घनश्याम भडेकर
कठीण समय येता कोण कामास येतो? असे विचारणारा एक साईन बोर्ड बरीच वर्षे मातोश्री बंगल्याच्या बाहेर असायचा. हा बोर्ड वाचून येणारे पाहुणे क्षणभर थांबायचे आणि मनातल्या मनात थोडा विचार करून या बोर्डाखालीच पादत्राणे काढून बंगल्यात प्रवेश करायचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोज सकाळी १० वाजल्यानंतर जनता दरबार घ्यायचे. येणारा शिवसैनिक असो की नसो, सर्वांसाठी मातोश्रीचे दरवाजे सतत उघडे असायचे. कलानगरमध्ये गेल्यानंतर रस्त्यावरून डोकावून पाहिले की साहेब लोकांशी बोलत खुर्चीवर बसलेले दृष्टीस पडायचे. एक साध्या वेशातील पन्नाशीचा पोलीस लांबून सर्वांना न्याहाळत असायचा. साहेबांचा मार्शल नावाचा डॉगी कोणावरही न भुंकता जवळ येऊन वास घेऊन निघून जायचा. रोज शेकडो माणसं दरबारात यायची आणि आपली कामे फत्ते करून जायची. त्यात मातब्बरांपासून गोरगरीबांपर्यंत सर्वांना मुक्त प्रवेश होता.
लोकांच्या अडचणी समजून घेतल्या की साहेब राजे या स्वीय सहायकांना फोन लावायला सांगायचे. ज्यांचे फोन लागले नाहीत ती माणसं पुन्हा दुसर्या दिवशी बंगल्यावर यायची. मग पुन्हा फोनाफोनी. फोन लागलाच तर कामाची शंभर टक्के गॅरंटी. साहेबांनी सांगितले आणि काम झाले नाही असे शक्यच नाही. काही दिवस अधूनमधून साहेब शिवसेना भवनातही बसायचे. साहेबांच्या एका फोन कॉलवर अनेक लोकांची फार महत्त्वाची कामे क्षणात व्हायची.
हे सर्व मी आज का सांगतो आहे? अलीकडेच मी बर्याच वर्षांनी शिवसेना भवनात माझ्या मित्रांना भेटायला गेलो होतो आणि समोरचे दृश्य बघून साहेबांची आठवण आली. साहेबांच्या स्टाईलमध्ये नितीन मधुकर नांदगावकर नावाचा शिवसेनेचा उपनेता जनता दरबारात लोकांचे प्रश्न सोडवत होता. डोक्यामागे केसाचा बुचडा बांधलेला, चेहर्यावर मिशी आणि भली मोठी दाढी बघून हिमालयातल्या साधूची आठवण आली. जो एका फटक्यासरशी गोरगरिबांचे, अडल्या नडल्याचे सर्व प्रश्न काही क्षणात सोडवू शकेल एवढी हिंमत, तेवढी ताकद त्याच्यात असावी असे वाटून गेले.
४०-५० माणसं त्याच्यासमोर बसली होती. सर्व जाती-धर्माचे लोक होते. तरुण-तरुणी, अंध अपंग आणि वयोवृद्ध आई-वडीलही आले होते. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या होत्या. नितीनच्या विनंतीनुसार प्रत्येकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे विनंती अर्ज आणले होते. क्रमाक्रमाने प्रत्येकाला नितीन आपल्याजवळ बोलावून शांतपणे त्यांची समस्या समजून घेत होता. मग त्यांचे काम होण्यासाठी समोरच्याला फोन करून गरजवंतांना सहकार्य करण्याची विनंती करत होता. तो नीट बोलला तर ठीक नाहीतर त्याची काय खैर नाही. नितीनने त्याला ठोकलाच समजा. लोकांच्या भल्यासाठी नितीनने अशी अनेक प्रकरणे सहज लीलया हाताळली आहेत. म्हणूनच तो गरिबांच्या हृदयातील रॉबिनहूड झाला आहे.
