राजेंद्र भामरे
गुन्हे तपास करत असताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या असल्याखेरीज गुन्हा उघड होत नाही, तो पूर्ण होत नाही. म्हणजेच त्या केसमध्ये आरोपींना शिक्षा लागत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो ‘अनुभव’, जसजसा तो येत जातो, तसतसा तपास अधिकारी परिपूर्ण व परिपक्व होत जातो. पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये मिळणारे ज्ञान हे लेखी, पुस्तकी स्वरूपाचे असते. जोपर्यंत त्याला प्रत्यक्ष तपासातील अनुभवाची जोड मिळत नाही तोपर्यंत ते शिक्षण परिपूर्ण होऊ शकत नाही. हे सारे समजण्यासाठी मी माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळातील तपासातील काही किस्से सांगतो.
१९८७ साली मी सटाणा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत होतो. तीन चार वर्षांची सेवा झालेली होती आणि पहिल्यांदाच प्रभारी अधिकारी (इन्चार्ज अधिकारी) म्हणून काम करीत होतो. पहिल्याच महिन्यात एके दिवशी खबर आली की देवळा रोडवरील एका गावात एका शेतातील विहिरीत गावच्या एका तरुणाचे प्रेत पडलेले असून ते फुगून वर आलेले आहे. म्हणून तपास टीम घेऊन मी घटनास्थळी आलो. आतापर्यंतच्या अनुभवानुसार व पुस्तकी ज्ञानानुसार ते चार-पाच दिवसांचे प्रेत असावे. विहिरीत खाट टाकून प्रेत बाहेर काढले प्रेत पोस्टमार्टेमसाठी पाठविण्याच्या परिस्थितीत नव्हते. ते पूर्णपणे कुजलेले होते, म्हणून सटाणा ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसरना पत्र लिहून प्रेताचे पोस्टमार्टेम हे घटनास्थळी जागेवरच करावे, म्हणून विनंती केली. त्यानुसार दुसर्या दिवशी डॉ. शरद वाघ हे त्यांच्या स्टाफसह घटनास्थळी आले. ते अत्यंत अनुभवी व विद्वान असे वैद्यकीय अधिकारी होते. पोस्टमार्टेम झाल्यावर ते म्हणाले, ‘प्रेताच्या फुप्फुसात पाणी नाही, एकदम ड्राय आहे.’ झाले, आमच्या पुस्तकी ज्ञानानुसार प्रेताच्या फुप्फुसात पाणी नसेल तर त्या इसमाला आधीच मारून मग पाण्यात टाकलेले असते.
मला वाटले, शंभर टक्के ही खुनाची केस आहे. गावातल्या लोकांनी प्रेत आधीच ओळखलेले होते. विहिरीत एक बॅग मिळाली होती, ती मयताची होती. मयत मुंबईला नोकरीसाठी होता. सुटीसाठी तो गावाकडे येत होता. गावच्या फाट्यापर्यंत एसटी होती. फाट्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर त्याचे गाव होते. गावाकडे जाणारा रस्ता हा पायवाटीचा शॉर्टकट रस्ता होता. झाले, मी खुनाचा तपास सुरू केला.
परंतु मयताच्या घरच्यांचा कोणावरही संशय नव्हता. मयताचा गावात कोणाशी वाद नव्हता. खून करण्याचा काही उद्देशही सापडून येत नव्हता. मी डॉक्टर वाघांना म्हणालो, खून समजू काय? ते म्हणाले, का? मी म्हणालो फुप्फुसात पाणी मिळालेलं नाहीये. तेव्हा ते हसायला लागले. मला म्हणाले, राजे, याला दुसरेही कारण असू शकते, नीट तपास करा. त्याचा खूप तपास केला. तेव्हा जी हकीगत उघडकीला आली ती अशी…
मयत रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याच्या गावच्या फाट्यावर एसटीतून उतरला. तेथून पायी चालत गावाकडे निघाला होता. रात्र अंधारी होती, त्याच्याकडे बॅटरी वगैरे काहीही नव्हती. रस्ता तसा नेहमीचाच म्हणजे पायाखालचा होता. त्यामुळे तो बिनधास्त आपल्या नादात चालत होता. पायवाट अत्यंत अरुंद होती आणि विहिरीला खेटूनच होती, विहिरीला कठडाही नव्हता. ती खूप खोल होती, मयताचा पाय घसरला आणि तो त्या विहिरीत पडला. विहिरीत पडत असताना घाबरून शॉकनेच त्याचा प्राण गेला. पाण्यात एखादी गटांगळी त्याने खाल्ली असावी आणि तो मृत झाला.
