सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
माणूस नव्हे, ब्रँड!
प्रश्न – ताई, मी खूप छान गाते. सोशल मीडियावर माझे रील्स टाकते, इथे खूपदा ऑनलाइन ऑडिशन असतात त्याही देते. पण माझ्या वाटेला फक्त टिंगलटवाळी आणि फुकटचे सल्ले येतात. एक माणूस म्हणून नीट वागणूक द्यायलाही लोक विसरत चालले आहेत का?
उत्तर – माझ्या प्रिय बहिणी, तुझे नाव भावना प्रधान तर नाही ना? विनोदाचा भाग सोड, पण तुला खरंच वास्तवाचे भान अजून आलेले दिसत नाही. सोशल मीडियावर ’माणूस’ अशी कोणतीही प्रजाती शिल्लक राहिलेली नाही. सोशल मीडियावर फक्त ब्रॅण्ड्स असतात. खपणारे, न खपणारे, चालणारे आणि पडणारे.. फक्त ब्रॅण्ड्स. तुम्ही काय गाता हे महत्त्वाचे नसते; तर तुम्ही दिसता कसे, स्क्रीन प्रेझेंन्स कसा आहे हे आजकाल जास्ती महत्त्वाचे आहे. गाते छान पण इम्प्रेशन पडत नाही तर मग तुम्ही न खपणारे ब्रॅण्ड असता. आवाज यथातथा आहे, पण दिसायला सुंदर आहात तर मग तुम्ही खपणारे, भरपूर लाइक्स आणि प्रतिक्रिया मिळवू शकणारे अर्थात खपणारे ब्रॅण्ड असता.
तुमच्या अंगातील कला कशी आहे हे महत्त्वाचे नसते, तर ती कितपत गर्दी खेचेल हे महत्त्वाचे असते. एखाद्या अनोळखी देशभक्ताची ओळख करून देणारे रील्स १०च्या वर लाइक खेचत नसते आणि कागदाचा ड्रेस घालून आलेली सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर लाखोंची गर्दी खेचते हे आजचे वास्तव आहे. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. सोशल मीडियाच्या बाहेर देखील एक प्रचंड मोठे जग आहे, तिथे भरभरून दाद देणारे रसिक आहेत, कला आणि कलाकार दोघांचा आदर करणारे दर्दी आहेत, प्रेमाची उधळण करणारे चाहते देखील आहेत. आपण फक्त मोबाइलच्या बाहेर डोकावण्याची गरज आहे.
– ज्ञानामृत विक्रेती सोमी
साक्षर म्हणजे सुशिक्षित नव्हे!
प्रश्न – एखाद्या कलाकाराचे, नेत्याचे एखादे वाक्य उचलायचे आणि त्या वाक्यावरून त्याला प्रचंड ट्रोल करायचे, अश्लील शब्दांचा मारा करायचा, झुंडीने यायचे आणि गदारोळ माजवायचा हे सगळे कधी थांबणार आहे? शिकले सवरलेले लोक असे जनावरासारखे वागताना पाहून शरम वाटू लागली आहे.
उत्तर – लाडक्या भावा, तू वाहतूक विभागात तर कामाला नाहीस ना? कारण सिग्नल तोडला, नो एंट्रीमध्ये घुसले आणि हवालदार साहेबांनी पकडले की ते हमखास हे वाक्य उच्चारतात, ’काय राव, येवढे शिकले सवरलेले दिसता अन असे वागता?’ हा प्रश्न ज्यांना ज्यांना पडतो, त्यांनी लक्षात घ्यावे की साक्षर आणि सुशिक्षित यामध्ये प्रचंड फरक आहे. एक मोठी दरी आहे. उत्क्रांती आता थांबली आहे. माकड ते माणूस असा यशस्वी प्रवास करून झाल्यानंतर आता आपला परतीचा पुन्हा माकड होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. देशाचे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात आहे, त्यांचा उच्छाद बघून आता भारतमातेची चिंता वाटू लागली आहे. देश चालवणारे जेव्हा स्वत:ला अवतारी घोषित करायला लागतात तेव्हा त्यांच्या भक्तांनी स्वत:ला देवगण घोषित करून, न पटणारे विचार मांडणार्या दानवांचा ’वैचारिक वध’ करायला काय हरकत आहे ना?
