शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेच्या स्थापनेनंतर काँग्रेससह अनेक पक्षांशी वेळोवेळी आघाड्या केल्या, सहकार्य केलं. सत्तेत मराठी माणूस असला पाहिजे, राज्यात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद झाला पाहिजे, हे त्यामागचं सूत्र. त्यातच एका टप्प्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली आणि त्या युतीला महाराष्ट्राच्या सत्तेवर नेऊन बसवलं. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या नेत्यांचा युती घडवून आणण्यात आणि ती नंतर टिकवण्यात मोठा वाटा होता. बाळासाहेबांनी युतीच्या काळातही शेठजी-भटजींच्या या पक्षाला ‘कमळी’ म्हणून धाकात ठेवलं होतं, आटोक्यात ठेवलं होतं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काही बाबतीत एकमत होतं, पण ही मंडळी कशी आहेत, हेही ते पक्के जाणून होते. १९६३ सालातलं हे चित्र पाहा. १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर चीन आणि पाकिस्तान यांनी भारतीय सीमेत केलेली अतिक्रमणं बेकायदा आहेत आणि तो प्रदेश भारतात परत आणण्याचा निर्धार जनसंघाने त्यांच्या जाहीरनाम्यात केला होता. त्यांची तेव्हाची शून्यवत राजकीय ताकद पाहता ही निव्वळ ‘कागदी घोषणा आणि दमबाजीची वाफ’च होती. त्यांचे बाळासाहेबांनी केलेले चित्रण पाहा… गंमत म्हणजे, याच जनसंघाची सत्ता गेली ११ वर्षे भारतावर आहे. या काळात पाकिस्तानात विनानिमंत्रण जाऊन केक खाऊन आलेले पंतप्रधान आणि त्यांचे चिल्लर पिल्लर अधून मधून जर्जर पाकिस्तानला लाल डोळे करून दाखवत असतात… चीनने मात्र यांच्या नाकाखालून भूप्रदेश ताब्यात घेतला आहे, त्यावर खेडी वसवण्याचं काम सुरू आहे… तिथे मात्र डोळे आपोआप मिटतात आणि डाराडूर्रर्र घोरण्याचे आवाज सुरू होतात… चीनशी पंगा, पडेंगा महंगा, हे या भेदरटांना पक्के ठाऊक आहे…