भारतातील बाहुल्यांचं जग सांस्कृतिक वारशाचं जतन करणं, मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडणं आणि व्यवसायाच्या नव्या शक्यतांचं दार उघडणं अशा अनेक स्तरांवर आपलं स्थान घट्ट करतंय. ही केवळ खेळण्यांची गोष्ट नाही, तर ही आहे भारताच्या विविधतेला जागतिक बाजारपेठेत स्थान देणारी हुकमाची राणी..
– – –
बाहुली हा प्रत्येक लहानग्याच्या जिव्हाळ्याचा आणि मोठ्यांच्या आठवणींचा विषय असतो. मुलींचं भावविश्व बाहुलीमध्ये अधिक गुंतलेलं असलं तरी, घर-घर खेळताना, (आता क्वचितच दिसणारी) बाहुलाबाहुलीची लग्नं लावताना किंवा बहिणीला त्रास देण्यासाठी तिच्या बाहुलीचे केस ओढणे, बाहुलीला मिशा काढणे, लपवून ठेवणे, हे उद्योग करताना मुलांचाही या खेळात सहभाग असतो. बाहुली ही मुलींची पहिली मैत्रीण असते. पूर्वी मुलीचं बालपण संपायच्या आधीच तिला ‘सून’, ‘आई’ बनवण्याची घाई असे. त्यातल्या त्यात त्या चिमुकल्या जिवाला विसावा असे तो बाहुलीचा. खरतर बाहुली स्वत: निर्जीव वस्तू पण आपल्या निरीक्षणाने, कल्पनाशक्तीने मुली तिच्याशी असा काही संवाद साधतात की बघणार्यालाही ती बाहुली खरी वाटू लागते. मोठ्यांनाही या बाहुलीच्या लग्नात सहभागी होण्याची उत्सुकता असायची ती यामुळेच.
बाहुली हा जीव की प्राण आहे अशा कौतुकापासून झालेली सुरुवात, आता काय बाहुलीशी खेळायचं वय आहे का असं वारंवार कानावर येण्यापर्यंत पोहोचलं की मुसमुसत ती बाहुली हळूच फडताळात ठेवत आयुष्यातल्या बाहुलीपर्वाचा समारोप होतो. संसाराच्या सर्व टप्प्यांची पूर्वतयारीच जणू मुली बाहुलीच्या खेळात अनुभवतात, विरह-वियोगाची तालीमही बाहुलीपासून दुरावताना होऊन जाते. मोबाइल, कम्प्यूटर, एआयच्या जमान्यातही मुलींच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असलेल्या या बाहुल्या आल्या तरी कुठून आणि कशा?
जगातील पहिली बाहुली असण्याचा मान ‘पॅडल डॉल्स’ना जातो. या लाकडी बाहुल्या प्राचीन इजिप्तमधील इ.स.पू. २०३०-१८०२ या काळातील कबरींमध्ये सापडलेल्या आहेत. या बाहुल्यांचे हात पंख्याच्या पॅडलप्रमाणे बाजूला पसरलेले असत. या डॉल्सना रंगवून त्यांच्या शरीरावर टॅटू किंवा वस्त्रांची चित्रे काढली जात. केसांसाठी मण्यांचा वापर केला जात असे. या बाहुल्या प्राचीन इजिप्तमधील स्त्रियांच्या रूपसौंदर्यविषयक कल्पना आणि मृत्यूनंतरच्या जीवनातील समारंभाचे प्रतीक असायच्या, असे मानले जाते.
मध्ययुगीन काळानंतर युरोपमध्ये बाहुल्यांचे उत्पादन व्यावसायिक पद्धतीने होऊ लागले. विशेषत: १५व्या ते १७व्या शतकात जर्मनीतील थुरिंगिया आणि न्युरेंबर्ग भागात बाहुल्यांचे उत्पादन हा एक मोठा उद्योग बनला होता. येथे मुख्यत: दोन प्रकारच्या बाहुल्या बनविल्या जात, लाकडापासून कोरलेल्या बाहुल्या आणि ‘बिस्क डॉल्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या मातीच्या बाहुल्या. या मातीच्या बाहुल्यांना रंग न देता विकले जाई. ग्राहक त्याच्या आवडीप्रमाणे बाहुलीवर रंगकाम आणि वेशभूषा करत.
