भारतीय क्रिकेटला आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वाने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक यश मिळवून देणार्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अचानक निवृत्तीने कसोटी क्रिकेटमधून ‘रो-को’ युगाचा अस्त झाला आहे. पण विराट-रोहितची तारांकित संस्कृती आणि गंभीर-आगरकर यांची कॉर्पोरेट संस्कृती यांच्या संघर्षाचे हे परिणाम आहेत. याच घटनाक्रमांचे हे विश्लेषण.
– – –
गेल्या दहा वर्षांत क्रिकेट आमूलाग्र बदलले आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट हा खेळाचा आत्मा झाला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आहे. ‘आयपीएल’सारख्या असंख्य लीग देशोदेशी होऊ लागल्या आहेत. यापुढे एक पाऊल टाकण्याच्या हेतूने टेन-१० आणि द हंड्रेड, आदी प्रयोग सुरू झाले आहेत. ५० षटकांचे एकदिवसीय क्रिकेट टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण दिलासादायक गोष्ट म्हणजे कसोटी टिकून आहे.
एकेकाळी अनिर्णीत सामन्यांची संख्या प्रचंड असायची, मैदानावर नांगर टाकून चिवट फलंदाजी करीत किल्ला लढवण्याचा तो काळ आता सरला आहे. आता कसोटी सामने सहजगत्या निकाली ठरत आहेत. यात तीन-चार दिवसांमध्ये निकाली ठरणार्या कसोटी सामन्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मध्यंतरी माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी कसोटी सामने चार दिवसांचे करावेत, अशी सूचनाही मांडली होती. कसोटी क्रिकेटची नजाकत टिकवणार्या रोहित आणि कोहली या दोन भारतीय किमयागारांची गेल्या काही दिवसांतील निवृत्ती ही तशी अपेक्षित, पण चटका लावणारी ठरत आहे.
हे दोघेही आधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्थिरस्थावर झाले, नंतर कसोटी क्रिकेटमध्ये स्थानापन्न झाले. महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाच्या कालखंडात दोघांनाही भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. त्यामुळे धोनीच्या यशोकाळातील या दोघांचेही योगदान महत्त्वाचे ठरते. रोहितला कसोटी क्रिकेट पचनी पडायला आणि सलामीवीर म्हणून नावारूपास यायला थोडा उशीर झाला. पण विराटने संपूर्ण कारकीर्दीत कसोटी क्रिकेटला सर्वतोपरी न्याय दिला.
२०१४ ते २०२२ या कालखंडात विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कात टाकली. आक्रमकता हा स्थायीभाव असलेल्या विराटने ६८ सामन्यांपैकी ४० विजय, १७ पराभव आणि ११ अनिर्णीत सामन्यांसह ७०.१७ टक्के यशोप्रवास राखला. मग २०२२ ते आजमितीपर्यंत रोहितने विराटचाच कित्ता गिरवत यश कायम राखले. २४ सामन्यांपैकी १२ विजय, ९ पराभव आणि ३ अनिर्णीत सामन्यांसह रोहितची यशाची टक्केवारी ५७.१४ इतकी.
रोहितचा स्थूलपणा मैदानावर प्रकर्षाने जाणवणारा. त्याची निवृत्ती जवळ आली आहे, हे पदोपदी जाणवत होते. परंतु फलंदाजी, नेतृत्व आणि तंदुरुस्ती याद्वारे विराटचा ठसा अधिक गहिरा होता. त्यामुळे विराट आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकला असता, कदाचित कर्णधारपदही सांभाळू शकला असता, असे मत व्यक्त केले जात आहे. कसोटी क्रिकेटचा अखेरचा शैलीदार फलंदाज निवृत्त झाल्याची खंतही काही जाणकारांनी प्रकट केली.
काही वर्षांपूर्वी भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी एक भाकीत केले होते. ते आता पूर्ण होऊ शकणार नाही. सचिनचे सर्व विक्रम एक भारतीय क्रिकेटपटू मोडेल आणि तो म्हणजे विराट कोहली, असे गावस्कर म्हणाले होते. त्याची प्रचितीही विराटच्या कामगिरीतून येत होती. परंतु एव्हरेस्टचे शिखर दिसत असताना ते सर करायचे नाही, असा निर्णय विराटने घेतल्यामुळे तो आश्चर्यकारक होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) धुरीणांनी त्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही केला, पण तो फोल ठरला. कसोटी क्रिकेटमधील दोघांचाही धावांचा आलेख गेल्या काही वर्षांत मंदावला होता, हे वास्तव स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका निर्णायक ठरली. या दौर्यावरील पहिल्या कसोटी सामन्याच्या विजयानंतर चारपैकी तीन सामने भारताने गमावले. ऑस्ट्रेलियाचा ३-१ असा कसोटी विजय भारताच्या कसोटी परिवर्तनास कारणीभूत ठरला. या दौर्यात रविचंद्रन अश्विनने तडकाफडकी निवृत्ती पत्करली, तर रोहितने अखेरच्या सामन्यात स्वत:हून माघार घेतली.
