खेळ मांडियेला वाळवंटी घाई।
नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान केला पावटणी ।
एकएका लागती पायी रे।।१।।
नाचती आनंदकल्लोळी।
पवित्र गाणे नामावळी।
कळिकाळावरी घातलीसे कास।
एक एकाहूनी बळी रे।।२।।
गोपीचंदनउटी तुळशीच्या माळा।
हार मिरवती गळा।
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव।
अनुपम्य सुखसोहळा रे।।३।।
लुब्धली नादी लागली समाधी।
मूढ जन नर नारी लोका।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव।
एकचि सिद्धसाधका रे ।।४।।
वर्णाभिमान विसरली याति।
एकएका लोटांगण जाती।
निर्मळ चित्ते। जाली नवनीते।
पाषाणा पाझर फुटती रे ।।५।।
होतो जयजयकार गर्जत अंबर।
मातले हे वैष्णववीर रे।
तुका म्हणे सोपी केली पायवाट।
उतरावया भवसागर रे ।।६।।
याच अभंगावरच्या निरुपणात मागच्या लेखात आपण वारकर्यांची एकमेकांच्या पाया पडण्यामागची जातनिरपेक्ष समतेची भूमिका पाहिलेली आहे. साधारण एकोणीसाव्या शतकापर्यंत वारकरी लोक जातीनिरपेक्ष भावनेने एकमेकांना नमस्कार करत असत. त्याच्या नोंदी आपल्याला सापडतात. पहिली नोंद लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची आहे. त्यांनी १८७७ साली मुंबईच्या आर्य समाजात ‘जातिभेद’ या विषयावर व्याख्यान दिलं होतं. त्यात त्यांनी जातिभेद न मानणार्या काही परंपरांचा उल्लेख केला आहे. ‘पंढरपूरचे वारकरी हे जात्याभिमान सोडून ज्याचे गळ्यात माळ त्यास मानितात; त्याचे पाया पडतात आणि परस्पर आनंदात असतात,’ अशी त्यांनी त्यावेळच्या वारकर्यांची नोंद केलेली आहे.
विशेष म्हणजे हे वारकरी विशिष्ट जातींच्या वर्चस्वाला मान्यता देत नसत. त्यामुळेच विशिष्ट जातीच्या सन्मानाच्या काही प्रथा असतील तर वारकरी त्या मानत नसत. त्याचाही दाखला त्याच व्याख्यानात लोकहितवादींनी दिला आहे. तो आहे गोधानी पाटील यांचा. लोकहितवादी लिहितात, ‘प्रवरासंगमाचा गोधानी पाटील म्हणून वारकरी होता, त्याच्या कीर्तनात ब्राह्मणास सन्मानार्थ फुले वगैरे तो देऊ देत नसे, तेव्हा याजबद्दल तक्रार झाली आणि शिंदे त्यास काशी क्षेत्री पाठवीत असता तो गेला नाही; पंढरीस काशी आहे असे म्हणून तो परत आला.’ त्यावेळी काही कीर्तनात ब्राह्मणांना सन्मानार्थ फुले देण्याची प्रथा होती. कीर्तनातल्या ब्राह्मणांना फुलांच्या माळा घातल्या जायच्या. या प्रथेला गोधानी पाटलांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार झाली. तक्रारीचा निवाडा करण्यासाठी त्यांना काशीला पाठवण्याचं ठरलं असावं. पण ते काशीच्या धर्मपीठाला मानतच नव्हते. पंढरीसच काशी आहे असं म्हणून ते पंढरपूरला आल्याचं लोकहितवादी सांगतात.