१७व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १८व्या शतकात जगाच्या कला राजधानीत म्हणजेच पॅरिसमध्ये बाहुल्यांचा एक नवा प्रकार जन्माला आला… फॅशन डॉल्स. त्या साध्यासुध्या बाहुल्या नव्हत्या, त्या युरोपभरात फ्रेंच फॅशनचा प्रसार करणार्या सुपर मॉडेल्स बनल्या. ‘पॉप डू मॉड’ या नावाने ओळखल्या जाणार्या या डॉल्सना फ्रेंच फॅशन डिझायनर्स डिझायनर वस्त्रांमध्ये सजवून राजघराण्यांपासून ते उच्चभ्रू ग्राहकांना पाठवीत. त्यांच्यामुळे फॅशन डिझायनर्सच्या कपड्यांची डिझाईन, रंगसंगती आणि साजशृंगार यांचा प्रसार जलदगतीने होत असे. एका अर्थाने या बाहुल्या आजच्या ‘फॅशन मॅगझिन्स’च्या खापरपणज्याच होत्या.
औद्योगिक क्रांतीमुळे १८व्या आणि १९व्या शतकाच्या दरम्यान युरोपमध्ये बाहुल्यांच्या निर्मितीला एक नवे तंत्रज्ञान प्राप्त झाले. आधी हाताने कोरण्यात येणार्या किंवा मातीपासून बनवलेल्या, मर्यादित संख्येत निर्माण होणार्या बाहुल्यांची जागा आता मशीनने साच्यातून तयार होणार्या प्लास्टिक किंवा सेल्युलॉईडच्या बाहुल्यांनी घेतली. बाहुल्यांची निर्मिती सोपी आणि स्वस्त झाल्यामुळे या काळात अमेरिकेत आणि युरोपमध्ये डॉल्सचे व्यवसायिक उत्पादन सुरू झाले. सायमन, हॅलबिग आणि आर्मंड मार्साय या कंपन्यांनी डोळे मिचकवणार्या अत्यंत सुंदर बिस्क डॉल्स तयार केल्या.
विसाव्या शतकात एक अशी बाहुली जन्माला आली जी पुढील अनेक वर्ष बाहुल्यांच्या साम्राज्याची अनभिषिक्त सम्राज्ञी बनली, तिचं नाव बार्बी. तिच्या निर्मितीची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. १९५०च्या उत्तरार्धात अमेरिकेतील खेळण्यांच्या बाजारपेठेत मुलींसाठी फक्त लहान बाळासारख्या दिसणार्या बाहुल्या उपलब्ध होत्या. या बाहुल्यांचा एकच उद्देश होता, मुलींना ‘आईपणाची’ भूमिका शिकवणे. पण रूथ हँडलर यांना या एकसुरी संकल्पनेतून बाहेर पडायचं होतं. त्या आपल्या मुलीला (बार्बरा) नेहमी ‘आईच्या भूमिकेतून’ बाहुल्यांबरोबर खेळताना पाहायच्या, तेव्हा त्यांना वाटायचं ‘मुलींना अशी बाहुली मिळाली पाहिजे जी त्यांना, फक्त बाळ सांभाळायला शिकवणार नाही, तर स्त्री सक्षमीकरणाचे स्वप्न दाखवेल.’ १९५६मध्ये रूथ हँडलर युरोपमध्ये सहलीला गेल्या असताना त्यांना एका दुकानात एक अनोखी जर्मन बाहुली दिसली- ‘बिल्ड लिली’. ‘बिल्ड झायटुंग’ या जर्मन वृत्तपत्रात झ्ाळकणार्या एका व्यंगचित्रावर आधारित ही बाहुली प्रौढ पुरुषांसाठी विनोदी भेटवस्तू म्हणून विकली जात होती. लिलीच्या अंगकाठीमध्ये एक वेगळा आत्मविश्वास होता. ती बेधडक, स्टायलिश आणि आकर्षक होती. या बाहुलीत थोडे बदल करून आपल्या मनातील बाहुली तयार करता येईल या कल्पनेने त्यांना हुरूप आला. रूथ हँडलर या मॅटल कंपनीच्या सहसंस्थापक होत्या. मॅटलची सुरुवात लाकडी फर्निचर बनवण्यापासून झाली, त्यानंतर त्यांनी लाकडी खेळणी तयार करायला सुरुवात केली.
