छत्रपती शिवाजी महाराजांना ‘लोककल्याणकारी राजा’ असं का म्हणतात? कारण कुठलाही निर्णय घेताना ते सर्वसामान्य रयतेच्या भल्याचा-कल्याणाचा सारासार विचार करून घ्यायचे! तुकोबारायांनी चारशे वर्षांपूर्वी राजाची कर्तव्यं काय आहेत याचं मार्गदर्शन करणारा एक अतिशय सुंदर अभंग सांगितला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची एकंदरीत कार्यपद्धती अभ्यासली तर या अभंगातून त्यांनी घेतलेली प्रेरणा स्पष्ट आणि थेट दिसून येते.
‘आर्तभुतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ति ।।
फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ।।
अल्पें तो संतोषी । स्थळीं सांपडे उदेसीं ।।
सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ।।’
…आर्तभूत म्हणजे गरजवंत गोरगरीब! त्यांच्यावरील अन्यायाचे निवारण व्हावे, त्यांचे दु:ख दूर व्हावे यासाठी राज्यकर्त्यांनी आपल्या सगळ्या उत्तम शक्ती योजाव्यात. …आयुष्यात चांगले फळ आणि समाधान मिळवायचं असेल तर यासारखं उत्तम काम नाही. …परिस्थितीने गांजलेली एखादी उदास व्यक्ती, तुमच्या अल्पशा मदतीनेही संतुष्ट होते… शेवटी तुका म्हणे- गरजवंत माणूस आणि गरजा पूर्ण करणार्या सत्ताधीशांचा हा संगम अतिशय उत्तम असतो.
शिवरायांच्या राज्यकारभाराचं अंतरंग तपासल्यावर आपल्याला कळतं की त्यांनी सगळ्यात आधी काबाडकष्ट करून जगाला पोसणार्या छोट्या शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले. दुसर्या बाजूला त्यांना नाडणार्या, लुबाडणार्या वतनदारांना धाक दाखवला! ‘आर्तभूतांप्रती’ योजलेल्या अनेक आज्ञा शिवरायांनी स्वदस्तुरात लिहिलेल्या आपल्याला आढळतात. ‘दुष्काळ पडलेला असेल त्या वर्षी शेतकर्याकडून सारा वसूल करायचा नाही.’ ‘स्वराज्याचे सैन्य मोहिमेवर असताना शेतकर्याच्या उभ्या पिकामधून घोडदळ जाता कामा नये.’ ‘सैन्यातील घोड्यांना दाणा-वैरण लागली तर शेतकर्यांना रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे.’ ‘गरीब रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये.’ वतनदार, सरदारांपासून मावळ्यांना सक्त ताकीद दिलेल्या या आज्ञा वाचून आपल्याला कळतं की शिवकार्याचं यश हे ‘फळ आणि समाधान… तेणे उत्तम कारण’ साध्य करण्यात आहे.
आजकाल कुणीही भंपक नेता आसपासच्या भाटांकरवी स्वत:ची तुलना शिवरायांशी करून घेतो, पण स्वत: मात्र धनाढ्य उद्योगपतींच्या हातचं बाहुलं बनून गोरगरिबांची आंदोलनं चिरडून टाकत असतो. छत्रपती शिवरायांशी बरोबरी करण्याची त्यांची कणभरही लायकी नसते. आदर्श राजाची कर्तव्यं तुकोबाराया किती समर्पकपणे सांगतात! सर्वसामान्य जनतेला लै काही लागत नाही हो… छोटी मदतही लाखमोलाची असते त्याला. ‘अल्पे तो संतोषी’! किमान पाठीवर हात ठेवा… त्याच्या मार्गात खिळे ठोकू नका… तुमचे आधाराचे शब्दही त्याच्या निराश आयुष्याला उभारी देतात. गरजवंत प्रजा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेला राजा यांचा संगम ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे, जी तुकोबारायांनी सांगितली आणि शिवरायांनी कृतीत आणली.
