□ मराठीच्या प्रसारासाठी पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध.
■ हिंदीची नव्हे, राज्यात मराठीची सक्ती करायला हवी, तीही व्यवहारात. नाही तर मराठी माणसंच मराठी भाषा आणि संस्कृतीही विसरून गोपट्ट्याचा भाग बनतील, हा सगळ्यात मोठा धोका आहे.
□ विधानसभा निवडणुकीतील गौडबंगाल महायुतीला भोवणार; फडणवीसांसह सहा सत्ताधारी आमदारांना कोर्टाचे समन्स.
■ गौडबंगाल भोवणार असतं तर यांना मुळात देशाची सत्ता १० वर्षे बळकावून ठेवताही आली नसती आणि तिसर्यांदा सत्ताही मिळाली नसती. सगळे घोटाळे भविष्यात कधी उघडकीला आलेच तर देशाला इतकी वर्षं कसं मूर्ख बनवण्यात आलं ते उघडकीला येईल… अर्थात, देशात तोवर ते समजण्याची बुद्धी शिल्लक राहिली असेल का, हा प्रश्न आहे.
□ घाटकोपरमध्ये मांसाहारावरून मराठी-गुजराती वाद.
■ मराठी माणसांनी मूळ मांसाहारी परंपरा बाजूला ठेवून शाकाहाराचं स्तोम लादून घेतलेलं आहेच. श्रावणापलीकडे, चातुर्मासापलीकडे आणि आपल्या इष्टदैवताच्या वारापलीकडे काहीही न पाळणारा मराठी माणूस आता इतरांच्या सोयीने आहार करू लागला आहे, आपला पारंपरिक आहार, नैवेद्य नाकारून शाकाहार्यांच्या भजनी लागला आहे. त्याची ही फळं आहेत.
□ कोकाटेंचे बदल्यांचे अधिकार फडणवीसांनी काढले; कृषी खात्यातील मनमानीला चाप; मंत्री अतुल सावे यांना दणका; मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली.
■ मित्रपक्षातल्या लोकांना आपल्याच मंत्रिमंडळात सहकारी म्हणून घ्यायचं, मग त्या माणसाच्या कार्यक्षमतेविषयी, सचोटीविषयी शंका निर्माण करून आपण फार स्वच्छ आणि कार्यक्षम आहोत, असा भ्रम सगळीकडे पसरवायचा आणि या सहकार्यांचे अधिकार काढून घेऊन त्यांना फक्त सांगू तिथे सह्या करणारे होयबा बनवायचं, हा केंद्रातला मोदी शहा पॅटर्न आहे. त्याचीच ही महाराष्ट्रीय आवृत्ती आहे फक्त.
□ नाराजी पुन्हा उफाळली; मिंधे पुन्हा ‘दर्या’खोर्यात.
■ आता तिथेच शांतपणे वानप्रस्थाश्रमात राहण्याची तयारी करायला हवी. तुमची गरज आणि महत्त्व यांची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे. इतरांकडे फक्त दोघेच शिल्लक राहतील, अशा गर्जना करत होते. यांच्याकडे तर दुसरा, घरचा तरी सोबत राहील की खोबरं तिकडे चांगभलं करत निघून जाईल, याची गॅरंटी देता येणार नाही.
□ कर्जतमधील चार विद्यार्थिनींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ; प्रकरण दडपण्यासाठी मिंधेंचा दबाव.
■ लाडक्या बहिणींनो, दीड हजार रुपयांच्या भिकेत आपल्या मुलीबाळींची सुरक्षितता का पणाला लावलीत? इतर कुणी केलं की थेट फाशीची मागणी करणारे, बेकायदा एन्काऊंटर करणारे, मानवतेला काळिमा फासणार्या या गुन्ह्यात आरोपींची पाठराखण कशी करू शकतात? त्यात आपले आणि परके असा भेद कसा करू शकतात?
□ देशात मुस्लिमांच्या विरोधात, सौदी-दुबईत मात्र पाहुणचार; ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा.
■ पठाण का बच्चा आहेत ते, इकडून (भरगच्च भरलेला) झोला उठा के निघून जातील, तेव्हा कदाचित तिकडेच आश्रयाला जातील आणि मग त्यांचे भक्त नदीत, समुद्रात उड्या मारतील बहुतेक लाजेने… पण मुळात लाज तर असायला हवी!
□ बिले थकली, आधी पैसे द्या नाहीतर कामे बंद करू – महाराष्ट्रातील ठेकेदार महासंघाचा ठाण्यातील बैठकीत इशारा.
■ सबूर सबूर, हे तुमचंच राज्य आहे. जनतेचं राज्य आहे का? जनतेसाठी, तिची फुप्फुसं मातीसिमेंटने भरणारा बकासुरी विकास सुरू आहे का? तुमच्यासाठी आणि कमिशनखोरांसाठीच राज्य चालवलं जातंय ना? मिळतील पैसे! तुम्हाला निश्चित मिळतील.
□ मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा.
■ फक्त साडेचारशे कोटी? याला काय घोटाळा म्हणतात? नोटबंदी, जीएसटी, इंधन दर, निवडणूक रोखे, पीएम केअर्स फंड, राफेल वगैरेंच्या तुलनेत दात कोरण्याइतका तरी आहे का या घोटाळ्याचा वकूब!
□ बीड पुन्हा हादरले; ध्वनिप्रदूषणाविरोधात लढणार्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण.
■ चूक त्या महिलेची आहे. आपण वकील आहोत, तर सगळीकडे कायद्याचं राज्य असलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांना त्रास देणारे उपक्रम कायदा सुव्यवस्था राखणार्यांनी थांबवले पाहिजेत, असल्या भाकड कल्पना या बाईंनी का जोपासल्या? त्याही बीडमध्ये राहात असताना?
□ भाजपला सर्वाधिक देणग्या देणार्या हैद्राबादच्या मेघा इन्फ्रास्ट्रक्चरवर जलविद्युत प्रकल्पांची खैरात.
■ सगळा देश ज्यांच्या गाठीला बांधला आहे त्या एकट्या मालकावर किती बोजा टाकणार? काही गोष्टी इतरांनाही विभागून द्याव्या लागतात. आपल्यासाठी जो इतकं करतो त्याच्यासाठी काही करणं हे आपलं कर्तव्य आहे. सगळी चोर कंपनी चोरीच्या धंद्यात अतिशय इमानदार असतेच ना!
□ समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची लगीनघाई; शेतकर्यांना मोबदल्याची फुटकी कवडी नाही.
■ शेतकरी? ते काय करतात? झाल्या, गेल्या जमिनी त्यांच्या. आता चकरा मारत बसा. सत्तेतली चोर कंपनी आपल्याला न्यायाने काही देईल, ही कल्पना करून का घेतली मुळात त्यांनी?