• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मानसोपचार तज्ज्ञांचा बाप!

- किरण माने (शुद्ध बुद्ध काया... तुकोबाराया! (भाग : १०))

Nitin Phanse by Nitin Phanse
July 3, 2025
in धर्म-कर्म
0

तुकोबाराया संत, प्रतिभावान कवी, समाजसुधारक, विद्रोही लढवय्ये हे सगळं तर होतेच, पण त्या सगळ्याच्या पलीकडं जाऊन ते उत्तम ‘मानसोपचार तज्ज्ञ’सुद्धा होते!
माणसाचं मन ही अजब गोष्ट आहे. काबूत राहिलं नाही, भरकटत गेलं तर संपूर्ण आयुष्याची धूळधाण करू शकतं. तसंच ते प्रचंड ताकदवानसुद्धा असतं. कितीही मोठं संकट येऊद्यात, ‘आता सगळं संपलं’ असं वाटणारे कितीही प्रसंग येऊद्यात. आपल्या मनानं आपल्याला सांगितलं ना, की ‘दुनिया इकडची तिकडं होऊदेत, तू हार मानायची नाही’; तर मग तुमच्याविरोधात कितीही शक्ती लागूद्यात, कुणी कितीही चिखलफेक करूद्यात, तुम्ही सगळ्याला पुरून उरता!
जगात सगळ्यात मोठ्ठं विध्वंसक कृत्य आणि सगळ्यात मोठ्ठं विधायक काम कुणी घडवलं असेल तर ते माणसाच्या ‘मनानं’. लै खतरनाक असतं माणसाचं मन! मग या मनाचं संतुलन कसं ठेवायचं? मनावर लगाम कसा घालायचा? याबद्दल एक जगात भारी सल्ला एका अभंगातून तुकोबारायांनी दिला आहे.
‘मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणा ।।
मीच मज राखण झालो । ज्याने तेथेचि धरिलो ।।
जे जे जेथे उठी । तें ते तया हातें खुंटी ।।
भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ।।’
…माझं मन माझ्या मनाला क्षणोक्षणी वळवतं. माझी बुद्धी माझ्या बुद्धीला क्षणोक्षणी वळवते.
…मीच माझा राखणदार झालो आहे. त्यामुळे जागच्या जागी स्थिर झालो आहे. मी मनाला स्वैरपणानं नको तिथं, चुकीच्या मार्गावर हिंडू देत नाही.
…मनात जे जे भलतं-सलतं येतं, ते त्या त्या वेळी, तिथल्या तिथे मनच खुंटवून टाकतं. मनात आलेल्या सगळ्या विकारांना मनच थोपवतं.
…मनात जे काही चढउतार होतात, मनाच्या सागरात जी काही भरती-ओहोटी येते त्या दोन्हीचा साक्षीदार म्हणून ‘तुका’ तटस्थ उरला आहे.
किती सुंदर आहे हे! आपल्या मनात आत खोलवर जे काय चाललेलं असतं त्यावर सतत सावधपणानं नजर ठेवायला पाहिजे. आपलं नुकसान करतील, अधोगतीकडे घेऊन जातील अशा गोष्टी जागीच रोखल्या-थोपवल्या पाहिजेत. नाहीतर अशा निगेटिव्ह विचारांचे ‘व्हाइब्ज’ आपल्या पर्सनॅलिटीवर उमटतात. आपलं वागणं त्रासदायक ठरतं. निर्णय चुकतात. मनातल्या विचारांवर आपलं सुख-दु:ख, भविष्यातलं यशापयश ठरणार असतं. म्हणून आपल्या मनानंच आपल्या मनावर आणि बुद्धीनंच तटस्थ राहून बुद्धीवर, कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे, असं तुकोबाराया सुचवतात!
मी जेव्हा एका ठिकाणी या अभंगाविषयी सांगितलं होतं, तेव्हा एक मानसोपचारतज्ज्ञ मला म्हणाले, ‘आधुनिक मानसशास्त्रात आम्ही याला ‘माइंडफुलनेस’ असं म्हणतो!’ तुकोबाराया काळाच्या किती पुढचे होते हे यावरून आपल्याला लक्षात येईल.
मुळातच स्वैर, स्वच्छंदी असलेलं आपलं मन जाणीवपूर्वक ताब्यात ठेवलं, तर काय जादू होऊ शकते हे सांगताना तुकाराम महाराज आणखी एका अभंगात म्हणतात,
चित्त समाधाने । तरी विष वाटे सोने ।।
बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगो काय ।।
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ।।
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ।।
…माणसाचं मन जर समाधानी असेल तर विषसुद्धा सोनं वाटू शकतं. म्हणजेच वाईट काळही आनंदमय वाटतो.
…मनातला अति लोभ हा भ्रामक असतो म्हणजेच त्यातून हाताला दु:खाशिवाय काही लागत नाही. हे तुम्ही जाणून घ्या, तुम्हा भल्या माणसांना मी काय सांगावं?