१९५९ साली रूथ हँडलर यांनी जेव्हा २९ सें.मी. उंचीच्या एका प्रौढ स्त्रीसारखी दिसणार्या बाहुली बनवण्याची कल्पना
मॅटलच्या सहकार्यांपुढे मांडली, तेव्हा अनेकांनी विरोध केला. ‘प्रौढ बाहुल्यांबरोबर कोण खेळेल’ असा प्रश्न विचारला गेला. पण रूथ ठाम राहिल्या. त्यांनी जर्मन डॉलवर आधारित अमेरिकन डॉल डिझाइन केली. त्यांच्या मुलीच्या ‘बार्बरा मिलिसेंट रॉबर्ट्स’ या नावावरून या नवजात बाहुलीचं बारसं केलं… बार्बी. ९ मार्च १९५९ रोजी ‘न्यूयॉर्क टॉय फेअर’मध्ये काळ्या आणि पांढर्या रंगाच्या झेब्रा प्रिंट स्विमसूटमध्ये बार्बीचा जगाला पहिल्यांदा अधिकृत परिचय झाला. तिचा चेहरा, पोशाख आणि देहयष्टी पूर्णपणे नव्या विचारसरणीचे प्रतीक होते. बार्बीला बाजारात आणताना मॅटलने एक क्रांतिकारी निर्णय घेतला, आईवडिलांसाठी नव्हे तर थेट मुलांना साद घालणार्या जाहिराती बनवायच्या. त्यांनी ‘मिकी माऊस क्लब’ या शोवरून पहिल्यांदा खेळण्यांची जाहिरात केली, जो आज थेट मुलांपर्यंत पोहोचणार्या जाहिराततंत्राचा आरंभ मानला जातो.
बार्बीने खेळण्यातील व्यक्तिरेखा जिवंत करण्याचे उदाहरण स्थापित केले. बार्बी ही केवळ खेळण्यातील बाहुली नसून एक सामाजिक विधान होती. ती आई नव्हती, पत्नी नव्हती. ती स्वतंत्र होती, स्वप्न बघणारी आणि करिअर घडवणारी होती. थोडक्यात बार्बी समाजातील स्त्रीच्या बदलत्या प्रतिमेचा एक सजीव आरसा होती. १९५९मध्ये बार्बी डॉल पहिल्यांदा बाजारात आली, तेव्हा तिचं रूप हे एक यशस्वी, सुंदर, सडपातळ तरुणीचं आदर्श रूप होतं. त्यावेळी अमेरिकन समाजात स्त्रीची भूमिका मुख्यत: गृहिणीची होती, पण त्यांच्या मुलींसाठीच्या स्वप्नांना बार्बीने एक पर्याय दिला. सुटसुटीत कपडे, केशभूषा, सौंदर्यदृष्टीने साजेसं व्यक्तिमत्त्व आणि ‘स्वप्नवत’ जीवनशैली, बार्बी अमेरिकेला आवडली. आणि जे अमेरिकेला आवडतं ते जग आवडून घेतंच, या न्यायाने बार्बी जगभर स्वीकारली गेली. जसजसा समाजात स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडत गेला, तसतशी बार्बीही बदलली. १९६० आणि ७०च्या दशकात स्त्रीवादाच्या लाटेने अमेरिकन समाज ढवळून निघाला. स्त्रिया केवळ सौंदर्याचं प्रतीक राहिल्या नाहीत, तर त्यांनी शिक्षण, करिअर, विज्ञान, खेळ, आणि राजकारण यामध्ये आपली ओळख निर्माण केली. याच काळात बार्बीही ‘नर्स’, ‘शिक्षिका’, ‘एअर होस्टेस’ याच्या पुढे जाऊन डॉक्टर, अंतराळवीर, आर्मी ऑफिसर, अगदी राष्ट्राध्यक्ष म्हणून दिसू लागली.
बार्बीबरोबर तिच्या जोडीदाराचीही कल्पना पुढे आली. १९६१मध्ये मॅटलने ‘केन’ या तिच्या प्रियकराचा बाहुला बाजारात आणला. (रूथ हँडलर यांच्या मुलांचं नाव होतं केन.) त्यानंतर १९६३मध्ये मिड्ज ही बार्बीची मैत्रीण आणि १९६४मध्ये तिची धाकटी बहीण स्किपर यांचीही ओळख झाली. १९६८पर्यंत बार्बीच्या ‘मैत्रीण’रूपाने वेगवेगळ्या रंगाच्या आणि पार्श्वभूमीच्या व्यक्तिरेखा बाजारात आल्या. मात्र, स्वत: बार्बीला तिचा गोरा रंग बदलून ‘लॅटिना बार्बी’ (अफ्रिकन-अमेरिकन) बनण्यासाठी १९८० साल उजाडावं लागलं.
