बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेले हे व्यंगचित्र आहे १९७२च्या नववर्षारंभ अंकातले. दर वर्षाच्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर म्हातारे झालेले, जीर्ण, मलूल, दाढी वाढलेले जुने वर्ष अर्भक किंवा बालकरूपातल्या नव्या वर्षाच्या हातात काही तरी सोपवते आहे, काही सल्ला देते आहे, असे व्यंगचित्र काढण्याचा परिपाठ अनेक व्यंगचित्रकारांचा होता, तसाच तो बाळासाहेबांनीही पाळलेला दिसतो… इथे संदर्भ आहे भारत-पाकिस्तान युद्धाचा. बाळासाहेब कायमच काँग्रेसचे विरोधक राहिले होते, खासकरून महाराष्ट्रातल्या काँग्रेसजनांना त्यांच्या कुंचल्याचे फटकारे नेहमीच बसत. पण, १९७१मध्ये इंदिरा गांधींनी भारताच्या कुरापती काढणार्या पाकिस्तानचे दोन तुकडे करून एका तुकड्याचं रूपांतर बांगला देशात केलं होतं. त्या पराक्रमामुळे त्यांचे विरोधकही त्यांना दुर्गा म्हणून संबोधायला मजबूर झाले होते. युद्धामुळे देश विकल झाला असला तरी त्याचा इंदिराजींवर प्रचंड विश्वास होता. त्यांच्या नेतृत्त्वाखाली सगळा भारत एकवटला होता आणि कोणाही दुष्ट शक्तीने भारताकडे डोळा वर करून पाहू नये, अशा दमदारपणे आक्रमणं मोडून काढायला सज्ज होता… भारतावर आक्रमण झालेलं असताना त्यात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना न भेटता, त्या जागेला भेट न देता, आधी निवडणुकीच्या प्रचारसभेला हजेरी लावून, तिथे डरकाळ्या फोडून मतांची तजवीज करणारं निवडणूकजीवी नेतृत्त्व तेव्हा नव्हतं. तुम्ही एवढ्या मोठ्या वल्गना करत असताना असा हल्ला झालाच कसा, असा सत्तेला सवाल करण्याऐवजी देशातल्या एका जनसमुदायाला काही संबंध नसताना बहिष्कृत करण्याची आततायी पावलं उचलून, देशात फूट पाडण्याचा अतिरेक्यांचा, शत्रुराष्ट्राचा मनसुबा यशस्वी करून दाखवणारे लोकही तेव्हा नव्हते, हेही लक्षात घ्यायला हवं म्हणा!