राहुल गांधी म्हणतात, गुजरातमधील काँग्रेस नेतृत्वामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एका गटाचे अंतर्गत मतभेद आहेत. तर दुसर्या गटातील लोकांच्या विचारात आणि हृदयात काँग्रेस आहे. ज्यांचा रक्तगट काँग्रेस असेल तेच सच्चे शिपाई काँग्रेसला पुढे नेणार आहेत असे राहुल गांधींना वाटते.
– – –
काँग्रेसमधील असंख्य नेत्यांचे शरीर काँग्रेसमध्ये दिसत असले तरी त्यांचा मेंदू चमडी बचाव उपक्रमाअंतर्गत भाजपमध्ये भरकटतो हे राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जाऊन स्वतःच सांगून टाकले ते बरे झाले. त्यांना नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसचा रक्तगट शोधण्याची बुद्धी झाली आहे. म्हणजे आता कुठे राहुल गांधी अॅक्शन मोडमध्ये येण्याची चिन्हे दिसत आहेत. पण, आता या शोधातून काय निष्पन्न होईल?
ज्यांचा राजकारणाशी जराही संबंध नाही, पण, जे विवेकवादी आहेत, ज्यांना देशाबद्दल चिंता वाटते, देश भाजपच्या हाती गेल्याने संपूर्ण वाटोळे होईल अशी भीती वाटते, असे देशातील तमाम लोक गेल्या दहा वर्षांपासून राहुल यांना वेगवेगळ्या माध्यमातून सजग करीतच होते. भारत जोडो यात्रेत अनेकांनी त्यांना भेटून, पक्षातील घातक नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, तरच तुमच्या पक्षाचे भले होईल, असा सल्लाही दिला होता. परंतु संयम हा काँग्रेसचा गुणधर्म असल्याने पाणी नाकातोंडात गेल्यावर राहुल गांधी खळाळून जागे झालेले दिसतात. आता त्यांचे जागे होणे कृतीत बदलणार असेल तरच नेते आणि कार्यकर्त्यांचा ‘रक्तगट काँग्रेस’च असल्याचा शोध घेण्यात अर्थ राहणार आहे.
काँग्रेस हा केवळ नेहरू-गांधी कुटुंबियांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडून सतत टीका होत असते. काँग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल, राज्यसभेचे खासदार, पक्षसंघटनेत मलईदार पदे उपभोगून अजीर्ण होईपर्यंत माया जमवणार्या नेत्यांना भाजपच्या तंबूत गेल्यावर ईडी, सीबीआय, आयटीच्या धाकात काँग्रेस हा सोनिया आणि राहुल गांधींचाच पक्ष आहे अशी वक्तव्ये करावी लागतात. परंतु इंग्रजांपासून या देशाला मुक्तता मिळाली ती याच पक्षाकडून. भाजपचे उगमस्थान असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यलढ्यात कोणती भूमिका घेतली होती, याचा अख्खा इतिहास भाजपच्या नेत्यांनाही माहिती आहे. काँग्रेसच्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले. स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेस स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र बदलत गेली. नंतरच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या पिढ्या स्वतःपलीकडे विचार करण्याच्या मानसिकतेतच नसल्याचे दिसून आले. आपल्या पूर्वजांनी देशासाठी रक्त सांडले, संघर्ष केला याच माजात हे नेते राहिले. त्यांनी शिक्षणसंस्था उभारल्या. कोणी वैद्यकीय महाविद्यालय, कोणी अभियांत्रिकी महाविद्यालय, कोणी शाळांसाठी जमिनी बळकावल्या. हे नेते स्वतःचे दुकान थाटून बसले. पुढच्या अनेक पिढ्यांची त्यांनी चिंता संपविली. नेत्यांनी गलेलठ्ठ होताना देशाचा, देशातील गरीब लोकांचा विचार केला नाही आणि त्यातच काँग्रेसचा आलेख घसरत गेला. १९८९पासून काँग्रेसला उतरती कळा लागली, ती आजतागायत आहे.