खरे सांगायचे तर जेव्हा एक माणूस दुसर्या माणसाचा आदर करायला शिकेल तेव्हाच हे प्रकार कायमचे थांबतील. पण जे हे प्रकार थांबवू शकतात, आवर घालू शकतात तेच कुठेतरी या प्रकारांना प्रोत्साहन देताना दिसतात आणि आपण हताश होऊन जातो. आज एका हाकेत मुंबई शांत करणारे बाळासाहेब हयात नाहीत, पण निदान शेकडो कार्यकर्त्यांचे कीबोर्ड शांत करू शकणारे काही नेते, कलाकार, खेळाडू, विचारवंत नक्की आजूबाजूला आहेत. पण असे काही घडताना दिसत नाही. उलट एखाद्या क्ष कलाकाराचा चित्रपट येत असेल, तर त्याच्या प्रतिस्पर्धी य अभिनेत्याची टीम ही क्ष बद्दलचे जुने वाद, त्याने केलेली आणि लोकांना खटकलेली विधाने, त्याच्यावर होत असलेले आरोप हे जोमाने मीडियामध्ये पसरवायला लागते. एकाच संघात खेळाणार्या दोन खेळाडूंची तुलना त्या त्या राज्यातील मीडियामध्ये रंगवलेली दिसायला लागते, नेते जाहीरपणे थर्ड डिग्री लावण्याची धमकी द्यायला लागतात. लोक ज्यांच्याकडे एक स्फूर्तिस्थान म्हणून बघत असतात, तेच अशी स्फूर्ती द्यायला लागल्यावर अपेक्षा तरी कोणाकडे आणि काय करायच्या?
– आदरात अनादर शोधण्याची सवय लागलेली सोमी
अस्सल कला हवी कोणाला?
प्रश्न – ताई, मी स्वातंत्र्यकाळात घडलेल्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या कथा, किस्से, राजकारण आणि समाजकारण एकेकाळी कसे हातात हात घालून चालायचे, शास्त्रज्ञांचे बहारदार किस्से असे बरेच काही पोस्ट करत असतो. मात्र त्याला म्हणावे तसे प्रेक्षक मिळत नाहीत, प्रतिक्रिया येत नाहीत. लोकांना नक्की कशात रस उरला आहे? काय हवे आहे त्यांना?
उत्तर – आयुष्यात ’काय हवे आहे’ या प्रश्नाचे उत्तर ज्यांना मिळाले आहे, ते एकतर सोशल मीडियावर दिसत नसतात किंवा मग जेव्हा दिसतात तेव्हा त्या दिसण्याचे देखील पैसे कमावत असतात. बाकी उत्तराच्या शोधात असणारे या दोन लोकांचे खिसे भरत असतात. माझे प्रामाणिक मत असे आहे की, कुठलीही कला ही स्वान्तसुखाय सादर करावी. एखादी कथा, गाण्याचा – नृत्याचा व्हिडिओ प्र्ाकाशित केला की ’गंगार्पणमस्तु’ म्हणावे आणि त्याकडे पाठ फिरवावी. त्याच्यात जीव गुंतवू नये. कोणी कौतुक करेल, त्याला धन्यवाद द्यावेत. कोणी थट्टा करेल त्याला दोनदा धन्यवाद द्यावेत. वाद घालत बसू नये.
लोकांना काय हवे आहे, हे कळण्यासाठी आजकाल फारसा विचार करण्याची गरज नाही. लोकांना छत्रपतींनी किती योजनाबद्ध पद्धतीने शास्ताखानावर छापा घातला यात काही रस नसतो. अमेरिकेने कशी योजना आखली, ओबामाला कसे पकडले, कसे मारले, कुठे नाहीसे केले, तो मेला तेव्हा त्या घरात काय काय सापडले, कोणत्या अभिनेत्रीचे फोटो त्याने साठवले होते यामध्ये रस असतो. स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांपासून बचावासाठी काय काय युत्तäया लढवायचे, कसे लपायचे, एखादा कट कसा आखायचे यामध्ये देखील रस नसतो. त्यांना रस असतो, बलात्कार केल्यानंतर फलाना आरोपी पोलिसांना कसा चकवा देत होता, त्याने मोबाईल परप्रांतात जाणार्या ट्रकमध्ये टाकून पोलिसांना गुंगारा कसा दिला, बलात्काराच्या आधी त्याने निष्पाप तरुणीचे अपहरण कसे केले, तिला गुंगी येण्यासाठी काय दिले? किंवा एखाद्या खुनाचा कट कसा आखला गेला, किती वार केले, पहिला वार कोणी केला, मेलेला जास्ती मोठा भाई होता का ज्याने मारला तो मोठा भाई होता? कुठल्या भाईच्या टोळीत कोण लोक आहेत, त्यांच्यावर काय गुन्हे आहेत? हे जाणून घेणे आज जास्ती महत्त्वाचे आहे.
हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये कोण कोणाशी बोलत नाही? नव्या कर्णधाराची मीडियावर जी अचानक ट्रोलिंग सुरू झाली आहे, तिच्या मागे माजी कर्णधाराच्या पीआर टीमचा हात आहे काय? अमक्या अभिनेत्रीचे तमक्या राजकारण्याबरोबर नक्की काय चालू आहे? कोणता कलाकार घटस्फोटाच्या तयारीत आहे? नव्याने आलेला चित्रपट फुकट कुठे डाऊनलोड करता येईल? कोणत्या वेबसाइटवर जगभरात बंदी आहे आणि त्या आपण कशा उघडायच्या, विकायला ठेवलेली अॅप्स फुकट कशी मिळवायची? हे असे काही सांगणार असाल तर मग ठीक आहे. नाहीतर मग अंगावरचे कपडे उतरवणार्या काही ललनांची आणि साड्या घालून नाचणार्या बाप्यांची रांग आहेच.
’लोकांना काय हवे आहे’ यापेक्षा आपल्याला लोकांना काय दर्जेदार द्यायचे आहे याचा विचार करावा. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारे सगळेच काही आदर्श नसते. लोकं काहीही बघतात आणि कशालाही लोकप्रिय करतात. एका, फक्त एका चित्रपटात चार दृश्यात दिसलेली पोरगी मुलाखतीसाठी बोलावली जाते आणि ती सांगते, ’मी मम्माला म्हणाले, अगं मी आता लोकप्रिय स्टार झाले आहे; मी नोकरी नाही करू शकत.’ हिच्या ‘मन्नत’बाहेर जणू रोज लाखो चाहते ही बाहेर पडण्याची वाट बघत असतात. एक वंदनीय व्यक्तिमत्त्व तिने झू मध्ये पिंजर्यात, आत अंधारात जाऊन बसलेल्या वाघाला कसे हाक मारून बोलावले, तो आला किंवा घरात शिरलेल्या पालीला हाक मारून बाहेर निघून जाण्यासाठी कसे समजावले आणि पालीने ऐकले हे रंगवून रंगवून सांगते. लोक देखील ऐकतात. ’निलावंती’ जिवंत आहे हे मी ओरडून सांगत होतो पण कोणी ऐकले नाही. आता लोकांना पटेल.
– व्रात्यशोधक सोमी
खोटेच नंतर खरे बनते…
प्रश्न – काही लोक इतक्या आत्मविश्वासाने सोशल मीडियावर खोटे कसे बोलतात किंवा लिहितात? गंमत म्हणजे लोकांना त्याची जरा देखील शंका येत नाही. हेच खोटे पुढे सत्याचा वेष धारण करते आणि जगभर पसरते.
उत्तर – ’काही लोक’ हा शब्द अत्यंत चुकीचा आहे. हे सामान्य लोक नाहीत तर चित्रगुप्त आहेत. परवा मी एकाला अत्यंत प्रामाणिक चेहर्याने ’शाहरुखवर काळी जादू कशी झाली, त्याचे चित्रपट कसे कोसळायला लागले आणि मग ’रुहानी’ उपचार केल्यानंतर तो पुन्हा कसा शिखरावर गेला’ याचे साद्यंत वर्णन ऐकले. ’हे सगळे शाहरुखला माहिती आहे का?’ असे विचारले तर सद्गृहस्थाने मला ब्लॉक फेकून मारला. हे लोक इतक्या आत्मविश्वासाने थापा मारतात कारण समोर माना डोलावणार्यांमध्ये सोशल मीडियाच्या बाहेर एक जग आहे याची कल्पना नसलेले असंख्य बसलेले असतात. हिंदुस्थानाला इंडिया नाव का पडले हे व्हॉट्सअप विद्यापीठात शिकत असलेले आमचे एक काका सगळ्यांना भारावलेल्या आवाजात सांगत असतात. हे काका एकेकाळी एका मोठ्या उद्योगात पर्चेस ऑफिसर होते. खोट्या लेखनावरचा, बोलण्यावरचा हा जो लोकांचा अंधविश्वास असतो, तोच या खोटे पसरवणार्या लोकांचा आत्मविश्वास असतो. ‘A lie can travel around the world and back again while the truth is lacing up its boots.’
– विचारजंत सोमी