एकंदरीतच बरेच काही धुमसत होते. त्याचे पडसाद हळूहळू उमटू लागले. भारताच्या खराब कामगिरीमुळे दौर्यावर कुटुंबासह जाण्यासंदर्भातील नियमावली कडक करण्यात आली. मध्यंतरी एका पत्रकार परिषदेत रोहितला संघाबाहेर राहण्याच्या निर्णयाविषयी विचारले असता तो म्हणाला होता की, ‘मी दोन मुलांचा बाप आहे. त्यामुळे परिपक्वता आहे. काय करायचे आहे, हे माहीत आहे. सूर हरवलेल्या खेळाडूला इतका महत्त्वाचा सामना खेळायची संधी मिळू नये, यासाठी मी संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला.’ हे सांगताना ‘बाहेर बसलेले व्यक्ती हे ठरवू शकत नाही की, मी कधी थांबायचे,’ हे बिंबवायलाही रोहित विसरला नाही. अखेरीस काही दिवसांच्या अंतराने रोहितच्या पाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केला. वर्षभरापूर्वी रोहित-विराटने भारतीय क्रिकेटला ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाची अमूल्य भेट दिली. पण, जेतेपदाच्या साक्षीने त्यांनी ट्वेन्टी-२० क्रिकेटलाही अलविदा केले.
विराट-रोहित युगात भारतीय कसोटी क्रिकेट यशोशिखरावर राहिले. या कालखंडात भारतीय संघाने तीनपैकी दोनदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दोनदा जेतेपदाने हुलकावणी दिली. पण यंदा भारतीय संघाला तिसरे स्थान मिळाल्याने अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नाही. हेही अपयश दोघांनी स्वीकारले. पण दशकभराच्या या अंतरात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये यश मिळवू शकतो, या विश्वासाचे श्रेयही विराट-रोहितला जाते. फिरकीच्या बळावर देशांतर्गत मालिका जिंकता येतात, हे भारतीय क्रिकेटचे वर्षानुवर्षे जपलेले कसोटी यशाचे समीकरण. परिणामी परदेशात फलंदाजांची हाराकिरी आणि गोलंदाजांचा संघर्ष हा ठरलेलाच. विराटने जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव यांना घेऊन वेगवान मार्याची चौकडी तयारी करीत उत्तम मोट बांधली. कालांतराने शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराजसारखे गोलंदाजसुद्धा यात सामील झाले. आता परदेशातील मालिकांचे भय भारतीय क्रिकेट संघाला उरले नाही, या परिवर्तनाचा शिल्पकार विराटलाच म्हणावे लागेल.
२०१८-१९मध्ये भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात २-१ असे नामोहरम करीत इतिहास घडवला. हे विराटच्या नेतृत्वाचे अभूतपूर्व यश. सौरव गांगुलीच्या नेतृत्वक्षमतेच्या एक पाऊल पुढे टाकत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ‘अरे’ला ‘का’रे करणे आणि डिवचण्यातही हा पठ्ठ्या अग्रेसर. मग पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे उपविजेतेपद मिळाले. नंतर मायदेशात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश अशा काही संघांविरुद्ध निर्भेळ यश. २०१६ ते २०२० या कालखंडातील ४२ महिने आयसीसीच्या क्रमवारीतील अग्रस्थानावर भारताचे वर्चस्व टिकून होते. वेस्ट इंडिजला कॅरेबियन बेटांवर भारताने दोनदा हरवले. इंग्लंडविरुद्धची मालिका बरोबरीत सुटली.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा २-१ असा विजय मिळवला. यावेळी ट्रॅव्हिस हेडच्या फलंदाजीमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद निसटले. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेशविरुद्ध मायदेशातील मालिका जिंकल्या. रोहितच्या नेतृत्वकाळात नव्या पिढीचे शिलेदार संघात आले. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, केएस भरत यांनी कसोटी संघात चुणूक दाखवली. परंतु गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून त्याने मोठ्या खेळाडूंनाही दमात ठेवायला सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेटमधील ‘तारांकितांची संस्कृती’ संपवण्याचा गंभीरने जणू चंगच बांधला आहे. रोहित-विराटच्या संस्कृतीत कौटुंबिक पर्यटन आणि मनमानी पद्धतीने सामने किंवा मालिकांसाठीची विश्रांती हे महत्त्वाचे भाग होते. रोहितच्या निवृत्तीनिर्णयाच्या काही दिवस आधी गंभीरने नाव न घेता दिग्गज क्रिकेटपटूंना निर्वाणीचा इशारा दिला होता. जोवर कामगिरी करीत आहेत, तोवर खेळाडू हे संघात समाविष्ट असतील. कामगिरी उत्तम होत असेल, तर प्रशिक्षक, निवड समिती सदस्य किंवा अगदी ‘बीसीसीआय’सुद्धा तुम्हाला खेळण्यापासून रोखू शकणार नाही, अशा आशयाचे विधान गंभीरने केले होते. हेच दोघांच्या जिव्हारी लागले असावे.
