जाता नाही जात ती जात, असं म्हणतात. आपल्या देशातून जातिभेद हद्दपार व्हावेत, यासाठी इतक्या महापुरुषांनी प्रयत्न केले, पण हल्ली धर्म आणि जात पुन्हा प्रबळ झाले आहेत. अशाने लोक ‘भारतीय’ कधी बनतील?
– प्रज्ञा वंजारी, माजलगाव
प्रज्ञाताई, तुमचा गैरसमज होतोय… महापुरुषांनी प्रयत्न केल्याने लोक १९४७पासून भारतीयत्व विसरत चालले होते… उलट आता भारतीय लोक पुन्हा भारतीय बनायला लागलेयत… आता कुठल्या सालापासून ते मला विचारू नका.. राणावतांच्या सुकन्येचे व्हिडिओ काढून बघा, त्यांनीच साल जाहीर केलंय.
आयपीएलच्या स्पर्धेतली प्रत्येक मॅच फिक्स असते, असं एका बुकीने मुलाखतीत सांगितलं आहे. तो म्हणतो, कितीही छोटं टार्गेट असलं तरी प्रत्येक मॅच २० ओव्हरपर्यंत कशी खेळली जाते, १५ ओव्हरमध्ये कशी संपत नाही, याचा विचार करा. खरंच असं असेल तर कोट्यवधी लोक ही क्रिकेटची सर्कस पाहतात तरी कशाला?
– विनोद मुळ्ये, गिरगाव
मग कोट्यवधी लोकांनी करायचं काय? देशाच्या जीडीपीबद्दल बोलायचं? बेरोजगारीबद्दल बोलायचं? महागाईबद्दल बोलायचं? दहशतवादी कारवायांबद्दल बोलायचं? यात काय एंटरटेनिंग आहे? मॅच एंटरटेनिंग असते. त्यामुळे लोक सगळ्या गोष्टी विसरतात. कोणाला काही प्रश्न विचारत नाहीत, त्यामुळे उत्तर देण्याची जबाबदारी असणार्यांच्या डोक्याला ताप नाही, त्यांच्या समर्थकांना, असा प्रश्न विचारणार्या कोट्यवधी लोकांना ट्रोल करण्याचा मनस्ताप नाही. पोलिसांना खोट्या केसेस नोंदवून घेण्याचा व्याप नाही… अशा पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघा ना. कशाला निगेटिव्ह गोष्टी उगाळता? अशी शांतता देशात नांदावी, म्हणून अख्खं आयपीएलच फिक्स केलं असेल तर त्यात आपल्या प्रश्नोत्तरांनी काय फरक पडणार आहे? आपण प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर खेळूया!
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरवर बहिष्कार टाका, असं आवाहन काही मोदीभक्त ट्रोल मंडळींनी सोशल मीडियावरून केलं होतं. पण यांच्या आवाहनानंतरही श्रीनगरची विमानं फुल आहेत आणि मराठी माणसं मोठ्या संख्येने भरपूर डिस्काऊंटयुक्त काश्मीर सहल करतायत. असं कसं झालं?
– महेंद्र माने, वाई
जसं शाहरुख आणि आमीरच्या चित्रपटांचं झालं… बहिष्कार टाका म्हटलं तरी लोकांनी चित्रपटांना गर्दी केली… मला तर असं वाटतंय… बहिष्कार टाका असं आवाहन करणार्यांना तोंडावर पाडायचं, या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून, श्रीनगरची विमानं फुल व्हावीत म्हणून काश्मीरवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन मुद्दाम केलं गेलं असावं… विमान कंपन्या कोणाच्या आहेत बघा… (म्हणजे… एकही विमान कंपनी आमची नाही, एवढंच आम्हाला म्हणायचंय…)
देशात कुठेही संकट आलं की आमचे स्वयंसेवक काही तासांत तिथे हजर होतात, असा दावा देशातली एक नोंदणीकृतही नसलेली सांस्कृतिक संघटना करते. पहलगाम हल्ल्यानंतर यांच्यातला एकही मनुष्य तिथे कुणाला दिसला नाही. कुठे हरवले असतील ते?
