प्रसाद ताम्हनकर
सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
डिटॉक्सची सुंदर दुनिया!
प्रश्न : ताई, मागच्या वेळी तू जे डिटॉक्स प्रकरण सांगितले ते काय होते?
उत्तर : लाडक्या भाऊराया, डिटॉक्स अर्थात डिजिटल डिटॉक्स म्हणजे मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या पडद्यापासून, अगदी कोणत्याही स्क्रीनपासून लांब राहणे. यामुळे आपल्या डोक्याचा त्रास कमी होतो आणि आपल्यामुळे लोकांच्या डोक्याला होणारा त्रास देखील कमी होतो. ही एक प्रकारची विपश्यना आहे, असे म्हणालास तरी हरकत नाही. ही प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवीच हवी. यामुळे मानसिक स्वास्थ्य प्रचंड सुधारते, मानसिक तणाव दूर होतात, चिडचिड कमी होते आणि एक प्रकारची स्वस्थता मिळते. डोळ्यांचे आजार, पाठदुखी, मानदुखी यांना आळा बसतो. मोबाइल आणि कॉम्प्युटरशिवाय देखील लोकांशी संवाद साधता येतो, गप्पा हाणता येतात, मौजमजा करता येते, याचे नवे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. स्क्रीनच्या पलीकडे एक सुंदर जग आहे याची पुन्हा जाणीव होते. देशात संपूर्ण गावंच्या गावं असे डिजिटल डिटॉक्स अनुभवायला लागली आहेत आणि त्याचे फायदे मिळवायला लागली आहेत, अशा वेळी आपण तरी मागे का राहावे? स्वत:च्या मानसिक स्वास्थ्यासाठी नाही तर निदान आपल्या अनुपस्थितीमुळे इतरांना मिळणार्या समाधानासाठी तरी एकदा हा अनुभव घ्यावाच.
– डिटॉक्स सोमी
आधी करा, मग सांगा!
प्रश्न : सोमीताई, माझ्या लहान मुलाला मोबाइलचे प्रचंड व्यसन लागले आहे. त्याला सतत हातात मोबाइल हवा असतो. कोणाचाही फोन आला तरी त्याला उचलायचा असतो. बोलता येत नाही तरी हूं हूं करत राहतो. सतत त्याला स्क्रीनवर गाणी किंवा कार्टून बघायची असतात. मी काय करू?
उत्तर : लाडक्या भगिनी, एका गावात एक जमीनदार राहत होता. जमीनदार मोठा तालेवार, शेकडो एकर जमीन, शंभर सव्वाशे गडी माणसं कामाला, चौपसी वाडा असा मोठा थाट होता. जमीनदाराला गावात मोठा मान सन्मान होता. इतके सगळे असूनही जमीनदार सतत काळजीने ग्रस्त असायचा, त्याची तब्येत देखील खंगायला लागली होती. रात्री झोपेने असहकार पुकारला होता, त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे उमटायला लागली होती. जमीनदाराच्या दिवाणजींनी एक दिवस धाडस करून जमीनदाराला काळजीचे कारण विचारले. म्हणाले, ‘रावसाहेब, आपली सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. मी स्वत: हिशेब बघतो, त्यामुळे तुमच्या पुढच्या चार पिढ्यांना कसली ददात नाही हे देखील जाणतो. तुमचे आणि कुटुंबातील सर्वांचे आरोग्य देखील उत्तम आहे. पुढच्या आठ दहा वर्षात एकुलता एक मुलगा देखील हाताशी येईल. असे सगळे असताना, तुम्हाला नक्की चिंता तरी कशाची लागली आहे?’
जमीनदाराने एक उसासा सोडला आणि म्हणाला, ‘दिवाणजी पुढच्या सात पिढ्यांचे सोडा, मला माझ्या पुढच्या पिढीची चिंता लागली आहे. एवढा चांगला मुलगा देवाने दिला आहे. हुशार आहे, गुणी आहे. पण त्याला साखर खायची अत्यंत वाईट सवय लागलेली आहे. जाता येता, उठता बसता त्याला सतत साखर खायची असते. आधी आम्हाला गंमत वाटली पण आता त्याचे व्यसनात झालेले रूपांतर पाहून धास्ती वाटायला लागली आहे. साखर द्यायला नकार दिला तर तो चिडतो, संतापतो, आदळआपट करतो. काल तर चक्क आईच्या अंगावर धावून गेला. सतत साखर खाऊन त्याचे दात किडायला लागले आहेत. अंगात स्थूलपणा यायला लागला आहे. अभ्यासात मागे पडू लागला आहे. काय करावे काही सुचत नाही.’ दिवाणजींनी थोडा विचार केला आणि म्हणाले, ‘रावसाहेब, गावाबाहेरच्या अरण्यात एक मुनी राहतात. मोठे तपस्वी आणि ज्ञानी आहेत. आपण त्यांचा सल्ला घ्यावा.’