शिवसेना भवनात दुपारी १२ वाजता सुरू झालेला नितीनचा जनता दरबार रात्रीचे दोन वाजून गेले तरी संपता संपेना. पहिल्या रांगेत येऊन बसलेला उत्तर प्रदेशातील एका भय्याचा मुलगा, त्याची समस्या वेगळीच. पोटापाण्यासाठी नोकरी शोधत तो एकटाच महाराष्ट्रात आला. भिवंडीतील एका कारखान्यात मशीनवर काम करण्याची नोकरी मिळाली. महिना पगार फक्त १२ हजार रुपये. तेथे काम करत असताना मशीनचा तुकडा उजव्या हातावर पडला आणि हाताची चार बोटे तुटली. हात रक्तबंबाळ झाला. त्याला जखमी अवस्थेत मालकाने डॉक्टरकडे नेऊन जुजबी औषधोपचार करून घरी पाठवले. जाताना नुकसान भरपाई म्हणून २० हजार रुपये त्याच्या हातावर टेकवले. आणि एका स्टॅम्प पेपरवर एक लाख रुपये दिल्याची नोंद केली व त्या खाली मुलाची स्वाक्षरी घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उरलेले ८० हजार मिळावेत म्हणून मुलाने बरेच प्रयत्न केले, पण व्यर्थ गेले. नितीनच्या जनता दरबारातील समाजकार्याची माहिती देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेळोवेळी प्रसारित होत असतात. असाच एक व्हिडीओ पाहून एका कामगाराने शिवसेना भवनमध्ये जाण्याचे मुलाला सुचवले होते, म्हणून तो नितीनला भेटण्यासाठी आला होता. हा कोणाचा कोण, ना ओळखीचा ना पाळखीचा, कामापुरता (नितीन) मामाकडे आलेला. मदतीची याचना करत होता. मुंबईत त्याचे कुणीही नातेवाईक नव्हते. नितीनने त्याला धीर दिला आणि मालकाला फोन करून दम दिला, पण मालक उर्मट निघाला तो दादागिरीची भाषा करू लागला. दोन-चार अपशब्द बोलून त्याने फोन ठेवून दिला. नितीन भयंकर संतापला. दुसर्या दिवशी त्या मुलाला गाडीत घेऊन नितीन भिवंडीच्या कारखान्यात पोहोचला. तो आल्याची कुणकुण लागताच मालक मागच्या दरवाजाने पळून गेला. हे पाहून नितीनने दुसर्या कामगाराकडे निरोप ठेवला, ‘त्याला सांगा आज पळालास उद्या तुला पळवून घेऊन जाऊ… मुकाटपणे गरीबाचे पैसे देऊन टाक.’
दुसर्या दिवशी सकाळी नितीनने आपल्या गाडीत नेहमीचे यशस्वी कलाकार बसवले आणि त्या मुलालाही सोबत घेऊन पुन्हा भिवंडीतील तो कारखाना गाठला. तो उर्मट मालक ३६ इंची छाती पुढे काढून प्रतिकार करण्यासाठी बाहेर आला होता. परंतु नितीनचा आवेश पाहून त्याचे पाय लटपटायला लागले. तो उभ्या उभ्याच गळपटला. त्याने माफी मागितली आणि त्या ८० हजार रुपयांचा चेक लिहून मुलाच्या हाती दिला.
मुंबई ते भिवंडी दोन फेर्या झाल्या त्यासाठी किती वेळ आणि पैसा व्यर्थ गेला याची नितीनला पर्वा नाही, पण गरीबाचे काम मार्गी लागले यातच त्याला आनंद भारी. म्हणतात ना… तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.
जनता दरबाराची महती मंत्रालयापर्यंत पोहोचली म्हणायची, कारण मंत्रालयातील क्लास वन अधिकारी, पुढारी आमदारांच्या चिठ्ठ्या घेऊन शिवसेना भवनात येऊ लागले आहेत. विधान भवनात आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमलेले सहाय्यक पोलीस आयुक्त स्वत:च्या सुरक्षेसाठी जनता दरबारात येतात, त्यावेळीची ही गोष्ट. या साहेबांचे मुंबईत स्वत:चे घर नव्हते. आपल्या बजेटमध्ये घर ठाण्याला मिळेल म्हणून त्यांनी एका बिल्डरकडे आठ लाख रुपये अॅडव्हान्स देऊन एक फ्लॅट बुक केला. परंतु पाच वर्षे उलटून गेली तरी इमारतीचे बांधकाम काही सुरू होईना. बिल्डर टोलवाटोलवीची उत्तरे देऊ लागला. त्याचे मंत्र्या-संत्र्यांशी संबंध असल्यामुळे तो पोलिसांना दाद देत नव्हता. एसीपी साहेब हतबल झाले. रीतसर तक्रार करावी तर साहेबांनी एवढे पैसे कुठून आणले म्हणून भलती चौकशी सुरू व्हायची, या भीतीने साहेब गप्प बसले. त्यांनी जनता दरबारात येऊन नितीन नांदगावकरांची भेट घेतली आणि आपली अडचण सांगितली. सहाय्यक पोलीस आयुक्तांनाही न जुमानणार्या त्या बिल्डरला नितीनने आपल्या भाषेत फैलावर घेतले. परिणामी बिल्डरने घेतलेले आठ लाख रुपये हप्त्याहप्याने देण्यास सुरुवात केली.