हे गोधानी पाटील कदाचित गोधाजी पाटील असू शकतात असं मला वाटतं. गोधाजी पाटील हे पंढरपूरच्या देहूकर फडावरील प्रख्यात वारकरी होते. त्यांचे देहूकरांशी नातेसंबंधही होते. ते प्रवरासंगम परिसरातीलच होते. गोधाजी पाटील यांचा बाणेदारपणा आपल्याला दिसतो. त्या काळात कीर्तनात ब्राह्मणांना फुले देण्याची पद्धत होती. महिपतींनीही नावजी माळी हे तुकोबारायांचे टाळकरी कीर्तनात ब्राह्मणांसाठी फुलांच्या माळा बनवून आणत असत असं लिहिलं आहे. त्यात मला तथ्य वाटत नाही. तुकोबांनंतर या प्रकारची रुढी प्रवरासंगम परिसरात असावी. महिपतींनी नावजी माळींचा कथाभाग फुलवण्यासाठी तीच रुढी वारकरी कीर्तनात चिटकवली असणार. मुळात गोधाजी पाटील काशीला गेले नाहीत यातही त्यांची वारकरी विचारांशी असलेली बांधिलकी दिसते. काशी ही सनातनी पंडितांची नगरी. सनातनी धर्माचं सर्वोच्च धर्मपीठ. या धर्मपीठाला सामाजिक समतेचा वारकरी विचार मान्य नव्हता. साहजिकच जात्याभिमान विसरून एकमेकांच्या पाया पडणं असो वा कीर्तनात ब्राह्मणांना फुले देण्याच्या प्रथेला विरोध असो या बाबी काशीच्या धर्मपीठाला मंजूर नव्हत्याच. त्यामुळेच गोधानी पाटील काशीला न जाता माघारी पंढरीला आले. जातिभेदाचा विचार न करता एकमेकांच्या पाया पडण्याची प्रथा पंढरपुरात आहे, पण काशीत नाही हे वास्तव तुकोबारायांनी नोंदवून ठेवलं आहे. त्यामुळेच पंढरपूर हे काशीसारख्या इतर तीर्थांच्या तुलनेने श्रेष्ठ ठरतं असं तुकोबाराय म्हणतात. जात्याभिमान सोडून देण्याचा प्रयोग फक्त पंढरपुरात होत असल्यानं ते श्रेष्ठ तीर्थ आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. ‘वाराणसी गया पाहिली द्वारका। परि न ये तुका पंढरीचा।।१।। पंढरीच्या लोका नाही अभिमान। पाया पडती जन एकमेका।।२।।’ तुकाराम महाराजांनी या अभंगात जे स्पष्ट केलं आहे तेच गोधानी (गोधाजी) पाटील यांच्या प्रसंगात दिसून येतं.
वारकरी संप्रदायात जातिभेदाच्या विरोधातल्या तत्वज्ञानाची जाणीव काही प्रमाणात वारकर्यांना होती याचे हे दाखले सापडतात. विठ्ठल रामजी शिंदे यांनीही ‘ज्याच्या गळ्यात वीणा त्याची जात न पाहता ब्राह्मणही त्याच्या पायावर डोके ठेवतात आणि आनंदाने गोपाळकाल्याचा घास परस्परांच्या तोंडात घालून सेवन करतात’ या प्रकारची नोंद केलेली आहे. या नोंदीत ते तत्कालीन वारकरी संप्रदायिकांचा व्यवहार सांगत आहेत की वारकरी संतांचं तत्वज्ञान सांगत आहेत याचा उलगडा होत नाही.
अर्थात पुढे हे प्रमाण कमी होत गेलं. काही वारकरी ब्राह्मणश्रेष्ठता मानायला लागले. त्यामुळे काही बहुजन वारकरी सत्पुरुष ब्राह्मणांकडून नमस्कार करून घेत नसत. या प्रकारच्या नोंदी आपल्याला काही वारकरी सत्पुरुषांच्या चरित्रात दिसतात. त्याचबरोबर ब्राह्मणांकडून पाया पडून घेणार्या बहुजन वारकर्यांच्या विरोधात तक्रारीही व्हायला लागल्या. दादा महाराज सातारकर हे नाभिक जातीतले महान वारकरी भाष्यकार. काही ब्राह्मण त्यांच्या पाया पडत. त्यामुळे संतापलेल्या सनातन्यांनी तत्कालीन शंकराचार्य पीठाकडे तक्रारही केली होती. यात द्रविडशास्त्र्यांचा पुढाकार होता. अर्थात त्याचा फारसा फायदा झाला नाही. सनातनी पंडितांनी ब्राह्मणांनी दादा महाराजांच्या पाया पडण्याला खूप विरोध केला, याचे तपशीलवार दाखले सापडतात.
वारकरी कीर्तनात कीर्तनकाराला विणेकर्याच्या तर विणेकर्यालाही कीर्तनकाराच्या पाया पडावं लागतं. त्यावेळीही जातिभेद पाळण्याचा प्रयत्न केला जायचा. एकतर दलित कीर्तनकारांचं प्रमाण कमी होतं. त्यात परत सहसा सवर्ण वारकरी दलित कीर्तनकाराला बोलवत नसतच. प्रसंग आलाच तर दलित कीर्तनकाराला दलित विणेकरी आणावा लागायचा. त्याचेही दाखले आपल्याला सापडतात. आळंदीच्या एका वारकरी शाळेतही हा प्रकार चालत होता. अर्थात याला अपवाद असणारे समतावादी वारकरीही होते. ते संतविचाराला अनुसरून समतेचा भक्तिव्यवहार करत. पण त्यांचं प्रमाण फार कमी होतं हेही तितकंच खरं. अनेक फडांवर बहुजन विणेकरी आहेत. त्यामुळे काहीवेळा ब्राह्मण कीर्तनकार या बहुजन विणेकर्यांना नमस्कार करत असतील. पारंपरिक सवर्ण वारकर्यांत दलित विणेकरी सहसा नसतच. अनेकदा गुरू करतानाही जातीचा विचार केला जात होता. वारकरी संप्रदायात गुरूबाजी नसली तरी ज्याच्याकडून माळ घातली जाते त्याच्याविषयी औपचारिक अर्थाने गुरू म्हणून आदरभाव असणं स्वाभाविक असतं. साहजिकच माळ घालणारा गुरू हा खालच्या मानल्या गेलेल्या जातीतला असेल तर त्याला नमस्कार करावा लागणार होता. त्यामुळे बरेच ब्राह्मण वारकरी त्या फडावरच्या ब्राह्मण वारकर्याकडूनच माळ घालत. फडाचा मालक बहुजन असेल तर त्याच्याकडून माळ घालण्याऐवजी त्याच फडावरच्या ब्राह्मण वारकर्याकडून माळ घातली जायची. काहीवेळा जातीपलीकडचा विचार करणारे वारकरी मात्र माळ घालताना माळ घालणार्या व्यक्तीच्या जातीचा विचार करत नव्हते. विशेषत: दादा महाराज सातारकर यांचे बरेच अनुयायी उच्चवर्णीय होते. अर्थात त्याचा स्वत: दादा महाराजांना आणि त्यांच्या अनुयायांनाही सनातन्यांकडून त्रास झालाच.