बुडण्याआधीच त्याचा प्राण गेलेला असल्याने त्याच्या फुफ्फुसात हवा भरली गेली, त्या वाटेने पाणी आत गेले नाही. अर्थात हे सारं मला डॉक्टर वाघांनी समजावून सांगितलं. या विषयावरील पुस्तके काढून ती वाचून दाखविली. नाहीतर या प्रकरणाला उगाचच खुनाचे प्रकरण म्हणून वेगळीच दिशा मिळाली असती.
दुसरी घटना आठवते ती या वरील घटनेनंतर एक ते दीड वर्षांनंतरची.
सटाणा तालुक्यात माझ्या पोलीस स्टेशनअंतर्गत लखमापूर पोलीस आउटपोस्ट आहे. त्याअंतर्गत एका गावात घडलेली ही गोष्ट आहे.
एके दिवशी संध्याकाळी चार साडेचार वाजता गावातून पोलीस पाटलांनी फोनने खबर दिली की एका घरात एक नवविवाहित माहेरवाशीण जळालेली आहे. ताबडतोब त्या गावी पोहोचलो. घटनास्थळ म्हणजे एक जुने घर. दोन खोल्यांचे असेल ते. गेल्या गेल्या पाटलांनी हकिगत सांगितली.
घराच्या सान्यातून (छताच्या ठिकाणी असलेली छोटी जागा, प्रकाश येण्यासाठी व धूर जाण्यासाठी सोडलेली जागा) दुपारी दोन वाजता खूप धूर येताना दिसला. कसला धूर येतो आहे, म्हणून लोक त्या घराचा दरवाजा ठोकू लागले. दार आतून बंद होते ते कुणी उघडेना.
पाच दहा मिनिटं प्रयत्न करूनही उपयोग होईना, म्हणून काही लोक धाब्यावर (गच्चीवर) चढले आणि तेथून त्यांनी २०-२५ बादल्या, घागरी पाणी सान्यातून घरात ओतले. धूर कमी झाला. तेथून लोकांनी डोकावून बघितले तर दृश्य फारच भयानक होते, घरात माहेरपणाला आलेली मुलगी जळून कोळसा झालेली होती. पोलीस केस असल्यामुळे पोलीस पाटलाने दार उघडू दिले नाही आणि घटना पोलिसांना कळवली.
घराबाहेर त्या मुलीची आई आक्रोश करीत होती. दोन पंचांसमक्ष दरवाजा तोडला. आत जाऊन बघतो तर ती मुलगी जळून कोळसा झालेली होती. रॉकेलचा वास येत होता, धुराम्ाुळे सगळे घर काळे झाले होते. घराची उंची सात फूट होती. माझा असलेला अनुभव आणि ज्ञान सांगत होते की मुलीची उंची पाच फूट दोन ते तीन इंच होती, ती जळत असताना निघालेल्या ज्वाळा सुमारे तीन ते चार फूट तरी असतील. म्हणजेच किमान ८ ते ९ फूट उंचीपर्यंत गेल्या असतील त्यामुळे ७ फूट उंचीवर असलेले, घराचे लाकडी छत जळायला हवे होते, पण इथे ते जळालेले नव्हते.
अनेकदा माणसे (स्त्री, पुरुष) आत्महत्या करताना रॉकेल वगैरे अंगावर टाकून पेटवून घेतात, परंतु जसा चटका बसू लागतो, तसे ते सहन न झाल्याने, ते पळू लागतात. दिसेल त्याला मिठी मारतात. अशा अनेक घटना मी बघितलेल्या होत्या, त्यामुळे या मुलीला कोणीतरी जाळले असावे असे वाटले. परंतु मी स्वत: पंचांसमक्ष दरवाजा आतून बंद असल्याने, तो तोडून दार उघडले होते. मला काही कळेना. प्रेत पोस्टमॉर्टमला पाठवले. सुदैवाने सटाणा ग्रामीण रुग्णालयात मेडिकल ऑफिसर शरद वाघच होते.
