दुबईत न्यूझीलंडला नमवून चॅम्पियन्स करंडक जिंकणार्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं तमाम देशवासियांच्या आशाअपेक्षा पूर्ण केल्या आहेत. या निमित्तानं ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शहा यांनी अहमदाबादला खास ‘विजयाचा रंगोत्सव’ या शाही मेजवानीचं आयोजन केलं होतं. या रंगारंग काल्पनिक उत्सवाचा हा ‘बुरा न मानो होली है’ शैलीतला हा काल्पनिक वृत्तांत!
– – –
साबरमतीच्या तीरावर भव्य शामियान्यात जल्लोष सुरू होता. चॅम्पियन्स करंडकाच्या प्रतिकृती आणि पांढर्या कोटातील दिग्विजयी भारतीय संघाचे कट्आऊट्स यांच्यासोबत ‘विजयाचा रंगोत्सव’ असा हा साग्रसंगीत, पूर्ण रंगीत कार्यक्रम ऐन रंगात आला होता. क्रिकेटपटू, मार्गदर्शक, संघटक आणि त्यांचे कुटुंबीय या रंगकार्यात मश्गूल होते. काहींच्या हाती विविध उत्साहवर्धक पेयांचे ग्लास होते.
जय शाह यांच्या भाषणानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पहिला मान अर्थात जय शाह यांचा. ‘‘नमस्कार मित्रहो, माझं नाव जय आणि देशाच्या क्रिकेटची संघटनात्मक जबाबदारी मी सांभाळल्यापासून भारतीय संघाचा जयजयकार सुरू आहे. हो, अध्येमध्ये काही पराभवाचे प्रसंग आले. पण, चंद्रावरही काही डाग असतातच की तसेच ते (जडेजा गिलच्या कानात डाग अच्छे होते है, असं काहीसं पुटपुटला). पण, ‘रो-को’नं म्हणजेच आपल्या रोहित आणि विराट सेनेनं दाखवून दिलं की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचंच वर्चस्व अबाधित राहील. विजयाचा हा आलेख असाच उंचावत राहो!’’ जय यांच्या भाषणानं धडाक्यात प्रारंभ झाला.
मग गंभीर म्हणाला, ‘‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेआधी बर्याच चर्चा सुरू होत्या. माझे संघातल्या वरिष्ठ खेळाडूंशी संबंध बिघडलेत, असंही प्रसारमाध्यमांनी फोडणी देऊन प्रकाशात आणलं. रोहितच्या नेतृत्वाची ही अंतिम परीक्षा असेल. याचप्रमाणे सूर गवसला नाही, तर कदाचित निवृत्तीही घेऊ शकेल. भारताच्या वेगवान मार्याची धुरा सांभाळणारा जसप्रीत बुमराची अनुपस्थिती चिंतेत भर घालणारी होती. विराटच्या धावांचं सातत्यही हरवलेलं. याशिवाय, माझं मार्गदर्शनसुद्धा पणाला लागलं होतं. पण, चॅम्पियन्स करंडक विजेतेपद, हे या सर्व प्रश्नांचं उत्तर ठरलं. त्रिवार अभिनंदन!!! (टाळ्यांचा गडगडाट आणि आरोळ्या) रोहित आणि विराट यांच्यासमवेत जेतेपदाच्या लढतीआधी मी खास चर्चा केली आणि त्यांना विजयाचं महत्त्व अधोरेखित करून सांगितलं आणि फलश्रुती तुमच्यासमोर आहे. संघातील सर्वांचं मनापासून आभार, तुम्ही मला मोठी भेट दिलीत. धन्यवाद!’’ गंभीरनं चॅम्पियन्स करंडक उंचावला, तसं सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले. ‘‘चला, आता रंग खेळूया,’’ जय यांनी गंभीरला रंग लावत भाषणबाजी संपल्याची घोषणा केली.
