मनोविकास प्रकाशनाच्या ‘भारतातील प्रमुख धर्म’ या पुस्तकात डॉ. शरद अभ्यंकर यांनी अनेक प्रमुख धर्मांविषयी माहिती देतानाच त्या त्या धर्मातील धर्ममार्तंडांनी हितसंबंध जोपासण्यासाठी पोखरलेला धर्म कसा टाकाऊ झालाय याची चिकित्सा केली आहे.
– – –
– जगदीश काबरे
उत्क्रांतीच्या ओघात माकडापासून माणूस जन्माला आला. मग त्याला देवाधर्माची गरज केव्हापासून वाटायला लागली? या प्रश्नाचा विचार करता आपल्या असे लक्षात येते की, आदिमानव प्राणीसदृश होता. त्यामुळे फक्त आहार, मैथुन, निद्रा एवढ्याच गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत होत्या. जसजसा तो उत्क्रांत होत गेला आणि त्याला चाकाचा, अग्नीचा, शेतीचा शोध लागला, त्यानंतर तो भटक्या अवस्थेतून एका जागेत स्थिरावण्याच्या अवस्थेत गेला. त्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी टोळ्या करून राहू लागला. त्याच काळात तो निसर्गाच्या अगम्य आणि अज्ञात गोष्टीविषयी विचार करू लागला. ज्या अर्थी आपल्याला या निसर्गातून अन्नपाणी मिळते आणि त्यामुळे आपण जगू शकतो त्या अर्थी हे देणारा कोणीतरी नियंता असला पाहिजे, असे त्याला वाटले. त्यातून देवाची निर्मिती झाली. पण त्या काळचे त्याचे देव निसर्गातील वरूण म्हणजे वारा, पर्जन्य म्हणजे पाऊस, सूर्य म्हणजे अग्नी, चंद्र म्हणजे शीतलता अशा नैसर्गिक घडामोडी हेच होते. म्हणजे सुरुवातीला तो निसर्गपूजक होता. नंतर जसजशा टोळ्या मोठ्या होऊ लागल्या तसतसे त्यांच्यात कुणीतरी एक बलवान माणूस सरदार बनू लागला. नंतर असे संरक्षणकर्ते स्वत:ला राजा म्हणू लागले.
काळ बदलत होता आणि इतिहास घडत होता. नंतरच्या पिढ्यांनी इतिहासातील अशा समाजाला दिशा देणार्या राजांना त्यांच्या पराक्रमामुळे देव म्हणायला सुरुवात केली. मग माणूस निसर्गपूजेतून व्यक्तिपूजेकडे वळला. त्यातून समाज नीतीनियमाने चालावा म्हणून काही कर्मकांड आले. ती जोपासणारा एक वर्ग समाजात निर्माण झाला. या वर्गाने समाजाला एका विशिष्ट विचाराने बांधून ठेवण्यासाठी धर्माची निर्मिती केली. काही धाडसी माणसे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करू लागली. त्यांनी या नव्या जगात वेगळा धर्म स्थापन केला. अशा प्रकारे या पृथ्वीवर एकाचे अनेक धर्म निर्माण झाले. म्हणून आजही आपल्याला सर्व धर्मांत काही मूलतत्त्वे सारखीच दिसतात. भाषा जरी वेगळ्या असल्या तरी काही शब्दही अर्थासहित सारखेच असलेले दिसतात.
