(खिशातला मोबाइल वाजला आणि नेहरू जाकीटातल्या व्यक्तीचं बकध्यान तुटलं… हा नंबर ज्यांच्याकडे आहे असे जगात एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक होते. म्हणजे फोन महत्त्वाचा होता… मोबाइलवरचं नाव पाहताच जाकीटवाल्या व्यक्तीचा चेहरा उजळला… अब आया ऊँट पहाड के नीचे…
मी भेटायला गेलो होतो तेव्हा कसा वागला होता हा माणूस… असो.)
‘हॅलो डोलांड माय फ्रेंड, हाऊ आर यू?’
‘आयम फाइन आयम फाइन. मिस्टर मोडी. मला वाटतं तुम्हाला इंग्लिश शब्द सापडेपर्यंत इकडे माझ्या फोनचं टॅरिफ मलाही परवडणार नाही इतकं वाढेल. आपलं बोलणं मार्मिकच्या वाचकांना कळलं पाहिजे. त्यामुळे हे संभाषण आपण मराठीतून करू या का?’
‘का नाही, का नाही? महाराष्ट्र से मेरा पुराना रिश्ता…’
‘मिस्टर मोडी, हे सगळं महाराष्ट्राच्या इलेक्शनसाठी राखून ठेवा. सध्या मी काय सांगतोय ते ऐका. आयम इन अ फिक्स!’
‘हां हां. तुम्ही म्हणाल ते फिक्स. एकदम फिक्स…’
‘मिस्टर मोडी, आयम इन अ फिक्स म्हणजे मी अडचणीत सापडलेलो आहे. माझ्या देशात माझ्याविरोधात आंदोलनं सुरू झालेली आहेत. लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत…’
‘(गालातल्या गालात हसत) ओ माय गॉड! हे कधी झालं, कशामुळे झालं, थायलंडमध्ये असताना माझं इतर कशात म्हणजे बातम्या वगैरे पाहण्यात लक्षच नव्हतं… ऑफिशियल कार्यक्रमच खूप होते ना!’
‘यू सी मिस्टर मोडी, आय हॅव अ फ्रेंड. इलॉन मस्क.’
‘हो हो हो, आय नो आय नो! त्यांच्या मुलांनी माझी दाढी खेचून पाहिली होती. गोड मुलं आहेत आणि गर्लफ्रेंड पण…’
‘दॅट इज नॉट द पॉइंट, मी आणि मस्क मिळून आमचा देश चालवतो आहोत…’
‘शेम शेम…’
‘व्हॉट?’
‘मला म्हणायचं होतं सेम सेम. आमच्याकडे पण मी आणि माझा उद्योगी मित्र मिळून असाच देश चालवतो…’
‘पण आमच्याकडच्या नतद्रष्ट लिबरल, डेमोक्रॅटिक, बुद्धिमान लोकांना हे पटत नाही. आम्ही सगळ्या जगात क्रांती घडवतो आहोत, अमेरिकेला ग्रेट बनवतो आहोत, हे त्यांना कळतच नाही…’
‘(हुंदके देत) आमच्याकडे पण हीच अवस्था आहे. फक्त आमच्याकडे एक बरं आहे, डोक्यावर पडलेले किंवा मेंदू आमच्या विचारसरणीच्या चरणी गहाण ठेवलेले लोक बरेच आहेत आणि त्यांचाच आवाज सगळीकडे पोहोचत राहील, अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. तरी हे लिबरल लोक आम्हालाही शिव्या घालत असतात. पिकतं तिथे विकत नाही, हेच खरं.’
‘व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू… मी दोन दिवसांपूर्वीच सगळ्या जगाला कडू औषधाचा डोस दिला आमच्या रेसिप्रोकल टॅरिफच्या माध्यमातून…’
‘आम्हालाही दणके बसलेच आहेत तुमच्या त्या अनर्थनीतीचे.’
‘आता आमच्या औषधाने सगळं जग खडखडीत बरं होईल आणि मग त्याचं सगळं क्रेडिट मला मिळेल म्हणून माझे सगळे विरोधक एकवटलेले आहेत… तो जॉर्ज सोरोस आहे ना?…’
‘हो हो, आमच्याकडे पण आम्हाला विरोध करणार्या सगळ्यांना तो पैसे पुरवतो…’
‘तोच. त्याने सगळ्या विरोधकांना पैसा पुरवलाय. देशातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यांवर उतरले आहेत आणि आम्हा दोघांना शिव्या देत आहेत… या सगळ्या लोकांना कसं आवरायचं मला कळत नाही… आय गॉट टु नो की तुम्ही इंडियामध्ये अशा सिच्युएशन्स एकदम इफेक्टिवली हँडल करता म्हणून…’
‘तेवढंच तर करतो आम्ही… सिच्युएशन निर्माण करतो, हँडल करतो… दुसरं येतंय काय? मला सांगा, तुमच्याकडे सोशल मीडिया आहे ना? एक्स तर मस्कच्याच मालकीचं आहे. सगळीकडे या सगळ्या आंदोलन करणार्या लोकांना देशद्रोही डिक्लेअर करून टाका…’
‘ओके. नोटेड.’
‘(मनातल्या मनात : आपदा में अवसर शोधला पाहिजे…) खिळे आहेत का तुमच्याकडे मोठेमोठे… नसतील, कमी असतील तर माझ्या फ्रेंडच्या दुकानातले पाठवून देतो. वापरलेले आहेत, पण भाव कमी करून पाठवतो लगेच… सगळ्या शहरांमधल्या रस्त्यांवर ठोका ते खिळे…’
‘त्याने काय होईल?’
‘आंदोलक त्या रस्त्यांवरून चालतील कसे? घरातच बसायला लागेल ना त्यांना? त्यातही काही वेगळ्या रस्त्यांनी गोळा झालेच तर त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारा… इतक्या जोरात की दूर उडूनच गेले पाहिजेत… तुमच्या पोलिसांच्या हातात दांडकी द्या आणि सांगा, यात कोणी तुमचा भाऊ आहे, बहीण आहे, आई आहे, बाप आहे, असा विचार करायचा नाही… सगळे तुमचे शत्रू आहेत, असं समजायचं आणि डोकी फोडायची… रक्त रक्त वाहायला पाहिजे रस्तोरस्ती… ते पाहिलं की घरातून बाहेर पडण्याची इतरांची खुमखुमी जिरेल…‘
‘बेस्ट बेस्ट… आणखी सांगा…’
‘जमलं तर सगळी गर्दी छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये कोंडली जाईल असं पाहा… तुमच्याकडे तो एक प्रॉब्लेम आहे… फार मोठे रस्ते बनवून ठेवता तुम्ही… मग आंदोलनं होणारच ना?… गल्ल्या शोधा, त्यात कोंडा, चेंगराचेंगरीत मरतील भरपूर माणसं…’
‘ओहोहो, जबरदस्त आयडिया… आता मी जातीनं सगळीकडे जातो आणि ही सगळी व्यवस्था करतो…’
‘अं अं अं… माय फ्रेंड डोलांड… ही चूक कधीही करायची नाही… आपण कुठेही जायचं नाही… जळू दे आपलाच देश जळला तर… मरू देत आपलीच माणसं मेली तर… आपण त्याची दखलच घ्यायची नाही… मस्त फिडल वाजवत बसायचं…’
‘फिडल?… ते नाही माझ्याकडे…’
‘डोन्ट वरी, मी पाठवून देतो ना माझ्याकडचं… शेवटी जिवलग मित्र असतात कशासाठी?’