रंगभेदासोबतच बार्बीची अंगकाठी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली. १९५८मध्ये बार्बीची जी शरीररचना समोर आली, ती वास्तवात अशक्य असलेली होती. अत्यंत सडपातळ कंबर, लांबट पाय आणि अप्राकृतिक शरीरमान असलेली ही रचना. बार्बीच्या शरीररचनेपासून प्रेरणा घेऊन जगभरातील फॅशन इंडस्ट्रीमध्ये ‘झिरो फिगर’ ही संकल्पना ग्लॅमर आणि सौंदर्याचं परमोच्च प्रतीक म्हणून मांडली गेली. बार्बीला आदर्श मानणार्या मुलींनी तिच्यासारखं दिसणं, तिच्यासारखं राहणं, अगदी तिच्यासारखी फिगर मिळवणं, हे एका प्रकारचं वेड झालं. हाच आदर्श पुढे किशोरवयीन मुलींमध्ये शरीराबद्दल अस्वस्थता, आहाराची भीती, आणि फॅड डाएट्स यांचं मूळ कारण ठरू लागला. झिरो फिगर ही मीडिया आणि मार्केटिंगने निर्माण केलेली एक भ्रामक प्रतिमा आहे अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी हा संबंध अधोरेखित केला आहे. बार्बीने हे रूपक इतकं ठळकपणे साकारलं की अनेक पिढ्यांमध्ये त्याचा खोल परिणाम झाला. त्यामुळे बार्बीचं शरीरमान आणि झिरो फिगर या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. खूपच टीका झाल्यानंतर मॅटलने बार्बीच्या शरीरसाच्यांमध्ये वेळोवेळी बदल केले. २१व्या शतकाच्या सुरुवातीला बार्बीला रुंद कमरेचा भाग देण्यात आला. २०१६मध्ये ‘पटीट’, ‘टॉल’ आणि ‘कर्व्ही’ अशा तीन नव्या प्रकारांच्या बार्बी बाहुल्या बाजारात आल्या.
२०००नंतर बार्बी अधिक समावेशक झाली. विविध वर्ण, धर्म, शरीरयष्टी आणि अगदी अपंगत्वाचंही प्रतिनिधित्व करणार्या बाहुल्या बाजारात आल्या. बार्बीने जागतिक स्त्रीच्या कथा सांगायला सुरुवात केली. आजची बार्बी एकाच वेळी पायलटही आहे, संगणक अभियंता आहे, क्रिकेटपटू आहे, शिक्षक आहे, आणि हिजाब परिधान करणारी मुस्लीम तरुणीही आहे. बार्बीचा हा प्रवास म्हणजेच स्त्रीसौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांपलीकडे जाऊन स्वातंत्र्य, समानता, आणि स्वप्नांचा पाठपुरावा यांची कहाणी आहे. पण त्याचबरोबर जेव्हा जेव्हा बार्बीने रूप बदलले तेव्हा तेव्हा बार्बीच्या निर्मात्या कंपनीसाठी व्यवसायवाढीची संधीही निर्माण झाली.
मॅटलने बार्बीला अमेरिकन संस्कृतीचं प्रतीक म्हणून सादर केलं गेलं असलं तरी खर्च वाचवण्यासाठी तिचे उत्पादन मात्र नेहमीच अमेरिकेबाहेर केलं. आज बार्बी हा जागतिक ब्रँड आहे. युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशिया हे तिचे प्रमुख बाजार आहेत. २००९मध्ये मॅटलने शांघायमध्ये सहा मजली बार्बी स्टोअर उघडलं, ज्यात स्पा, डिझाईन स्टुडिओ आणि कॅफेसह विविध बार्बी उत्पादनांचा समावेश होता. मात्र मुस्लिम देशांमध्ये बार्बीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. १९९५मध्ये सौदी अरेबियात बार्बीवर बंदी घालण्यात आली कारण ती इस्लामी पोशाखसंहितेला पूरक नव्हती. त्यानंतर २०१७मध्ये हिजाब घातलेली बार्बी सादर करण्यात आली. २०१६मध्ये बार्बीच्या शरीररचनेमध्ये मोठे बदल झाले आणि २०१९मध्ये लिंगभेदरहित बाहुलीही आली. २०२०मध्ये ‘सर्वाधिक विविधता असलेली बार्बी’ ही नवीन मालिका सुरू झाली, ज्यात कृत्रिम पाय, व्हीलचेअर आणि श्रवणयंत्र वापरणारी बार्बी यांचा समावेश होता.
