– किरण माने
साप्ताहिक ‘मार्मिक’मधली तुकोबारायांवरची ही लेखमाला लिहीत असताना मला सगळ्यात जास्त आनंद याचा होत होता की ज्या माझ्या वडिलांनी माझ्यावर हे संतविचारांचे संस्कार केले ते हे लेख वाचू शकतील. माझे पहिले काही लेख दादांनी वाचलेही. उशाखाली ठेवून कौतुकानं पुन:पुन्हा वाचले. मला मनापासून सुख देणारे ते क्षण होते.
…आज हा लेख वाचायला माझे दादा या जगात नाहीत…
…त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे सोपवलेली ‘तुकाराम गाथा’ त्यांनी आयुष्यभर जपली. फक्त जपली नाही, तर आचरणात आणली. पीडब्ल्यूडीसारख्या खात्यात असूनही त्यांनी पगारापलीकडे एक पैसाही घरात आणला नाही. प्रामाणिकपणे नोकरी करून सुखाचा संसार केला. माझ्यासाठी दादांनी किती प्रॉपर्टी ठेवली, किती संपत्ती ठेवली याला माझ्यालेखी शून्य महत्त्व आहे. त्यांनी माझ्यात सात पिढ्यांना पुरून उरेल अशी वारकरी संप्रदायाची विचारधारा पेरली. माणसात देव पहायला शिकवला. कर्मकांड, अंधश्रद्धेपासून मला दूर ठेवलं. या प्रॉपर्टीचं मोल करता येणार नाही. बापाची महती सांगताना तुकोबाराया म्हणतात,
बाप करी जोडी लेकराचे ओढी ।
आपुली करवंडी वाळवूनी ।।
एकाएकी केला मिरासीचा धनी ।
कडिये वागवूनी भार खांदीं ।।
लेवऊनी पाहे डोळां अळंकार ।
ठेवा दावी थोर करूनिया ।।
तुका म्हणे नेदी गांजू आणिकांसी ।
उदार जीवासी आपुलिया ।।
…बाप लेकराच्या प्रेमापोटी पै पै जोडत रहातो. हे करताना अक्षरश: तो आपली काया सुकवतो.
…जाताना एकाएकी त्याला आपल्या कमाईचा वारस, मालक करतो. लहानपणी ज्याचा भार कडेखांद्यावर वागवून त्यानं मोठा केलेला असतो.
…त्याच्या अंगावर अनेक अलंकार, तसेच संस्कारांचे, विचारांचे दागिने लेववून त्याला डोळा भरून पहातो, त्याला ऐश्वर्यसंपन्न करतो.
…तुका म्हणे, बाप आपल्या लेकराला इतरांपासून त्रास होऊ देत नाही, जिवावर उदार होऊन तो लेकराचं रक्षण करतो.
तुकोबारायांनी आईच्या प्रेमाची महती अनेक अभंगांतून गायली आहे. पण त्या तुलनेत बाप दुर्लक्षिला नाही. हा एक अभंग ‘बाप काय असतो’ याचं मूर्तिमंत उदाहरण ठरला आहे. अनेक कीर्तनकारांचा आणि कीर्तन ऐकण्यासाठी येणार्या भाविकांचा हा अत्यंत आवडता अभंग आहे. आपल्याकडे पितृसत्ताक व्यवस्था आहे. बाप घरातला कर्ता पुरुष असतो. त्यामुळे घराला शिस्त लावणं, सगळ्यांना धाकात ठेवणं, त्याची आदरयुक्त भीती असणं हे अपेक्षित असतं. आईइतकीच बापाचीही लेकरांवर अपार माया असते हे मुलांच्या खूप उशिरा लक्षात येतं… तोवर बापाची जाण्याची वेळ जवळ आलेली असते.
आपल्या लेकराबद्दल कितीही माया असली तरी बापाने ती दाखवायची नाही असा जणू एक रिवाजच आहे आपल्याकडे. घरात काहीही घडो, बापानं अश्रू लपवून आपली कर्तव्यं पार पाडायची असतात. तशाच मुलाविषयी आपल्या भावनाही तो काळजात दडवून ठेवत असतो. वरवर दाखवलं नाही, तरी बापाच्या मनात आपल्या लेकराबद्दल अतिशय उत्कट प्रेम असतं. आयुष्यभर जिवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून, हाडाची काडं करून, आपल्या लेकरासाठी तो कमाई करून ठेवतो. आपला लेक आपल्यामागेही सुखी, सुरक्षित राहावा, त्याला कसली अडचण येऊ नये, त्याचा उत्कर्ष व्हावा यासाठी बाप आयुष्य खर्ची घालतो. हे सगळं अव्यक्त प्रेम तुकोबारायांनी या अभंगामधून शब्दांत उतरवून अजरामर केलं.