जमीनदाराला सल्ला एकदम पटला. त्याच दिवशी त्यांनी सहकुटुंब जाऊन तपस्वींचे दर्शन घेतले. एकांतात त्यांना आपली अडचण सांगितली. तपस्वी काही वेळ मौन राहिले आणि म्हणाले, ‘चार दिवसांनी त्याला माझ्याकडे घेऊन या.’ झाले, चार दिवसांनी पुन्हा जमीनदार सहकुटुंब दर्शनाला हजर झाले. तपस्वींनी जमीनदाराच्या मुलाला जवळ बसवले आणि मायेने समजावले. ‘बाळा, कोणतीही गोष्ट अती प्रमाणात करणे वाईट. त्याने दुष्परिणाम भोगायला लागतात. साखरेचे व्यसन कमी कर.’ सल्ला ऐकून आणि दर्शन घेऊन सगळे परतले. काय आश्चर्य काही दिवसात जमीनदाराच्या मुलाचे साखरेचे व्यसन पूर्णपणे सुटले. जमीनदाराला प्रचंड आनंद झाला. तो धावत धावत तपस्वींकडे गेला आणि लोटांगण घातले. सर्व काही कथन केल्यावर जमीनदार विचारता झाला, ‘मुनीवर तुम्ही त्याला फक्त दोन समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचे व्यसन पूर्ण सुटले. पण हे तुम्ही त्याला पहिल्या दिवशी देखील सांगू शकला असतात. मग तुम्ही चार दिवसांनी का बोलावलेत?’ तपस्वी प्रसन्न हसले आणि म्हणाले, ‘मला स्वत:ला खूप साखर खायची सवय होती. अशावेळी मी त्याला कोणत्या अधिकाराने सल्ला देणार? आणि त्या सल्ल्यात खरेपणा किती असणार? म्हणून चार दिवसात मी आधी माझी सवय मोडली आणि मग त्याला सल्ला दिला.’ तुम्ही नवरा बायको देखील चार दिवस सवय सोडून बघा…
– तपस्वी सोमी
भविष्याची धास्ती नको, खात्री हवी!
प्रश्न : सोमी, आजकाल रोज जगावर भयंकर संकट येणार असल्याचे सांगत असतात. टीव्ही, सोशल मीडिया, वर्तमानपत्राच्या वेबसाइट सगळीकडे तेच चालू असते. यात कितपत तथ्य आहे? सतत या असल्या गोष्टी पसरवून आपण लोकांना घाबरवत आहोत, धास्तावलेल्या लोकांची धास्ती अधिक वाढवत आहोत हे या लोकांच्या लक्षात येत नाही का? नक्की काय साध्य होते या सगळ्यातून?
उत्तर : खरे तर या अशा लोकांमुळे जग संकट में है! बरं, हे काही आजचे आहे असे नाही. पूर्वी देखील जगात एखादा महापूर आला, विनाशकारी भूकंप झाला, वणवा पसरला किंवा कोणतीही मोठी दुर्घटना घडली की तिचे भाकीत अमक्या तमक्याने कित्येक वर्षांपूर्वी कसे करून ठेवले होते याचे दाखले देणारे महाभाग लगेच हजर होतात. दोन तासात कुंडली बनवून देणारा आणि भूत भविष्य सांगणारा एक महाभागाने ‘बाबा वेंगा नावाचा महान भविष्यवेत्ता’ अशा शीर्षकाचा एक लेख काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर लिहिला होता. बाबा वेंगा ही एक स्त्री होती हे ज्याला माहिती नाही, तो त्यांच्याविषयी ज्ञान पाजळत होता. बाबा वेंगा, नॉस्ट्रॅडेमस, भविष्य पुराण यांचे दाखले देत अनेक लोक आपली पोळी भाजून घेत असतात. या लोकांचे, त्यांच्या लेखनातले कोणतेही एक वाक्य उचलायचे आणि त्याचा बादरायण संबंध जोडायचा हे यांचे काम. हजारो लोक बुद्धी गहाण ठेवून यांच्या नादाला लागतात आणि अशा फसव्यांना अधिक स्फुरण चढते.