संघातील काही खेळाडूंनी टारगट विराटच्या नेतृत्वाखाली मग गंभीरला उचलून शामियान्यात मधोमध असलेल्या छोट्या रंगविहिरीत टाकलं. त्यातून सावरणार्या गंभीरला ‘‘बुरा न मानो, होली है,’’ हे सांगायला विराट अजिबात विसरला नाही. त्यानंतर विराटनं रंग लावत रोहितला मैत्रीपूर्ण आलिंगन दिलं. ‘‘तुझ्या नेतृत्वात यशोशिखरं जिंकण्याची क्षमता आहे. तू खरोखर किमयागार कप्तान आहेस. भविष्यात जेव्हा भारतीय क्रिकेटची सोनेरी पानं चाळली जातील, तेव्हा तुझं नाव अभिमानानं घेतलं जाईल,’’ अशा शब्दांत विराटनं आपल्या भावना प्रकट केल्या. रोहितनंही आपलं मन मोकळं करत म्हटलं, ‘‘मित्रा जिंकलंस! आयसीसी’च्या मोठ्या व्यासपीठावर दडपण झुगारत कसं खेळावं, याचा तू वस्तुपाठ आहेस. मी तर फक्त चषक स्वीकारण्याचं कार्य करतोय. फलंदाजी आणि संघातील आक्रमक वृत्ती ही तुझ्या मैदानी अस्तित्वामुळे संचारते, हे कसं नाकारू शकेन. याहून महत्त्वाचं म्हणजे माझं क्रिकेट संपलेलं नाही, हे मला सिद्ध करण्यासाठी तू बळ दिलंस.’’
इतक्यात हाती भांगेचा ग्लास घेतलेल्या हार्दिकनं अमिताभच्या शैलीत ‘रंग बरसे भीगे चुनरवाली…’ या गाण्यावर ठेका धरला. गिल, जडेजा, हर्षित हेसुद्धा त्याच्यासोबत ठुमके देऊ लागले. हे संपताच अनुष्काला गाणं म्हणायचा अनावर मोह झाला. ‘खेळताना रंग बाई होळीचा’ हे उच्चारताक्षणीच हार्दिकनं ‘थांबा, थांबा’ म्हणत पुढचं गाणं म्हणू नये, कारण त्या ओळी अयोग्य असल्याचं अनुष्काला पटवून दिलं. ‘‘अच्छा असं का,’’ अशी हार्दिकला कबुली देत अनुष्कानं मग नवं गाणं म्हटलं, ‘‘लय भारी, लय भारी, तुझी फटकेबाजी लय भारी…’’ अनुष्कानं ऑसी संघाविरुद्धच्या त्याच्या वादळी खेळीचं मुक्तकंठानं कौतुक केलं.
दुसरीकडे अर्शदीप भांगडा करीत होता. त्यानं शमीला हातानं खेचून नाचायला लावलं. ‘‘शमीजी, तुसी ग्रेट हो! दुबईच्या फिरकीला अनुकूल मैदानावर तुम्ही प्रतिस्पर्ध्यांच्या दांड्या उडवल्यात. साथीला कोणताही तोलामोलाचा वेगवान गोलंदाज नसताना एकट्यानं जिद्दीनं किल्ला लढवलात. दुखापतीतून सावरत परतल्यावर शमीची कामगिरी मैदानावर पहिल्यासारखी होत नाही, अशी मतं प्रकट केली जात होती. त्या टीकाकारांना तुम्ही चोख उत्तर दिलंत. शमी, तुमचा आम्हाला अभिमान आहे,’’ अशी भावोत्कट प्रतिक्रिया देत अर्शदीपनं शमीला रंग लावला.
वरुण चक्रवर्तीनं जडेजाकडे मोर्चा वळवला. ‘‘सर, तुमचा विजयी चौकार भारताच्या यशातला महत्त्वाचा क्षण. तुमचं अष्टपैलूत्व माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतं,’’ असं शांतपणे म्हटल्यानंतर क्षणार्धात आक्रमक होत वरुणनं जडेजाला पिचकारीनं रंगवून काढलं. जडेजा आपल्या मानाचा बडेजाव न करता वरुणची पाठ थोपटत म्हणाला, ‘‘शाब्बास वरुण. हर्षितला संघाबाहेर ठेवून तुला संघात घेण्यासाठी गौती सर जेव्हा आग्रही होते, तेव्हा तू त्यांचा पिट्टू आहेस, असा आमचा गैरसमज झाला. मी, कुलदीप, अक्षर असे तीन फिरकीचे पर्याय असताना चौथा फिरकीपटू कशासाठी, हा आम्हाला सर्वांनाच पडलेला प्रश्न होता. पण, तुझ्या मिस्ट्री स्पिननं हिस्ट्री घडवली. तुझं वय ३३ वर्षे, म्हणजे आणखी काही वर्षंच तू खेळू शकशील. पण, सध्याची तुझी कामगिरी पाहता तू कारकीर्द संस्मरणीय करशीलच. असाच खेळत राहा!’’ वरुण जड्डूच्या शब्दांनी भारावला.
