माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, असा पत्रकारितेचा पहिला धडा आहे म्हणतात. मग मध्यंतरी एक कुत्रा बातमीचा विषय झाला तो कसा?
– स्नेहा मंचेकर, कराड
हा विषय कळणं साध्यासुध्या, नैसर्गिकरित्या जन्म घेतलेल्या माणसाचं काम नाही, आंबे खाऊन जन्म घेतलेल्या एखाद्या माणसाला विचारा… (सध्या आंब्याचा सीझन आहे म्हणून म्हटलं बाकी काही नाही… नाहीतर कुत्र्याबद्दल बोलल्यावर कुत्रा चावतो, तसा आंब्याबद्दल बोलल्यावर आंबा चावायचा… तुमच्या प्रश्नाचा रोख ओळखून चोख उत्तर दिलंय… रोखठोक वाटलं तर थोडं नॉर्मल करून घ्या.
संतोषराव, तुम्हाला काय वाटतं? राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
– प्रभाकर गरड, हिंगोली
तुम्हाला काय वाटतं त्यांनी एकत्र येऊ नये का? की ते एकत्र येतील म्हणून पोटात गोळा उठतोय का? की ते एकत्र येऊ नयेत म्हणून कोंबडा बकरा रेडा बिडा कापायचा आहे का? की त्यांना परत कसं फोडायचं याचं प्लॅनिंग करायचं आहे?
संतोषराव, देशातल्या एका भागावर शेजारच्या देशातून अतिरेकी येऊन हल्ला करतात तेव्हा त्याबद्दल दोषी कुणाला धरायचं? देशाच्या राज्यकर्त्यांना की शेजारच्या अंडीपाववाल्याला, पंक्चरवाल्याला?
– अब्दुल शेख, गोवंडी
कोणालाही दोषी धरा. पण खर्याला दोषी धरू नका. काही नाही, बिचार्या न्यायमूर्तींची दया येते. राज्यकर्त्यांना दोषी धरण्याचा जमाना विरोधी नेत्यांच्या बाबाच्या जमान्यानंतर गेला. शेजारच्या अंडी पाववाल्याला, पंचरवाल्याला कोणालाही दोषी धरा; पण खबरदार चायवाल्याला दोषी धराल तर… चायवाला म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर जो चायवाला पटकन येतो, त्याला डोळ्यासमोर धरून बघा…
मला आजवर विमानात बसण्याची संधी मिळाली नाही. ती मिळवायची असेल तर दोन प्रतींमध्ये अर्ज करून एक म्हस्के आणि एक शिंदे यांना पाठवायचा का? कृपया मार्गदर्शन करा.
– पंढरीनाथ पाटील, पंढरपूर
तुम्ही कोणाबद्दल काय बोलताय पाटील? आम्हाला काहीच कळत नाहीये. तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोला बाबा. हल्ली दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ नाही तरं नुकसानच होतं… असं परवाच एक स्टुडिओवाला सांगत होता. तुम्ही पंढरपूरचे पंढरीनाथ आहात म्हणून सांगतो, हल्ली ‘एकनाथा’चे भारूड गायला पण भीती वाटते. त्यामुळे उद्या जर कोणी म्हणाले की देवाच्या विमानाने सदेह वैकुंठाला गेलेल्या संत महाराजांनाही देवाच्या विमानात आम्हीच बसवलं होतं, तरी आम्ही काही बोलणार नाही.
ज्या वेगाने आपल्याकडे याचं नाव बदला आणि त्याचं नाव बदला, असा खेळ सुरू आहे, ते पाहता कोणीतरी तुमचं नाव बदलण्याची मागणी करील, अशी भीती नाही का वाटत? कोणी चॉइस दिलाच तर बदलून काय नाव ठेवलेलं आवडेल तुम्हाला?
– राणी पाषाणकर, औंध
मुळात तुम्हाला या खेळाचे नियमच माहीत नाहीत ताई… हा खेळ मालकासाठी खेळला जातो. आपल्या मालकाचे नाव कशात गुंतणार असे वाटले की या खेळाला सुरुवात होते. त्यासाठी अमक्याचे नाव बदला अशी मागणी आपल्याच ठेवलेल्या माणसांकडून केली जाते. आता ना आमचा असा कोणी मालक, ना आम्हाला कोणी ठेवलाय, त्यामुळे आमचं नाव बदलल्याने कोणाच्या बापाला फरक पडणार आहे? आणि नाव जर कोणी बदलून देणारच असेल तर ‘राहुल नरेंद्र शिंदे-फडणवीस’ हे नाव कसं वाटतं?
हल्ली सगळ्या गोष्टी ऑनलाइन मिळतात हो. मला तर वाटायला लागलंय की काही दिवसांनी वर आणि वधूही झेप्टो किंवा स्विगीवरून डिलिव्हर होतील की काय पाच मिनिटांत!
– नारायण कामतेकर, चंदन नगर
तुमची अपेक्षा रास्त आहे.. पण बाळाची डिलिव्हरी पण ऑनलाईन मागाल तर जास्त होईल.
महाराष्ट्रात जेवढी ‘नाटकं’ चालतात, तेवढी देशाच्या कोणत्याही भागात चालत नाहीत, असं म्हणतात. काय असेल हो याचं कारण?
– बाजीराव घोरपडे, फलटण
कारण महाराष्ट्रातल्या लोकांना नाटकंच आवडतात. म्हणूनच नाटकं करणारी माणसं सिंहासनावर बसतात… म्हणजे नाट्यरसिकांच्या हृदयसिंहासनावर… (ज्या ‘नाटकां’बद्दल तुम्ही बोलताय ‘त्याच’ नाटकाबद्दल आम्ही बोलतोय. नाहीतर आधी बोलून, नंतर आमच्या बोलण्याचाही विपर्यास केला, असं बोलून रंग बदलणारे सरडे नाहीत आम्ही… कळलं का घोरपडे?)