…मन अस्वस्थ असेल, ते चिंतेनं किंवा लालसेनं तळमळत असेल, तर शीतल असलेल्या चंदनाच्या स्पर्शानंही अंग भाजून निघतं.
…मनाच्या दोलायमान अवस्थेनं फक्त आणि फक्त त्रास होतो. त्याला काहीही उपचार नाही, पूजेचाही उपयोग नाही. म्हणून, आनंद, सुख, समाधान मिळवायचं असेल, तर मन समाधानी ठेवणं आवश्यक असतं.
काही ट्रक किंवा बसच्या मागे लिहिलेलं असतं बघा, ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’! रस्त्यावरच्याच नव्हे, तर आयुष्याच्या प्रवासात कायम लक्षात ठेवण्यासारखं हे वाक्य आहे. मनावर सतत पाळत ठेवून ते समाधानी, आनंदी ठेवत रहाणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. संत रोहिदास म्हणतात, ‘मन चंगा तो कठौती में गंगा’. मन चांगले असेल अर्थात नियत साफ असेल तर माझ्या चामडं साफ करण्याच्या कटोर्‍यातलं पाणीही गंगेइतकं निर्मळ भासेल. मन प्रसन्न असल्यावर माणसाला कशाही परिस्थितीत आशावाद दिसतो, मग त्याला काहीही साध्य करणं अशक्य नसतं, हे सांगताना तुकोबाराया एका प्रसिद्ध अभंगात म्हणतात,
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।
मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली।
मनें इच्छा पुरविली। मन माउली सकळांची ।।
मन गुरू आणि शिष्य । करी आपुले चि दास्य।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात।
नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।
…आपलं मन प्रसन्न ठेवा, सगळ्या इच्छा आकांक्षा, सगळं काही पूर्ण करण्याचा तो मार्ग आहे. आपण मुक्तपणे स्वातंत्र्याचा अनुभव घेणार की वाईट गोष्टींच्या बंधनात अडकणार, हे आपल्या मनावरच अवलंबून असतं.
…आपलं मनच एखादी प्रतिमा बनवून त्यावर श्रद्धा ठेवतं, आपणच त्याची पूजा करतं. आई जशी बाळाच्या इच्छा निरपेक्ष आनंदानं पूर्ण करते, तसं आपलं मनही आपल्यावर अपार मायेचा वर्षाव करतं.
…मन आपला गुरूही होतं आणि शिष्य बनून ज्ञानार्जनही करतं. म्हणजेच ज्ञान देणं आणि घेणं या गोष्टी आपल्या आपणच करायच्या असतात. मनानंच शिकवावं आणि आपल्या मनानंच शिकावं, हाच ज्ञानाचा खरा मार्ग. मन स्वत:च स्वत:चा दास बनतं म्हणजेच स्वत:च्या जबाबदार्‍या पेलू लागतं, स्वत:ची कर्तव्यं स्वत:च पार पाडू लागतं… मग त्याला स्वत:च्या विकासासाठी कुणाचा गुलाम व्हावं लागत नाही. या मार्गानं मन आपल्याला प्रसन्न ठेवतं आणि आपण मनाला. आपली प्रगती आणि अधोगती या सगळ्याचे मूळ या मनाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असते.
…शेवटी तुकोबाराया म्हणतात, साधना करणारे साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते सगळे सगळे कळकळीनं एक गोष्ट ऐका : मनाशिवाय दुसरं दैवत नाही… नाही… नाहीच!
तुकोबांसारखी व्यक्ती इतक्या आग्रही शब्दांत, पुन:पुन्हा ‘नाही’ हा शब्द वापरून मनाचं महत्त्व सांगते, हे हलक्यात घेण्यासारखं नाही. तरीही लोक चेहरा छान दिसण्यासाठी प्रसाधनं, शरीर छान दिसण्यासाठी कपडे या गोष्टींवर अतोनात खर्च करतात, लक्ष देतात. अर्थात हे वाईट नाही, पण त्याचवेळी मनाची कणभरही काळजी घेतली जात नाही, हे घातक आहे. शरीर आणि मन यात श्रेष्ठ काय? माणसाचे शरीर आकर्षक असेल, पण मन गढुळ असेल तर तो चांगला ठरतो की वाईट? रोज शरीराची अंघोळ करतो आपण, पण मनाच्या शुद्धतेसाठी काय करायला पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा तुकारामांचा एक सुंदर अभंग आहे,
काय धोविले बाहेरी मन मळले अंतरीं ।
गादले जन्मवरी असत्यकाटे काटले ।।
सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करी रे मन वाचा ।
तुझिया चित्ताचा तू च ग्वाही आपुला ।।
