□ पंतप्रधान आले… गेले, मेट्रो आणि समृद्धीच्या उद्घाटनांचा मुहूर्त टळला.
■ मुळात पहलगाम हल्ल्यानंतर ते काश्मीरला गेले नाहीत, प्रचारासाठी थेट बिहारला पोहोचले. त्यानंतर त्यांनी केरळात पण जाऊन प्रचार केला. महाराष्ट्रात कसलीही निवडणूक नसताना, प्रचार करण्यासारखं काही नसताना ते आले याबद्दलच त्यांचे आभार मानले पाहिजेत ना!
□ १०० दिवसांच्या प्रगतिपुस्तकात मिंधे आणि अजितदादा नापास.
■ …आणि भाजप मात्र पास! ईव्हीएमच वापरलं होतं की काय प्रगतिपुस्तक बनवायला? असल्या प्रगतिपुस्तकावर विश्वास तरी कोण ठेवणार आणि त्याचा कोणाला काय फायदा होणार? दिल को खूष रखने के लिए, गालिब ये खयाल अच्छा है… इतकंच.
□ सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी नाही – गुजरातच्या कंपनीला न्यायालयाने फटकारले.
■ असे फटकारे देताना कोर्टाने गरीबांसाठी न्याय मिळण्याची काय स्वतंत्रपणे व्यवस्था केली आहे, त्याचाही गोषवारा द्यायला हवा होता. सर्वसामान्य माणूस तर साध्या सेशन्स कोर्टातही जायला घाबरतो. तो सुप्रीम कोर्टात कसा येईल आपोआप?
□ जातीनिहाय जनगणनेबाबत सरकारने हेडलाईन दिली, पण डेडलाईन कधी देणार – काँग्रेसचा सवाल.
■ त्यांचा इतिहास पाहा. तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी गिमिक्स करण्यात त्यांची १०० वर्षं गेलेली आहेत. ठोस काही सकारात्मक करण्याची मुळात त्यांची वृत्तीच नाही, त्यांच्याकडे तसा कार्यक्रम नाही. जो विषय मुळात त्यांना अमान्य आहे, त्यात ते डेडलाईन देतील? काहीतरी पाचर सापडल्याशिवाय तर हे घडणं शक्यच नाही.
□ मुंबईत पुन्हा निकृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण; वांद्रे येथे अभियंता निलंबित, कंत्राटदाराला दंड.
■ जिथे उत्कृष्ट दर्जाचं काँक्रीटीकरण झालं आहे, तिथल्या अभियंता आणि कंत्राटदाराचा सार्वजनिक सत्कार झाल्याची बातमी वाचली आहे का कधी कोणी? कोणतंही कंत्राट निघाल्यानंतरची शाळकरी मुलांनाही माहिती असलेली टक्केवारी वजा झाल्यावर काँक्रीटीकरणाचा दर्जा उत्तम कसा राहील? हे सगळं कंत्राटदार राज कोणाच्या भल्यासाठी सुरू आहे, ते लोकांना कळत नाही, तोवर ही थूकपट्टी चालू राहील.
□ संपूर्ण महाराष्ट्रात खंडणीखोरांचे साम्राज्य – पृथ्वीराज चव्हाण.
■ पृथ्वीराज बाबा, सगळ्यांनाच त्रास आहे त्याचा. पण, तुमचा पक्ष त्यावर काय करतो आहे? विरोधी पक्ष त्यावर काय करत आहेत? कोणतं आंदोलन उभं राहतंय? तुमचा पुढाकार कुठे दिसतोय? लोकांमध्ये खदखद आहे, पण तिला वाचा फोडण्याचं काम विरोधी पक्ष खरंच करतायत का?
□ मुंबई महानगरपालिकेचा ४३ टक्के नालेसफाईचा दावा खोटा; प्रत्यक्षात डॅशबोर्डवर ३२ टक्केच काम पूर्ण.
