□ देशाला पंतप्रधान नाही… भाजपला आहे – उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला.
■ उद्धवसाहेब, भाजपची फार मौज आहे, त्यांच्याकडे परिधान मंत्री, प्रचार मंत्री, विदेशात संचार मंत्री आणि फावल्या वेळात पंतप्रधान असा फोर इन वन मामला आहे… देश काय, चालतोच की आपोआप!
□ पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांच्यासोबत ट्रम्प यांचे स्नेहभोजन.
■ शिवाय ‘आय लव्ह पाकिस्तान’ अशी प्रेमळ पखरणही झाली. त्यांनी नमस्ते ट्रम्प वगैरे अराजनैतिक, उथळ आणि थिल्लर उपक्रम सरकारी खर्चाने केले नाहीत, तरीही केवढं प्रेम ऊतू चाललंय. आपल्या देशांतर्गत स्वार्थ साधण्याच्या, निवडणुका जिंकण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या वेदीवर मोदींनी भारताच्या हिताचा बळी देऊन टाकला आहे.
□ धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका; करुणा यांच्या पोटगीतील ५० टक्के रक्कम जमा करण्याचे कोर्टाचे आदेश.
■ आजारी आहेत बिचारे, नका छळू त्यांना. मंत्रीपदही नाही, शिवाय हा ससेमिरा. यासाठी उडी मारली होती का वॉशिंग मशीनमध्ये?
□ ठाणे पालिकेचा पूर्वीचा रेकॉर्ड चांगला होता, आता काय झाले? – बेकायदा बांधकामावरून हायकोर्टाकडून पुन्हा कानउघडणी.
■ आता काय झाले? ज्याला वाट्टोळे म्हणतात ते झाले. कोणी केले? ज्यांनी सत्तेसाठी बाप पळवला, खोक्यांसाठी गद्दारी केली, त्यांनी केले. कशासाठी केले? कोंबड्या, रेडे, बकरे, मांत्रिक यांच्यावर खर्च किती होतात!
□ न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाण्यातील ३३ बेकायदा बांधकामांवर हातोडा.
■ बांधकामांवर हातोडा पडेल, त्यात ज्यांचे पैसे गुंतले असतील, ते बरबाद होतील. ज्यांनी खोटी कागदपत्रे तयार केली, ज्यांनी ती करायला मदत केली, ज्यांच्या हद्दीत ही बांधकामे उभी राहिली, त्यांचे काय होईल? हा खरा प्रश्न आहे.
□ केडीएमसीची वेबसाईट बंद; डोंबिवलीत ४९० पदांची भरती लटकली.
■ ज्या राज्यात दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये शुल्क वसूल केल्यानंतर प्रवेशाची वेबसाइट क्रॅश होते, प्रवेशांची मुदत आठवडा, पंधरवडाभर पुढे जाते आणि त्याची कोणाला कसलीही लाज वाटत नाही, तिथे पदांची भरती लटकल्याची काय कौतुकं सांगायची!
□ रायगड किल्ल्याकडे जाणारा पर्यायी रस्ता वर्षभरातच वाहून गेला, महाडमध्ये ठेकेदार मालामाल.
■ पर्यायी रस्ता बनवणार्या ठेकेदारालाच पुन्हा कंत्राट मिळालं असणार, यात काही शंका नाही. केरळसारख्या प्रचंड पावसाच्या राज्यात जंगलाच्या अंतर्भागापर्यंत उत्तम डांबरी रस्ते आहेत आणि आपल्याकडे ते वर्षभरात वाहून जाण्याच्या लायकीचे बनवले जातात, यातून समाज म्हणून आपण कुठे आहोत, किती गंडलेले आहोत, ते कळून जायला हरकत नाही.
□ कणकवलीत भुताटकी झाली… रस्त्यासाठी मंजूर दहा लाख रुपये गायब.
■ समजा, ते १० लाख रुपये वापरले गेले असते, तरी रस्ताही गायब झाला असताच तो… दोन तीन वेळा निधी मंजूर होऊन खर्च झाल्यानंतर सुद्धा. देवचारांचा, मुंज्यांचा, हडळींचा, भुताखेतांचा प्रदेश आहेच ना तो!
□ मिंधे स्वार्थी आणि मतलबी; डोंबिवलीत भाजपचा एक्स पोस्टवरून निशाणा.
■ कशाला ट्विटरवरून टिवटिव करता? तुमच्या सुस्वच्छ वरिष्ठ नेत्यांना सांगा आणि वॉशिंग मशीनमधून हे डागाळलेले नग बाहेर काढून फेका की! ते स्वार्थी आणि मतलबी आणि तुम्ही काय जगाच्या कल्याणाला वाहून घेतलेल्या विभूती?
□ महाउधारी सरकारने थकवली ८० हजार कोटींची बिले; कंत्राटदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न.
■ ज्या राज्याची ओळखच मुळात कंत्राटदारांचे कंत्राटदारांसाठी चालवले जाणारे राज्य अशी झाली आहे, त्या राज्यात कंत्राटदारांची ही अवस्था असेल तर बाकीच्यांचं काय होणार?
□ मुंबईतील अल्प उत्पन्न गटासाठीच्या ३६८ भूखंडांवर ३० वर्षे बांधकामच नाही.
■ अल्प उत्पन्न गटासाठी आहेत ना ते भूखंड? त्यांच्यावर आपल्या दोन राष्ट्रीय उद्योगपतींपैकी एकाची नजर पडली की त्याचा उत्कर्ष होईल. गरीबांवर वाया घालवतात का इतके महागडे भूखंड?
□ कोट्यवधींच्या शववाहिन्या अलिबागमध्ये धूळखात; मिंधेंच्या चमकोगिरीचा वडखळमध्ये बॅण्ड वाजला.
■ हे पाहा, शववाहिन्यांची मूळ किंमत काय होती? त्या खरेदी किती किंमतीला झाल्या?
□ अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाची आर्थिक गाडी कोसळली.
■ विमान कोसळल्यावर आर्थिक गाडी पण कोसळणारच ना! फक्त आपल्या देशाच्या दोन मालकांपैकी कोणी विमानाच्या क्षेत्रात येतंय का ते पाहा.
□ निवडणुकीचे फुटेज आता ४५ दिवसांनी नष्ट करणार.
■ भाजपची शाखा बनलेल्या निवडणूक आयोगाने नंतर नष्ट करण्यासाठी मुळात फुटेज तयार तरी का करायला हवं आहे? मुळात निवडणुका घेता तरी कशाला? उठा आणि जाहीर करा की निवडणूक झाली, हा जिंकला, विषय संपला. नाहीतरी तेच करताय ना!
□ मोदी यांचे किस्से, ट्रम्प म्हणाले, या, जेवण करू, चर्चा करू, पण मी नकार दिला.
■ जगन्नाथाच्या भेटीसाठी नकार दिला, असं ते सांगतायत. आता तोंडाळ ट्रम्पने ‘मी कधीच बोलावलं नव्हतं यांना’ असं सांगू नये म्हणजे मिळवली.