– राजेंद्र भामरे
ह्यूमन ट्रॅफिकिंग हा जगातला सगळ्यात जुना व्यवसाय आहे. पुण्यात सामाजिक सुरक्षा विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असतानाचा हा हृदयविदारक अनुभव. या विभागाच्या अंतर्गत जी काही कामे येतात त्यामध्ये ह्यूमन ट्रॅफिकिंगला आळा घालणे हे एक महत्त्वाचे काम असते. ड्रग्स स्मगलिंग आणि ह्यूमन ट्रॅफिकिंग हे जगातील अत्यंत संघटित गुन्ह्याचे प्रकार आहेत. सज्ञान स्त्रियांना कायद्याप्रमाणे वेश्याव्यवसाय करता येत असला तरी त्यांच्या मनाविरुद्ध तो व्यवसाय त्यांच्याकडून करून घेता येत नाही. तसेच कायद्याप्रमाणे सोळा वर्षांच्या आतील कुठल्याही मुलीकडून करून घेतलेला वेश्याव्यवसाय हा गुन्हा आहे, मग तो तिच्या इच्छेने असला तरीही. अत्यंत शक्तिशाली आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल असलेले हे क्षेत्र आहे.
पुण्यात बुधवार पेठ, शुक्रवार पेठ या ठिकाणी वेश्या व्यवसायाचे जाळे पसरलेले आहे. सुमारे तीन हजार मुली या व्यवसायात असाव्यात असा अंदाज आहे. सुमारे २५० वर्षांपासून ही वस्ती आहे. उत्तर पेशवाईच्या काळात हा भाग बावनखणी म्हणून प्रसिद्ध होता. काळाच्या ओघात शहरीकरण होत गेलं, तसतशी ही वस्ती देखील वाढत गेली. पूर्वी ही वस्ती खूपच लहान होती.
मला सामाजिक सुरक्षा विभागात काम करताना दोन वर्षे पूर्ण झालेली होती. या काळात बुधवार, शुक्रवार पेठ, रेड लाइट एरिया इथे रेड करून जवळ जवळ दोनेकशे मुलींना आम्ही सोडवलेले होते. त्यामध्ये अनेक मुली अल्पवयीन होत्या.
एके दिवशी ऑफिसमध्ये टपाल बघत बसलो होतो, तेव्हा एक निनावी पत्र आलेले दिसले. मी चांगले काम करीत असल्याबद्दल पत्रलेखकाने माझे अभिनंदन केले होते. परंतु याबरोबरच एका विशिष्ट ब्रॉथेलवर म्हणजे कुंटणखान्यावर ‘तुम्ही दोन वर्षात एकदाही रेड केलेली नाही, असे का?’ म्हणून विचारणाही केलेली होती. तेथे अल्पवयीन मुलींकडून मोठ्या प्रमाणात बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो, असेही नमूद केलेले होते. तसेच सध्या त्या ठिकाणी आठनऊ अल्पवयीन मुली आहेत, अशीही माहिती दिली होती. कुंटणखान्याच्या लोकेशनचा नकाशा, तसेच आतील खोल्यांचा नकाशा, मुली कुठे लपवून ठेवल्या असतील याचा नकाशाही दिलेला होता. इथे तात्काळ रेड करा, असे वारंवार आवाहन केलेले होते.
सगळी कामे बाजूला सारली आणि दोन पंच बोलावून घेतले, रेडिंग स्टाफ एकत्र केला. त्यात महिला कर्मचारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विमल बिडवे आणि बंगाली दुभाष्या अशी टीम होती. कुठे रेड करायची ते गुप्त ठेवले. गाडीत बसलो तेव्हा रेडच्या सूचना दिल्या. शुक्रवार पेठेच्या दिशेने निघालो, दिलेल्या पत्त्याच्या अर्धा किलोमीटर अलीकडे जीप उभी केली आणि पांगून चालत निघालो. पत्रात पत्ता दिलेला होताच. बुधवार, शुक्रवार पेठेचा एरिया आमच्या स्टाफला पूर्णपणे माहित होता. त्यामुळे ते ब्रॉथेल सापडायला कुठलीच अडचण आली नाही. दुपारची वेळ असल्यामुळे सगळीकडे सुस्त कारभार होता. पत्रातील उल्लेख केलेल्या त्या घरात आम्ही प्रवेश केला. घरातील महिलेला पोलीस ओळखपत्र दाखवून, रेड करण्याचा उद्देशही समजावून सांगितला. कुंटणखान्याची मालकीण त्या ठिकाणी हजर नव्हती, ती कुठेतरी बाजारात गेलेले होती, तिची मॅनेजर बाई हजर होती.
