कधीकधी वृत्तपत्रांमध्ये ‘ईश्वर चिठ्ठी’ येतेच. म्हणजे ईश्वर मानवाला आपले अस्तित्व जाणवून देतोच. किंवा तसा प्रयत्न करून मानवास विचार करावयास लावतोच. या प्रयत्नांमध्ये ईश्वर यशस्वी होतोच याची खात्री नसते. तरीपण यश-अपयश, लाभ-हानी समान मानून ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या मानवी न्यायानुसार ईश्वर त्याचे प्रयत्न चालूच ठेवतो.
मूळ मुद्दा आहे ईश्वर चिठ्ठीचा. वेळोवेळी वृत्तपत्रांमध्ये ‘ईश्वर चिठ्ठी’ गाजते ती निवडणूक निकालाच्या निमित्ताने. अनेक निवडणुकांचे निकाल (सर्व मानवी प्रयत्न संपल्यावर किंवा ते थिटे पडल्यानंतर) ईश्वर चिठ्ठीद्वारे लावतात. आणि आश्चर्य म्हणजे निरीश्वरवादी विद्वानदेखील ती ईश्वर चिठ्ठी मानतातच. म्हणजे ऐनवेळी ईश्वर आपल्या ठेवणीतले अस्त्र (किंवा चिठ्ठी) काढून मानवाला आणि त्याच्या सव्यापस्वय प्रयत्नांना, त्याच्या तथाकथित अफाट विद्वत्तेला एका फटक्यात नाकाम करून टाकतो. या रीतीने ईश्वर मानवाला ‘ईश्वर शरण’ बनवतोच.
काही वर्षांपूर्वी आमच्या भागात जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात अमरावती व भंडारा जि.प.च्या अध्यक्षांची निवड ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे झाल्याचे वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले. (आणि हे वृत्त ईश्वर शपथ सत्य आहे.) या पद्धतीने निवडून आलेले अध्यक्ष, अध्यक्षा (किंवा इतर महान नेते) हे आपण ईश्वराची साथ व ईश्वराचा हात लाभला म्हणून निवडून आलोत, असे मानतील असे मानण्याचे कारण नाही. सर्वस्वी स्वप्रयत्नाने, स्वकष्टाने व स्वकर्तृत्त्वाने मिळालेले ‘स्वराज्य’ ही श्रींची इच्छा’ मानणारा जाणता शिवकल्याण राजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला हे आपण सारे जाणतोच. परंतु सर्वस्वी परप्रेरित, परप्रभावित आणि परपुष्ट अजाण जननेते हा ईश्वर निर्णय मानतीलच असे मानण्याचे कारण नाही. (ते ईश्वर पाहून घेईल.)
या ईश्वर चिठ्ठीमुळे आमच्या बालपणीच्या अशाच ‘ईश्वर चिठ्ठी’ प्रसंगाची आठवण सांगावीशी वाटते. ही पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची (किंवा त्यापेक्षाही पूर्वीची) घटना असू शकते. त्यावेळी आम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या लहान खेड्यातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी होतो. आजच्या प्रगत स्थितीचा व तथाकथित अत्यंत हुशार व भाग्यवान असलेल्या आजच्या विद्यार्थ्यांचा विचार करता आम्ही फारच अडाणी व खेडवळ होतो. त्या काळात परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरिता अभ्यासाखेरीज अन्य मार्गच नव्हता. परीक्षा ‘पास’ करण्याचे आजचे अतिप्रगत मार्ग आपण पाहातोच. तसे कोणत्याही आधुनिक मार्गाची जाणही नसलेले आम्ही अत्यंत मागास व खेडूत विद्यार्थी होतो. त्या काळात आमच्या भागात वीज (इलेक्ट्रीसिटी) आलेली नव्हती. परीक्षेच्या काळात रात्र रात्र जागून अभ्यास करणे (तेही रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात) हा आमचा राजमार्ग. अशा काळात आमचे काही ‘ज्येष्ठ व जाणते’ आम्हाला ईश्वर चिठ्ठीचा उपाय सांगत होते. परीक्षेच्या काळात आदल्या रात्री संबंधित विषयांतील काही संभाव्य प्रश्न अलग अलग चिठ्ठ्यांवर लिहावेत. त्या चिठ्ठ्या नीट घड्या करून रात्रीच गावातील हनुमानाच्या मंदिरात मूर्तीच्या पायाजवळ ठेवाव्यात. दुसर्या दिवशी सकाळी स्नान करून त्या मंदिरात जावे. हनुमंताला नमस्कार करून, डोळे मिटून त्यामधील फक्त एक चिठ्ठी उचलावी. त्या चिठ्ठीवर जो प्रश्न असेल तो हमखास परीक्षेत येणार ही आमची भावना. असा प्रयोग मी दुसरी किंवा तिसरीत शिकत असताना कधीतरी केल्याचे आठवते. परंतु तो हनुमान मला कधी पावलाच नाही. आताही मी त्या मंदिरात प्रसंगोपात जातो, तेव्हा हनुमान माझ्या मूर्खपणाला हसतात, असेच मला वाटते.