काशिनाथ गोविंद थावरे यांचं उदाहरणही फार महत्त्वाचं आहे. काशिनाथ गोविंद थावरे हे थोर संतचरित्रकार दा. का. थावरे यांचे वडील होते. ते सच्चिदानंद बाबांचे वंशज होते. सच्चिदानंद बाबा म्हणजे ज्यांनी ज्ञानेश्वरीचे लेखनिक म्हणून काम केलं ते. काशिनाथ थावरे यांनी गणेशानंद महाराजांना गुरु मानलं होतं. हे गणेशानंद महाराज दलित जातीतले वारकरी सत्पुरुष होते.
अर्थात असे वारकरी अपवादात्मक होते. बरेच वारकरी ‘वर्णाभिमान आणि जातपात’ पाहूनच एकमेकांच्या पाया पडत असत. त्यामुळे पाया पडण्याचा प्रयोग संतांनी ज्या जातमुक्तीच्या कारणांसाठी घडवून आणला तो हेतूच असफल ठरला. समतेचा विचार हरवल्यामुळे पाया पडणं हे एक कर्मकांड बनून गेलं. त्यामुळेच गाडगेबाबांनी पाया पडण्याचा विधीच बंद करून टाकला. ते त्यांच्या पाया पडायला आलेल्या लोकांना पाठीत काठी मारत. लोकांनी त्या काठीलाही चमत्काराचा झेंडा लावलाच. ज्याच्या पाठीत बाबांची काठी बसते तो फार भाग्यवान असतो अशा गैरसमजूती पसरायला वेळ लागला नाही. पाठीत काठी मारण्याचंही पुढे कर्मकांड बनलं.
याबाबतीत आणखी एक नोंद करायला हरकत नाही. गाडगेबाबांचे समतानंद अनंत हरी गद्रे नावाचे एक चाहते होते. ते समतावादी विचारांचा कृतीशील पुरस्कार करणारे थोर सामाजिक विचारवंत होते. ते ‘सत्यनारायण’ करत. खरं तर तो सत्यनारायण नव्हताच मुळात. तो संतांप्रमाणेच एक सामाजिक समतेचा प्रयोग होता. त्यात एका दलित जोडप्याला पूजेला बसवलं जायचं. ब्राह्मणांकडून दलित जोडप्याची पूजा व्हायची. अस्पृश्यता आणि जातिभेदाच्या विरोधातले स्वरचित मंत्र म्हटले जायचे. ब्राह्मणांनी दलित जोडप्याचे पाय धुवून त्यांना नमस्कार करण्याचा तो विधी होता. खरंतर गाडगेबाबा पाया पडून घेण्याच्या विरोधात होते, पण बाबांनी या गद्रेंच्या सत्यनारायणाला मात्र प्रोत्साहन दिलं. जातमुक्तीचा प्रयोग म्हणून असे हजारो सत्यनारायण करण्याचा सल्लाही बाबांनी समतानंदाना दिला होता. थोडक्यात गाडगेबाबांचा विरोध कर्मकांडाला होता, पण कोणी त्या कर्मकांडाला जातमुक्तीच्या सामाजिक प्रयोगाचं वळण देत असेल तर बाबांना ते हवं होतं.
वारकरी संतांनी एकमेकांच्या पाया पडायला सांगितलं आणि गाडगेबाबा पाया पडून घेत नसत म्हणून ते वारकरी नव्हते असंही काही लोक म्हणतात. गाडगेबाबांचं म्हणणं इतकंच होतं की पाया पडतानाही जातिभेद पाळला जात असेल तर पाया पडण्याला काहीच अर्थ उरत नाही. पाया पडण्यातला संतांचा समतेचा विचार समतानंदाच्या पूजेत त्यांना दिसला तेव्हा बाबांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. संतांच्या पाया पडण्याच्या या प्रयोगाचा इतिहास हा ‘असा’ आहे.
– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर