माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मूळ शिवसेना फोडून त्यातून निर्माण केलेली गद्दारसेना भारतीय जनता पक्ष नावाच्या राक्षसी शक्तीच्या दावणीला नेऊन बांधणारे गद्दारनाथ आहेत, अशी लक्षावधी शिवसैनिकांची भावना आहे. आपण गद्दार नाही, आपणच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा चालवतो आहोत, असा शिंदे यांचा दावा आहे. तो करण्याचा त्यांना अधिकारही आहे. महाशक्तीचा आशीर्वाद आणि अमाप धनशक्ती यांच्या जोरावर सगळ्या संवैधानिक, न्यायिक प्रक्रिया गुंडाळून ठेवून त्यांना या राज्यावर अडीच वर्षे राज्य करण्याची संधीही मिळाली. या काळात धर्मवीर १ आणि धर्मवीर २ या नावांनी आनंद दिघे यांच्यावर सिनेमा काढत असल्याचे भासवत शिंदे यांची प्रतिमानिर्मिती करण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतरच्या (मतदारांवर प्रलोभनांची आणि पैशांची खैरात करून अत्यंत संशयास्पदरित्या जिंकलेल्या) निवडणुकीत ज्याअर्थी आपल्या पक्षाला भरघोस यश मिळालं, त्याअर्थी आपण गद्दार नाही, यावर राज्यातील जनतेने शिक्कामोर्तब केलं, असा सोयीस्कर अर्थ शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते काढत आहेत. ती त्यांची भावना असू शकते.
पण, बाळासाहेबांच्या सच्च्या सैनिकांची ती भावना आहे का?
अजिबातच नाही.
मस्तवाल सत्तेविरोधात मशाल चेतवून उभा असलेला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव धारण केलेला पक्ष म्हणजेच खरी शिवसेना आहे आणि शिंदेसेना ही मिंधेसेना, गद्दार सेना आहे, दुसर्याचा बाप पळवणार्यांची टोळी आहे, अशी मूळ शिवसेनेवर निष्ठा कायम असलेल्या सैनिकांची भावना आहे. शिंदेसेनेने एक निवडणूक जिंकली म्हणजे त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला गेला, असा गैरसमज कोणीही करून घेऊ शकतो- पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरडावून सांगतात त्याप्रमाणे ते काही सर्वांनी मान्य करावे असे ‘विधिद्वारे स्थापित’ सत्य नाही. गद्दारी हाच पुढच्या सगळ्या राजकीय घटनाक्रमाचा पाया असल्याने अनेक लोक त्यांना गद्दार मानणारच आणि तसे म्हणणारच.
अनेकांच्या मनात असलेल्या या तीव्र भावनेला कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनने एका विडंबनगीतातून वाट करून दिली. ‘भोली सी सूरत आँखो में मस्ती’ या ‘दिल तो पागल है’ या सिनेमातल्या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर रचलेल्या या विडंबनगीतात कामराने शिंदे यांचं नाव घेतलेलं नाही. त्याने ‘मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आये’ अशी स्पष्ट ओळ लिहिलेली आहे… तुमची समजूत काहीही असेल… माझ्या नजरेतून मात्र मला ते गद्दारच दिसत आहेत, असं सांगणार्या या गाण्याने भडकलेल्या शिंदे सेनेच्या गुंडांनी हा कार्यक्रम जिथे चित्रित झाला तो स्टुडिओ फोडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गुंडांनी नंतर पोलिसांकडे कामराच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. कामराने माफी मागावी, अशी दरडावणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री संविधानाचा सोयीस्कर हवाला देऊन देताना दिसले. त्या संविधानात स्टुडिओच्या नुकसानभरपाईची काही तरतूद आहे का हो अध्यक्ष महोदय? भावना दुखावलेल्या गुंडांनी खासगी मालमत्तेची नासधूस केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लगेच त्यांची जामीनावर सुटकाही झाली. म्हणजे प्रॉपर्टी कुणाची आणि नासधूस करणारे कोण आहेत, यावर यांचा बुलडोझर न्याय ठरणार?
स्टुडिओची नासधूस करण्याची सुपीक कल्पना ज्याच्या डोक्यात आली आहे, तो शिंदे यांचा हितचिंतक असू शकत नाही. या आततायी कृत्यामुळे साध्य काय झाले? जो व्हिडिओ एरवी एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहिला असता असा तो प्रचंड व्हायरल झाला. त्यावर आणि स्टुडिओच्या मोडतोडीवर सोशल मीडियावर उमटणार्या तीव्र प्रतिक्रिया पाहिल्यानंतर ‘आम्हाला जनतेचं मँडेट मिळाले आहे’ ही उसनी गुर्मी उतरायलाही हरकत नाही. कोट्यवधी रुपये खर्चून, दोन सिनेमे काढून, गावभर खैराती वाटून जो प्रतिमानिर्मितीचा उद्योग केला, तो आठदहा ओळींच्या गाण्याने आणि त्यापेक्षाही अधिक त्यावरच्या हिंसक प्रतिक्रियेने मातीमोल केला.
म्हणून म्हणतात की राजाने विदूषकाशी लढाई करायची नसते. विदूषक याचा अर्थ मस्कर्या असा नसतो. विदूषक हा पाचकळ विनोद करणारा पोरकट मनुष्य नसतो, तर तो सत्तेचा टीकाकार असतो. त्याने सतत झोंबरी टीका करून सत्तेला पराणी लावावी, सत्ता निरंकुश आणि आंधळी होऊ देऊ नये, यासाठी शहाण्या सत्तेनेच केलेली ती व्यवस्था असते. हे कळण्याइतकं शहाणपण अलीकडच्या सत्ताधीशांमध्ये नाही, हे तर स्पष्टच आहे. नाहीतर ‘टीका हा लोकशाहीचा प्राण आहे’ हे आदरणीय पंतप्रधानांचं वचन तरी त्यांनी लक्षात ठेवलं असतं आणि ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असा उदारमतवाद ठेवला असता. सतत कोणाच्याही बोलण्याने, कविता करण्याने, चित्र, व्यंगचित्र काढण्याने, लिहिण्याने यांच्या भावना दुखावत असतात. आपल्या भावना इतक्या दुखर्या कशा, त्यांच्यावर काहीतरी इलाज केला पाहिजे, हे यांना सुचत नाही. नाहीच काही आवडलं, पटलं तर संविधानाने दिलेल्या चौकटींमध्ये निषेध करा, कायदेशीर मार्गांनी कारवाई करा. मोडतोड कसली करता?
महाराष्ट्राच्या मानबिंदूची, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे कोश्यारी, आपटे, सोलापूरकर, कोरटकर यांच्यामुळे यांच्यातल्या एकाच्याही भावना दुखावत नाहीत, आता बुलडोझर घेऊन जातो त्या महाराष्ट्रद्रोह्याला जमीनदोस्त करतो, असा मराठी बाणा यांच्यातल्या एकातही जागला नाही, तो शिंदेंच्या तथाकथित अवमानाने जागा झाला; म्हणजे यांचा मीटर कुठे पडतो आणि कुठे पडत नाही, ते न कळायला महाराष्ट्र दुधखुळा आहे का?
तर सांगायचा मुद्दा म्हणजे राजाने विदूषकाशी लढाई करायची नसते. राजाचंच हसं होतं.