महाराष्ट्रात भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महायुती सरकार स्थापन होऊन शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभाराच्या पहिल्या शंभर दिवसांचा गुलाबी अजेंडा सुरुवातीस मांडला होता. त्याचा आता पुरता फज्जा उडाला आहे. त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या कारनाम्यामुळे महायुती सरकारमधील नेत्यांचा चेहरा काळाठिक्कर पडला आहे. म्हणूनच राज्य कारभार करताना ‘नाकी नऊ आले आहेत’ असा कबुलीजबाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिला आहे. ‘सर्व सोंगे करता येतात, पण पैशाचे सोंग घेता येत नाही’ असे अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये महिना देण्याच्या अडचणीतून, तसेच राज्यातील प्रश्न सोडविताना नाकी नऊ येतात असे उद्विग्नपणे म्हटले असले तरी गेल्या शंभर दिवसात महायुती सरकारमधील सहकारी, मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि पाठीराखे व हिंतचिंतकांच्या कारनाम्यांनी, कृष्णकृत्यांनी आणि बेताल वक्तव्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाकी नऊ आणले आहे हे मात्र नक्की.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्याला तीन महिने उलटले. वाल्मिक कराड या एका सूत्रधाराला अटक केली असली तरी हत्येचा आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. वाल्मिक हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी. हत्या झाली त्या दिवसापासून देशमुख कुटुंबीय, भाजपाचे अष्टीचे आमदार सुरेश धस आणि विरोधक, देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून सभागृह आणि सभागृहाबाहेर मागणी करीत होते, करीत आहेत. देशमुख यांच्या हत्येला मंत्री धनंजय मुंडे जबाबदार आहेत असा आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस, ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांनी केली. विरोधी पक्षाने ही मागणी लावून धरल्यामुळे अखेर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला. पण राजीनामा उशीरा घेतल्यामुळे महायुती सरकारची नाचक्की झाली.
दुसरे प्रकरण राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे. बनावट कागदपत्रे सादर करून शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तिला स्थगिती मिळाली असली तरी न्यायालयाची टांगती तलवार कोकाटे यांच्या डोक्यावरून हटली नाही. मंत्री कोकाटे यांची बाजू मांडताना, विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देताना अजित पवार यांना नाकी नऊ आले.
महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे काळे कृत्य लपवताना महायुती सरकारला कसरत करावी लागत आहे. गोरे यांनी एका महिलेला नग्नचित्र पाठवल्याची तक्रार या महिलेने केली होती. हे प्रकरण लावून धरणारे पत्रकार तुषार खरात यांना अटक झाली आहे. एवढे घडूनही गोरे यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट देवाभाऊ माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही, अशी मग्रुरीची भाषा त्यांनी केली आहे. गोरे यांच्या मुजोर वक्तव्यामुळे आणि काळ्या कृत्यामुळे महायुती सरकारला उजळ माथ्याने फिरणे मुश्कील होणार आहे.
स्वत:ला नवहिंदूरक्षक म्हणवणारे नितेश राणे हे ‘मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे’ असे म्हणत जाती-धर्मात द्वेष निर्माण करणारी वक्तव्ये सतत करीत असतात. मुसलमानांना मशिदीत घुसून मारू. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू, हिंदू दैवतांची विटंबना करणार्यांचे हात कलम करू अशी भाषणे, वक्तव्ये राणे करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कोणीही मुसलमान नव्हते, असली धडधडीत थापेबाजी ते करत असतात. माझा बॉस सागर बंगल्यावर आहे. त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही अशी मग्रुरीची, अहंपणाची भाषा ते करतात. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा बादरायण संबंध जोडून ठाकरे कुटुंबाच्या बदनामीचा कुटील डाव ते रचत आहेत. दिशा सालियन प्रकरण संपले आहे. तिची हत्या नसून तिने आत्महत्या केली, असा निर्वाळा तपासयंत्रणेनी दिला आहे. तरी गाडलेले मढे उकरून काढून आदित्य व शिवसेनेला बदनाम करण्याचा अव्यापारेषु व्यापार राणे आणि भाजपा करीत आहेत. इतर धर्मीयांविरोधात राणे यांच्या नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न अंगलट येऊन सरकारच्या नाकी नऊ आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राणे यांना काही काळ शांत राहण्याचा सल्ला दिला आहे असे समजते.
भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचाजवळील आदिवासींची वनजमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे बळकावली असा आरोप धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एका पत्रकार परिषदेत केला. याआधीही रावल हे पर्यटनमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचार व अनियमित कारभाराचा आरोप झाला होता. भाजपाचे बीड येथील आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यावरही गुंड सहकार्याला पाठिशी घालण्याचा आरोप झाला. त्यांचा ‘कार्यकर्ता’ सतीश भोसले ऊर्फ ‘खोक्या’ याने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या खोक्याची दहशत, काळे कारनामे, खंडणी प्रकरणे आता बाहेर येऊ लागली आहेत. गुंडागर्दी, राख माफिया व जमीनमाफियांची दादागिरी यामुळे बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. बिहार बरा पण बीड नको, एवढी या जिल्ह्याची नाचक्की सत्ताधारी राजकारण्यांनी केली आहे. हा एकच ‘खोक्याभाई’ नाही तर विधिमंडळात सर्वच खोकेभाई आहेत असा सणसणीत आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यावर महायुतीतील आमदारांना मिर्ची लागली. पण महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार हे ‘खोक्याचेच सरकार’ आहे हे सर्वश्रुत आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईमधील घाटकोपर येथील कार्यक्रमात मुंबईच्या घाटकोपरची भाषा ही गुजराती असून मुंबईत राहणार्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे असे नाही, असे मराठी भाषेचा अपमान करणारे विधान केले होते. नागपूरस्थित कथित पत्रकार डॉ. प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगून, त्यांच्याबद्दल अर्वाच्य बरळून छत्रपतींची बदनामी केली. एवढेच नाही तर ब्राह्मणांवर टीका कराल तर हिसका दाखवू, अशी धमकीही त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना दिली. वर मी अशी धमकी दिलीच नाही असे शहाजोगपणे म्हणत तो पोलिस संरक्षणातून फरार झाला. आता त्याला अटक झाली असली तरी महाराष्ट्रातले शिवप्रेमी संतापले आहेत. त्यांचा रोष शांत करता करता महायुती सरकारला नाकी नऊ येत आहेत. राहुल सोलापूरकर या अभिनेत्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगर्याहून सुटकेची घटनाच खोटी ठरवली आहे. महाराज औरंगजेबच्या दरबारातील अधिकार्यांना लाच देऊन सटकले असे निराधार विधान करून त्याने शिवरायांच्या शौर्याचा अपमान केला. पण त्याच्यावर कारवाई केली गेली नाही, उलट त्याला संरक्षण दिलं गेलं. तेव्हा महायुती सरकारचे शिवप्रेम हे किती बेगडी आहे हे कळले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत भाजपाच्या चित्रा वाघ आणि शिवसेनेचे अॅड. अनिल परब यांच्यातील द्वंद्व सार्या महाराष्ट्राने बघितले. परब आणि वाघ बाई यांच्या भाषेमधील फरकही महाराष्ट्राने पाहिला, ऐकला. स्वतःला सुशिक्षित व सुसंस्कृत पक्ष म्हणवणार्या भाजपाच्या वाघ बाईंनी ‘‘तुमच्यासारखे छप्पन पुरुष पायाला बांधून ही चित्रा वाघ फिरते’’ असे वक्तव्य केले. यापूर्वी या ताईंनी हजार मेहबूब शेख तंगड्याला बांधून फिरत असल्याचे थिल्लर विधान केलं होतं. विधिमंडळाच्या सभागृहात पुरुष सभासदानेही असे खालच्या दर्जाचे, असंस्कृत वक्तव्य केले नसावे. दुसर्या दिवशी अध्यक्षांच्या दालनात या वादावर पडदा टाकला गेला असला तरी या ‘छपन्न पुरुष..’ वक्तव्यामुळे सभागृहाची गरिमा गेली आणि महायुती सरकारची नाचक्की झाली ती वेगळीच.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबनात्मक कवितेमुळे संतापलेल्या शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या सेटची त्या हॉटेलची तोडफोड केली. औरंगजेबाची कबर उखडवून टाकण्यावरून वाद झाल्यानंतर नागपूरची दंगल उसळून निष्पाप लोकांचे अपरिमित नुकसान झाले, नागपूरमधील धार्मिक सलोख्याचे घट्ट बंध तुटले. उपराजधानी नागपूर आणि राजधानी मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले. आपण सत्तेत आहोत तेव्हा आपल्याला कोणी हात लावणार नाही ही मस्ती कामराच्या घटनेत दिसली. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय, नाचक्की होतेय हे कुणाच्या लक्षात येत नाही. सत्ताधार्यांपुढे पोलीस व गृहखात्याची हतबलताही दिसून येते.
गेल्या शंभर दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या अशा अप्रिय घटनांमुळे महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. लाडक्या बहिणींनी २१०० रुपये काय, पण महिना १५०० रुपयेही देणे भविष्यात राज्य सरकारला कठीण होणार आहे. राज्य सरकारवर नऊ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. समाज कल्याण खात्यातील खर्चाला कात्री लावली आहे. इतर लोकोपयोगी योजनाही हळूहळू बंद होणार आहेत. कारण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही अशी कबुली अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात बाजारबुणगे, गद्दार आणि बाटगे यांना घेऊन सत्ता आणली. काहींना मंत्रिमंडळात स्थान दिले. पण त्यांच्या काळ्या कृत्यांनी, कारनाम्यांनी मंत्रिमंडळाची, विधिमंडळाची आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. म्हणूनच राज्यकारभार करताना महायुती सरकारच्या नाकी नऊ आले आहेत असे अजितदादांना उद्विग्नपणे म्हणावे लागले.
अजितदादा, तुम्ही हे (तरी) शंभर टक्के खरे बोललात.