राजाला ‘आई’ची उपमा देऊन तुकोबारायांनी एक फार गोड अभंग लिहिलाय,
‘धाकुट्याचे मुखी घांस घाली माता ।
वरी करी सत्ता शाहाणियां ।।
ऐसें जाणपणें पडिलें अंतर ।
वाढे तों तों थोर अंतराय ।।
दोन्ही उभयतां आपण चि व्याली ।
आवडीची चाली भिन्न भिन्न ।।
तुका म्हणे अंगापासूनि निराळे ।
निवडिलें बळें रडतें स्तनी ।।’
…जे शेंडेफळ असतं, धाकटं बाळ असतं, त्याला आई एकेक घास भरवते. त्याचवेळी, स्वत:च्या पायावर उभं राहिलेलं, शाळेत जाणारं थोरलं मूल असतं, त्याच्यावर मात्र आई सत्ता गाजवत असते. त्याला धाकात ठेवत असते… मुलाची ‘जाण’ जसजशी वाढत जाईल तसतसं आई त्याला आणि नुकत्याच जन्माला आलेल्या अजाणत्या बाळाला वेगवेगळी वागणूक देते. दोघांत फरक करते. जसजसं मूल मोठं होतं तसतसं आई थोडं अंतर देऊन, त्याला दूर करून स्वतंत्र जगायला शिकवते…खरं तर दोन्ही मुलं तिच्याच पोटी जन्माला आलेली असतात. दोघांवरही तिचं प्रेम असतं.. पण ते व्यक्त करण्याची ‘चाल’, पद्धत भिन्न असते.
…शेवटी तुका म्हणे- ‘रडणार्या दुबळ्या लहान मुलाला आई स्तनाला लावून दूध पाजते… तर मोठ्या मुलाला ती अंगापासून दूर ठेवते. कारण तो आधीच दूध पिऊन सक्षम झालेला असतो. आता त्याला त्याची गरज नसते! राजा हा या आईसारखा असावा. त्यानं विचार करायला पाहिजे की आपल्या देशवासीयांमध्ये जे बलशाली, धनाढ्य उद्योगपती आहेत. ती ‘थोरली’ मुलं आहेत, त्यांच्या समस्यांतून मार्ग काढायला ते समर्थ आहेत. त्यांना धाकात ठेवावं… गरीब-दुबळी-शेतकरी-कष्टकरी- रोजचं कमावून रोज खाणारी जी बहुसंख्य जनता आहे, ती धाकटी बाळं आहेत. सत्ताधार्यांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी. दूधपित्या बाळासारखी ती फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून आहे!
राजा कसा असावा याबाबत मार्गदर्शन करणारे तुकोबारायांनी लिहिलेले अभंग वाचून त्याचा संबंध शिवरायांच्या कार्यपद्धतीशी तपासून पाहिला तर शिवरायांच्या महानतेचं गमक आपल्याला सापडतं.
…आत्ताची पोरंपोरी ज्या वयात इन्स्टावर रील बनवण्यात गुंतलेली असतात, त्या वयात, म्हणजे वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी शिवरायांनी आयुष्याचं ध्येय ठरवलं होतं! स्वराज्य स्थापना करायचं ध्येय. असल्या स्वप्नाला कुणीही वेड्यात काढेल अशी परिस्थिती होती त्याकाळी. त्याकाळी राजसत्ता उपभोगणारे सत्ताधीश अतिशय बलाढ्य होते. त्यापुढे पोरगेल्याशा शिवरायांचा वीस-बावीस गावांचा मोकासा म्हणजे दर्या में खसखस! पण शिवरायांची ध्येयावरची नजर धारदार होती. आत्मविश्वास जबरदस्त होता. वेळ पडली तर दोन पावलं मागं येऊन, मोठ्ठी झेप घेऊन, शत्रूचा फडशा पाडण्याचा ‘जिगरा’ होता! तुकोबारायानं जणू अशा हिम्मतवाल्या लढवय्याला मार्गदर्शन म्हणून लिहून ठेवलंवतं…
‘आधी सोज्वळ करावा मारग ।
चालतां तें मग गोवी नाहीं ।।
ऐसा चालोनियां आला शिष्टाचार ।
गोवीचा वेव्हार पापपुण्य ।।
पळणें तों पळा सांडुनि कांबळें ।
उपाधीच्या मुळें लाग पावे ।।
तुका म्हणे येथें शूर तो निवडे ।
पडिले बापुडे कालचक्रीं ।।’
…आधी आपल्या मार्गातले खाचखळगे बुजवून, काटेकुटे-दगडगोटे काढून टाकून तो मार्ग स्वच्छ करावा. मग त्यावरून चालताना त्रास होत नाही… अगदी पूर्वीपासून असा शिष्टाचार चालत आलेला आहे. ‘पापपुण्य’ हा गुंतागुंतीचा व्यवहार आहे… पळायचं असेल तर अंगावरचं कांबळं टाकून द्या आणि मग पळा. नाहीतर ते आग पकडेल आणि त्याच्या लागेनं तुम्ही होरपळाल. …शेवटी तुका म्हणे- इथे जो शूर असेल तो हाच मार्ग निवडतो. बाकीचे बिचारे काळचक्रात अडकतात.