विविध रूपे अनुभवलेली बार्बी मातृत्वापासून मात्र नेहमीच दूर राहिली. रूथ हँडलर यांच्या मते, बार्बी ही आई नसावी, कारण ती विवाहपूर्व आणि जबाबदारीपूर्व काळाचं प्रतिनिधित्व करत होती. मात्र व्यावसायिक गरज म्हणून २००२मध्ये बार्बीची मैत्रीण मिड्ज गर्भवती बाहुली म्हणून आली. तिच्या पोटात बाळ असलेलं यंत्र जोडलेलं होतं. पण काही ग्राहकांनी आक्षेप घेतला की ही बाहुली किशोरवयीन मातृत्वाला प्रोत्साहन देते. त्यामुळे वॉलमार्टने ती बाहुली विक्रीतून काढून टाकली. १९९२मध्ये आलेली ‘टोटली हेअर बार्बी’, जिचे केस पायापर्यंत लांब होते, ही आजवर सर्वाधिक विक्री झालेली बार्बी आहे. तिच्या विक्रीने १ कोटींचा टप्पा पार केला. ‘केनेथ सीन कार्सन’ म्हणजेच केनची बार्बीच्या जीवनात एन्ट्री झाली, परंतु ‘सिंगल करिअर गर्ल’ हा गाभा जपण्यासाठी त्यांचं लग्न कधीच झालं नाही. २००४मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं आणि बार्बीने नंतर ऑस्ट्रेलियन सर्फर ब्लेनला डेट केलं. पण २०११मध्ये व्यायामशाळेत मेहनत घेऊन केन परत आला आणि ते पुन्हा एकत्र येणार, अशी घोषणा झाली.
बार्बी हे निर्जीव खेळणं असूनही तिने अनेकांच्या जीवनात प्रेरणास्थान म्हणून जागा निर्माण केली. १९८६मध्ये अँडी वॉरहोल यांनी बार्बीचं पेंटिंग केलं. १९९४मध्ये पीटर मॅक्सनेही तिचं चित्र बनवलं. कार्ल लॅगारफेल्ड आणि डायान वॉन फर्स्टनबर्ग यांच्यासारख्या फॅशन डिझायनर्सनी बार्बीसाठी पोशाख तयार केले. ‘टॉय स्टोरी-३’पासून (२०१०) ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ (२०२३) चित्रपटापर्यंत बार्बी ४०हून अधिक चित्रपटांमध्ये झळकली आहे. २०१६मध्ये पॅरिसमधील ‘म्युझियम ऑफ डेकोरेटिव्ह आर्ट्स’ या लूव्रचा भाग असलेल्या संग्रहालयात बार्बीवर विशेष प्रदर्शन भरवलं गेलं, ज्यात ७००हून अधिक बार्बी बाहुल्या होत्या.
जगात दर सेकंदाला दोन बार्बी विकल्या जातात. पण बार्बीचा व्यवसाय फक्त बाहुलीविक्रीपुरता मर्यादित नाही, ती एक बहुआयामी ब्रँड इकोसिस्टम आहे. मॅटल ही कंपनी बार्बीच्या माध्यमातून विविध स्तरांवर महसूल निर्माण करते, उदा. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीवर आधारित कपडे, स्टेशनरी अॅप्स, मोबाईल गेम्स विकणे. शिवाय टीव्ही मालिका, नेटफ्लिक्स सीरिज ते २०२३ साली प्रदर्शित झालेल्या हॉलिवुड सिनेमातून (१२,००० कोटी रुपये) बॉक्स ऑफिस कमाईबरोबरच ब्रँड व्हॅल्यू आणि बार्बीचे नाव आणि फोटो असलेल्या वस्तू विक्रीमधूनही मोठी कमाई होते.