१९९१ ते १९९६ आणि २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसचे सरकार असले तरी ते बहुमताचे नव्हते. काँग्रेसच्या घसरणीला कारण हे बहुतांश काँग्रेसचे नेते आहेत, परंतु याचे खापर गांधी कुटुंबियांवर फोडले जाते. खरेतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ठरवले असते तर २००४ आणि २००९मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान न करता सोनिया किंवा राहुल होऊ शकले असते. गांधी कुटुंबियांनी बलिदान द्यावे, त्याग करावा आणि आपण मात्र मलिदा खावा ही वृत्ती या पक्षातील नेत्यांमध्ये बळावत गेली आहे. काही मिळाले नाही की गांधी कुटुंबियांवर टीका करावी हा अलीकडे काँग्रेसच्या तथाकथित नेत्यांचा धंदा झाला आहे.
राहुल गांधी म्हणतात ते खरे आहे. या पक्षात अनेक नेते शरीराने काँग्रेसमध्ये दिसत असले तरीही त्यांचे मन मात्र भाजपमध्ये भरकटत असते. भाजप सत्तेत आहे आणि हे नेते सत्ताळलेले असल्याने त्यांना केवळ पदे भोगायची आहेत. ईडी-सीबीआय पासून संरक्षण हवे आहे. त्यांना तुरुंगात जायचे नाही आणि आणखी काही पिढ्यांसाठी आर्थिक सोय करून ठेवायची आहे. असे नेते भाजपकडे आकर्षित होतात. भाजपकडे मुळात नेतेच नसल्याने भाजपलाही अशा संधिसाधू नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याशिवाय पर्याय नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या मोदींच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांचा आढावा घ्या. त्यात भाजपचे कमी आणि अन्य पक्षांतून आलेले मंत्री अधिक आहेत. परंतु काही नेते जाणीवपूर्वक काँग्रेसमध्ये रखडलेले दिसतात. किंबहुना त्यांना काँग्रेसमध्येच थांबून पक्ष पोखरण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी ते भाजपच्या उमेदवाराला मदत करतात. त्यांना निवडणूक जिंकून देतात.
प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या नेत्यांचे आपसात पटत नाही. त्यांचे भांडण विकोपाला गेलेले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र अशी अनेक राज्ये नेत्यांच्या सुंदोपसुंदीमुळे हरण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. या नेत्यांना बाहेर घालवण्याची वेळ आली आहे. राहुल गांधी हे केव्हाच करू शकले असते. त्यांच्या भोवताली असणारे नेतेही एकांतात गांधी कुटुंबियांबाबत चांगले बोलतीलच अशी अपेक्षा करता येत नाही. पक्षातील एक महासचिव दुसर्या महासचिवास खासगीत शिव्या देत असतो. काही लोक राहुल गांधींना आपला नेता मानतात, तर काहींनी आपल्या सोयीच्या राजकारणासाठी प्रियंका गांधी यांना जवळ केलेले आहे. तर काही लोक सोनिया गांधीच आमच्या नेत्या आहेत असे म्हणत पक्षात गोचिडासारखे चिकटून बसलेले आहेत.
विद्यमान स्थितीत मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या क्षमतेनुसार उत्तम काम करीत आहेत. त्यांना नेता मानणारा कोणीही दिसत नाही. त्यांनी लोकसभेच्या जागा दुपटीपर्यंत नेऊन ठेवल्या. गांधी कुटुंबियांनी त्यांना काम करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिले. परंतु त्यांच्या कामात अडथळे आणणारे डोक्याने भाजपमध्ये रमणारे नेतेच आहेत. त्यामुळे गुजरातेत राहुल यांनी अर्ध्या अधिक नेत्यांना घरी पाठवण्याची भाषा केली ती त्यांना वास्तवात उतरावी लागेल. प्रत्येक राज्यात जाऊन हीच कृती करावी लागणार आहे. नवीन लोकांना संधी द्यावी लागणार आहे.