माणसानं बाकी काहीही विसरलं तरी चालेल, पण दोन गोष्टी कधीच सोडू नयेत, आई आणि वडील. कुठं झुकायचं असेल तर आईवडिलांच्या पुढं. जिथे श्रद्धेनं मस्तक टेकावं असं एकच तीर्थक्षेत्र म्हणजे आईबापाचे पाय. तुकाराम महाराज म्हणतात,
मायबापे केवळ काशी ।
तेणें न वजावे तीर्थासी ।।
पुंडलीकें काय केले ।
परब्रह्म उभे ठेले ।।
तैसा होई सावधान ।
हृदयीं धरी नारायण ।।
तुका म्हणे मायबापे ।
अवघी देवाची स्वरूपे ।।
…आईवडील म्हणजेच फक्त काशी आहेत. जो मनुष्य आईवडिलांच्या सहवासात असेल, त्यानं तीर्थयात्रा करायची गरज नाही.
…पुंडलिकानं काय केलं? आईवडिलांची सेवा करताना, साक्षात देवालाच उभं राहायला लावलं.
…तसा सावध रहा. ईश्वराला आपल्या हृदयात ठेवावं, पण त्याला प्राप्त करण्यासाठी आईवडिलांची सेवा करणं थांबवू नको.
…शेवटी तुका म्हणे, आईवडील म्हणजे पूर्णाशानं ईश्वराचं स्वरूप आहेत!
सोप्या शब्दांत सांगायचं तर तुकाराम महाराज सांगतात, आईवडिलांची सेवा हीच ईश्वराची पूजा. तुकाराम महाराजांनी अनेक अभंगांमधून आई आणि लेकराच्या नात्याचं उदाहरण वेगवेगळ्या संदर्भानं दिलं आहे. संतसज्जनांशी आपलं नातं सांगताना हाच दाखला देऊन ते म्हणतात,
मातेचिये चित्ती।
अवघी बाळकाची व्याप्ति।।
देह विसरे आपुला।
जवळीं घेता सीण गेला।।
दावी प्रेमभाते। आणि अंगावर चढते।।
तुका संतांपुढे। पायीं झोंबे लाडे कोडें।।
…आईच्या मनात सगळीकडे बाळ व्यापून राहते.
…त्याच्यासाठी ती आपलं देहभान विसरून जाते. त्याला जवळ घेतल्यावर तिचा सगळा शीण जातो.
…तिनं मायेनं त्याला खाऊ दाखवला की ते तिच्याकडं आवेगानं झेपावतं.
….तुकासुद्धा या लेकरासारखा संतांच्या पायांशी लाडाकोडानं झोंबतो!
आणखी एका अभंगात ते म्हणतात,
लेकराचे हित।
वाहे माऊलीचे चित्त।।
ऐसी कळवळ्याची जाती।
करी लाभेंविण प्रीती।।
पोटी भार वाहे।
त्याचे सर्वस्व ही साहे।।
तुका म्हणे माझे।
तैसे तुम्हा संतां ओझे।।
…लेकराचं हित व्हावं, हाच विचार माऊलीच्या चित्तात असतो.
…तिच्या मनातल्या या कळवळ्याची जातकुळी वेगळीच असते. तिला त्या बदल्यात कुठल्याही लाभाची अपेक्षा नसते.
…आधी नऊ महिने ती आपल्या पोटी त्याचा भार वाहते आणि नंतर आयुष्यभर त्याचं सर्व काही सहन करते.
…शेवटी तुका म्हणे, तुम्ही संत हे माझ्या आईसारखे आहात त्यामुळे माझे ओझे तुम्ही वाहायचे आहे.
तुकोबारायांचे अनेक अभंग आहेत ज्यातून या आईबाप आणि मुलाच्या नात्याचं विविध अंगांनी त्यांनी वर्णन केलंय. आईबापाचा हात आपल्या डोक्यावर असणं यासारखं दुसरं सुख नाही. माझ्या माथ्यावरची बापाची सावली गेली, पण आईच्या अमाप प्रेमाचा वर्षाव ती कमी भरून काढेल. यावेळी माझा हा लेख वाचायला वडील नाहीत, पण माझी आई तो मनापासून वाचेल या विचारांनी आजच माझं मन संमिश्र भावनांनी गच्च भरून आलंय… लेख वाचून झाल्यावर तिच्या चेहर्यावर जे स्मित येईल ते माझ्यासाठी जगातलं सर्वात सुंदर बक्षीस असेल!
‘सांगतां हें नये सुख ।
कीर्ती मुख न पुरे।।’