बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे मुखपृष्ठचित्र आहे १९७४ सालातलं. काही काळापूर्वी काँग्रेसचे दोन तुकडे झाले होते. इंदिरा गांधी यांच्याशी निष्ठावंत असलेल्या मंडळींचं इंडिकेट आणि त्यांच्या विरोधकांचं सिंडिकेट अशी ही दुफळी होती. सिंडिकेटमधले काही लोक इंडिकेटमध्ये घुसले होते. त्यांचा माजोरीपणा वाढलेला होता. या सगळ्या गोंधळात देशातली लोकशाही धोक्यात आली होती. तेव्हा ती प्रस्थापित होऊन जेमतेम २७ वर्षं झाली होती. त्यामुळे तिच्यासाठी बाळासाहेबांनी कुंडीतल्या रोपाची योजना केली आहे. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वर्तनातून लोकशाहीचं सिंचन केलं पाहिजे. म्हणून पाइपने दिलं जाणारं पाणी ही प्रतिमा त्यासाठी वापरली आहे. हे पाणी जर मुजोरीने, अधिक दाबाने, जोराने रोपांवर फवारलं गेलं तर ती रोपं टिकतील का? मुळापासून उखडलीच जातील ना? इथे इंदिराजी झाडांना पाणी घालताना उमाशंकर दीक्षित या विश्वासू सहकार्याला विचारतायत की आपण इतकी काळजी घेतो तरी असं का होतं? का होतं ते चित्रात दिसतंयच… पण किमान तेव्हा इंदिराजींना लोकशाहीची काही काळजी होती. आज लोकशाहीचं झाड मुळापासून उखडण्याचा कार्यक्रम चालला आहे आणि त्यासाठी पाण्याचा फवारा नाही, बुलडोझरच फिरवला जातो आहे. बाळासाहेबांनी आजच्या काळातल्या परिस्थितीचं कसं चित्रण केलं असतं? त्यांच्या कुंचल्याने सत्तेवर केवढे तिखट हल्ले चढवले असते?