बाळासाहेबांनी रेखाटलेली रविवारची जत्रा पाहण्यासाठी ‘मार्मिक’चे वाचक आणि व्यंगचित्रकलेचे दर्दी आठवडाभर वाट पाहात. आठवड्याभरातल्या अनेक सामाजिक राजकीय घटनांवर भाष्य करणारी वेगवेगळी व्यंगचित्रं गुंफून बाळासाहेब एक भाष्यपटच तयार करत आणि त्यात मार्मिक टिप्पणी, विनोद आणि नाट्याची पखरण असायची. या जत्रेत अनेक राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक किंवा अन्य मान्यवर मानकरी असायचे, पण शेवटचा मानकरी असायचा काकाजी, सामान्य माणूस. त्या सगळ्या घटनांचा अखेरीला सर्वसामान्य माणसावर काय परिणाम होतो, ते जत्रेचं भरतवाक्य असायचं अनेकदा आणि तो एकदम परफेक्ट क्लायमॅक्स असायचा. ही जत्रा होळी, धुळवड हे सण साजरे करणारी. इंदिरा गांधींच्या साडीवर पडलेल्या डागांपासून जगजीवनरामांच्या हातातली पिचकारी, वीरेंद्र पाटलांची धुळवड, सीमाप्रश्नाचा ओंडका, ना. ग. गोरे यांच्या बोंबा या मार्गाने हे चित्र अचानक करी रोड अपघातात बळी घेणार्या यमाच्या पिचकारीपर्यंत येतं आणि सर्वसामान्य माणसाला चित्रातल्या काकाजींप्रमाणेच स्तंभित करतं… चित्राची रचना, प्रत्येक व्यक्तिरेखा जणू हलते, बोलते आहे इतका रेषांमधला जिवंतपणा आणि एखाद्या पूर्णविरामासारखं कलाटणी देणारं भरतवाक्य… उगाच लोक या जत्रेची आतुरतेने वाट पाहात नसत!