रोहित-विराट द्वयीला क्रिकेटविश्वात ‘रो-को’ असे म्हणले जाते. ज्यांना रोखणे कठीण असाच त्याचा अर्थ. पण त्यांच्या निवृत्तीने संघातील दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटची दारे ठोठावणार्या करुण नायरला संधी मिळू शकते. परंतु श्रेयस अय्यरलाही स्थान देण्याची नितांत आवश्यकता आहे. या दोघांच्या निवृत्तीने कसोटी कर्णधारपदाचे स्थानही रिक्त झाले आहे. जसप्रीत बुमरा हा कामगिरी आणि अनुभव या बळावर अग्रेसर असला तरी त्याच्यात नेतृत्वगुणांचा अभाव आहे. गिल, ऋषभ पंत हेसुद्धा पर्याय विचाराधीन आहेत. रोहित आणि विराट यांच्या यथोचित निवृत्तीसाठी निरोपाचा सामना खेळण्याचा सन्मान मिळायला हवा होता. पण भारतीय क्रिकेटमध्ये हे भाग्य फार थोड्यांनाच लाभले आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड या निष्णात कसोटीवीरांनाही निरोपाचा सामना खेळता आला नाही. फक्त सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा जंगी कार्यक्रम आखून क्रीडा प्रक्षेपण वाहिनीने पैसे कमावले. ‘बीसीसीआय’ने दिग्गज क्रिकेटपटूंच्या निरोपाच्या सामन्याचा विषय नाजूकपणे हाताळण्याची गरज आहे. इथे तुझी कामगिरी होत नाही. संघासाठीची तुझी गरज संपली, आता दूर हो, अशी कॉर्पोरेट संस्कृती उपयोगाची नाही.
तूर्तास, विराट-रोहितच्या निवृत्तीबाबत ‘तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे’ अशी कसोटी क्रिकेटची स्थिती झाली आहे. तर भारतीय क्रिकेटला आगामी इंग्लंड दौर्यासाठी ‘तू नव्या युगाची आशा, जय जय भारत देशा’ ही साद घालून नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे. ‘रो-को’ युग कसोटी क्रिकेटमधून अस्त झाले आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये टिकून आहे. आगामी विश्वचषक जिंकून समाधानाने निवृत्तीचे त्यांचे लक्ष्य आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय, हाय, तू जाता राहील कार्य काय?’ अशी भा. रा. तांबे यांच्या कवितेत मांडलेली कॉर्पोरेट संस्कृती भारतीय क्रिकेटमध्ये गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर राबवत आहेत. रोहित-विराटने कामगिरी आणि काळाची पावले ओळखून कसोटी क्रिकेटला पूर्णविराम दिला असला तरी त्यांची छाप मात्र कायम राहील.
‘अमरप्रेम’ चित्रपटात आनंद बक्षी यांनी लिहिलेले आणि किशोर कुमार यांनी गायलेले ‘कुछ तो लोग कहेंगे’ हे सुंदर गाणे आहे. त्यातल्या या ओळी रो-को यांच्या निवृत्तीसंदर्भातल्या चर्चांवर समर्पक भाष्य करतात.
कुछ रीत जगत की ऐसी है
हर एक सुबह की शाम हुई
तू कौन है, तेरा नाम है क्या
सीता भी यहाँ बदनाम हुई
कुछ तो लोग कहेंगे
लोगों का काम है कहना!