बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेली ही जत्रा आहे इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीपूर्व काळातली. विषय आहे एप्रिल फूल. दर वर्षी एक एप्रिल रोजी एकमेकांना काहीतरी निरुपद्रवी बनवाबनवी करून गंडवण्याचा प्रकार जगभरात चालतो. त्याला एप्रिल फूल म्हणतात. अलीकडे लोक तो उत्साहाने साजरा करताना दिसत नाहीत. वर्षाचे बारा महिने चकली, शंकरपाळी, लाडू मिळू लागले की दिवाळीच्या फराळाची गंमत संपते, त्याचप्रमाणे लोकांना वर्षाचे बारा महिने मूर्ख बनवलं जात असल्यावर एप्रिल फूलची काय मजा असणार? इथे फूल्स कॅप ही एक ‘प्रॉपर्टी’ वापरून बाळासाहेबांनी एप्रिल फूलचा खेळ एखाद्या चित्रपटासारखा रंगवला आहे. तेव्हाचे सत्ताधारी स्वत:ची आणि जनतेची फसवणूक कशी करत आहेत, ते इथे दिसतं, त्याचप्रमाणे विरोधकही दिवास्वप्नांमध्ये रमलेले दिसतात. तेव्हा स्वातंत्र्याला जेमतेम २५ वर्षे झाली होती… स्वातंत्र्यानंतरची ७० वर्षे सत्ताधार्यांनी तुम्हाला मूर्ख बनवलं, असं सांगून सत्तेवर आलेल्यांनी अमृतकाळात जे काही जुमला सरकार चालवलेलं आहे, ते पाहिल्यावर सर्वसामान्य नागरिकांची या जत्रेतली भावना आजही तीच आहे, फक्त वर्षांचा आकडा बदलला आहे!