अशा सर्व धर्मांच्या तत्वांविषयी समग्रपणे सामान्य लोकांना कल्पना असतेच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो आणि इतरांचा कनिष्ठ. खरे तर प्रत्येकाने आपापल्या धर्माचाही व्यवस्थित अभ्यास केलेला असतोच असे नाही. डॉ. शरद अभ्यंकर यांच्या मनात हा विचार आला. लोकांना सर्व धर्म व्यवस्थितपणे समजावेत, त्यातील खाचाखोचा, गुण आणि दोष लक्षात यावेत या उद्देशाने त्यांनी भारतातील प्रमुख धर्म (सच्च्या भूमिकेतून घडवलेला धर्मपरिचय) या नावाचे एक पुस्तक लिहिले. यात धर्मांविषयी माहिती असली तरी ती त्यांनी अत्यंत सहजसोप्या आणि ओघवत्या भाषेत वर्णित केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक कुठेही जडजंबाल झालेले नाही. भारतातील प्रमुख धर्माविषयी माहिती देताना त्या धर्माचा उगम आणि उद्गाता कोण याची माहिती देता देता त्या त्या धर्मात शिरलेल्या अंधश्रद्धा आणि धर्ममार्तंडांनी हितसंबंध जोपासण्यासाठी पोखरलेला धर्म कसा टाकाऊ झालेला आहे, हेही विशद केलेले आहे. हे सांगताना त्यांनी खुसखुशीत भाषेतून बारीक-बारीक चिमटेही काढलेले आहेत. चिमट्यामुळे शरीराला होणारी वेदना जशी सुसह्य असते तसेच या पुस्तकातील धर्मचिकित्सेचे झाले आहे. हे अत्यंत कठीण काम आहे. पण ते लेखकाने लिलया पेलले आहे. कसे ते आपण पुस्तकातील काही नमुन्यातून पाहूया…
१) मी सातारच्या वैद्यक महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात असे. आमचे एक सह-प्राध्यापक ज्यू होते, ते भारत सोडून इस्रायलला जाणार होते, कॉलेजतर्फे त्यांचा निरोप समारंभ झाला आणि इथले सर्व पाश सोडून आपल्या धर्मभूमीकडे जाणार्या त्या डॉक्टरांचे सर्वांनी गुणगान केले. मला वाटले हाच एखादा मुस्लीम डॉक्टर पाकिस्तानात जात असता तर त्याला ‘खाना यहां का और गाना वहां का!’ अशा शिव्या खाव्या लागल्या असत्या. (पृष्ठ क्र. २२)
२) आक्रमक हिंदूधर्मीयांची संख्याही आता राजाश्रयामुळे वाढत आहे. घरवापसी, गोमांस बाळगले अशा संशयावरून जीव घेणे, लव्ह जिहाद या नावाखाली प्रेमीजनांचा छळ करणे, ‘जय श्रीराम’ सक्तीने म्हणायला लावणे, दंगल केली असे आरोप ठेवून घरे बुलडोझ करणे हे आवडीने केले जाते. (पृष्ठ क्र. ६९)
३) काही वर्षापूर्वी आम्ही जपानमध्ये प्रवास करत होतो. त्यावेळी बुद्ध पौर्णिमा होऊन काही दिवस झाले होते, आम्हाला टोकियो शहरात मोठ मोठी बुद्ध मंदिरे दाखवण्यात आली. आम्ही आमच्या गाईड महिलेला विचारले ‘तुमच्याकडे बुद्ध पौर्णिमेला काय कार्यक्रम झाले?’ यावर तिने विचारले ‘कसली बुद्ध पौर्णिमा?’ आम्ही ‘बुद्धाज बर्थ डे, फुल मून डे इन मे’ असे सांगितल्यावर ती म्हणाली ‘देवळातल्या पुजार्यांनी काही कार्यक्रम केले असतील. इतरत्र आम्ही काही करत नाही.’ आमच्याकडे या दिवशी सुट्टी असते आणि बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात, असे सांगितल्यावर ती म्हणाली, ‘जपानमध्ये एकही धार्मिक सुट्टी नसते.’ यावर मी सांगितले की आमच्याकडे सात धर्मांच्या अनेक सुट्या असतात. त्यावर तिने ‘आता समजले तुमचा देश का मागासलेला आहे,’ अशा नजरेने आमच्याकडे पाहिले. (पृष्ठ क्र. ११३)
४) एकंदरीत धर्म म्हटले की त्याचा प्रचार करण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी बराच अधर्म करावा लागतो, हेच खरे. (पृष्ठ क्र. १२५)