श्रेयस खुर्चीवर शांतपणे बसून अर्ध्या भरलेल्या शीतपेयाच्या ग्लासकडे एकटक पाहात होता. कसली तरी चिंता त्याला सतावत होती. रणजी स्पर्धेत मुंबईकडून सातत्यपूर्ण धावांचा पाऊस पाडल्यानंतरही जेतेपदानं हुलकावणी दिली, याची चिंता असेल का ती? एव्हाना चॅम्पियन्स करंडकातही चौथ्या क्रमांकाची धुरा समर्थपणे पेलत त्यानं भारताच्या जेतेपदाच्या प्रवासात मोठी भूमिका बजावलेली. मिश्किल स्वभावाच्या पंतने श्रेयसला म्हटलं, ‘‘भावा, इतका उदास का? अर्धा ग्लास भरलेला आहे, त्याचा सध्या आनंद मान. माझी पाहा फक्त पॅसेंजर म्हणूनच दुबईवारी झाली.’’ आता श्रेयसच्या भावनांचा बांध फुटला आणि तो पंतच्या खांद्यावर ओक्साबोक्शी रडू लागला. ‘‘गेल्या वर्षी माझ्याकडून स्थानिक सामना न खेळायची चूक झालेली. त्याची शिक्षा मला भोगावी लागली. ‘बीसीसीआय’च्या वार्षिक करारातून माझी गच्छंती झाली. येत्या काही दिवसांत करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर होईल. यावेळी तरी मला त्यात स्थान मिळेल ना?’’ पंतने श्रेयसला दिलासा देत ‘‘नक्की मिळेल,’’ असं आश्वासन दिलं.
वरकरणी शांत वाटणारा केएल राहुल रंगांच्या मस्तीत न्हाऊन निघालेला होता. अक्षरकडे पाहताच, ‘‘बापू, तू कुठे पळतोस? डावा आहेस, पण छावा आहे. डावे-उजवे फलंदाज मैदानावर असले की गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी अडचणीचं ठरतं, ही रणनीती तुझ्यासाठी फलदायी ठरली. माझ्या आणि हार्दिकच्याही आधी तू मैदानावर उतरायचास. पण, मिळालेल्या संधीला तू उत्तम न्याय दिलास. पंतला डावलून मला संधी मिळेल की नाही, ही शंका होती. पण, मला सातव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून नव्हे, तर यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळालं. कधीकधी त्याचा वाईट वाटतं. पण, मी माझं सर्वोत्तम योगदान दिलं. विजेतेपदाच्या यशात आपण खारीचा वाटा उचलला, याचं समाधान वाटतं.’’ अक्षरनं राहुलला धीर देत म्हटलं, ‘‘तुझ्या गेल्या अनेक वर्षांच्या कारकीर्दीचा मला हेवा वाटतो. सलामीपासून सातव्या क्रमांकापर्यंत संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर उतरत तू लीलया फलंदाजी करतोस. एकदिवसीय प्रकारातली तुझी उपयुक्तता नाकारता येणारच नाही.’’
‘विजयाचा रंगोत्सव’ आता ऐन बहरात आला होता. छोट्या-छोट्या संवादांतून अनेक जणांनी आपापली सुखदु:ख एकमेकांसमोर मांडली. होळीची उडती गाणी एकापाठोपाठ एक सादर केली जात होती. सोबत प्याले रिते होत होते आणि खाद्यापदार्थांचा आस्वादही घेतला जात होता. सर्व क्रिकेटपटू, मार्गदर्शक आणि संघटक या विजयरंगात रंगले होते. हे वातावरण ग्वाही देत होतं की, अवघा (विजय)रंग एकचि झाला…