□ भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून मराठी माणूस पेटून उठला; विधिमंडळातही रणकंदन.
■ सरकारने काय केलं? भय्याजींवर काय कारवाई झाली? बाकी सोडा, किमान पक्षांतर्गत कानपिचक्या तरी दिल्या गेल्या का? संघटनेत कोणी त्यांना काही डोस दिले का? मराठी माणसांना हे दिसत नाही किंवा त्याने डोळ्यांवर नको ते झापड ओढून घेतलेलं आहे. त्याचा असाच अपमान होत राहणार.
□ हक्कभंग आणणार्या जयकुमार गोरे यांचे आणखी काळे कारनामे उघड होणार.
■ गोरेंचे कितीही काळे धंदे उघडकीला आले तरी ते वॉशिंग मशीन पार्टीमध्ये असल्याने पिट्ट गोरेच राहणार… एका निर्घृण आणि अंगावर शहारे आणणारी नृशंसता दाखवणार्या खुनाच्या प्रकरणात गुन्हेगारांना अटक होण्यापासून ते संबंधितांचा राजीनामा घेण्यापर्यंत किती संथगतीची कार्यवाही झाली, ते दिसतंय ना! निलाजर्या पोपटलाल पार्टीसाठी हे धंदे किरकोळ आहेत.
□ जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतो – अंबादास दानवे यांचा विधान परिषदेत गंभीर आरोप.
■ आणि करारी मुख्यमंत्र्यांनी ‘मित्र’पक्षांमधल्या मंत्र्यांच्या खात्यांमधले फिक्सर कसे हटवले याच्या बातम्या सगळ्या चाटुकार माध्यमांनी काय कौतुकाने चालवल्या होत्या ना! फिक्सर फक्त त्यांचे चालणार नाहीत एवढाच त्याचा अर्थ होता.
□ कामोठ्यात नाल्याजवळ बारावीच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा.
■ त्या ज्यांच्या असतील त्या विद्यार्थ्यांनी आता काय त्या नाल्यात जीव द्यायचा? त्यांना न्याय कसा मिळणार?
□ ज्याला गुजराती जमते त्यालाच नोकरी, हे सरकारचे धोरण आहे का? – आमदार रोहित पवार यांचा सवाल.
■ ज्याला गुजरातची जी हुजुरी जमते, त्यालाच महाराष्ट्रात सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळते, ते लक्षात घेता नोकरीसाठी ही अट टाकायला हरकत नाही… महाराष्ट्रातल्या मराठी ‘भय्याजीं’ना आनंदच होईल!
□ अविश्वास ठराव दाखल असतानाही उपसभापती खुर्चीत कशा? – शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा कोंडीत पकडणारा सवाल.
■ या मंडळींना संसदीय कामकाजाच्या साधनशुचितेची काही पर्वा आहे, असा कोणाचाही गैरसमज होण्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही अनिलजी!
□ जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर सेंटरचे आयसीयू बंद; रुग्णांचे हाल – सुनील प्रभूंनी उठवला सवाल.
■ गोरगरीबांना गंभीर आजारांवर दर्जेदार उपचार मोफत मिळता कामा नयेत, फार्मा कंपन्या आणि खासगी हॉस्पिटलांची धन होत राहावी, आरोग्यविमा कंपन्यांचे उखळ पांढरे होत राहावे, अशीच राज्यकर्त्यांची इच्छा आहे. श्रीमंतांची भांडी घासायला लागतात, पैसे घेऊन मतं द्यायला लागतात आणि दंगलींमध्ये एकमेकांची डोकी फोडायला लागतात, त्यापलीकडे गोरगरीब हवेत कशाला?
□ मंत्रालयातील आधुनिक वाल्मीक कराड कोण? – मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
■ घरचा आहेर दिला खरा, पण जिलबीचं जेवण जेऊन नंतर ते पान खाऊन काडीने दात कोरत शांतच बसणार आहेत… कार्य सिद्धीस जातच राहणार आहे.
□ आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय! – मिंधे आमदार थोरवेंची खासदार तटकरेंवर आगपाखड.
■ आणि हे म्हणे ‘मित्र’ पक्ष आहेत!
□ पैशांच्या नावाने बोंब, महाराष्ट्रात आर्थिक शिमगा; उत्पन्नापेक्षा राज्याचा खर्च भरमसाठ.
■ कसलीही छाननी न करता लाडक्या बहिणींवर उधळण करून झाली आहे, सत्ता मिळवली आहे, आता पैशाचं सोंग कुठून आणतात ते पाहायला हवं.
□ धारावीवर चालणार अदानीचा बुलडोजर.
■ सगळ्या देशावर तोच चालतो आहे… धारावीत वेगळं काय होणार?
□ फडणवीसांनी शिंदे यांच्या बिल्डर ‘मित्रा’ला हटवले.
■ राजकारणाचा खेळ आहे हा! बेडकीने कितीही स्वप्न पाहिली तरी ती बैल बनू शकत नाही.
□ ठाण्याच्या अर्थसंकल्पात सहा हजार कोटींच्या आकड्यांची हेराफेरी.
■ फक्त? नीट मोजदाद करा.
□ मोदी गप्प का? हिंदुस्थानींना बेड्या, साखळदंड; नेपाळींना अमेरिकेने सन्मानाने पाठवले.
■ मोदींचे मित्र डोलांड रोज शेलक्या शब्दांत भारताचा उद्धार करून भारतीयांचा अपमान करत असतात. आणि इथले मोदखुळे ट्रम्पने झेलेन्स्कीला कसं वाईट वागवलं, याबद्दल तात्यांच्या कौतुकारत्या ओवाळत असतात. एकाच वेळी हिटलर आणि इस्रायल या दोहोंचे चाहते असलेल्यांकडून वेगळी काय अपेक्षा ठेवणार म्हणा!
□ राज्यात जमेपेक्षा खर्चात २० हजार कोटींची वाढ; सरकारची चिंता वाढली, विरोधक घेरणार.
■ महाराष्ट्राला विकसित, प्रगत राज्यांच्या यादीत शेवटून पहिल्या नंबरपर्यंत नेण्याची सुपारी घेतलेल्यांच्या सरकारने उत्तम कामगिरी चालवली आहे. अभिनंदनच करायला हवं त्यांचं!