५) …असा हा ख्रिस्ती धर्म. सर्व जगभर पसरलेला. हजारो चांगल्या गोष्टी करणारा, पण शेकडो वाईट गोष्टींचा मोठा इतिहास असणारा. आपल्या सेवाकार्यातून हजारो लोकांचे जीव वाचवणारा पण तितक्याच लोकांचे जीव घेणाराही. एक सुविचार आहे, ‘माणसांना त्यांच्या लायकीनुसार सरकार मिळते,’ तसे आपल्याला म्हणता येईल, ‘लोकांना त्यांच्या लायकीनुसार धर्म मिळतो’. (पृष्ठ क्र. १३६)
६) कुराणात कोणतीही भर घालणे, बदल करणे वा दुरुस्ती करणे यावर पूर्णपणे बंदी आहे. कारण याचा अर्थ कुराण अपूर्ण वा चुकीचे आहे असा होतो. आपला धर्मग्रंथ अपुरा आहे हे कोणताही धर्मनिष्ठ माणूस मान्य करत नाही. (पृष्ठ क्र. १४६)
या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते की, त्यांनी सर्व धर्म आणि धर्मियांची चिकित्सा केलेली आहे. त्या पुस्तकाचे सार सांगताना प्रस्तावनेत सुरेश द्वादशीवार लिहितात…
‘या पुस्तकात ज्यू आणि हिंदू या अतिशय प्राचीन धर्मापासून शीख व बहाई या अलीकडे जन्माला आलेल्या धर्मांचीही रोचक ओळख त्यांनी वाचकांना करून दिली आहे. ते करताना त्यांनी धर्मांच्या मूळ ग्रंथांची ओळख व त्यातील आचारांची महती तर सांगितलीच पण त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष व्यवहारात त्यांची केलेली मोडतोडही सांगितली आहे. सर्व धर्मांत काळानुरूप झालेले बदल, त्यातील प्राचीन नीतिमूल्यांची नंतरच्या काळात झालेली परवड आणि धर्मांनी निर्माण केलेल्या समाजव्यवस्था या सार्यांचे विवरण करतानाच अभ्यंकरांनी या धर्मांनी समाजातील दुबळ्या वर्गांवर व विशेषतः स्त्रियांवर कायमस्वरूपी लादलेल्या अन्यायाचे वर्णनही स्पष्टपणे सांगितले आहे. अतिशय मोजक्या शब्दांत पण कमालीच्या सच्च्या भूमिकेतून घडविलेला धर्मपरिचय व धर्मचिकित्सा असे या पुस्तकाचे वर्णन थोडक्यात करता येणारे आहे. ते करताना त्यांनी भारतातील बहुसंख्यकांच्या धर्मांएवढीच अल्पसंख्यकांच्या धर्मांचीही परखड चिकित्सा केली आहे हे त्याचे आणखीही एक वैशिष्ट्य आहे.’
एकंदरीत हे पुस्तक भारतातील प्रमुख धर्मांची नुसती माहिती देत नाही तर वाचकाने अंतर्मुख होऊन आपापल्या धर्माचा अभ्यास करून त्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी चिकित्सा करण्यास आणि इतर धर्मांचाही अभ्यास करण्यास उद्युक्त करते. हे पुस्तक लिहिताना त्यांनी कोणत्याही धर्माचा, धर्म संस्थापकाचा वा तो धर्म मानणार्या लोकांचा अवमान केलेला नाही; तर सभ्य पण स्पष्ट शब्दात काही गोष्टी सुनावलेल्या आहेत. ज्याला भारतातील विविध धर्माविषयी जाणून घ्यायचे आहे अशा प्रत्येक वाचकाने म्हणूनच हे पुस्तक वाचायलाच हवे आणि माणुसकीने जगायला शिकायला हवे. तेव्हा लेखक पुस्तकाच्या शेवटी म्हणतात त्याप्रमाणे वाचकांनो, द्या सोडून हा कालबाह्य झालेला, वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय घडवणारा, माणसा माणसात वैर निर्माण करणारा, झापडबंद विचार करायला लावणारा, सिंदबादच्या म्हातार्यासारखा तुमच्या मानगुटीवर बसलेला धर्म नावाचा राक्षस आणि द्या मुक्त विचाराला वाव. विज्ञाननिष्ठा आणि मानवता यावर आधारित जीवनप्रणाली स्वीकारा. सुखी, समाधानी आणि आनंदी व्हा!
पुस्तक : भारतातील प्रमुख धर्म
लेखक : डॉ. शरद अभ्यंकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
एकूण पृष्ठे : २००, किंमत : रु. २७०