पापपुण्यविटाळ देहीं भरिता न विचारिसी काही।
काय चाचपसी मही जी अखंड सोवळी ।।
कामक्रोधा वेगळा ऐसा होई का सोवळा ।
तुका म्हणे कळा गुंडुन ठेवी कुसरी ।।
…शरीर नुसतं बाहेरून धुतल्यामुळं काय साधणार आहे? आतून मन मळलेलंच आहे. जन्मभर मनात असत्याचे काटे घुसलेले आहेत, ते तर तसेच आहेत.
…असं दंभाचं, खोटारडेपणाचं वागणं सोडून दे, मन आणि वाचा म्हणजेच विचार आणि बोलणं शुद्ध केलं पाहिजे. आपलं मन शुद्ध आहे की नाही, याची खात्री आपली आपणच देऊ शकतो. कारण आपणच आपले साक्षीदार असतो.
…पापपुण्यविटाळ या भ्रामक आणि घातक कल्पनांनी आपलं शरीर भरून टाकत असताना तू काहीच विचार करत नाहीस. उलट, जी पृथ्वी अखंड सोवळी आहे, ही भूमी संपूर्णपणे शुद्ध आहे, ती मात्र तू संशयानं चाचपून बघत असतोस. म्हणजेच जे अवास्तव, काल्पनिक आहे ते चिकित्सा न करता मनात भरून घेतोस आणि जे वास्तव आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे त्यावर मात्र शंका उपस्थित करतोस.
…तुला जर सोवळा व्हायचं असेल, तर फक्त शरीर धुवून नाही होणार… तू कामक्रोधांपासून वेगळा हो. मनातले सगळे विकार तू टाळलेस की आपोआपच शुद्ध होशील. नुसत्या बाहेरून सुंदर दिसणार्‍या कलाकुसरी या तुला शुद्ध बनवू शकत नाहीत. त्यामुळे तुका म्हणे, त्या तुझ्या बाह्यकळा तू गुंडाळून ठेव.
बाकी सगळ्या विकारांना लगाम घालाच, पण एक विकार असा आहे, जो माणसानं फक्त ताब्यातच नव्हे तर मुळापासून उपटून लांब फेकून द्यायला हवा, तो म्हणजे ‘अहंकार’ ! गर्व, ताठा सोडला तर मन आपोआपच शुद्ध होतं, हे सांगताना एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,
त्याग तरी ऐसा करा। अहंकारा दवडावे ।।
मग जैसा तैसा राहे । काय पाहे उरले ते ।।
अंतरीचे विषम गाढे। येऊ पुढे नेदावे ।।
तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ।।
…त्याग करायचाच असेल, तर अहंकाराचा करा.
…अहंकार सोडल्यानंतर स्थिर रहा आणि आपल्या आत डोकावून बघ.
…मनात आणखी काही वाईटसाईट उरलंय का ते निट शोध. आत जे काही वाईटसाईट शिल्लक असेल ते पुढं येऊ देऊ नको. म्हणजेच ते वाढू देऊ नको, नष्ट कर.
…शेवटी तुका म्हणे, अशा प्रकारे माणसानं मन शुद्ध ठेवून समाधानी राहिलं पाहिजे.
किती तळमळीनं तुकोबारायांनी अहंकाराचा कणही शिल्लक ठेवू नका हे सांगितलंय. जशी कॅन्सरची गाठ काढताना तिचा एक छोटासा कणही डॉक्टर शिल्लक ठेवत नाहीत, तशी ही अहंकाराची गाठ काढायच्या तुकोबांच्या सूचना आहेत. कॅन्सर काढून टाकला तरी पुन्हा उद्भवू शकतो. तशीच ही गर्वाची ‘आतली गाठ’सुद्धा पुन्हा वर येऊ देऊ नये हेही निक्षून सांगितलंय!
आपल्या आयुष्याच्या प्रवासात यशापयश ठरवणारं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपलं ‘मन’. या मनाच्या मशागतीसाठी तुकोबांच्या अभंगाइतका प्रभावी दुसरा कुठलाही मार्ग नाही. जगातल्या उत्तमोत्तम मानसोपचारतज्ज्ञांचा बाप होता आपला तुकोबाराया. हे एवढं अगाध ज्ञान आपल्याजवळ असून आपण सैरभैर आहोत. कारण आपण गाथेतले अभंग समजून घेत नाही. आता तरी कळलं ना, आपला ‘तुका आकाशाएवढा’ का होता ते? अहो, त्याचा एकेक अभंग लाखमोलाचं काहीतरी देऊन जातो. आपला कोट्यवधी रुपयांचा महाल असूद्या, पण त्यात तुकारामाची गाथा नसेल तर आपल्यासारखे दरिद्री आपणच. ज्याच्या झोपडीत रोज तुकोबाचा एक तरी अभंग अनुभवला जातो, त्याच्या सुखाला तोड नाही.

Previous Post

वाघ आले, कोल्हे टरकले; जंगल जागले का?

Next Post

इतिहासाचा वेगळा दृष्टिकोन

Next Post

इतिहासाचा वेगळा दृष्टिकोन

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.