बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे मुखपृष्ठचित्र आहे १९६२ सालातलं. ते तेव्हाच्या पद्धतीचे रंग वापरणारं आहे, हे एक वैशिष्ट्य आहे या चित्राचं. नंतर शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना अधिक बसले, कारण ते शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार होते. तत्पूर्वी मात्र त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही मुखपृष्ठं चित्रित केली होती, आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती. इथे संदर्भ आहे १९६२च्या भारत-चीन संघर्षाचा, चीनने आक्रमण करण्याआधीचा. त्यात चीन भारताच्या पंतप्रधानांच्या, पं. नेहरूंच्या खुर्चीखाली बाँब लावतो आहे आणि ते त्याचवेळी त्याच्या कमरेवर बाँब ठेवत आहेत, असं चित्रण बाळासाहेबांनी केलं आहे. तेव्हाचे भारताचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन आता स्फोटाच्या आवाजाने कानाचे दडे बसायला नकोत म्हणून कानांत बोटं घालून उभे आहेत. आज बाळासाहेब असतं तर असंच चित्र त्यांनी रेखाटलं असतं, पण त्यात भारताच्या जागी असले असते ट्रम्प. अमेरिकेच्या या अध्यक्षाने मूर्खपणाचा कळस चालवलेला आहे आणि त्याच्या वेडगळ टॅरिफ नीतीला चीनने अजिबात भीक घातलेली नाही. अमेरिकेने चीनच्या विरोधात व्यापारयुद्ध छेडावं आणि चीनने त्याला जशास तसं उत्तर द्यावं, इतका चीन मोठा झाला आहे, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. इथे मेनन यांच्या जागी सगळं जगच कानात बोटं घालून उभं आहे… या दोन महासत्तांमधल्या संभाव्य संघर्षस्फोटाच्या हादर्याने सगळं जगच डळमळणार आहे.