– नितीन क्षीरसागर, काळा चौकी
नोंदणीकृतही नसलेली सांस्कृतिक संघटना म्हणता, मग तिला एवढं का सिरीयसली घेता? एखाद्या वास्तूवर दावा करण्यापेक्षा, एखाद्या समाजाशी उभा दावा मांडण्यापेक्षा, तुम्ही म्हणताय तसा दावा जर ‘ती’ संघटना करत असेल तर बरं नाही का? आणि हल्ल्यानंतर त्या संघटनेपैकी कोणी जरी नाही दिसलं, तरी उद्या जर हल्ले करणार्यांना कदाचित पकडलंच (पुलवामानंतर ‘त्या’ हल्लेखोरांना पकडतील अस आम्हाला वाटलं होतं, पण त्यावेळी थोबाडावर पडलो, म्हणून आता कदाचित म्हणतोय, बाकी काही नाही) तर त्यांचे प्रमुख तरी फोटो काढायला समोर येतील… तेव्हा बघा त्यांच्यातल्या मनुष्याला डोळे भरून… एवढी कसली तुम्हाला हुरहुर त्यांच्यातल्या एका तरी मनुष्याला बघण्याची…
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यावर सोशल मीडियावरचे युद्ध समर्थक, युद्धाची भाषा करणारे राजकीय पुढारी आणि गोदी मीडियाचे सगळे संरक्षण तज्ज्ञ न्यूज अँकर यांची ताबडतोब सैन्यभरती करून त्यांना आघाडीवर पाठवलं तर पाकिस्तान युद्धाआधीच पराभव मान्य करेल… कशी वाटते ही आयडिया?
– सोनल खटावकर, वैजापूर
दुसर्यांच्या पोटावर पाय आणणारी आयडिया आहे तुमची, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आयडिया केली आणि पाकिस्तानचा युद्धाआधीच पराभव झाला.. तर त्या बातमीच्या जिवावर तुम्ही म्हणताय ते राजकीय पुढारी आणि गोदी मीडिया फार फार तर वर्षभर पोटं भरतील… पण नंतर त्यांनी कोणाला शिव्या घालून पोटं भरायची? त्यापेक्षा या लोकांना पोटं भरण्यासाठी जी ‘खुली छूट’ दिलेली आहे ती आयडिया कितीतरी ग्रेट नाही का? बिचारे पोटं पण भरतायत आणि घरं पण भरतायत… हे बघवत नाही वाटतं तुम्हाला..?
घरात बसून युद्ध युद्ध खेळणारे, सोशल मीडियावर खर्या नावाने वावरण्याची हिंमतही नसलेले भाजपचे ट्रोल देशाच्या संरक्षणासाठी प्राण अर्पण केलेल्या वीरांच्या आई आणि पत्नीची असभ्य भाषेत टवाळी उडवतात. हे यांचे संस्कार आहेत का?
– मीनाक्षी लेले, डोंबिवली
मग काय त्यांनी खर्या नावाने ट्रोल करायचं? आता खोट्या नावाने ट्रोल करतात तर तुम्ही एवढ्या चिडलाय, उद्या त्यांनी खर्या नावाने ट्रोल केले तर तुम्ही गप्प बसाल? तुम्ही उत्तर देणारच. त्यावर ते उत्तर देणार. हा वाद वाढत जाणार. असा वाद वाढू नये म्हणूनच ट्रोल करा, पण खर्या नावाने करू नका असे संस्कार त्यांच्यावर झालेले असतील… आता देशाच्या संरक्षणासाठी प्राण अर्पण केलेल्या वीराबद्दल आपल्याला अभिमान असेल, गर्व असेल, दु:ख असेल, कणव असेल… पण ते शहीद झाले तर ‘वो क्या मेरे लिये मरे क्या’ असे संस्कार ट्रोल करणार्यांवर झाले असतील तर त्याला ते ट्रोलकर तरी काय करणार?