२०१४नंतर लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे मताधिक्य वाढत गेलेले आहे. आज लोकसभेत भाजपचे २४० आणि काँग्रेसचे १०१ खासदार आहेत. २०१९च्या तुलनेत २०२४मध्ये काँग्रेसला दोन कोटींपेक्षा अधिक मते मिळाली. दोन टक्क्यांनी मते वाढली. याउलट मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला एक टक्का मते कमी मिळाली आहेत. भाजपकडे संपूर्ण यंत्रणा आहेत. निवडणूक आयोगावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. विधानसभेत महाराष्ट्रात मतदान कसे वाढले हे गौडबंगाल अद्यापही कायम आहे. त्याबाबत निवडणूक आयोग माहिती द्यायला तयार नाही. अशाही परिस्थितीत काँग्रेसचे मतदान वाढत असेल तर काँग्रेसला अनुकूलता आहे असे म्हणायला हरकत नाही.
खरगे यांनी पद स्वीकारल्यानंतर वर्षभरातच भाजपची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकावर काँग्रेसचा झेंडा फडकावला, या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका होती. परंतु मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा, महाराष्ट्र इथे पक्षाला, आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. त्याची कारणमीमांसा करताना या पराभवांचे खापर खरगे किंवा गांधी कुटुंबियांवर फोडण्यात आले नाही. भाजपने यंत्रणांचा केलेला गैरवापर यावर विविध सामाजिक, राजकीय संस्था, विचारवंत बोलू लागले. यासोबतच राज्यातील काँग्रेस नेत्यांचे आपसातील वैर आणि भाजपसोबत आतून हातमिळवणी पराभवाला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कारण, देशभरातील काँग्रेसनेत्यांसाठी तीन दशकांपासून तीर्थक्षेत्र असलेल्या ‘१०, जनपथ’ला येणारे कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे लोंढे ’१०, राजाजी मार्ग’ या खरगे यांच्या निवासस्थानाकडे वळले आहेत.
राहुल गांधींनी आपली वेगळी फळी निर्माण करीत खरगेंना स्वतंत्रपणे काम करू दिले. ८२ वर्षीय खरगे यांच्याकडे जातीच्याही राजकारणात अगदी फिट्ट बसणारा परिपक्व नेता म्हणून पाहिले जाते. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुका असताना राहुल यांची भारत जोडो यात्रा सुरू होती. ते हिमाचलमध्ये फिरकले सुद्धा नव्हते. खरगे यांच्या नेतृत्वात किल्ला लढविण्यात आला. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या या गृहराज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी जोरात प्रचार केला होता. परंतु हे राज्य भाजपला गमवावे लागले. हिमाचल जिंकण्याचे श्रेय खरगेंना मिळाले. त्यानंतर कर्नाटकच्या निवडणुकात राहुल, प्रियांका आणि खरगे यांची रणनीती जादू करून गेली. खरगेंचे हे गृहराज्य असल्याचा काँग्रेसला फायदा झाला.
भाजपच्या तुलनेत रसातळाला पोहचलेल्या काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वात २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल, प्रियांका, सोनिया यांनी संपूर्ण देश पिंजून काढला. त्यावेळी काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडे मतदारांनीच पाठ फिरवली होती. काँग्रेस आता संपली अशी भाकीतं होत गेली. परंतु या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल ११ कोटी ९५ लाखांच्या जवळपास मते घेतली. राहुल गांधीमुळेच पक्षाची दुरवस्था झाल्याचा ठपका काँग्रेसच्या नेत्यांकडून ठेवण्यात आला. पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले. १९९६ ते १९९८ या काळात सीताराम केसरी हे अध्यक्ष होते. त्यानंतर २४ वर्षांनी खरगेंच्या निमित्ताने गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला मिळाला.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला असतांना दोघांनाही पक्षात शाबूत ठेवण्याची किमया खरगेंनी साधली. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तेव्हा सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील वाद शमवून उत्तम सरकार देण्याचे श्रेयही खरगे यांनाच जाते. त्यांना छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल आणि टीएस सिंहदेव यांचे स्नेहमीलन करता आले. नाराजांच्या जी-२३ मधील नेत्यांशी सुसंवाद होऊ शकला तो खरगेंमुळेच. पक्षाची रणनीती आखताना याही वयात दररोज १५-१६ तास ते काम करतात. त्यांची बोलण्याची शैली, कार्यकर्त्यांशी संवाद यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढता आहे. खरगे यांची जमेची बाजू म्हणजे ते कार्यकर्त्यांना सहजपणे उपलब्ध आहेत. सुरक्षा वा इतर कारणांमुळे गांधी कुटुंबातील सदस्यांबाबत ते शक्य नव्हते व नाही. खरगेंनी बेरजेच्या राजकारणावर वर्षभरात भर दिला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार्या शशी थरुर यांना त्यांनी सीडब्ल्यूसीमध्ये घेऊन विरोधकांना आत्मसन्माने वागविण्याचा आदर्श घालून दिला. ही कृती सध्याच्या पराकोटीच्या विद्वेषाच्या राजकारणात खरगेंची राजकीय उंची व आदर वाढविणारी आहे.
