कोरोनाच्या महामारीमुळे सुरक्षिततेचा पर्याय म्हणून बहुतेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना ’वर्कफ्रॉम होम’ची मुभा दिली आहे. परंतु ’वर्कफ्रॉम होम’ची सवय आता नोकरदारांना आवडू लागल्याचे दिसतेय. तब्बल 53 टक्के हिंदुस्थानातील नोकरदारांनी ‘वर्क फ्रॉम होम’ कायमस्वरूपी मिळावे यासाठी चक्क नोकरी बदलण्याची तयारी दर्शवल्याचे सॉफ्टवेअर फर्म सेल्सपर्ह्सने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच काहींनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय मिळाल्यास कमी पगारातही काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
नोकरदारांचा कल जाणून घेण्यासाठी सेल्सफोर्सने केलेल्या या सर्वेक्षणात दहा देशांमधील वीस हजार नोकरदारांची मत जाणून घेतली होती. त्यात तब्बल 4 हजार हिंदुस्थानी नोकरदारांचा समावेश होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 79 टक्के नोकरदारांच्या मते कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. सेल्सफोर्स इंडियाचे उपाध्यक्ष डल्स कृष्णन म्हणाले, जागतिक महामारीच्या संकटातही बडय़ा कंपन्या आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत. ग्राहकांसोबत कर्मचाऱयांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्यासाठी हा फायदेशीर पर्याय आहे.
– ’वर्क फ्रॉम होम’संदर्भात इंडिडने मे महिन्यात सर्वेक्षण केले होते. त्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत ’वर्क फ्रॉम होम’ शोधण्याच्या प्रमाणात 377 टक्के वाढ झाल्याचे आढळले होते.
सौजन्य : दैनिक सामना