मुलीची आई बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती, त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा, शेजारच्या लोकांचे जाबजबाब घेऊन मी पोलीस स्टेशनला परत आलो. सकाळी प्रेताचे पोस्टमार्टेम झाले. मी डॉक्टर वाघ यांना भेटलो. त्याच्या म्हणण्यानुसार मुलीचा मृत्यू अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतल्याने झाला होता. मृत्यूची वेळ दुपारी दोनच्या सुमारास होती. विशेष म्हणजे त्या मुलीने मरताना ‘मांडी घातलेली’ होती, त्या मुलीचा निग्रह बघून मला सती जाणार्या, जळत्या चितेत निग्रहाने बसणार्या महिलांची आठवण झाली. मला काही कळेना, असे कसे होऊ शकते, काहीच बुद्धी चालेना, म्हणून तपासासाठी पुन्हा त्या गावी आलो. मयत मुलीच्या आईला हकिगत विचारली, तिने सांगितलेली हकिगत ऐकून सुन्न झालो तो आजपावेतो सुन्नच आहे. ही घटना आठवली की पुन्हा काही काळ सुन्न होऊन जातो. ती हकीकत अशी…
मयत मुलगी ही तिच्या आईची एकुलती एक होती. मुलीचे वडील ५-६ वर्षांपूर्वी वारले होते. आईला शेती वगैरे इस्टेट काहीही नव्हती. फक्त वडिलोपार्जित दोन खोल्यांचे राहते घर होते. मुलगी नववीपर्यंत शिकली होती. रंगाने गोरी आणि दिसायला छान होती, तिचे सतराव्या वर्षी आईने कर्ज काढून, किडूकमिडूक विकून, घर गहाण ठेवून तिचे लग्न लावून दिले. तिचा नवरा जवळच असलेल्या रावळगाव शुगर फॅक्टरीत कामाला होता. लग्नानंतर ५-६ दिवसांनी ती प्रथेप्रमाणे दोन दिवस माहेराला आली, तेव्हा जरा नाखूशच दिसत होती. परंतु आईने तिला कळूनही काहीही न विचारता सासरी पाठवून दिले. दोन महिन्यांनी मुलगी अचानक माहेरी घरी आली.आईला म्हणाली, मला सासरी नांदायला जायचे नाही आणि कारणही सांगेना. आईला वाटले चार आठ दिवसांत शांत होईल, मग हिला समजावून सांगू, काही अडचण असेल तर गावच्या नातेवाईकांना सांगून सोडवूयात व परत पाठवूया. एक दिवस तिच्या आईने तिला खूप खोदून खोदून विचारले तेव्हा तिने सांगितले, ‘नवर्यामध्ये पुरुषार्थ नाही’. आईने तिला खूप समजावून सांगितले काही दिवसांत सारे सुरळीत होईल. परंतु मुलीने सांगितले की लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा ४-५ दिवसांनी ती माहेरी आली होती, तेव्हाच तिला हे माहीत झालेले होते.
आई काही केल्या तिचे म्हणणे ऐकेना. आईचे म्हणणे होते की झालेल्या लग्नामुळे ती पूर्णपणे कर्जबाजारी झालेली होती. मुलीचे लग्न तुटले तर दुसरे लग्न लावणे अशक्य बाब आहे. मुलगी ऐकेचना तेव्हा आईने विष पिऊन आत्महत्या करीन अशी धमकी दिली, त्यामुळे मुलगी सासरी जाण्यासाठी तयार झाली. एक दिवस ती म्हणाली, मी उद्या सासरी जाते, काळजी करू नकोस. आई खुश झाली, सकाळीच तिने नवीन साडी आणून दिली, दोघींनी मिळून स्वयंपाक केला, जेवणे झाली. रावळगावला जाणारी एसटी बस दुपारी अडीच वाजता होती. मुलगी आईला म्हणाली, ‘तू शेताच्या कामावर, रोजंदारीवर जा, मी एकटी निघून जाईन.’ प्रचंड दारिद्र्य असल्याने, रोजगार बुडू नये म्हणून आई शेतात कामाला निघून गेली. ती गेल्यावर मुलीने घराला आतून काडी लावली, एक लिटर रॉकेलची बाटली पूर्णपणे अंगावर ओतली, मांडी घातली आणि काडेपेटीने स्वत:ला पेटवून घेतले.
तिचा मनोनिग्रह इतक्या टोकाचा होता की ती मांडी घातलेल्या अवस्थेत जळून कोळसा झाली तरी तिची मांडी मोडली नाही की उभी राहिली नाही किंवा इकडे तिकडे सरकली नाही. म्हणूनच वरचे लाकडी छत जळाले नाही. घराच्या सान्यातून येणारा धूर पाहून लोकांनी पाणी टाकले, तोपर्यंत ती कोळसा झालेली होती. त्या दिवसानंतर ४-५ दिवस मला झोप आली नाही, आजही ती घटना आठवली की मन पिळवटून निघते. त्यामध्ये चूक आईची होती की परिस्थितीची याचे उत्तर मला सापडत नाही.