बार्बीला अनेक स्पर्धकांचाही सामना करावा लागतो. सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजे हॅस्ब्रो कंपनीचा ब्रॅट्झ ब्रँड, ज्यांची बाहुली बार्बीच्या तुलनेत अधिक स्टायलिश, बिनधास्त आणि ‘एजी’ प्रतिमेसाठी प्रसिद्ध झाली. २०००च्या दशकात ब्रॅट्झने बार्बीच्या मार्केट शेअरवर मोठा परिणाम केला. त्यानंतर एलओएल सरप्राइझ डॉल्सचाही (एमजीए एंटरटेनमेंट) उदय झाला, ज्यांनी ‘सरप्राइझ एलिमेंट’ आणि मिनी साईजच्या ट्रेंडचा फायदा घेत लोकप्रियता मिळवली. डिझ्नीच्या फ्रोजन फ्रंचायझीतील एल्सा आणि आना यांच्याही डॉल्सनी एकेकाळी बार्बीच्या विक्रीला टक्कर दिली. याशिवाय टकारा टोमी (जपान), चिनी लोकल ब्रँड्स आणि भारतात फन्स्कूलसारख्या स्थानिक खेळणी कंपन्यांनीही स्थानिक किमतींवर बार्बीला आव्हान दिलं. ही स्पर्धा फक्त उत्पादनापुरती मर्यादित नव्हती, तर सौंदर्याच्या प्रतिमांपासून ते सामाजिक संदेशांपर्यंतच्या सगळ्या पातळ्यांवर होती. त्यातूनच एनआरआय बार्बी आली. अमेरिकेत भारतीय आणि आशियाई माणसांची संख्या मोठी आहे. अशा ग्राहकांना आपलेसे करण्यासाठी बार्बी तयार करणार्या मॅटेल कंपनीने २०२३मध्ये ‘कवी शर्मा’ या नावाची भारतीय-अमेरिकन बाहुली सादर केली. कवी ही न्यूजर्सीमध्ये राहणारी, नृत्य-संगीताची आवड असलेली आणि ब्रॉडवेवर परफॉर्म करण्याचं स्वप्न पाहणारी एक उत्साही मुलगी आहे. पण ती दिसायला कितीही आधुनिक असली तरी एकत्र कुटुंबपद्धती दाखवून तिचं एक प्रेमळ, भारतीय पारंपरिक मूल्यांवर वाढलेलं आई, वडील, आजी (दादीमां), लहान भाऊ ऋषी आणि पाळीव कुत्रा स्कॅम्पर यांचं कुटुंब दाखवण्यात आलं आहे.
जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत भारताचं बाहुल्यांचं विश्व बहुपेडी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि तांत्रिक परंपरेचं प्रतिबिंब आहे. इथे लहानग्यांच्या हातात खेळण्यासाठी असलेल्या ‘नायिका’ बाहुल्यांपासून ते अघोरी तांत्रिक प्रयोगांमध्ये वापरल्या जाणार्या ‘खलनायिका’ काळ्या बाहुल्यांपर्यंत, नवरात्रात पायर्यांवर मांडल्या जाणार्या देवतारूप बाहुल्यांपासून ते स्टेजवर दोर्यांनी नाचवल्या जाणार्या कठपुतळ्यांपर्यंत बाहुल्यांनी वेगवेगळी रूपं घेतली आहेत. कधी या बाहुल्या मुलांच्या शिक्षणाचं साधन बनतात, कधी स्त्रीसौंदर्याचे मापदंड सांगतात, कधी मातृभाव प्रकट करतात तर कधी अंधश्रद्धेच्या अंधार्या कोपर्यांचं मूर्तस्वरूप ठरतात.
भारतातील कठपुतळी परंपरेचा इतिहास तब्बल दोन हजार वर्षांहून जुना मानला जातो. ‘कठपुतळी’ हा शब्द ‘काठ’ म्हणजे लाकूड आणि ‘पुतळी’ म्हणजे बाहुली या दोन शब्दांच्या मिलाफातून तयार झाला आहे. राजस्थानी ‘भाट’ समाजाने ही परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे नेली असून, ती कथावाचन, समाजप्रबोधन आणि ऐतिहासिक घटनांचं चित्रण करण्याचं माध्यम आहे. कठपुतळी म्हणजे हातात पकडलेल्या दोर्यांनी हलवलेली लाकडी बाहुली. कठपुतळी खेळवणार्याला इंग्रजीत पपेटीअर म्हणतात. तो अनेक दोर्या एका लहानशा चौकटीला बांधून त्याच्या हाताने त्या नियंत्रित करतो. एका बाहुलीच्या डोक्याला, हातांना, कमरेला आणि पायाला वेगवेगळ्या दोर्या बांधलेल्या असतात. पपेटीअरने त्या दोर्यांना विशिष्ट पद्धतीनं हलवलं की बाहुली चालते, नाचते, वाकते, हात दाखवते, डोळे फिरवते. या नृत्यनाट्याच्या प्रदर्शनात राजा-राणीची प्रेमकथा, राक्षस-वध, ऐतिहासिक प्रसंग किंवा सामाजिक संदेश अशा गोष्टी सांगितल्या जातात. आजही राजस्थानातील पर्यटनस्थळी १०००हून अधिक भाट कुटुंबं ही कला जपतात.
