महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच डोळ्यात तेल घालून जागरुक असणारे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी पूर्वी आणि आता शिक्षणक्षेत्रासाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय माझा मानलेला लाडका परमप्रिय मित्र पोक्या याला सदैव आदर्शच वाटत आले. इतक्या तळमळीने काम करणारा एकही शिक्षणमंत्री आजपर्यंत झाला नाही, अशी त्याची ठाम धारणा आहे. तरीही त्यांची खिल्ली उडवणारे, त्यांच्या वकुबाबद्दल शंका घेणारे, त्यांचे निर्णय मागे घ्यायला लावणारे अनेक महाभाग आहेत. त्यांची पोक्याला कीव करावीशी वाटते. प्रकाशित होण्याच्या वाटेवर असलेलं त्यांचं आत्मचरित्र पोक्याच्या हाती लागलं तेव्हा तो इतका भारावून गेला की मला म्हणाला, असा शालेय शिक्षणमंत्री मिळायला भाग्य लागतं. खरं तर केंद्रीय शिक्षणमंत्री होण्याची पात्रता असलेल्या या व्यक्तिमत्वाची राज्यात जी कुचंबणा होतेय ती पाहून वाईट वाटतं. आदरणीय भुसे साहेबांच्या आगामी आत्मचरित्रातील हे प्रकरण पोक्याने मला वाचून दाखवलं. तेच वाचकांच्या माहितीसाठी इथे देतो…
…राज्याचं शालेय शिक्षणमंत्रीपद महायुतीच्या काळात माझ्याकडे दोनदा चालून आलं. ते पद मलाच दिलं याचं श्रेय मी माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि माननीय आजी मुख्यमंत्री देवेंद्रराव फडणवीससाहेब यांना देईन. कारण त्यांनी माझ्या मनातली गोष्ट अचूक जाणली होती. शाळेत असताना ‘मी कोण होणार?’ असा निबंध परीक्षेत लिहायला आला की मी शिक्षणमंत्री होणार असं मी आत्मविश्वासाने लिहित असे. कदाचित माझ्या आतल्या आवाजाची ती प्रतिक्रिया असावी. तेव्हापासून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही अभ्यासाची गोडी लागावी यासाठी नेमकं काय करायची गरज आहे हे विचार माझ्या मनात सतत घोळत असत. मला आता आठवत नाही की मी कधी नापास झालो असेन. तरीही नापास होणार्या विद्यार्थ्यांविषयी मला नेहमी सहानुभूती वाटत असे. त्यामुळे मोठेपणी शिक्षणमंत्री झाल्यावर नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असा अध्यादेश काढण्याचा निर्णय मी तेव्हाच घेतला होता.
मी शालेय शिक्षणमंत्री झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना माझे विचार पटवून दिले आणि बर्याच प्रमाणात त्याची अंमलबजावणी झाली. भविष्यात हळूहळू ‘नापास’ हा शब्दच शालेय शिक्षणक्षेत्रातून हद्दपार झालेला दिसेल, याची मला खात्री आहे. आज आमच्या फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात शैक्षणिकदृष्ट्या मागास पण इतर गोष्टींमध्ये हुशार असलेले अनेक मंत्री आहेत त्यांचा मला अभिमान वाटतो. माणूस शिक्षणाने नव्हे, तर कर्तृत्त्वाने ओळखला जावा हा माझा आग्रह असतो. त्यामुळेच शालेय शिक्षणमंत्री झाल्यापासून आजपर्यंत मी माझ्या जबाबदारीने काही ठोस निर्णय घेतले, पण माझ्याकडे नेहमीच संशयाने पाहणार्या संकुचित वृत्तीच्या माझ्याच काही सहकारी मंत्रीमहोदयांनी थातूरमातूर कारणं सांगून ते रद्द करण्याचा सपाटा लावला, याचं मला दु:ख आहे. सर्व शालेय विद्यार्थ्यांना एकच ड्रेसकोड लावण्याचा आणि ते गणवेश सरकारनेच एखाद्या कंत्राटदाराकडून शिवून घेत शाळांना पुरवण्याचा निर्णय मी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना अंमलातही आणला, पण आताच्या सरकारने या योजनेत तथाकथित भ्रष्टाचाराचा संशय वाटतो असं म्हणत तो निर्णय बासनात गुंडाळला. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय पुस्तकांना वह्यांची पाने जोडावी हा निर्णय अंमलात आणून मी लाखो पुस्तकांसह त्यांना जोडलेल्या वह्यांचीही छपाई केली. पण यावर्षी ही योजना रद्द केल्यामुळे लाखो पुस्तकं-वह्या अफाट खर्च करूनही गोदामात धूळखात पडल्या आहेत.
मला पहिलीपासून हिंदी चित्रपट पाहण्याची आवड असल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिंदीचा पाया मजबूत व्हावा या विशाल हेतूने मी पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याची घोषणा केली, पण तिथेही मला माघार घ्यायला भाग पाडलं त्यांनी. १५ दिवसांपूर्वी खेडेगावातील एका शाळेत ‘महाराष्ट्राचं शैक्षणिक भवितव्य’ या विषयावर भाषण देण्यासाठी आणि बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्यासाठी मी गेलो होतो. शाळेच्या प्रशस्त इमारतीच्या पार्श्वभूमीवर मैदानात एकाच तर्हेच्या गणवेशात उभ्या असलेल्या शिक्षिका, शिक्षक पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. विद्यार्थी, विद्यार्थिनींचा गणवेश डोळ्यात भरत होता. क्षणात डोक्यात कल्पना चमकली की महाराष्ट्राच्या सर्व शाळांतील शिक्षक शिक्षिकांना गणवेशाची सक्ती केली तर राज्यीय एकात्मतेचं ते दृश्य किती विलोभनीय असेल! तिथून परतल्यावर मी शिक्षकांसाठी ड्रेसकोडची घोषणा केली, तर मी काहीतरी पाप करतोय अशा तर्हेने माझ्या वक्तव्यावर सारे तुटून पडले. मला माझ्या मराठी संस्कृतीबद्दल इतरांपेक्षा जरा जास्तच अभिमान आहे हे मी कृतीतून दाखवून देत असल्यामुळे तर ही मंडळी माझा द्वेष करीत नसतील ना! पण माझे विचार मी थकू दिले नाहीत. सर्व शिक्षकांना भगवे धोतर आणि सदरा, डोक्यावर भगवी टोपी, शिक्षिकांना भगवी नऊवारी साडी-चोळी, भगवी पर्स, विद्यार्थ्यांना भगवी शर्ट-पँट, विद्यार्थिनींनाही भगवा युनिफॉर्म, एवढंच नव्हे, तर सर्व शाळांना एकच रंग… भगवा. राज्याचं भगवीकरण करण्याचा पहिला मान माझ्या शालेय शिक्षण खात्याला मिळणार याचा मला अभिमान वाटतो.
शालेय शिक्षणाशी संबंधित अनेक आदर्श योजना आज माझ्या डोळ्यांसमोर आहेतच. पण, मंत्र्यांनाही एक ड्रेसकोड असावा अशी माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी आहे. ज्या सत्ताधारी मंत्र्यांना व आमदारांना दाढ्या आहेत त्यांनाही, त्यांनी भगवा डाय म्हणजे कलप लावावा यासाठी मी स्वत:पासून सुरुवात करणार आहे.