■ पाच टक्के घ्या, द्या, विषय मिटवून टाका! ही जिथली भाषा असते, तिथे काटेकोर माहिती मिळण्याची अपेक्षा चुकीची नाही का? कोण आहे रे तो डॅशबोर्डवाला, बोलवा त्याला! नवशिका दिसतोय…
□ मिरा-भाईंदरमध्ये मिंध्यांना झटका; महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
■ ज्या दिवशी यांचा टांगा पलटी होईल, तेव्हा सगळेच घोडे फरार होणार आहेत. अनेक कार्यकर्त्यांना आपला वॉर्ड, आपले मतदार सांभाळण्यासाठी मन मारून मिंधे, गद्दार आणि महारद्दड शक्तीची सोबत करावी लागत आहे. कधीतरी सगळेच योग्य ठिकाणी परततील.
□ लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासींचे पैसे पळवले.
■ मग काय स्वत:च्या खिशातून देणार का आपले नेते? हे लक्षात घ्या, ते कधीही स्वत:च्या खिशात, काही देण्याकरता, हात घालत नाहीत. आपल्याच खिशात हात घालणार आणि इकडच्या खिशातून काढून तिकडच्या खिशात ठेवणार. आता आदिवासींसाठी आणखी कुणाच्या तरी निधीवर तुळशीपत्र ठेवतील… सगळा फिरवाफिरवीचा कारभार!
□ तिजोरीत खडखडाट आणि तीन मंत्री निघाले इटलीला.
■ उकडतंय किती इथे! जनसेवा करता करता एसी केबिनींमध्ये पण घामाच्या धारा लागल्या आहेत. आता छान थंड हवेत, आपण करून ठेवलंय तसं वाटोळं न झालेल्या एखाद्या देशात कशाचा ना कशाचा अभ्यास करायला जायला नको?
□ अजितदादांचे ‘तो मी नव्हेच!’ – शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते!
■ धादांत खोटे होऊन पडणार असतील, तर यांच्यापुढे पुरावे आपटून तरी काय उपयोग? बरं हे स्वत:ला अतिशय स्पष्टवक्ते, काम होणार असेल तर हो म्हणतो, नाही तर नाही म्हणतो, असे असल्याचं प्रोजेक्ट करतात.
□ आदिवासी विकास महामंडळाच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार.
■ काळाबाजार म्हटलं की गुजरात आलाच! बरं ते सगळ्या देशातलं सगळ्यात व्हीआयपी राज्य. देशावर सत्ता त्यांचीच. दिल्लीत कंत्राटदारांपासून व्यापार्यांपर्यंत सगळ्यांवर त्यांचाच अमल. त्यांच्याबद्दल तक्रार करून साध्य काय होणार?
□ महाराष्ट्राचा ऊर्जा प्रकल्प हरयाणातील हायजेनकोच्या घशात.
■ अरेच्चा, या वेळेला राज्य कसं बदललं पण! कदाचित आता हरयाणाचं नाव घेत असतील, मग तिकडून योग्य राज्यात जाईल… कोणतं राज्य ते विचारू नका… सांगायची गरज आहे?
□ बेकायदा बॅनरविरोधात ठोस पावले उचला – हायकोर्टाचे राज्यातील नगर परिषद, पालिकांना आदेश.
■ ते अजिबात काहीही करणार नाहीत. त्यांचे हात संगनमताने बांधलेले आहेत. त्यांनी हायकोर्टाकडे बोट दाखवलं तर त्यांचे आका येऊन कोर्टात तमाशे करतील.
□ मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण योग जुळून आलेला नाही – अजित पवार यांनी व्यक्त केली भावना.
■ अडवाणींना भेटा. दु:ख कमी होईल. शिवाय, आपल्या कुंडलीत तो योग येत नाही तो कोणत्या पूर्वसुकृतामुळे, त्याचंही काही मार्गदर्शन मिळेल.