आता काळ बदलला, मोबाईल आला, अख्खं जग मुठीत सामावलं आहे, परंतु बाहुलीचे महत्त्व काही कमी झालं नाही. कपड्यांच्या चिंध्यांनी बनवली गेलेली ठकी नावाची विद्रूप बाहुली काळानुरूप मॉर्डन स्वरूपात दिसायला लागली आहे. परंतु हा बदल नऊवारी साडी ते सहावारी साडी असा न होता, नऊवारी ते डायरेक्ट फ्रॉक असा घडला. यामुळेच काश्मीर ते कन्याकुमारी या विविधतेने नटलेल्या खंडप्राय प्रदेशात हुबेहुब बार्बीसारखी दिसणारी बाहुली सरसकट विकली जाऊ लागली. कारण भारतातील खेळणी उत्पादकांनी नावीन्याच्या, कलात्मकतेच्या भानगडीत न पडता, जे प्रगत देशात विकलं जात होतं त्याचीच नक्कल करून भारतात विकली. पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली. आता भारतीय बाहुल्या भारतीय चेहर्यांनी हसतायत आणि बाजार देखील त्यांच्या प्रेमात पडलाय.
‘द गुड डॉल’चं उदाहरण पाहा. सुहास आणि सुनीता रामेगौडा यांनी शहरी आयुष्य आणि धकाधकीच्या जगण्यापासून दूर जाऊन निलगिरीच्या डोंगरात साधं पण अर्थपूर्ण जीवन निवडलं. शेती करता करता त्यांना उमगलं की गावातील लोकांना शेतीसोबतच जोडधंदा हवा आहे.
आपल्या कॉर्पोरेट अनुभवाचा उपयोग करून ‘या समाजासाठी काहीतरी करायचं’ हा संकल्प ठरला. पण नक्की काय करायचं हे कळत नव्हतं. एके दिवशी त्यांच्या मुलीने एक प्रश्न विचारला ‘मला आणलेली बाहुली माझ्यासारखी का दिसत नाही?’ आणि हा एक साधासा प्रश्न त्यांना भारतीयत्वाच्या विविधतेला साजेशा डॉल्सची कल्पना देऊन गेला.
सुरुवातीला सॉफ्ट फॅब्रिक डॉल्सची छोटी बॅच तयार झाली. डॉल्सच्या त्वचेचा रंग गव्हाळ, सावळा, जसा भारतातला बहुतेक मुलींचा आहे. याशिवाय पारंपरिक वेशभूषा, गजरा, बिंदी, चुडी, कुरळे केस असं सगळं होतं. या बाहुलीच्या रील्स इन्स्टाग्रामवर वायरल झाल्या. ही बाहुली पाहून मुली म्हणत होत्या, ‘शी लुक्स लाईक मी…’ मग काय या कल्पनेला एक नवा चेहरा मिळाला.
पुढच्या टप्प्यावर सुनीता स्वत: डिझायनर झाल्या. डॉल्सचे कपडे हे केवळ वस्त्र नव्हते, तर अनुभव होते. प्रत्येक राज्याच्या पोशाखांची प्रेरणा घेत, कधी पंजाबची फुलकारी, कधी तामिळनाडूचा कांचीवरम सिल्क, कधी कोकणातली नऊवारी यांचं बालरूप शिवलं गेलं. ही फक्त बाहुल्यांसाठी नव्हे, तर त्या ड्रेस तयार करणार्या महिलांसाठीही क्रांती ठरली. उटीमधल्या एक छोट्या युनिटमध्ये महिलांनी हे कपडे शिवायला सुरुवात केली, तेव्हा फक्त पाचजणी होत्या, आज ९५ महिलांना रोजगार प्राप्त होत आहे. हे काम करून काहीजणी आज त्यांच्या पतींपेक्षा जास्त कमावतात. आणि पुरुषप्रधान संस्कृतीत जे नवरे स्वयंपाकघरात पाय ठेवत नव्हते, ते आज घरगुती कामे करताना दिसतात. ‘द गुड डॉल’ची निर्मिती टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेत वाढतेय, तमीळनाडू, मध्य प्रदेश आणि जयपूरच्या कापड कारखान्यांमध्ये वाया जाणार्या चिंध्या या डॉल्समध्ये रुपांतरित होतायत. ‘सिनर्जी’, ‘ट्रायडंट’सारख्या कंपन्यांसोबत भागीदारी करून हा अपसायकलिंगचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
काही कंपन्या त्यांच्या सीआरएम गिफ्टिंगसाठीही या डॉल्सचा वापर करतात. या सार्या प्रवासात ‘द गुड डॉल’चा ‘नीला’ हा एक नवीन चेहरा उदयास येतोय. निलगिरीत राहणारी ही छोटी मुलगी, तिच्या कुटुंबाच्या, शेताच्या आणि जंगलातील प्राण्यांच्या साहसांनी भरलेली गोष्ट लवकरच क्यूआर कोडवरून ऐकायला मिळणार आहे. हे पात्र केवळ खेळण्यापुरतं मर्यादित नसून, एका कॉमिक सीरिजमध्येही प्रकट होणार आहे.