कोरोनाच्या एका लहानशा विषाणूने जगभरात जो काही धुमाकूळ घातला, तो अनुभवूनही लोकांना अक्कल येत नाही हे दुर्दैव आहे. ज्या लोकांनी आरोग्याची, स्वच्छतेची काळजी घेतली, सरकारी नियमांचे पालन केले त्यांना कोरोनाचा फार मोठा फटका बसला नाही. त्यांचे भविष्य त्यांनी स्वकाळजीने निरोगी ठेवले. कोरोनाची भविष्यावाणी कोणी करून ठेवली होती आणि पुढे काय घडणार आहे याची काळजी ते करत बसले नाहीत. कोणी भविष्यावाणी केली म्हणून काही घडत नसते तर जगभरात घडणार्या दुर्घटनांना बहुतांश वेळा मानवी चूक जबाबदार असते. तुम्हाला भविष्याची स्वप्ने दाखवत दाखवता स्वत:च्या भविष्याची तरतूद करणार्यांपासून चार हात लांब राहा. चार हातच का लांब राहायचे? चार हा आकडा शुभ का आहे? तुमच्या पत्रिकेत चार आकड्याचे महत्त्व काय आहे? हे जाणून घ्यायचे असेल तर माझ्या नंबरवर ५०० रुपये पाठव आणि सर्व काही एका क्लिकवर जाणून घे.
– सॉम्स्ट्रॅडेमस
सगळ्यांना सगळ्याच्या शुभेच्छा!
प्रश्न : सोमीताई, प्रत्येक सणाच्या, जयंतीच्या, दिवसाच्या शुभेच्छा देणे गरजेचे आहे का? सुजाण लोकदेखील असे वागताना बघून वैषम्य वाटते.
उत्तर : सुजाण किंवा अजाण कोणी असो, त्याने कसे वागावे हा त्याचा अधिकार आहे. पण आपण जसे वागतो तसे समोरच्याने देखील वागावे असा जो त्यांचा आग्रह असतो, त्याचे खरे वैषम्य वाटते. व्हॉट्सअपच्या एका ग्रुपमध्ये एकाने गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याला दोन लोकांनी लाइक दिले. शुभेच्छा देणारा लगेच गरजला, ‘का? शुभेच्छा द्यायची लाज वाटते का? हिंदुस्थानी आहात ना?’ काय बोलावे अशा लोकांना? आता देशाचा नागरिक आहे हे पटवून देण्यासाठी शुभेच्छा आली रे आली की लगेच सगळ्यांनी तिच्यावर शुभेच्छा देणे गरजेचे आहे का? लाइक करणारे काही कामात असतील किंवा फोटो वगैरे टाकून शुभेच्छा देणार असतील किंवा अगदी नसेल त्यांना देशभक्ती दाखवायची हौस… त्यावर त्यांची देशभक्ती अवलंबून आहे का?
‘जय शनी देव! शनी देवांचा हा फोटो लाइक करा अन्यथा त्यांच्या क्रोधाला सामोरे जा!’ असे काही वाचले, की मला शनी देव लॅपटॉप उघडून बसलेले आहेत. शेजारी त्यांचा कावळा मोठ्या बारीक नजरेने स्क्रीनमध्ये डोकावत आहे आणि ‘प्रभू ती बघा सोमी.. लाइक न करता पुढे गेली स्क्रोल करून’ असे त्यांचे कान भरत आहे आणि मग शनी देव ‘थांब.. गाडी पंक्चर करतो आता तिची. म्हणजे उशीर होईल आणि ती जाईपर्यंत बँक बंद होईल’ असे क्रोधाने बोलत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर साकारते. सोमवारी ‘जय शंभो’पासून झालेली सुरुवात रविवारी ‘गणपती बाप्पा मोरया’पर्यंत अखंड सुरू असते. पुरातन काळी राक्षस लोक शंभर-शंभर वर्षे तपस्या करत असत म्हणे. शंभर वर्षात ते जितके नम:स्मरण करत असतील तितके आजकालचे स्वयंघोषित देवभक्त एक दिवसात सोशल मीडियावर पूर्ण करत असतात.
दिवसातून चार वेळा स्वामी, बाबा, देवी, देव यांचे दर्शन घडवणारे, दिवसातून चार वेळा लोकांना साईचे दर्शन घडवले नाही तर पाप लागेल या भावनेने फोटोंची आरास मांडणारे, आपल्या एकट्यावर नको तर सर्वांवर देवाची कृपा असावी या उदात्त भावनेने मोठे आणि भव्य मंडप उभारून सोहळे साजरा करणारे, सतत वाईट शब्दांचा आणि निराशाजनक वाक्यांचा कानावर पडणारा वावर दूर व्हावा या सदहेतूने स्पीकर्सच्या भिंती उभ्या करून लोकांचे कान तृप्त करणार्या, रात्र-रात्र आपल्या नृत्याविष्काराने लोकांचे डोळे सुखावणार्या सर्वांनाच आपण वंदन करत राहावे आणि आयुष्याचे रहाटगाडगे फिरवत राहावे.
आणि हो, सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले त्या दिवसाच्या शुभेच्छा!
– सर्वभक्त सोमी