सर्कशीतला विदूषक राजवाड्यात आला की तो राजा बनत नाही, राजवाड्याची सर्कस बनते.
– तुर्कस्तानी म्हण
अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी डोनाल्ड ट्रम्प दुसर्यांदा विराजमान झाल्यामुळे अनेक देशांच्या प्रमुखांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. आपला देशप्रमुख किती विद्वेषाने भरलेला आहे, केवढा भ्रष्ट आहे, किती वाह्यात बडबड करतो, किती सडकछाप भाषा वापरतो, किती आचरट, असंवेदनशील, मूर्ख आणि अहंमन्य आहे, अशा ज्या काही तक्रारी त्यांच्याबद्दल त्यांच्याच देशातले लोक करत असतील, त्या सगळ्या आता थांबल्या असतील. तक्रारी करणारे ट्रम्पकडे पाहून दु:खाने मान हलवून म्हणत असतील, अरे, याच्यापेक्षा आपलं ध्यान बरंच बरं म्हणायचं! ते अजून एवढं घसरलेलं नाही!
असं नेमकं काय केलंय ट्रम्प तात्यांनी?
काय केलं नाही ते विचारा.
विचार करा, अमेरिकेचा अध्यक्ष जाहीरपणे म्हणतो, विविध देशांचे प्रमुख मला धडाधड फोन करतायत आणि (रेसिप्रोकल
टॅरिफमधून सूट मिळावी म्हणून) ते माझा पार्श्वभाग चुंबायला तयार आहेत (ट्रम्पइतका असभ्यपणा आपण करू शकत नाही, म्हणून इथे सभ्य प्रतिशब्द वापरले आहेत, ट्रम्पची मूळ भाषा अश्लील आणि गलिच्छच आहे). जगातल्या एका महाशक्तीचा अध्यक्ष, जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे अमेरिकेचा अध्यक्ष. या पदाची गरिमा कमी करणारे अध्यक्ष अमेरिकेने याआधीही पाहिले आहेत. जॉर्ज डब्ल्यू. बुश अर्थात डुब्या हे त्याचं सगळ्यात अलीकडचं उदाहरण. पण या पदाची सगळी गरिमा एकहाती गटारात बुडवून टाकण्याचा अभूतपूर्व पराक्रम मात्र ट्रम्प यांच्याच नावावर नोंदवला जाईल.
या गृहस्थाला दुसर्यांदा संधी मिळाली तर तो अमेरिकेचंच नव्हे तर जगाचंही वाटोळं करील अशी भीती शहाणी माणसं व्यक्त करत होती. पण सध्याचा काळ शहाणपणाला पोषक नाही. सगळ्या जगावरच बेअक्कल द्वेषाचं एक भूत स्वार झालेलं आहे. मनुष्य तितुका एक इथपासून माझ्या देशातले गोरे तेवढे एक इथपर्यंत अमेरिकेची घसरण झाली आहे. अर्थात, आपण त्यांना हसता कामा नये, आपणही मनुष्य तितुका एक ते आमची विशिष्ट आडनावांची पोटजात तेवढी एक एवढा र्हास करून दाखवलेला आहेच की! अवदसा आठवल्याप्रमाणे अमेरिकनांनी ट्रम्प यांना निवडून दिलं आणि ट्रम्प यांनी ही भविष्यवाणी खरी करण्याचा विडा उचलल्याप्रमाणे टॅरिफ वॉर नावाचा बालिश प्रकार सुरू केला. प्रत्येक देश बाहेरून येणार्या मालावर इम्पोर्ट ड्यूटी म्हणजे आयात कर लावतो. तेच टॅरिफ. आपल्या देशातल्या शेतकर्यांना, उत्पादकांना परदेशी स्वस्त मालाशी स्पर्धा करायला लागू नये, म्हणून हे टॅरिफ लावलं जातं. सगळेच देश ते लावतात. पण, प्रत्येक देशाला आपल्या देशात तयार झालेला माल बाहेर विकायचाही आहेच की! आपण फक्त येणार्या मालावर कर लावू, बाहेर जाणारा माल मात्र करमुक्त राहील, असं कसं होणार? म्हणून सगळे देश परस्परांशी चर्चा करून सामंजस्याने टॅरिफ ठरवतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे ठरवण्याचं काम जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) करते.