दिलेल्या सूचनांप्रमाणे स्टाफने संपूर्ण घरातील मुलींना हॉलमध्ये एकत्र केले. त्यानंतर तेथे असलेल्या बाईला सगळ्या मुली हजर करा असे सांगण्यात आले, परंतु त्या बाईने एवढ्याच मुली आहेत असे सांगितले. मुलींच्या लपण्याच्या जागा म्हणजेच गॅस सिलिंडरचे मागील बाजूस असलेला कप्पा, भिंतीतील कपाटे, बेडच्या मागे चिकटून असलेले कप्पे यामधून आठ ते दहा मुली बाहेर काढण्यात आल्या. हे कप्पे अत्यंत छोटे असतात, तिथे हवा यायला देखील जागा नसते, जास्त वेळ तिथे गेला तर गुदमरून मुलींचा मृत्यू होऊ शकतो. गॅस सिलेंडरच्या मागील बाजूस सरकत्या प्लायवूडच्या दरवाज्याचा कप्पा असतो. लाकडी कॉटच्या बाजूला देखील भिंतीमध्ये असे चोरकप्पे असतात. त्यामध्ये या मुली दडवून ठेवलेल्या असतात.
हॉलमध्ये सार्या मुलींना बसवण्यात आले त्या सगळ्या भेदरलेल्या होत्या. बहुतांश मुली पश्चिम बंगालमधील चोवीस परगणा आणि बांगलादेशामधून आलेल्या होत्या, त्यांना बंगाली सोडल्यास कुठलीही भाषा येत नव्हती. त्यांच्याकडे वयाची विचारणा केली तेव्हा, सगळ्याजणी आपले वय सतराच्या पुढे असून आपण सज्ञान असल्याचे सांगत होत्या. आमचा बंगाली दुभाषा सगळ्या मुलींशी बंगालीमधून बोलत होता. तसेच नेहमी रेड करून आमच्या स्टाफला आणि मलाही मोडकी तोडकी बंगाली भाषा येत होती. एपीआय विमल बिडवे आणि महिला पोलीस कर्मचारी धनश्री मोरे यांनी सगळ्या मुलींना आवाहन केले, ‘ज्या मुली अल्पवयीन असतील त्यांनी बाजूला या, तसेच ज्या मोठ्या मुलींकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असेल, ज्यांना घरी जायचे आहे अशा मुलींनीही बाजूला या.’ परंतु एकही मुलगी त्यातून बाहेर आली नाही. सगळ्या म्हणाल्या, आम्ही सज्ञान आहोत आणि आमचे मर्जीने येथे आलेलो आहोत. आमच्यावर कोणीही बळजबरी केलेली नाही, असे त्यांनी बंगालीत सांगितले.
लहान दिसणार्या सात-आठ मुलींना आम्ही बाजूला काढले आणि आमच्या महिला कर्मचार्यांनी त्यांना बाजूला घेत विश्वासात घेऊन विचारपूस करण्यास सुरुवात केली. पोलिसांना अनेक रेड्सच्या अनुभवामुळे अंदाज असतो की कुठली मुलगी बोलू शकेल. यातून आणखी तीन मुली बाजूला काढण्यात आल्या. जवळ जवळ एक तासभर त्या सर्व मुलींना विश्वासात घेण्याचा प्रयत्न चालू होता .या मुली ज्यावेळी कुंटणखान्यात आणल्या जातात त्यावेळी त्यांना वारंवार असे खोटे सांगितलं जाते की, ‘पोलीस आमचेच आहेत, जरी तुम्ही पोलिसांकडे गेलात तरी पोलीस तुम्हालाच एक दोन वर्षांसाठी जेलमध्ये टाकून देतील. पोलिसांना काही सांगितले तर ते तुम्हाला मारतील, मग तुम्हाला कोण सोडवेल?’ असे वारंवार सांगितल्याने त्या मुलींनाही ते खरे वाटू लागते. यामुळे त्या पोलिसांना खरे सांगायला तयार नसतात.
या मुलींकडे विचारपूस करीत असताना मालकिणीला, मॅनेजरला दुसर्या खोलीत बसून ठेवलेले असते, त्यांच्यासमोर विचारपूस केली जात नाही. तसेच मालकिणीला मुद्दाम वाईट पद्धतीने वागवले जाते, जेणेकरून मालकिणीचा आणि पोलिसांचा काहीही संगनमताचा संबंध आहे, असे त्या मुलींना वाटू नये आणि त्या बोलत्या व्हाव्यात. काही वेळाने पोलीस कॉन्स्टेबल धनश्री मोरे माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ‘साहेब, एक मुलगी बोलेल असं वाटतंय, तुम्ही स्वत: त्या मुलीशी बोला.’ मी व दुभाषा राजू बंगाली असे त्या मुलीशी बोलायला लागलो. तुझे नाव काय, गावाचे नाव काय, इत्यादी फॉर्मल प्रश्न मी तिला विचारले. तसेच तिला बंगालीतून विचारले ‘तोमार बाबा आछे, मा आछे (तुला बाबा-आई आहेत का)? हे विचारताच तिच्या चेहर्यावरील भाव बदलू लागले, ती बोलेल असे वाटले म्हणून तिला, ‘आमी ठीक तोमार बाबारा मातो अछे, आमारा तमारा मातो मेये अछे’ (मी तुझ्या बाबासारखाच आहे, मला पण तुझ्यासारखी मुलगी आहे), असे सांगितल्यावर तिने एकदम टाहो फोडला आणि ती एकदम माझ्या गळ्यात पडून हमसून-हमसून रडायला लागली. अगदी एखादी खूपच भेदरलेली लहान मुलगी आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून रडावी तशी. तिला शांत करायला आम्हाला २०/२५ मिनिटे गेली. आम्हा सार्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने न सांगताही तिच्यावर किती क्रूर अत्याचार झाले असतील हे समजलं.