तसाच ईश्वर चिठ्ठीचा हा एक किस्सा ऐका. एका खेडेगावी एका कुटुंबातील शेताची हिस्से-वाटणी चालू होती. चार भावांमध्ये समान हिस्से वाटलेत. पण एक असा भाग होता त्याचे हिस्से करता येत नव्हते. तो पूर्णपणे कुणातरी एकालाच मिळणार अशी स्थिती होती. मग प्रत्येकाचे प्रयत्न तो भाग आपल्यालाच मिळावा असे चालू होते. गावचा तलाठी खूप हुशार. (तसे ते हुशारच असतात.) त्याने ईश्वर चिठ्ठीचा उपाय दर्शवला. सर्वांनाच तो मान्य झाला. मग तलाठी साहेबांनी आपले बुद्धीचातुर्य पणास लावले. एका भावाच्या कानास लागला. गुप्तपणे जी करायची ती सौदेबाजी केली. सर्वजण तलाठी कार्यालयात जमले. आपल्या सोयीची जागा पाहून सगळे फतकल मांडून बसले. सगळ्यांच्या चेहर्यांवर उत्सुकता आणि आतुरता. तलाठीसाहेब आपल्या ओट्यावर टेबल-खुर्ची मांडून विराजमान. एक-एकास नाव विचारले गेले. प्रत्येकाने आपापले नाव सांगितले. रामराव, श्यामराव, बाबाराव, दादाराव. तलाठी साहेबांनी चार वेगवेगळ्या चिटोर्यांवर नावे लिहिली. जपून घड्या केल्या. बाहेर रस्त्यावर खेळत असलेल्या एका अजाण बालकास बोलावले. तलाठी साहेबांनी त्या मुलाच्या डोळ्यांवर रुमाल बांधला. त्या अजाण बालकाने टेबलावरील एक चिठ्ठी उचलली. साहेबाने ती चिठ्ठी हातात घेतली. ती उचलली आणि वाचली. त्या चिठ्ठीवर नाव होते ‘बाबाराव’. बाबारावचा आनंद गगनात मावेना. इतर भाऊ हिरमुसले. सर्वांनी ईश्वर चिठ्ठी मान्य केली. सर्वजण आपापल्या घरी गेले. साहेबांनी सर्व चिठ्ठ्या काळजीपूर्वक जमा केल्या. स्वत: कचर्याच्या टोपलीत टाकल्या. दुसर्या दिवशी सफाई करणार्या नोकराने टोपलीतील केर बाहेर फेकला. विशिष्ट प्रकारे घड्या केलेल्या चिठ्ठ्या पाहून त्याला काहीतरी वाटले. त्याने त्या चार चिठ्ठ्या उचलल्या. उघडून पाहिल्या. चारही चिठ्ठ्यांवर एकच नाव, बाबाराव, बाबाराव, बाबाराव बाबाराव. अशी ही ईश्वर चिठ्ठीची कथा.
यावरून एक सुवचन आठवले. ‘जे नसेल तुमच्या ललाटी, ते लिहू शकतो तलाठी’.