी आणि युनिट तीनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार (सध्या एसीपी) हे तिथे गेलो. पहिले सीसीटीव्ही तपासले तेव्हा ते बंद असल्याचे दिसून आले, त्यामुळे तपासाचा महत्वाचा मार्ग बंद झाला होता. सिक्युरिटीकडे विचारणा केली, तेव्हा कुणी संशयित इसम आला नसल्याचे त्यांनी सांगितले आणि आपण ड्युटी सोडून कुठेही गेलो नव्हतो, असेही म्हटले. ती सोसायटी सात मजल्यांची होती. सातव्या मजल्यावरचा एक, सहाव्या वरचा एक, चौथ्या आणि दुसर्या मजल्यावरचा एक फ्लॅट फोडण्यात आला होता. स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस तिथे पंचनामा करण्यासाठी आले होते. बहुतेक फ्लॅटचे लॅचेस व कड्या कटावणीने उचकटून, दार उघडून त्यावाटे फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यात आला होता.
फ्लॅटमधील लाकडी आणि लोखंडी कपाटे देखील कटावणीने तोडून त्यातील ऐवज चोरून नेला होता. त्यांनी सोने सोडून दुसर्या कशालाच हात लावलेला नव्हता.
चार नंबरच्या फ्लॅटमध्ये राहणार्या आयटी इंजीनिअरकडे विचारपूस करता त्याने सोन्याव्यतिरिक्त आपले एटीएम कार्ड चोरीला गेल्याचे सांगितले. घरात होणार्या खर्चाचा हिशेब राहावा, म्हणून एकाच खात्यातून ते पैसे खर्च करीत होते. पती आणि पत्नी त्यासाठी त्या बँकेच्या खात्याचे एकच एटीएम कार्ड वापरत होते. पत्नीने त्याचा पिन क्रमांक कपाटाच्या शेजारील कॅलेंडरवर बारीक अक्षरात लिहून ठेवला होता. त्या खात्यात फारशी रक्कम नव्हती. एखाद्या वेळेस या कार्डाचा वापर करून गुन्हेगार पैसे काढण्याचा प्रयत्न करेल, म्हणून तुम्ही ते कार्ड बंद करू नका, अशा सूचना आम्ही त्यांना दिल्या होत्या. सुनील पवार यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट मिळतात का, याचा तपास सुरू केला. खबरे कार्यान्वित केले. या सगळ्यात ८ ते १० दिवस निघून गेले.
एके दिवशी त्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्याचा प्रयत्न झाला. आधी एक लाख रुपये, नंतर ५० हजार रुपये, त्यानंतर २० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात फक्त पाच हजार रुपये असल्यामुळे गुन्हेगाराला ते पैसे काढता आले नाहीत, अशी माहिती सुनील पवार यांना बँकेकडून मिळाली. ते बँकेच्या सतत संपर्कात होते. हे एटीएम मुंबईतल्या फोर्ट परिसरात वापरण्यात येत होते. युनिट तीनच्या तपास टीममधील एपीआय तांदळे यांनी त्या एटीएममध्ये जाऊन तिथले सीसीटीव्हीचे फुटेज आणले. त्यानुसार त्यामधील सर्वांचे फोटो तयार करण्यात आले. पवारांच्या एका खबर्याने त्यामधील एक फोटो ओळखला. तो मुन्ना कुरेशी याचा होता. तो गोवंडीचा राहणारा असून यापूर्वी त्याने अनेक घरफोड्या केल्या होत्या.
खबर्यांकडून मुन्ना कुरेशीचा मोबाईल नंबर मिळाला. तो एअरटेल कंपनीचा होता. त्या काळी एअरटेलचा मोबाईल बंद असला तर त्याचे लोकेशन मिळत नसे. मुन्ना कुरेशी हा अधूनमधून फोन सुरू करायचा, पण तपास टीम पोहोचेपर्यंत तो पुढे पसार झालेला असायचा. कारण त्याचे लोकेशन दोन ते तीन तास आधीचे मिळायचे. आठवडाभर हा खेळ सुरू होता. त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसमोर उभे ठाकले होते.