आता हे जरा ‘इस्कटून’ सांगतो. म्हणजे तुकोबाराय-शिवराय हे लोभस नातं आपल्याला लख्खपणे दिसेल… शत्रूला कधीही कमकुवत समजू नका. त्यानं तुमच्या मार्गात पदोपदी अडथळे आणून ठेवलेले असतात. सगळीकडून तुमचे मार्ग बंद होतील असा सापळा रचलेला असतो. त्याकडे दुर्लक्ष करून भावनेच्या भरात चाल करून गेलात तर तुम्ही चक्रव्यूहात फसू शकता. लै मोठं नुकसान होऊ शकतं. थोडा जरी हलगर्जीपणा झाला, तरी जबर किंमत मोजावी लागू शकते. हे टाळण्यासाठी तुकोबाराया सांगतात, ‘आधी सोज्वळ करावा मारग!’ ज्या मार्गावरून आपल्याला वाटचाल करायची आहे तो मार्ग आधी साफ करा. तर आणि तरच तुम्हाला यश मिळेल!
…यशासाठी पूर्वापार चालत आलेला एक शिष्टाचार तुकोबारायांनी सांगितला आहे. तो विचार शिवकार्यात पदोपदी दिसतो. शिवराय कधीच नशिबावर अवलंबून राहिले नाहीत. पापपुण्य किंवा योगायोग या संकल्पना फसव्या आणि गुंत्यात अडकवणार्या असतात. आपणही हे मेंदूत कोरून ठेवायला हवे की दैववाद हा यशाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा असतो.
…‘पळताना कांबळं खाली टाकून पळा. नाहीतर कांबळं आग पकडेल आणि होरपळाल.’ तुकोबारायांनी ‘कांबळं’ हे रूपक म्हणून वापरलं आहे. कांबळं म्हणजे अंगावर पांघरायचं घोंगडं. थंडीसाठी आपण घेतो ती शाल किंवा रग. कांबळं आपल्याला ऊब देतं. म्हणजेच कांबळं हे सुखासीनतेचं प्रतीक आहे. आपल्या भवताली आपण निर्माण केलेलं सुरक्षाकवच आहे. ते पहिलं फेकून दिलं पाहिजे. ऐशआरामी जगण्यापेक्षा खडतर कष्टाची तयारी पाहिजे. संकटं झेलता आली पाहिजेत. हालअपेष्टा सहन करता यायला पाहिजेत. थोडक्यात, ‘सुख को ठोकर मार. दुख को गले लगा. तकदीर तेरे कदमों में होगी… और तू मुकद्दर का बादशाह होगा!’
चारशे वर्षांपूर्वी सर्वसामान्य जनतेपासून ते या जनतेचं नेतृत्व करणार्या सत्ताधार्यांपर्यंत प्रत्येकासाठी तुकोबारायांनी किती मोलाच्या मोठी गोष्टी सांगून ठेवल्यात बघा… खर्या अर्थानं ‘जगद्गुरू’ होते ते!