नवी मुंबईत घर घेण्यासाठी एका रेल्वे पोलिसाने बिल्डरला साडेतीन लाख रुपये दिले. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्याने डेप्युटी पोलीस कमिशनरकडे तक्रार केली. त्यांनी दखल घेतली नाही म्हणून पोलीस कमिशनरकडे तक्रार केली. त्यांनीही हात झटकले. आम्ही पैसे वसूल करू शकत नाही, हे सिव्हिल मॅटर आहे, तू कोर्टाकडे दाद माग असा वरिष्ठांनी सल्ला दिला. अखेरीस तो पोलीस शिवसेना भवनातल्या जनता दरबारात आला आणि नितीनची भेट घेऊन मदतीची याचना केली. नितीनने बिल्डरला फोन करून मी येऊ? की तू येतोस? अशी विचारणा केली, तसा बिल्डरने दुसर्याच दिवशी साडेतीन लाखाचा चेक पाठवून दिला. असे एक दोन नव्हे तर सुमारे २५० पोलिसांचे प्रश्न नितीनने चुटकीसरशी सोडवून टाकले आहेत.
विक्रोळीच्या टागोर नगरमध्ये जयवंत कदम नावाचे गृहस्थ राहत. त्यांचा मुलगा रिक्षा चालवून घर सांभाळतो. वडिलांना कोविडचा आजार झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नामांकित रुग्णालयात त्याने वडिलांना अॅडमिट केले. औषधोपचार चालू असताना दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. बिलाचे पैसे चुकते केल्यानंतरही अतिरिक्त आठ लाख रुपयांची मागणी हॉस्पिटल व्यवस्थापनाने केली. ती रास्त नव्हती. जोपर्यंत बिलाचे पूर्ण पैसे देत नाही, तोपर्यंत बॉडी ताब्यात देणार नाही अशी आडमुठी भूमिका हॉस्पिटलने घेतली. एका सामान्य मराठी कुटुंबावर आलेले संकट नितीनला समजले आणि तो तणतणत शिवसेना भवनातून हॉस्पिटलमध्ये गेला आणि डॉक्टरांना सर्वांसमक्ष जाब विचारला. बिलात गैरवाजवी लावलेले आठ लाख रुपये रद्द करून मुलाच्या वडिलांची डेड बॉडी कुटुंबाच्या ताब्यात देण्यास नितीनने भाग पाडले.
अशीच दुसरी घटना घडली. नितेश कारेकर धापा टाकत धावत पळत जनता दरबारात आला. नितीनचे हात जोडून आभार मानत म्हणाला, माझ्यासाठी तुम्ही देवापेक्षा कमी नाहीत, तुम्ही प्रयत्न केल्यामुळे माझे दीड लाख रुपये वाचले. नितेशच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होता म्हणून त्याने एका बड्या इस्पितळात वडिलांना अॅडमिट केले. हार्ट सर्जरी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नितेशने दोन लाख रुपये चुकते केले, परंतु वडिलांना घरी घेऊन जाताना, प्रिव्हिलेज चार्जेस म्हणून एक लाख पन्नास हजार रुपये अधिक भरा, त्याशिवाय तुम्हाला घरी जाता येणार नाही असे डॉक्टरांनी बजावले. हे चार्जेस अयोग्य, अन्यायकारक असल्याचे नितीनने ठणकावून सांगितले आणि दीड लाख रुपये माफ करायला लावले.
