हिवाळा आला की दुसरी कुठली काळजी घेतली नाही तरी एकवेळ चालेल, पण आपल्या त्वचेची काळजी नक्की घ्या. थंडीचा जोर हळूहळू वाढायला लागलाच आहे. त्यामुळे त्वचेला नेमके कोणते पदार्थ लावू नयेत ते आता पाहूया…
——————–
थंडी हा ऋतू आपल्याला खूप आवडत असला तरी थंडीमुळे बहुतांश लोकांची त्वचा कोरडी पडू लागते. ती निस्तेज होते. त्यामुळे या दिवसांत त्वचेची खास काळजी घ्यायलाच हवी. टीव्हीवरील जाहिरातींमध्ये हिवाळ्यात हे क्रीम लावा, ते क्रीम लावा अशा मुबलक जाहिराती आपण पाहातो. ती उत्पादने घ्यायची इच्छाही आपल्याला होते, पण काही पदार्थ हिवाळ्यात त्वचेला लावणे योग्य ठरत नाही. नेमक्या याच पदार्थांबाबत आपल्याला योग्य ती माहिती असत नाही. त्यासाठीच हा खटाटोप…
साबण
कोरोना संकटामुळे सतत हात धुत राहा असे सरकार ओरडून सांगत असते. ते चुकीचे नाही, पण सतत हात किंवा तोंड धुत राहणे त्वचेला हानिकारक ठरू शकते हे लक्षात ठेवा. कोणत्याही साबणामध्ये पीएच मोठ्या प्रमाणावर असते. शरीरावरील त्वचा त्यामुळे जास्त रूक्ष होत असते. त्यामुळे त्वचेशी साबणाचा जास्त संपर्क येईल हे जरा टाळाच. बाहेरून आलात की एकदा हातपाय छान धुतलेच पाहिजेत. त्यामुळे कोरोनाच नव्हे तर कुठल्याही विषाणूंची लागण आपल्याला होत नाही.
चेहर्यावरील पॅक
चेहरा सुंदर दिसावा यासाठी महिला दररोज वेगवेगळे पदार्थ एकत्र करून त्यांचा मास्क चेहर्यावर लावतात. उन्हाळ्यातच लावावेत असे मास्क त्या हिवाळ्यातही चेहर्याला लावतात. मुळात असे करणे टाळायला हवे. चुकीच्या मास्कमुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर चेहर्यावर मुल्तानी मातीचा पॅक मुळीच लवू नका. कारण मुल्तानी मातीने त्वचा ड्राय होते.
स्क्रब
हिवाळ्यात त्वचा शुष्क बनते. त्यामुळे या दिवसांमध्ये सतत स्क्रब करणे त्वचेसाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी बनविलेल्या स्क्रबचाच वापर करावा हे उत्तम.
सुवासिक उत्पादने
सुवासिक उत्पादने कितीही आल्हाददायक वाटत असली तरी हिवाळ्याच्या दिवसांत अशा उत्पादनांचा वापर टाळावा. कारण वातावरणात तपमान कमी असल्यामुळे त्यांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. या दिवसांत त्वचा शुष्क झाल्यामुळे सुवासिक उत्पादनांनी त्वचेत जळजळ होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात सुवासिक उत्पादने जरा टाळलात तरच बरे.