परंतु काँग्रेसला जोरदार धोबीपछाड देत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भाजपचे सरकार आले. इथे अतिलालसेपोटी इंडिया आघाडीला ठेंगा दाखवत ‘एकला चालो रे’ची भूमिका घेणे काँग्रेसला महागात पडले होते. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपला हिंदीभाषिक राज्ये हरणे कोणत्याही स्थितीत परवडणारे नव्हते. त्यामुळे साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर निवडणुकांमध्ये झाला.
मध्य प्रदेशात कमलनाथ असोत की दिग्विजय सिंग, राजस्थानात अशोक गहलोत आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना बाजूला सारत सर्व सूत्रे स्वत:च्या हाती घेतल्याचे चित्र होते. कमलनाथ यांनी तर कहरच केला. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशात एकही जागा द्यायची नाही अशी भूमिका घेतली होती. त्यावर अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा कमलनाथांकडून ‘कोण अखिलेश वखिलेश’ असे शब्दप्रयोग झाले. गोदी मीडियाच्या व्यासपीठावर जायचे नाही असा निर्णय इंडिया आघाडीने घेतला होता. त्याच पत्रकारांना कमलनाथ खास विमानातून मुलाखती देताना दिसले. भाजपच्या नेत्यांप्रमाणे कमलनाथ बागेश्वर धामच्या धीरेंद्रचे पाय धरताना दिसले. एकूणच शेवटच्या काळात भाजपची ‘बी टीम’ असल्याप्रमाणे कमलनाथांचे वावरणे असते. कमलनाथ काँग्रेससोबत खरंच प्रामाणिक होते का, असा संशय बळावतो आहे. ते भाजपमध्ये केव्हा जातील याचा नेम नाही.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. काँग्रेसच्या या नेत्यांवर शेवटच्या काळात कोणते दडपण आले याचा काँग्रेस अद्याप शोध घेऊ शकलेली नाही ही या पक्षाची शोकांतिका आहे. या सगळ्याच नेत्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त करीत मार्गदर्शक मंडळात बसविल्याशिवाय काँग्रेसला अच्छे दिन येण्याचे दूरवर चित्र नाही. तेलंगणात तरुण नेतृत्वाने विजय मिळवून दिला. तरुणांच्या हाती पक्ष सोपवणे काळाची गरज आहे. यात भाजपने नेहमीच आघाडी घेतली आहे. गांधी कुटुंबियांनी कष्ट उपसायचे आणि त्या भरवशावर नेत्यांनी सत्ता भोगायची हे दिवस आता उरले नाहीत. काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला मतदारांच्या दारात जावे लागणार आहे. हरियाणात भूपेंद्र सिंग हुड्डा आणि कुमारी शैलजा यांचे राजकीय वैर गिनीज बुकात नोंदवण्यासारखे आहे. यांच्यामुळेच येऊ पाहणारी हातची सत्ता गेली अशी तीव्र नाराजी राहुल गांधी यांना व्यक्त करावी लागली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे सचिव आणि हरयाणाचे प्रभारी प्रफुल गुडधे पाटील यांनी हुड्डा आणि शैलजा यांना न जुमानता स्वतःच निर्णय घेतले, त्यामुळे काँग्रेसचा आकडा ३७ पर्यंत पोहचू शकला. अन्यथा या राज्यात काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणी स्थिती निर्माण झाली असती.