अमेरिकेत पगार आणि अन्य खर्चांमुळे उत्पादन खर्च इतका आहे की तो देश बराचसा माल आयात करतो आणि काही उत्पादनांचा कच्चा माल, सुटे भाग आयात करून फक्त असेंब्ली देशांतर्गत करतो. त्यामुळे आयात अधिक आहे. त्याचबरोबर जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून त्यांच्याकडून काही देशांना सूट दिली जाते, कमी टॅरिफ आकारलं जातं. त्यामागे अर्थकारणापलीकडे, व्यापारापलीकडे काही दूरगामी विचार असतात. ट्रम्प तात्यांनी हे सगळं गुंडाळून तुम्ही जेवढा टॅरिफ लावता, तेवढाच आम्हीही लावणार, असली अडाणी दंडेली सुरू केली. अमेरिकेसारख्या, जगाचं आर्थिक इंजीन असलेल्या देशाने असं काही सुरू केलं तर ती जागतिक मंदीची नांदी ठरू शकते. याआधी अमेरिकेने दोन वेळा हा प्रकार करून झाला आहे आणि दोन्ही वेळा त्यातून आर्थिक मंदी उद्भवली आहे. आताही टॅरिफ जाहीर होण्याच्या दिवशी जगभरात ब्लॅक मंडेचा हाहाकार उडाला, सगळीकडचे शेअर बाजार धडाधड कोसळले. खुद्द अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. तिकडची मंडळी रस्त्यावर उतरली. बाजार पडला आहे तर खरेदी करून घ्या अशी (आपल्याकडेही निवडणुकीच्या आधी दिली गेलेली) टिप दिली तात्यांनी सगळ्या अमेरिकनांना. गिरे तो भी टांग उपर!
भारतासारखे काही मोजके देश वगळता अनेक देशांनी या दादागिरीला जशास तसं उत्तर देण्याची हिंमत केली. चीनने तर दंडच थोपटले. तेव्हा हे तात्या सांगत होते की माझ्याकडे इतर देशांचे प्रमुख दयेची भीक मागतायत, ते माझ्या पार्श्वभागाचं चुंबन घ्यायला तयार आहेत. असं होतं तर दुसर्याच दिवशी एकट्या चीनचा अपवाद करून तात्यांनी टॅरिफच्या अंमलबजावणीवर ९० दिवसांचा पॉझ का लावला? चीनवर आज अमुक टॅरिफ, उद्या त्याहून अधिक टॅरिफ असा बालिशपणा कशाकरता चालवला? यातून चीनला काही धडा मिळतो आहे, तर तसंही नाही. उलट चीनने रूद्र ड्रॅगन अवतार धारण करून ट्रम्प यांच्या पार्श्वभागावर चटके देणारे आगीचे फुत्कार सोडणं सुरू केलं आहे.
बरं, या गृहस्थाचं काय खरं मानायचं?
एक बार मैने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता, हा वेडगळ बाणा खरा धरून चालावं तर दुसर्या दिवशी तात्या पॉझ जाहीर करून मोकळे होणार. जगभरातल्या देशांना प्रश्न पडलाय की आपल्या मालाच्या किंमती नेमक्या निश्चित तरी कशा करायच्या? तात्या उद्या उठून पॉझला पॉझ देऊन पुन्हा टॅरिफ पे टॅरिफ लावणार नाही, याची खात्री त्यांचा जो कोणी ब्रह्मदेव असेल, तोही देऊ शकणार नाही.
मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणा तात्यांनी दिली होती. ती लिहिलेल्या टोप्याही मेड इन चायना आहेत आणि त्यांची मागणी आता इतकी घसरली आहे की त्यांचे सेल लागले आहेत. चीनवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करणारे टी शर्टही चीनमध्येच बनवले गेल्याची चर्चा आहे.
अमेरिका आधी ग्रेट होतीच.
विदूषकाला निवडून देऊन अमेरिकनांनी तिची द ग्रेट अमेरिकन सर्कस बनवून टाकली आहे.