बिगारी काम करणार्या एका गवंड्याला कोविड काळामध्ये काम मिळणे बंद झाले. तसेच शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सहकुटुंब गावाला स्थायिक होण्याचे त्याने ठरवले. बोरिवलीतील नामांकित शाळेत त्याचा मुलगा शिकत होता. त्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे होते, परंतु शाळेची तीस हजार रुपये फी बाकी असल्यामुळे मुख्याध्यापकांनी सर्टिफिकेट देण्यास नकार दिला. त्याने खूप गयावया केली, परंतु सरांना दया आली नाही. सर्टिफिकेट मिळावे म्हणून तो धरणे धरून बसला. शाळेच्या दारात तो आठ दिवस झोपून होता. खूप हाता पाया पडला, पण शाळेने नियमाचा बडगा दाखवला. नितीनला हे समजताच माणुसकीच्या दृष्टीने मदत करायला हवी म्हणून त्याने विकी नावाचा कार्यकर्ता शाळेत पाठवला. त्याने गवंड्याला झोपेतून उठवलं आणि सरांकडे घेऊन गेला. विकीने सरांना दयाधर्म करण्याचे उपदेशाचे डोस पाजले. त्यामुळे तासाभरात तीस हजार रुपये माफ होऊन लिव्हिंग सर्टिफिकेट मिळाले.
दोन्ही हाताने अपंग असणारी एक गरीब बाई आपल्या मुलाला घेऊन जनता दरबारात आली होती. मुलगा ज्या शाळेत नववी इयत्तेत शिकत होता, त्या शाळेची तीन वर्षांची ५१ हजार रुपये फी भरली नाही म्हणून मुलाला परीक्षेला बसू देण्यास सरांनी नकार दिला. मुलाचं वर्ष फुकट जाऊ नये म्हणून आई आटोकाट प्रयत्न करत होती. नवर्याला दहा हजार रुपये पगार होता. नितीन म्हणाला, घाबरू नको ताई, तुझ्या मुलाची फी मी भरीन पण त्याचे वर्ष फुकट जाऊ देणार नाही.
ताई मोठी खमकी.. म्हणाली, ‘तुम्ही पैसे देऊ नका. मी देईन, त्यासाठी मला नोकरी मिळवून द्या किंवा व्यवसाय करण्यासाठी कुठेतरी जागा द्या. मी भाजी विकून मुलाची फी भरीन.’ नितीनला गहिवरून आले त्याने ताईला व्यवसाय उभारून दिला. ती आज दोन पैसे कमवून घर चालवते आणि मुलगाही शाळेत शिकून उत्तम मार्क मिळवत आहे असं कळले. मानखुर्द येथे नवरा बायको आणि दोन महिन्याचे बाळ सुखात राहत होते. सर्व काही गुण्यागोविंदाने चालले असताना नवर्याला अवदसा आठवली आणि तो एका अप्सरेच्या प्रेमात पडला. संसाराकडे दुर्लक्ष झालं आणि बाईच्या नादानं सर्व गमावलं. घरात रेशन पाणी नसल्यामुळे चूल बंद झाली. अन्न पाण्याविना लहान बाळाचे आणि आईचे हाल होऊ लागले. तीन दिवस दोघेही उपाशी राहिले. ती आत्महत्या करण्याच्या विचारात होती. तिचे हाल बघवत नव्हते. शेजारच्यांनी सांगितले, शिवसेना भवनमध्ये जनता दरबार भरतो, तिकडे जाऊन तुमची व्यथा मांडा.
एक दिवस फाटक्या वस्त्रानिशी बाळाला घेऊन ती जनता दरबारात आली. परिस्थितीमुळे हाडाची काडं झाली होती. पोटात अन्न नसल्यामुळे मुलाला दूध पाजू शकत नव्हती. तान्ह्या बाळाला घेऊन जीवन जगणे असह्य झाले होते. तिची दुर्दैवी कथा ऐकून नितीन व्याकुळ झाला. त्याने दोघांनाही नवीन कपडे घेतले. खाऊ पिऊ घातले. इतकेच नव्हे तर वर्षभर रेशन पाणी घरपोच मिळेल याची व्यवस्था केली. दोन वेळेचे अन्न मिळाल्यामुळे बाई खाऊन पिऊन सुदृढ झाली. बाळ गुटगुटीत दिसायला लागलं. त्याला पाहून बापाला पश्चाताप झाला. त्याने बाईचा नाद सोडला आणि सुखाने संसार करू लागला.
अशक्य ते शक्य करून दाखवणार्या एका सामान्य शिवसैनिकाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद लाभले. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि प्रवक्ता व जनसंपर्क प्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अॅडव्होकेट हर्षल प्रधान यांचे मार्गदर्शन लाभले. म्हणूनच आज नितीन नांदगावकरसारखा रॉबिनहुड गरिबांच्या गळ्यातला ताईत झाला आहे.