महाराष्ट्रातील चित्र तरी कुठे वेगळे होते? भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात असतांना त्यांनी अथक प्रयत्न घेतले. त्यानंतर तर ते राहुल यांच्या गळ्यातील ताईत झाल्याचे दिसून आले. ते महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना जराही दाद देत नसत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तर त्यांनी लोकांचे फोन उचलणे बंद केले. संघटनेत त्यांनी नगरसेवकाची निवडणूक जिंकू न शकणार्या कार्यकर्त्यांना प्रदेश सरचिटणीस, सचिव अशी पदे दिली. संघटनेतील कार्याध्यक्षांना वाईट वागणूक दिली, असे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जाते. याबाबत खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे तक्रारी होऊही दखल घेतली गेली नाही. त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आले. राहुल यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची यात्रा भाजपच्या दिशेने सुरु झाली होती. अशा अनेक स्वार्थी नेत्यांनी काँग्रेसला फसवले आहे. राधाकृष्ण विखे पाटील असोत की मिलिंद देवरा. अशांना भविष्यात काँग्रेसमध्ये कधीही प्रवेश न देणे हा कठोर निर्णय पक्षाला घ्यावा लागणार आहे.
सर्वोदयी कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले, ही अलीकडच्या काळातील चांगली गोष्ट. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. जमिनीवर अंथरुण टाकून पाय पसरणारा माणूस आहे. अत्यंत निष्ठेने पक्षाचे काम केले आहे. पंचतारांकित ही कल्पना त्यांना मान्य नाही. राहुल गांधींनी त्यांची निवड करणे आणि पक्षाने ते मान्य करणे यातून पक्ष कात टाकतोय असे दिसते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते पक्षाचे बलस्थान आहेत. तरुणांमध्ये सतेज पाटील, प्रफुल्ल गुढधे पाटील, अमित देशमुख यासारख्या विश्वासार्ह चेहर्यांमध्ये काँग्रेसला जुने वैभव प्राप्त करून देण्याचा क्षमता आहेत. विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, विश्वजित कदम यासारख्या नेत्यांकडून काँग्रेसला खूप अपेक्षा आहेत. परंतु यांनाही भाजप खुणावत असल्याच्या रंजक कथा ऐकायला मिळतात. डॉ. नितीन राऊत हे केवळ एका समुदायाचे नेते झाले आहेत. यशोमती ठाकूर लढवय्या नेत्या आहेत. त्यांना वाणीवर संयम ठेवायला सांगत त्यांचा संघटनेसाठी उत्तम उपयोग केला जाऊ शकतो. या सगळ्यांची मोट बांधण्याची जबाबदारी आता सपकाळ यांच्यावर आहे.
काँग्रेसला सोडून भाजपात गेलो नाही तर तुरुंगात जावे लागेल असे सांगत सोनिया, राहुल, खरगे यांच्या पायाशी लोटांगण घालणारे अनेक नेते आहेत. अहमदाबादच्या दौर्यावर राहुल गांधी म्हणतात, गुजरातमधील काँग्रेस नेतृत्वामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एका गटाचे अंतर्गत मतभेद आहेत. तर दुसर्या गटातील लोक मात्र लोकांच्या पाठीशी राहतात, त्यांच्यासाठी लढतात, त्यांच्या विचारात आणि हृदयात काँग्रेस आहे. तेच आमचे सच्चे कार्यकर्ते आहेत. ज्यांचा रक्तगट काँग्रेस असेल तेच सच्चे शिपाई काँग्रेसला पुढे नेणार आहेत असे राहुल गांधींना वाटते.
परंतु दूषित रक्त झालेले नेते, कार्यकर्ते फक्त गुजरातमध्येच नाहीत. पक्षात स्वच्छता मोहीम तातडीने राबविण्याची गरज आहे. याची सुरुवात राहुल यांना त्यांच्याभोवतीच्या गराड्यापासून करावी लागेल. त्यात काही प्रवक्ते आहेत, महासचिव, सचिव आहेत. भाजपच्या नेत्यांसोबतच्या यांच्या बैठका मैत्रीपूर्ण असतात असे सांगितले जाते. परंतु ही मैत्रीच पक्षाला पोखरत चालली आहे. मुळावरची कीड नष्ट केली तरच महावृक्ष वाचेल.