तिने सांगितलेली हकीगत फारच भयानक होती. पश्चिम बंगालमधून एका ओळखीच्या इसमाने तिला सहा महिन्यांपूर्वी तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षी पुण्यात आणून या कुंटणखान्याच्या मालकिणीला विकलेले होते. सुमारे दोन महिने तिला जेवायला न देणे, मारहाण करणे, चटके देणे, तिचे ब्रेनवॉशिंग करणे इत्यादी प्रकार चालू होते. या काळात त्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न करून पाहिला, परंतु तो यशस्वी झाला नाही. अखेर तीन महिन्यांनी कुठलाही पर्याय नसल्यामुळे या मुलीने वेश्या व्यवसाय पत्करला होता. वयाच्या मानाने ती मुलगी जरा मोठी वाटत होती, म्हणून विचारता तिने सांगितलं की तिला कसले तरी शक्तीचे इंजेक्शन आणि गोळ्या देण्यात येत होत्या. घरातील मॅनेजर बाईला याबद्दल विचारले असता, तिने टॉनिकच्या गोळ्या आहेत असे सांगितले, परंतु घरझडतीत त्या गोळ्या कुठेही मिळाल्या नाहीत. बहुधा लहान मुलींना त्या मोठ्या दिसाव्यात म्हणून हार्मोन्सची इंजेक्शने व त्या प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात, त्यातल्या त्या असाव्यात; परंतु त्याचा पुरावा मिळाला नाही. ती मुलगी बाहेर निघाल्यावर अजून आठ मुली बाहेर आल्या, त्या सगळ्या १६ वर्षाखालील अल्पवयीन मुली होत्या. त्यांनी सांगितले की आमच्यावर पण बळजबरीने हा व्यवसाय लादलेला आहे, आमची इच्छा नसताना तो करून घेतला जातो इ.इ.
घटनास्थळी पंचनामा केला. त्या मुलींना बाहेर काढले, तेव्हा त्यांना मिळणार्या पैशाच्या बाबतीत एक धक्कादायक बाब समोर आली. मालकीण जेव्हा मुलींना विकत घेतात, त्यावेळेला मुली खरेदीच्या वेळी दिलेल्या रकमेचा हप्ता, त्यावर दरमहा आकारण्यात येणारे १० टक्के व्याज, त्यांना दिले जाणारे जेवणखाण, कपडेलत्ते, सौंदर्य प्रसाधने, यावरील खर्चही तिच्याकडून व्याजासकट वसूल केला जातो. म्हणजेच तिला एका गिर्हाईकाकडून १३० रुपये मिळणार असतील, तर १०० रुपये वरील बाबींकरिता मालकीण घेते. अवघे २० रुपये आपल्या हातात पडतात, असे त्या मुलीने सांगितले. वेश्यावस्तीच्या जवळ तोकड्या कपड्यात अंगविक्षेप करून गिर्हाईकांना आकृष्ट करणार्या मुली पाहून आपल्याला नेहमी राग येत असतो. परंतु, त्यामागची खरी गोष्ट अशी आहे की त्या मुलींची तसे करण्याची अजिबात इच्छा नसते, कुंटणखाण्याच्या मालकिणीच्या सक्तीमुळे त्यांना तसे करावेच लागते.
तिथे असलेल्या बाईला अटक करण्यात आली. जी मालकीण बाहेर गेलेली होती, तिला फरार दाखवण्यात आले. त्या मालकीणीने तिला गुन्ह्यात आरोपी करु नये, म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न केले. सहा महिने ती फरार होती. तिला बातमी काढून अटक करण्यात आली. मुलींचे जबाब घेऊन त्यांना शेल्टर होमला ठेवण्यात आले. आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोप पत्र पाठवण्यात आले. ज्या वयात मुली भातुकली खेळत असतात, त्या वयात या मुलींवर अशा प्रकारचे क्रूर अत्याचार केले जातात, यापेक्षा भयानक गोष्ट काय असेल? एखाद्याचा खून करण्यापेक्षाही ही गोष्ट अत्यंत भयानक आहे, ही समाजाला लागलेली कीड आहे. नरकापेक्षा भीषण यातना या मुली भोगत असतात.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)