पोलीस आपल्या मागे आहेत, याची कुणकुण मुन्नाला होती, त्यामुळे त्यांना चकवा देत तो फिरत होता. दरम्यान त्याने जुना मोबाईल फेकून दिला. त्यामुळे त्याच्या पकडण्याचा आशा मावळत चालल्या होत्या. पण एक दिवस खबर्याकडून बातमी मिळाली की मुन्ना नवी मुंबईमधून घाटकोपरला जाणार आहे. त्याचा गाडीचा नंबर सुनील पवार यांच्या टीमला मिळाला होता. ती गाडी सोनाटा लक्झरी कार होती. त्याला पकडण्यासाठी एपीआय तांदळे, एएसआय भोसले, हेडकॉन्स्टबेल अस्लम आतार, सपकाळे, रंगम या टीमने घाटकोपरच्या सिग्नलवर सापळा लावला. सुदैवाने मुन्ना तेथील वाहतूक कोंडीत अडकला आणि अलगद तपास टीमच्या जाळ्यात सापडला. त्याला पुण्याला आणून त्याच्याकडे चौकशी करता, त्याने ६५ घरफोड्यांची कबुली देऊन तीन कोटी रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल काढून दिला.
घरफोडी करताना त्याच्याबरोबर अस्लम बेग हा मुंबईचा सराईत गुन्हेगार असे. गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत मुन्नाने सांगितलेली हकीकत धक्कादायक होती. त्यांची घरफोडी करण्याची पद्धत वेगळीच होती, ते प्रामुख्याने बेंगळुरू, मुंबई, हैद्राबाद या ठिकाणी जाऊन घरफोडी करत असत. तिन्ही एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये प्रत्येकी एक लक्झरी कार लावून ठेवलेली असे. विमानातून उतरल्याबरोबर पार्किंगमधून ते आलिशान गाडीतून टार्गेटच्या ठिकाणी निघत. विमानतळापासून सुमारे २०० किलोमीटरच्या परिघात येणार्या शहरांमध्ये ते घरफोड्या करीत असत. गाडीच्या डिकीत त्यांनी एक चोरकप्पा तयार करून घेतला होता, त्यात फोल्डिंग कटावणी (कुलूप तोडण्याचे हत्यार), डायमंड टेस्टर (मिळालेले हिरे खरे आहेत की खोटे ते तपासण्याचे यंत्र), मिरची पूड, लॅपटॉपची बॅग, याबरोबरच कोट आणि टाय ठेवलेले असत. गाडीत बसताना ते कोट आणि टाय लावून बसायचे. शहरातील आलिशान सोसायट्यांचा त्यांचा अभ्यास होता. सोसायटीच्या गेटमधून प्रवेश करताना पेहराव आणि आलिशान कारमुळे त्यांना कोणीही अडवत नसे. पण ज्या ठिकाणी कुत्रा आहे, तिथे ते जाणे टाळत असत. गाडीतून उतरून सोसायटीत जाताना दोघेही गळ्यात लॅपटॉपच्या बॅगा लावीत, त्यामुळे ते उच्चभ्रू असल्याचे बघणार्यांना वाटे. दोघेही झीरो नंबरचे चष्मे वापरीत असत, त्यामुळे ते एकदमच एक्झिक्युटिव्ह वाटत असत.
प्रवेश केलेल्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर ते पहिल्यांदा जात. बंद फ्लॅटचा अभ्यास करत. जिन्याने चालत एक-एक मजला उतरत असत. फ्लॅटच्या बाहेर ठेवलेल्या कुंड्यांना पाणी घातलेले आहे का, बाहेर वर्तमानपत्रं जमा झालेली आहेत का, पायपुसणी, दाराचे हँडल, कुलूप यावर किती धूळ साठलेली आहे, याचा अभ्यास करून त्या फ्लॅटमध्ये कोणी नसल्याची ते खात्री करीत. अवघ्या २५ ते ३० सेकंदात आपल्याकडील तीक्ष्ण आणि आधुनिक कटावाणीने ते कडी कोयंडा उचकटून काढीत. घरात प्रवेश करून बंद कपाटे याच पद्धतीने तोडून त्यातील फक्त रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेत. प्रथमच त्यांनी वरील घरफोडी करताना एटीएम कार्ड घेतले, कारण त्यांना कॅलेंडरवर लिहिलेला पिन नंबर सहजपणे मिळालेला होता. तिथेच ते फसले.
दुसरा आरोपी अस्लम बेग याला मोबाईल लोकेशनवरून राजस्थानातून पकडण्यात आले. त्याची मुले थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पब्लिक स्कूलमध्ये शिकत होती. त्याचे एकंदरीत राहणीमान चैनीचे होते. दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)