या क्षेत्रात येणार्या नवीन उद्योजकांना बार्बीसारख्या ग्लोबल ब्रँडशी कॉम्पिटिशन करताना अधिकाधिक लोकल व्हावं लागेल. रूट्स अॅण्ड विंग्स डॉल स्टुडिओ या महाराष्ट्रातील पालघरस्थित कंपनीने हेच केले. हस्तनिर्मित बाहुल्या बनविणारी ही कंपनी भारतीय प्रांतांच्या विविध पारंपरिक विवाहसंस्कृतींचे प्रतिबिंब दर्शवणार्या अत्यंत देखण्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध वधू बाहुल्या तयार करते. प्रत्येक बाहुलीचा पोशाख हाताने शिवलेला असून पारंपरिक साड्या, दागिने, मेंदी अशा तपशीलांसह त्या सजवलेल्या असतात. मराठी नवरी, तमिळ अय्यर नवरी, बंगाली वधू, केरळी नवरी, राजस्थानी राणी अशा विविध शैलीतील बाहुल्या त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत. भारतीय सांस्कृतिक विविधतेचे सौंदर्य जपणार्या या बाहुल्या कलात्मक आणि भावनिक मूल्य असलेल्या स्मृतिचिन्ह बनल्या आहेत. ऑर्डरप्रमाणे ग्राहकांना हव्या तशा बाहुल्या ५००० ते ७००० या किंमतीत बनवून देणे ही या कंपनीची खासियत आहे.
भारतातला बाहुल्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. २०२४मध्ये भारतातील डॉल मार्केटचं एकूण मूल्य अंदाजे ५,००० कोटी रुपये इतकं होतं. ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमेमुळे स्थानिक उत्पादनांना चालना मिळाली असून ‘अॅमेझॉन’, ‘फर्स्टक्राय’, ‘एट्सी इंडिया’ यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर भारतीय डॉल्ससाठी स्वतंत्र विभाग तयार झाले आहेत. विशेषत: नवरात्र, दिवाळी अशा सणांच्या काळात या विक्रीत तीनपट वाढ होते. अनेक खासगी शाळा, प्ले स्कूल्ससुद्धा शैक्षणिक हेतूसाठी भारतीय बाहुल्यांची मागणी करत आहेत.
सोशल मीडियावरही डॉल्स मार्केटिंगची एक वेगळीच नवी दुनिया उभी राहत आहे. ‘इन्स्टाग्राम रील्स’वर ‘शी लुक्स लाईक मी’ अशा पोस्ट्स, कल्चरल ड्रेस-अप व्हिडिओज, ‘यूट्यूब शॉर्ट्स’वर अनबॉक्सिंग, खेळण्याच्या स्टोरीटेलिंग व्हिडिओज, ‘इन्फ्लुएंसर मॉम्स’च्या पॅरेंटिंग पेजेसवरून रेफरल मार्केटिंग आणि ‘इको-कॉन्शस ब्रँडिंग’च्या माध्यमातून ‘झिरो प्लास्टिक’ आणि ‘ऑर्गेनिक फॅब्रिक’ डॉल्सना अधिक पसंती मिळते आहे.
एकूणच, भारतातील बाहुल्यांचं जग सांस्कृतिक वारशाचं जतन करणं, मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडणं आणि व्यवसायाच्या नव्या शक्यतांचं दार उघडणं अशा अनेक स्तरांवर आपलं स्थान घट्ट करतंय. ही केवळ खेळण्यांची गोष्ट नाही, तर ही आहे भारताच्या विविधतेला जागतिक बाजारपेठेत स्थान देणारी हुकमाची राणी.. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर, ‘बाहुली सुनके खिलौना समझे क्या? सिर्फ खिलौना नहीं खिलाडी है ये!’