महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीव तोडून काम करणार्या महायुतीच्या मंत्र्यांना, आमदारांना तसंच या विकासकामात अडथळे आणू पाहणार्या विरोधी पक्षासकट विधिमंडळातील सर्व आमदारांना मे महिन्याची उन्हाळ्याची सुटी द्यावी, हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला बसणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांपुढे ठेवणार असल्याची बातमी माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्याला लागली, तेव्हा त्याने मला न विचारताच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिक्रिया घेण्याचं ठरवलं आणि परस्पर हा कार्यक्रम उरकून या प्रतिक्रिया माझ्या पुढ्यात आणून टाकल्या. त्याच ज्ञानात भर टाकण्यासाठी देत आहे.
एकनाथ शिंदे : मी दिवसरात्र जनतेसाठी वाहिलेला माणूस आहे. संकट महाराष्ट्रावर येवो, देशावर येवो वा जगावर, मी वरिष्ठांच्या आदेशासाठी थांबत नाही. तडक माझ्या चिरंजीवांना घेऊन निघतो आणि कामगिरी फत्ते करून येतो. आमचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब मला कुठेही पाठवण्यास कधीही तयार नसतात. का कोण जाणे, त्यांना कसली भीती वाटते देव जाणे, पण माझं उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य मी कुणाचीही पर्वा न करता पार पाडतो. एवढी धावपळ करून कोणीही कौतुकाचा एक शब्दही काढत नाही. शेवटी मीही हाडामांसाचा माणूस आहे. कितीही उसनं अवसान आणलं तरी थकायला होतं. त्यामुळेच मी विश्रांतीसाठी गावी पळतो. त्यातून कोणी वाटेल ते अर्थ काढले तरी त्याची पर्वा मी करत नाही. माझ्याप्रमाणे इतरही मंत्री आमदार थकत असतील. म्हणूनच शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व मंत्री आणि आमदारांना विश्रांतीसाठी मे महिन्याची उन्हाळ्याची सुटी द्यावी असा प्रस्ताव मी गेल्याच आठवड्यात माननीय राज्यपालांना सादर केला व तो विधिमंडळात पास करून न घेता आपल्या विशेष अधिकारात त्याबाबत वटहुकूम काढावा असा सल्लाही मी त्यांना दिला. आम्ही मंत्री, आमदार दुसर्यांच्या कुटुंबांच्या सेवेसाठी झटतो, पण आम्हाला आमच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आम्हालाही प्रॉब्लेम असतात, वयोमानानुसार तब्येतीच्या तक्रारी असतात. पूर्वी केलेल्या चुकांची भुतं रात्री स्वस्थ झोप घेऊ देत नाहीत. तेव्हा पद आणि पैसा म्हणजे सर्व काही नाही हे कळून चुकतं. चुकीला माननीय मोदीसाहेब क्षमा करतील, पण देव कधीही क्षमा करणार नाही, याची जाणीव आहे. आता मागे फिरता येत नाही, दोर कापलेले आहेत. म्हणूनच महिनाभर विश्रांतीची गरज आहे. कडक उन्हाळा आहे. आतून तापलेलं डोकं वरूनही तापतं. अंगातून घामाच्या धारा वाहतात. म्हणूनच गावातील घरात महिनाभर आराम केला तर पावसाळी अधिवेशनाचे दिवस थोडेफार बरे जातील.
अजितदादा : मंत्री आणि आमदारांना उन्हाळ्याची सुटी ही कल्पना चांगली असली तरी ती अंमलात येणार नाही. ती येऊही नये असं मला मनापासून वाटतं आणि ती शिंदे साहेबांच्या डोक्यातून उगवलेली कल्पना असल्यामुळे ती मुख्यमंत्र्यांकडून शंभर टक्के केराच्या टोपलीत जाईल, याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. आम्ही काम करणारी माणसं आहोत. माझं काकांशी पटत नसलं तरी या वयातही ते उनपावसात जी भटकंती करतात त्याला तोड नाही. आमच्या घराण्याचा तो गुण आहे. राजकारणात आल्यापासून गेल्या वर्षीपर्यंत मी काकांचं बोट कधी सोडलं नाही. त्यांच्यामुळेच मी सारी बारामती पिंजून काढली. लोक त्यांच्याइतकेच मलाही ओळखू लागले. म्हणूनच माझ्या लोकप्रियतेने कळस गाठला आणि काकांचं बोट सोडून स्वत:च्या पायावर उभं राहण्याची हिंमत मनगटात आली. शिंदेसाहेब म्हणतात तसं मे महिन्याची उन्हाळ्याची सुटी घेऊन एकेक महिना घरी आराम करत बसलो असतो, तर हे दिवस पाहायला मिळाले नसते. उपमुख्यमंत्रीपदाचा तर माझा रेकॉर्ड आहे. मी तर म्हणतो तुम्ही अस्सल लोकप्रतिनिधी असाल तर उन, वारा, थंडी, पाऊस याची कसलीही फिकीर न बाळगता लोकांमध्ये फिरले पाहिजे. आमचे काका तर प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखतात आणि घरातल्या माणसांनाही. तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी काकांसारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी वाटचाल करणार आहे. राजकारणात मजा मारणारे मजा मारत असतात, खुर्च्या उबवत असतात, पैशाची बेगमी करत असतात. मी त्यातला नाही. म्हणूनच माननीय मोदीसाहेब आणि शहा साहेबांनी मला त्यांच्यात घेतलं. मी तोंडावर स्पष्ट बोलणारा माणूस आहे. शाळेतल्या पोरांप्रमाणे मे महिन्याची सुटी आम्हालाही मिळावी, अशा पोरकट मागण्या करणं ज्येष्ठ मंत्र्याला शोभत नाही.
देवेंद्र फडणवीस : माझ्या कानावर तो विषय आलाय. पण त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही असं मला वाटतं. विधानसभा आणि विधान परिषद या काही शाळा नाहीत की त्यांना उन्हाळ्याची सुटी द्यावी लागेल. मुंबई आणि नागपुरातली अधिवेशनंही जेमतेम महिनाभरासाठी असतात. ती तीन-तीन चार-चार महिने चालली असती तर विश्रांतीसाठी वेगळी सुटी मागण्याची गरज समजू शकलो असतो. आमचे काही मंत्री आणि आमदारही अधिवेशनाचा काळ सोडला तर सुटीवर असल्यासारखेच असतात. थोडथोडक्या नव्हे तर चक्क सात-आठ महिन्याच्या सुटीवर. यांना आता मे महिन्याची अधिकची सुटी कशासाठी हवी? किती मंत्री आणि सरकारातले आमदार कुठल्या समाजसेवेत का िबझी असतात? आता तर अधिवेशनही सुरू नाही. बहुतेकजण आपल्या गावी पळालेत. एकनाथराव शिंदे आमचे ज्येष्ठ उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना विश्रांतीसाठी मे महिन्यात सुटी घेऊ शकतात. उलट अजितदादांमध्येच शिंदेंना पाहण्याची सवय मी अंगी बाणवून घेईन. मग त्यांची उणीव मला भासणार नाही.