आणखी एक घटना अशी आठवते की, मालेगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन दोन वर्षे झाली होती. त्यावेळी एक प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक ट्रेनिंग आटपून एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आमच्या पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता. मालेगाव शहर एसटी स्टँडच्या बाहेरील भागाला ‘पीला पंप’ असे म्हणतात. या ठिकाणी अनेक रिक्षा स्टँड, प्रवाशांची गर्दी असते, तसेच पिक पॉकेटर, छोटे-मोठे भुरटे, अवैध धंदे करणारी मंडळी, यांची रेलचेल असल्यामुळे तिथे एखादी छोटी घटना घडून कायदा आणि सुव्यवस्थेच्ाा प्रश्न कधीही निर्माण होत असे. तिथे एक पीएसआय आणि दोन कर्मचारी दिवसा बंदोबस्तासाठी सदैव नेमलेले असायचे. पोलीस स्टेशनला अधिकारी कमी असल्यामुळे शिकाऊ असूनही या अधिकार्याची नेमणूक तिथे केली होती. त्याच्या नेमणुकीनंतर तिसर्या दिवशीची गोष्ट असेल ही… मी दुपारी दोनच्या सुमारास जेवणासाठी घरी जायला निघालो होतो, तेवढ्यात शहर पोलीस स्टेशनसमोरील रिक्षा संघटना अध्यक्ष सायबू शेख हा वेगात रिक्षा दामटत, पोलीस स्टेशनच्या आवारात आला. त्याने करकचून ब्रेक मारत रिक्षा थांबवली आणि धावत माझ्याकडे आला. तेव्हा मी जीपमध्ये बसून घराकडे निघण्याच्या तयारीत होतो, काय झाले सायबू, असे त्याला विचारता, भेदरलेल्या स्थितीत तो म्हणाला, साहेब लवकर जा, पिवळ्या पम्पावर ड्युटीस असलेले शिकाऊ साहेबांना रिक्षावाल्यांनी घेरले आहे. त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची सुरू आहे, चुकून त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊ शकते…
हे ऐकताच मी पोलीस स्टेशनला असलेले तीन-चार कॉन्स्टेबल गाडीत घेतले आणि पिवळ्या पम्पाकडे निघालो. तीन-चार मिनिटांत तिथे पोहचलो. लांबूनच पाहिले तर ५० ते ६० रिक्षा त्या ठिकाणी उभ्या होत्या, त्या फौजदारांच्या आजूबाजूला गर्दी होती. ते पाहून मी आणि कर्मचारी जीपमधून उडी मारून तिथे गेलो. सुदैवाने तिथल्या रिक्षा संघटनेचा अध्यक्ष माझ्या परिचयाचा होता. हे सर्वजण माझ्याकडे त्या शिकाऊ फौजदाराबद्दल तक्रार करू लागले. यावर मी म्हणालो, ‘यहां पे बात नहीं करेंगे, चार-पांच लोग पोलीस स्टेशन चलो, वहां पे बात करेंगे.’
त्या पीएसआयला घेऊन पोलीस स्टेशनला आलो. आमच्या पाठोपाठ रिक्षा संघटना अध्यक्ष आणि चार-पाचजण तिथे आले. पीएसआयला आत बसण्यास सांगितले आणि रिक्षाचालकांना आतमध्ये बोलावले. त्याचे म्हणजे ऐकू लागलो, ते म्हणाले, ‘ये कैसा आदमी आपने दिया है, जब से पीले पंप पे बंदोबस्त के लिये आया है, तब से लोगों से ठीक बात नहीं करता, रिक्षावालों को गालिया देता है, ये तीन दिन से चालू है…’ यावर मी त्यांना क्या क्या गालियां देता है, असे विचारले. मात्र, ते सांगेनात, यावर मी पुन्हा त्यांना विचारलं, क्या क्या गालियां दिया है, ये बताओ. यावर त्यांनी नाइलाजाने शिकाऊ फौजदाराने दिलेल्या शिव्या मला सांगितल्या.
त्यावर मी मोठ्यांदा हसलो. एक शिवी देऊन, ‘इससे गंदी गंदी गालियां तो मैं आपको देता हूं’ असे म्हणताच रिक्षा संघटनेचा अध्यक्ष तात्काळ म्हणाला, ‘अरे, साहब मगर आप जो गालियां देते हो, वो प्यार से देते हो…’ हे ऐकताच त्या ठिकाणी जोरदार हशा पिकला आणि तो तणाव एका क्षणात मावळला.
विषय तिथेच संपला. शिकाऊ फौजदारांनाही शिकवण मिळून गेली.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)